गौरी गणपतीचा सण आला की,मला नेहमी एका गोष्टीची आठवण होते.मी गरोदर असताना मी आणि माझी आई चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो,गौरी गणपतीचा सण होता त्यामुळे उत्सहाचे वातावरण होते.आईला म्हणाले आपण आज चालतच घरी जाऊ या तितकेचं पाय मोकळे होतील.येताना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्यासाठी म्हणून मेडिकलमध्ये गेलो.तिथे असणाऱ्या बेंचवर मी बसले होते,पण काही वेळेतच मला गरगरायला लागले,चक्कर यायला लागली,घाम फुटला आणि डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली.मला उठून आईपर्यंत चालत जाणे पण शक्य होत नव्हते आईला सांगणे गरजेचे तर होतेच,कशीबशी मी चालत जाऊन आईला सांगितले,आई घाबरली कारण अशा नाजूक अवस्थेत आधीच काळजी घेतली जाते आणि त्यात असं काही झालं की चिंताच लागून राहते.आईला काय करावे हे सुचेना.घर जवळ असून देखील घरून कोण येऊ शकेल असं कोणीच नव्हते
मी बसले होते तिथेच थोड्या अंतरावर काही आजीबाई गप्पा मारत बसल्या होत्या.क्षणाचाही विलंब न लावता त्यातील एक आजीबाई माझ्या जवळ आल्या व आईला विचारले काय झालं?आईने सर्व सांगितले.माझी अवघडलेली परिस्थिती आणि आईचा घाबरलेला चेहरा बघून ताबडतोब त्या आजीबाईं आईला म्हणाल्या,
“इथंच आत माझं घर आहे,तिथे आपण हिला नेवू या तिला बरं वाटेपर्यंत तिला थांबू देत,चला मी कुलूप उघडते माझ्या मागून या”
या ओढवलेल्या प्रसंगामुळे आम्ही आजीबाईंबरोबर गेलो.मला चालनही शक्य नव्हते.तसंच डोळ्यांपुढे अंधारी येऊन,तोल जात होते.तशीच मी आजीबाईंच्या घरी पोहचले.
आजीबाईंच्या घरी गेल्यावर आजीबाईंनी प्रथम मला झोपायला सांगितले थोडावेळ शांत पडून राहिल्यावर आलेली चक्कर कमी व्हायला लागली.थोडं बरं वाटल्यावर आजीबाईंनी प्यायला पाणी दिले.त्यानंतर त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी पाठवलेला गौरी गणपतीचा प्रसाद मला खायला दिला.चहा ठेवला.जोपर्यंत मला पूर्ण वाटत नाही तोपर्यंत थांबून ठेवलं.आजीबाईंचा निरोप घेऊन निघताना मी पाया पडले.आजीबाईंमधील या माणुसकीच्या दर्शनाने नकळत डोळे पाणावले.
काय नातं होत माझं आणि आजीबाईंच?कोण होत्या त्या माझ्या?रक्ताच्या तर कुणीच नाही,पण रक्तापेक्षा माणुसकीच्या नात्याच्या होत्या.आजीबाईंनी माणुसकीच नातं जपलं होत.अशा माणसांपुढे आपोआपच हात जोडले जातात.आधीच्या पिढ्यांमध्ये संस्कार,आपलेपणाची भावना होती.खरंतर जगामध्ये अशा लोकांची गरज आहे,आपल्या समाजाला गरज आहे.यांच्याकडून शिकण्यासारखे असताना त्यांना वृद्धाश्रमाकडचा मार्ग दाखविला जातो.ही खूप गंम्भीर गोष्ट तर आहेच.पण समाजाला आवश्यक असणारे संस्कार आता पुसत जाताना दिसत आहेत.कारण
संस्कार करणारेच आता वृद्धाश्रमात आहेत.
आज या गोष्टीला आठ वर्षे झाली पण आजही दर गौरी गणपतीच्या सणाला त्या आजीबाईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही.एका परक्या व्यक्तीसाठी आजीबाईंनी किती तरी पटीची मदत केली होती.गौरीच्या रूपात त्या आजीबाईं भेटल्या होत्या.अशा या आजीबाईंमधील माणुसकीला सलाम.
चैत्राली भिलारे.
पुणे.
23.9.2021











माणूसकीचे दर्शन घडवणारी आजीबाई छानच.
🙏धन्यवाद प्रीती मॅडम 🙏
खुप छान
🙏धन्यवाद वीणा मॅडम 🙏
अप्रतिम 👌
🙏धन्यवाद 🙏