मंजिरी- स्त्री कथा
दिवस उजाडायचाच होता. मंजिरी रोजच्या सारखी सतार वाजवत होती. तिची रियाजाची ती वेळच होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. सतार बाजूला ठेऊन मंजिरीने फोन उचलला.
श्रीकांतचा भाचा अश्विनचा फोन होता. श्रीकांतचा अपघात झाला होता.
मंजिरी जेमतेम पंचेचाळीसची.एकविसाव्या वर्षी समरसोबत लग्न करुन या घरात आली.
समर IT कंपनीत नौकरीवर.
मंजिरी संगीत कलेत निपुण.
सुरेल गळा आणि स्वरांची जाण.
सतार उत्तम वाजवायची.
एका कार्यक्रमात गात असतांनाच समर लुब्ध झाला तिच्यावर, तिच्या गाण्यावर.
दोघांचे लग्न झाले .
समरच्या घराला घरपण आणले मंजिरीने.
समर आॕफिसमध्ये गेला कि मंजिरी एकटीच घरी राहायची.
तिचा वेळ जावा म्हणून गाण्याचे क्लासेस सुरु करायची कल्पना त्याचीच.
मंजिरीने क्लासेस सुरु केले .बरेच विद्यार्थी मिळाले तिला.
लग्नानंतर दोन वर्षात वेदचा जन्म झाला आणि नंतरच्या दोन वर्षात वेदिका आली.
समरला नेहमी टूरवर जावे लागायचे.
म्हणून समरने गावी राहणाऱ्या आईवडीलांना सोबत राहायला बोलवून घेतले.
लहान असतांनाच आईवडील गमावलेल्या मंजिरीने सासु सासऱ्यांशी जुळवून घेतले.
दिवस असेच आनंदात ,समाधानात चालले होते.
पण नियतीचा खेळ विचित्र असतो.
एकेदिवशी टूरवर गेलेला समर वापस येतच नाही.
समर विमान अपघातात जातो.
मंजिरी,आईवडील यांना धक्काच असतो हा.
सासु सासऱ्यांकडे बघून मंजिरी आणि मंजिरीकडे बघून सासुसासरे सावरतात स्वतःला.
मंजिरी सावरली असे भासवत असली तरी मनाने पार कोलमडून जाते.
उणापुरा दहा वर्षाचा संसार.
समर सोडून निघून गेला. सर्वच अविश्वसनीय,अकल्पीत.
आठ वर्षाचा वेद आणि सहा वर्षाची वेदिका अजाण वयात असतात.
आता बाबा आपल्याला दिसणार नाहीत एवढीच जाणीव झाली त्यांना .
आईच्या दुःखाची तीव्रता समजण्याइतपत समंजसपणा त्यांना अजून आलेला नसतो.
मंजिरी मुले आणि सासुसासरे यांच्यासोबत एकेक दिवस ढकलते.
सासुचे ह्दय मंजिरीकडे बघून पिळवटून जाते.
मंजिरीने पुर्वीसारखेच पुन्हा क्लासेस सुरु करावेत अशी सासुबाई गळ घातली.
खूप समजूत घातल्यावर मंजिरी तयार झाली.
पुन्हा क्लासेस सुरु केल्यानंतर हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत गेली.
गाणे आणि सितार दोन्ही क्लासेस सुरु करते ती. तिच्यात असलेल्या संगितातील जादुमूळे बरेच विद्यार्थी मिळतात तिला.
त्यातलेच एक श्रीकांत.
श्रीकांत लहानपणीच वडील गेलेले.आई आणि दोन बहीणींची जबाबदारी डोक्यावर. बहीणींची शिक्षण ,लग्न यातच त्याची उमेदीची वर्ष
निघून गेली.
स्वतःचे लग्न,कुटूंब हा विचार करायला सवडच नाही मिळाली श्रीकांतला.
आता पंचेचाळीशी उलटल्यानंतर स्वतःच्या जगण्याचा विचार सुरु केला.
लहानपणापासून सतारची आवड असलेल्या श्रीकांतने मंजिरीच्या क्लासमध्ये जायला सुरुवात केली.
मंजिरी सतार वाजवत असतांना निघणारे आर्त सुर श्रीकांतला जाणवायला लागले.
तिच्याकडे त्यांचे एकटक बघत राहणे,…..
मंजिरीला जाणवली त्यांना वाटणारी तिची ओढ.
समर नंतर एकटी पडलेली मंजिरी श्रीकांतच्या सहवासात पुन्हा मोहरायला लागली.
सतारमधून निघणारे आर्त सुर निघणे बंद झाले आता.
मंजिरी श्रीकांतला घेऊन सासु ,मुलांना भेटायला घरी घेऊन आली.
मुले जाम फिदा झाली श्रीकांतकाकांवर.
श्रीकांतकाकांबरोबर फिरणे,बागेत जाणे,सिनेमे बघणे आवडात होते त्यांना. एकेदिवशी मंजिरीने मुलांना जवळ बोलवून विचारले,’बाळांनो मी श्रीकांतकाकांसोबत लग्न केले तर चालेल का?
मुले सैरभैर झाली. तिला काहीही उत्तर न देता आजीला जाऊन बिलगली.
मंजिरी द्विधा मनस्थितीत सापडली.
तिच्या विराण आयुष्यात श्रीकांतच्या रुपाने हिरवळ येऊ पाहत होती.
पण मुले बाबांची जागा श्रीकांतला देऊ शकत नव्हते.
सासुबाईंनी मंजिरीला समजावून सांगितले ,’अग, मुले लहान आहेत अजून. एकदा तू लग्न केले कि हळूहळू श्रीकांतची सवय होईल त्यांना. ‘
मंजिरीलाही वाटले श्रीकांत जिंकून घेतील मुलांना
मंजिरी – श्रीकांतने लग्न केले.
श्रीकांतला काही पाश नव्हतेच.
ते मंजिरीसोबत राहायला आले.
मंजिरीला समरच्या जाण्याने आलेला एकटेपणा श्रीकांतच्या येण्याने संपला होता.
वेद तेरा आणि वेदिका अकरा वर्षाचे झाले एव्हाना.
श्रीकांतला मुलांचा नकार माहीत होता.
श्रीकांतने मुलांना जिंकायचे प्रयत्न सुरु केले पण मुले दाद देत नव्हते.
सतत आपल्या घरी कुणीतरी अनोळखी मनुष्य आला या नजरेनेच श्रीकांतकडे बघत होते.
पण मुलांच्या आततायी वागण्यामूळे मंजिरीला अपराधीपणा वाटायचा.
आई म्हणून आपण कमी पडतोय कि काय ही भीती वाटायची.
श्रीकांतशी लग्न करुन मुलांवर अन्याय केला का ही टोचणी बोचायची सतत.
श्रीकांतलाही मंजिरीची मधल्या मध्ये होणारी कोंडी लक्षात येत होती.
तो तिची आणि मुलांमध्ये होणारी घुसमट बघत होता.
मुलांना जिंकण्याचे प्रयत्न सार्थकी लागतील ही आशा हळूहळू मावळत गेली.
केवळ मंजिरी आनंदी राहावी या हेतूने तिच्याशी लग्न करणाऱ्या श्रीकांत ला तडजोड करुन मिळणारा आनंद नको होता.
आनंद निखळ असावा. त्यात तडजोड नसावी.
असेच त्यांना वाटायचे.
मुले आपला वडील म्हणून स्विकार करतील ही आशा संपली होती.
आपल्यामुळे मंजिरीपासूनही मुले दुरावत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंजिरीचे घर सोडायचे ठरवले.मंजिरीलाही सांगितले तसे.तिनेही मुले नाराज होतील म्हणून त्याला थांबण्याचा आग्रह केला नाही.
मुलांनी श्रीकांतला कधीच आपले मानले नव्हते. श्रीकांत गेल्यावर समर गेल्यानंतरचीच अवस्था परत आली मंजिरीच्या आयुष्यात.
पुन्हा तोच एकटेपणा,पुन्हा तेच सतारचे आर्त सूर आळवणे.चार पाच वर्ष गेली मध्ये.
मुले आता मोठी झाली .दोन्ही मुलांनी आपापले जोडीदार निवडले होते.
संसार थाटले होते. मंजिरीची काळजी घेत होते जबाबदारी म्हणून.
पण मंजिरीचा एकटेपणा घेऊ शकत नव्हते.
आयुष्यात आनंदात जगायचे असेल तरमनाला भावणारी सोबत लागते हे आईच्या बाबतीत मुलांच्या लक्षात येत नव्हते.
मंजिरी विचार करत होती,आई मुलांच्या चेहरा बघून त्याच्या मनात काय चाललयं हे ओळखते. मुलांचे तसे नाही. आईवर शेवटपर्यत फक्त आपलाच हक्क आहे याच समजूतीत असतात ती.
आई एक स्त्री आहे तिला काही गरजा,काही भावना आहेत हे कायम विसरतात .
खरे म्हणजे समर गेला तेव्हा मुले लहान होती. त्यांच्याजवळ वडीलांच्या खूप आठवणी होत्या असेही नाही. सहजतेने ते आईसाठी श्रीकांतचा वडील म्हणून स्वीकार करु शकले असते.पण केवळ आई आपलीच असावी या अट्टाहासाने त्यांनी श्रीकांतचा स्वीकार केला नाही.
मंजिरीने मुलांना कधीही समरची कमतरता जाणवू दिली नाही.
स्वतःचा एकटेपणा बाजूला ठेऊन त्यांचा सांभाळ गेला.
श्रीकांतशी लग्न केल्यानंतर श्रीकांतही त्यांना स्वतःच्या मुलासारखेच जपत होते. पण मुले दुर्लक्ष करीत राहीली त्यांच्याकडे.
आज श्रीकांतला मंजिरीची गरज होती.
मंजिरीचे श्रीकांतला भेटायला जाणे मुलांना आवडणार नाही हे मंजिरीला माहीत होते पण आता यावेळेस तरी ती फक्त एकटीपूरता निर्णय घेणार होती.
याआधी तिने मुलांच्या खोट्या हट्टापायी एकटेपणा ओढवून घेतला होता. पुन्हा ती चूक तिला करायची नव्हती.
बाहेर तांबडे फुटायला लागले.
पहाट होत होती.
सुर्याच्या सोनेरी किरणांनी अवघं वातावरण प्रसन्न झालेले. मंजिरी उठली,पायात चप्पल चढवली ,
हातात पर्स घेऊन दवाखान्यात असलेल्या श्रीकांतला भेटायला निघाली….










खूप छान
छान… लिखाण …
आयुष्याची नविन सुरुवात 👍
अप्रतिम
Khup sundar