पावसातील अपघात- पाऊस कथा
पावसातील अपघात- पाऊस कथा

पावसातील अपघात- पाऊस कथा

 

शेवटच्या तासिकेची घंटा पडली..तशी शरयू वर्गाबाहेर आली.. दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसाचा जोर अजून वाढतच होता.त्यामुळे शाळेच्या आवारातून बाहेर पडताच..घरी मुलांना फोन लावून पोहोचायला उशीर होईल म्हणून सांगून छत्री घेऊन ऑटो स्टॅन्डकडे निघाली.. सकाळी ती घरातून बाहेर पडताना रुचीचा रडवेला झालेला चेहरा तिला सारखा आठवत होता..पाऊस सुरू झाला की तो थांबेपर्यंत ती कावरीबावरी होऊन अगदी माझी पाठ सोडत नाही…
दोन्ही मुले यावेळी घरी एकटीच असल्याने त्यांच्या काळजीने शरयूचा जीव वरखाली होऊ लागला..
माझी रुची जेमतेम महिनाभराची आणि समय चार वर्षाचा..
तेव्हा अशाच एका रात्री श्री कायमचा घरातून न सांगता निघून गेला तो कधी परतला नाही..
त्याचा छोटासा टेक्सटाईल चा व्यवसाय फार काही श्रीमंती नव्हती..पण सुखी संसार होता माझा… श्री ला पहिले पासून व्यवसायात आवड त्याने स्वतःच्या मेहनतीने, हुशारीने व्यवसायात बऱ्यापैकी जम बसवला.. पैसा हाती खेळू लागला.. पण त्याच्या साध्या सरळ स्वभावाचा
मित्रमंडळींनी व जवळच्याच नातेवाईकांनी गैरफायदा घेतला..पैसा होता तोवर जे लोक विचारत होते. तीच लोक नंतर त्याला टाळू लागल्याने नाराज श्री घराबाहेर पडला..
दोन लहान मुलांकडे पाहून सुरुवातीला जवळच्या नातेवाईकांनी थोडीफार मदत केली… श्रीला शोधण्यासाठी पण त्यांनी मला खूप मदत केली.. पण श्री …सारे प्रयत्न व्यर्थ गेले नातेवाईकांच्या मदतीवर किती दिवस तरी जगावे तेव्हा गावातच राहणारी आपली मैत्रीण कल्याणीने तिच्या ओळखीतून आपल्याला लहान मुलांच्या शिकवण्या चालू करून दिल्या…
सोबतच शाळेत नौकरीसाठी अर्ज पण भरून दिला… यात तिचा भाऊ
सुदीपची पण खूप मदत मिळत गेली… आणि श्री नंतर सुदीप माझ्या आयुष्यात आला. .मी त्याच्या प्रेमात पडले..
सुदीपची अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती.. त्याने लग्न करून मला आयुष्यभर सोबत राहण्याची इच्छा बोलून दाखवली.. तेव्हा दोन मुलांची आई बायको म्हणून तुला चालेल का ?असे मी मजाकीने विचारताच… विश्वासाने माझा हात स्वतः च्या हाती घेऊन…हो..का नाही चालणार … असे त्याने म्हणताच.. मी मनोमन सुखावले …पण माझे हे नाते समाजाला मान्य होईल का? माझ्या सासरची मंडळी या लग्नाला तयार होईल का? यासोबत मामाजी माझ्या लग्नाला परवानगी देतील का? सुदीपने माझ्या मनातील चलबिचल ओळखून मला सर्व काही नीट होईल असा धीर दिला.. व योग्य वेळ पाहून एक दिवस घरी येऊन मामाजींना (श्री च्या वडीलांना) माझा हात मागितला..सुरुवातीला ते एकदम गोंधळले पण लगेच माझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून समाजातील लोकांची, नातेवाईकांची पर्वा न करता माझ्या बाजूने उभे राहिले ..आणि स्वतःच्या सुनेची पोटच्या मुलीप्रमाणे लग्न लावून दिले… सासूबाईचा माझ्या दुसऱ्या लग्नाली पूर्णपणे विरोध होता…
घरासमोर ऑटोला करकचून ब्रेक लागताच .. शरयूच्या भूतकाळातील आठवणींना पण ब्रेक लागला…आणि ती ऑटोतून उतरून घराच्या पायऱ्या चढू लागली.. घरातून मुलांच्या किलबिलाटा सोबत खमंग थालीपीठाचा दरवळ सुटला होता..आतमध्ये पाऊल टाकताच तिला मुले आनंदाने थालीपीठाचा आस्वाद घेताना दिसली.. हुबेहूब सासू बाईच्याच हातच्या थालीपीठाचा खमंग दरवळ ..
म्हणजे त्या आल्या तर..
. पण न सांगता अशा अचानक…
मामाजी वारल्यानंतर त्या मला भेटणे तर दूर पण फोन वर बोलणे सुध्दा टाळत होत्या.. जुन्या विचारांच्या सासूबाईंना माझे सुदीपसोबत चे लग्न केव्हाच मान्य नव्हते.. पण मामा जींसमोर त्यांचे काहीच चालले नाही..
शरयूची चाहूल लागताच गरमागरम चहाचा कप तिच्या हाती देत सासूबाई तिला म्हणाल्या..
मला…इथे असे अचानक बघून तुला आश्चर्य वाटले न शरयू.. अग तुझे सासरे, माझा कुंकवाचा धनी या दुनियेत मला एकटे सोडून गेल्यापासून एकटेपणा काय असतो हा मला खऱ्या अर्थाने जाणवला..म्हणून माझी चूक दुरुस्त करण्यासाठी मी तुम्हाला भेटायला आले..
सासूबाईंनी आपले दोघांचे नाते स्वीकारले ही आनंदाची बातमी सुदीपला द्यावी ..
म्हणून शरयू ने फोन हाती घेतला पण फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर… कदाचित ढगाळ वातावरणामुळे फोन लागत नसावा.. तसाही आज सुदीप त्याची सर्व काम आटोपून निघणार.. पण निघण्यापूर्वी एकदा फोन करून कळवतो असे म्हणाला होता. पण अजून पर्यंत त्याच्या फोन आला नाही..तिची बेचैनी वरच्या वर वाढू लागली..पावसाची संततधार चालूच होती.. ढगाळ वातावरणामुळे बाहेर काळोख दाटून आला होता. वेळ जाण्यासाठी म्हणून शरयूने टिव्ही चालू केला.. तर टीव्हीवरील एका बातमीने तिचे लक्ष वेधून घेतले..
काल पासून हाहाकर माजवलेल्या मुसळधार पावसाने साताऱ्याकडे येणाऱ्या गाडीचा पुलावर भीषण अपघात… पुरात चार लोक मृत्युमुखी पडली. तसेच काहीजण वाहून गेल्याचा अंदाज .. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता… साताऱ्याकडे येणारी गाडी.. म्हणजे …सुदीप याच गाडीत नाही..नाही ..गाडी क्रमांक MH..2908….हो.. हो हाच तर त्याच्या गाडीचा नंबर .. याच गाडीत सुदीप त्याच्या सहकार्‍यांसोबत गेला होता. सुदीप…. तिच्या मनाला आशंकेने घेरून काळजातील धडधड वाढली तेव्हा काळीज फाटून जणू आपल्या हाती येईल असे वाटू लागले..ती धावतच फोनकडे जाऊन पुन्हा पुन्हा सुदीपला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागली….पण फोन लागत नव्हता…
मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये जगन शिंदे ,गणेश पाटील ,विनय साळवे ..ही तर सुदीपसोबतचीच लोक.. तिला आता पावसातही भितीने दरदरून घाम फुटु लागला…म्हणजे सुदीपही..नाही नाही सुदीप….तू मला असे अर्ध्यावर सोडून जाऊ शकणार नाही.. सुदीप… म्हणत एकदम तिने मोठ्याने टाहो फोडला.. तोच दारावरची बेल वाजली डोळ्यासमोर सुदीपला सुखरुप अवस्थेत पाहून अश्रूंना पुसत घाबरून त्याला एकदम गच्च मिठी मारून हुंदके देत म्हणाली,
सुदीप तुझ्या गाडीला तर अपघात..
हो..तो..भयंकर अपघात माझ्या ऑफिसच्याच गाडीचा.. माझे नशीब चांगले म्हणून .. मी आईच्या फोनमुळे वाचलो.. आपल्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आईने सरप्राईज देण्यासाठी मला फोन करून होईल तितक्या लवकर तिथून निघण्यास सांगितले… मी आईचा निरोप मिळताच लगेच निघालो. नाही तर या अपघातात सर्वांसोबत मी पण .. खरं सांगू शरयू सुदीप भावनाप्रधान होत म्हणाला..
आईच्या आशीर्वादाने व तुझ्या प्रेमाने मला मरणाच्या दारातून…
सुखरुप परत आणले.,..

सौ. दर्शना भुरे हिंगोली.

(तुम्हीही तुमचे लिखाण marathi.shabdaparna.in साईटवर  वर पाठवू शकता.)

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!