Gangubai Kathiyawadi-movie review in marathi
Gangubai Kathiyawadi-movie review in marathi

Gangubai Kathiyawadi-movie review in marathi

 

Gangubai Kathiyawadi इज्जतसे जीनेका डरने का नही-शब्दपर्ण
Gangubai Kathiyawadi-movie review in marathi
जरा सोचो कामाठीपुरा नही होता तो….
सगळ्यांनी उभे राहून भाषण दिल्यानंतर स्टेजवर खुर्चीवर बसून बिनधास्त, बेडर गंगुबाईचा समोर बसलेल्या जनतेला, स्टेजवर  बसलेल्या पांढरपेशा लोकांना विचारलेला हा प्रश्न
पंधरा, सोळा वर्षाच्या अल्लड,भोळ्या, प्रियकराच्या प्रेमावर अतुट विश्वास असणाऱ्या  गंगापासून गंगू आणि  गंगुपासून गंगुबाई पर्यंतचा प्रवास म्हणजे संजय लिला भन्साळीचा,भन्साळी स्टाईलमधला  गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा.
समोरील पडद्यावरुन क्षणभरही नजर हलू न देणारा गंगुबाई काठियावाडी सिनेमा कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत सर्वच  बाबतीत अव्वल आहे.
सिनेमाची सुरुवातच अंगावर शहारे आणणारी आहे.नुकतीच वयात आलेली मुलगी कोठ्यावर विकण्यात येते.वेश्या बनण्यासाठी नकार दिल्याने दोन दिवस तिला मारहाण करण्यात येते.नकारावर ठाम असलेल्या तिला समजवण्यासाठी त्या कोठ्याची मालकीण गंगुबाईला बोलवते. सिनेमात गंगुचा प्रवेश होतो.
गंगुबाई  मुलीला भेटते आणि इथून प्रेक्षकांसमोर गंगुचे आयुष्य उलगडत जाते.त्या मुलीला समजवतांना गंगु तिला स्वतःची कथा सांगते.
वडील बॕरीस्टर,घरी सधनता असलेली गंगा मुंबईत येऊन हिरोईन बनण्याचे स्वप्न बघते.तिचा प्रियकर रमणिक हिरोईन बनवण्याचे आमिष दाखवतो त्याच्यावर विश्वास ठेवून ती मुंबईत येते.गंगाला पाचशे रुपयात शीलाबाईच्या कोठ्यावर विकतो.अनभिज्ञ असलेल्या गंगाला शीलाबाई एका खोलीत बंद करते.वेश्या बनायला तयार होण्याशिवाय गंगाजवळ पर्याय उरत नाही.
बदनाम कामठीपुरा,रात्री चंद्रासोबत उजाडणारा दिवस, जबरदस्तीने वेश्या बनलेल्या,आहे ती परिस्थिती अनिच्छेने स्विकारणाऱ्या तरुण मुली ,त्यांचा गि-हाईक आकृष्ठ करण्यासाठी देहाचा आटापिटा.गंगाही दोन दिवसात त्या बदनाम रस्त्यावर शरीर नटवून उभी राहते. दोन दिवसापूर्वी रमणिक सोबत आलेली अवखळ,जिवंत  गंगा संपते.
सिनेमात गंगा पहिल्यांदा रात्री रस्त्यावर उभी राहते ते दृश्य डोळ्यात पाणी उभे करते.
चेहऱ्यावर पावडरचे थर,ओठांना भडक लिपस्टिक, उभे राहण्यात उत्तानपणा पण डोळे कोरडे,भावहीन. पुतळ्यासारखी  दिसते.
ह्या पहिल्या रात्रीनंतर गंगा सराईत होत जाते.तिच्यावर गि-हाईक खूष होऊन दोगुना भाव देतात.
गंगु मुलीला कथा सांगतांना तिच्यात स्वतःला बघते.
मुलगी तिचा हट्ट सोडत नाही.गंगु कोठेवालीला पैसे देवून तिला तिच्या गावी पाठवते.
पुढे  कोठ्यावर तिची वट वाढत जाते.ती शिलाबाईवर  वरचढ होते.तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या  पुरुषावर सुड उगवते.अशाच एका प्रसंगात करीम लाला तिला न्याय देतो.गंगा त्याला भाऊ मानते.त्याचा कामाठीपुऱ्यातील दारुचा धंदा तिच्या ताब्यात देतो.
गंगुबाई निवडणूकीत उभी राहते. मातब्बर रजियाबाईला हरवून प्रेसिडेंट बनते.
कामठीपुऱ्यातील वेश्या आणि  मुलांच्या हिताचे कामे करते.
सिनेमा भन्साळीचा आहे.त्यामुळे दिग्दर्शन,फोटोग्राफी,सिनेमाचे सेटस् सगळेच उच्च दर्जाचे.
सिनेमातील पहिलेच दृश्य प्रेक्षकांना (मुलीचे नाक टोचतांनाचे)आपल्याला हादरवून टाकते.सिनेमा पहिल्या दृश्यापासून पकड घेते.
गंगुबाईची कथा माहीत असली तरी पुढे काय ही उत्सुकता सिनेमा संपेपर्यंत कायम राहते.
सिनेमा स्त्रीकेंद्री आहे. गंगुबाई बनलेल्या आलिया भटचा अभिनय अतिशय कसदार आहे. गंगुबाई तिच्यासारखी कोणी रंगवली नसती असे वाटण्या इतपत तिचा अभिनय दर्जेदार आहे.
साधीसी गंगा, मुबईत येऊन हिरोईन बनण्याचे स्वप्न रंगवणारी, रमणिक तिचे स्वप्न पूर्ण करणार ह्या भाबड्या विश्वासाने त्याच्यासोबत मुंबईत येणारी गंगा तिची फसवणूक असहाय्यपणे मान्य करते आणि पुढे  जाते.
पहिल्या रात्री पुतळ्यागत रस्त्यावर उभी राहणारी गंगा, देहविक्रीनंतरची पहिली कमाई दिव्याच्या जाळणारी गंगा,
आज सेठने मुझे नया नाम दिया है गंगु….असे सांगतांना आलिया भट गंगुचे दुःख, वेदना आपल्यापर्यत पोहचवते.
आफशानच्या प्रेमात पडलेली गंगु. त्यांच्यातील प्रणय, बिनधास्त गंगु आणि लाजणारा अफशान,
तिचे गच्चीतुन पत्ते फेकणे, त्याचे पत्ते झेलणे सगळेच अफलातुन रंगले आहे.
दोघेही एकमेकांवर प्रेम करतात पण गंगु प्रेमाचा त्याग करते. आणि त्याचे लग्न कोठेवालीच्या मुलीसोबत लावून देते. त्याच्या लग्नात वरवर आनंदी दिसण्याचा तिचा प्रयत्न सुरु असतो. पण तिच्या हास्यामागची  वेदना आलियाच्या अभिनयातुन जाणवत राहते.
सिनेमातील डायलाॕग्ज प्रकाश कपाडिया, उत्कर्षिनी वशिष्ट यांचे आहेत.
प्रत्येक प्रसंगात आलियाचा अभिनय, संवादफेक जबरदस्त आहे.
इज्जतसे जीनेका, डरने का नही
आँपकी इज्जत एक बार गयी तो गयी हम तो रोज रातको इज्जत बेचते है साली खतमच नही होती
कुँवारा आपने छोडा नही और श्रीमतीजी किसीने बनाया नही
शक्ती, संपत्ती और सद्बुद्धी तीनोही औरते है तो इस मर्दोकों किस बात का गुरुर?
माँ का नाम काफी नही है?
प्रत्येक दृश्यात आलिया भटने गंगुची वेदना दाखवली आहे.
अफशान बनलेला शांतनु माहेश्वरीचा अभिनयही लाजवाब असाच आहे. गंगुवर प्रेम करणारा साधासा अफशान तिला आदरही देतो.
सीमा पाहावा या गुणी अभिनेत्रीने शीलाबाईचा (कोठ्याची मालकिण) रोल उत्तम वठवला आहे.
गि-हाईक आल्यावर मध्यरात्री गंगुला उठवणारी शीला
अपने धंधेमे टाईम नही होता
शीलाबाईचा राग येतो पण त्याचबरोबर कणवही वाटते. तीही कोठ्यात गंगुसारखीच आणल्या गेली असेल हा विचारही मनात चमकतो.
गंगुची मैत्रीण बनलेली कमला ( इंदिरा तिवारी) शेवटपर्यंत गंगुला साथ देते.
रजियाबाईचा जबरदस्त रोल विजयराजने केला आहे. मेकअप, हावभाव, लकब, काहीही करुन गंगुला हरवायचेच ही जिद्द सगळेच सिनेमाला साजेसे.
सिनेमातील दृश्य म्हणण्यापेक्षा संपूर्ण  सिनेमाच मनाला सुन्न करणारा आहे.
गंगु पत्र लिहिते तो प्रसंग.
सगळ्याजणी  आपापल्या मनातील वाक्य टाकतात.आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला तरी तेव्हा आईवडिलांचे ऐकले असते तर….ही टोचणी प्रत्येकीला आहे.
आलियाच्या  आजूबाजूला ज्या मुली दाखवाल्या त्यांचाही अभिनय  उत्तम आहे.
कमली गेल्यानंतरचा प्रसंग, गंगुचे पमीला सांभाळणे.
अफशानच्या लग्नात गंगुबाईचे येणे. कोठ्यावर जाऊन एकटीनेच पत्ते खेळणे
गंगुचे तिच्या आईसोबत फोनवरचे संभाषण. अशी बरीच दृश्य  प्रेक्षकांना सुन्न करतात.
सिनेमातील गाण्यांना उत्कृष्ठ संगीत भन्साळीचे आहे.
मेरी जान मेरी जान
आयी है जो रात नशीली
जब सैया आये शामको
तो लग गये चाँद मेरे नामको
ही दोन्हीही गाणे खूप  श्रवणीय आहेत.
गंगा-गंगु-गंगुबाई. हा प्रवास बघतांना प्रेक्षकही त्या प्रवासात सामील होत जातात.
एस. हूसैन जायिदी यांच्या माफिया क्वीनस् आॕफ मुंबई या पुस्तकातील गंगुबाईच्या कथेवर आधारीत असलेला हा सिनेमा आहे. पुस्तकात रेखाटलेला गंगुबाईचा प्रवास सिनेमात अपूर्ण वाटतो.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

दर्जेदार साहित्य  लिहिण्यासाठी  आणि वाचण्यासाठी

खालील लिंक जरुर बघा.

Link

Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे  फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

4 Comments

    1. खूपच परिपूर्ण समीक्षण ! पूर्ण चित्रपट डोळ्यासमोरून सरकताना दिसला, आलिया भट च्या चेहऱ्यावरील
      भावना बारीक निरीक्षण करून मांडल्याचे प्रकर्षाने जाणवते,चित्रपट पाहण्याचा मोह आवरत नाही आता,खूप सुंदर प्रीती,अभिनंदन !

  1. Mohini1408

    खूप अप्रतिम रसग्रहण, पूर्ण फिल्म डोळ्यासमोर उभी केली. उत्तम लेखन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!