नागपूर सारख्या शहरात आजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरील बातमीने खळबळ उडवली.
नागपूर मधील सर्वात श्रीमंत व्यवसायी मंदार अग्रवालचा पछमढीला जातांना अपघात. घातपात असण्याची शक्यता.
दिवसभर शहरात हीच बातमी चर्चिल्या जात होती.
श्रीमंत असूनही तत्वे जपणारे कुटुंब अशी अग्रवाल परिवाराची ख्याती होती.
अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न झालेला मंदार वडिलांचा व्यवसाय जबाबदारीने सांभाळत होता.
वडिलांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेला व्यवसाय अजून उंचीवर नेण्याचा त्याचा प्रयत्न होता.
आणि आज अचानक….
काय असेल नक्की? पत्रकारांबरोबर लोकांनाही हाच प्रश्न पडला होता.
घातपात असेल तर कोण ? नक्कीच व्यवसायातील एखादा शत्रु असेल…लोकांमध्ये चर्चा रंगली होती.
रोज वर्तमानपत्रात मंदारची बातमी येत होती.पण फक्त तपास सुरु आहे अशी.
अपघाताचे धागेदोरे मिळत नव्हते.
त्या एरियात नव्यानेच रुजू झालेले अजित मोरेकडे ही केस आली.
ड्रायव्हर सदानंदची कसून चौकशी सुरु होती. नेमका अपघात झाला तेव्हा सदानंद गाडीत नव्हता.
गाडीचा handbreak ढिला झाल्यामुळे गाडी दरीत पडल्याचे निष्पन्न झाले.
संशयाची सुई त्याच्याकडे वळणे स्वाभाविकच होते.
अपघात झाला तेव्हा तू कुठे होता?
साहेबांनी सिगरेटचे पॕकेट संपले म्हणून मला आणायला पाठवले.
मी गाडी पार्क केली आणि गेलो साहेब.
सिगरेट घेऊन येईपर्यंत सगळे संपले होते.
जा तू.
अजित मोरेंनी मंदारची पत्नी अंजलीला चौकशीसाठी बोलवले.
मॕडम,सर नेहमी पछमढीला जायचे?
हो.तिथल्या कंपनीची कामे बघायला शुक्रवारी निघायचे इथून आणि रविवारी वापस यायचे.
तुम्ही नाही जायच्या?
जायची आधी नेहमी.एवढ्यातच जाणे होत नव्हते.बोलता बोलता अंजलीला चक्कर आली.
कोणीतरी मोरेंजवळ येऊन सांगितले
She is pregnant.
मंदारचे आईवडील काहीही बोलण्याचा मनःस्थितीत नव्हते.
मोरेसाहेब पोलीसस्टेनशमध्ये परतले.
तिथे पत्रकारमंडळी मोरेसाहेबांची वाट बघत बसून होते.
पोलीसइन्सपेक्टर अजित मोरे झपाझप चालत पोलीसस्टेशनमध्ये आले.आल्याबरोबर त्यांचा दरारा जाणवला.
पत्रकाराकडे एक कटाक्ष टाकून त्यांनी कदमला आजची फाईल आणायला सांगितले.
फाईलवर नजर फिरवत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देवू लागले.
साहेब आठ दिवस झाले.अजून खूनी सापडला नाही.
आम्ही प्रयत्न करतोय.
मंदार अग्रवालसारख्या श्रीमंत माणसाचा खूनी शोधायला
एवढा उशीर होतो आहे….
पत्रकाराचे बोलणे मध्येच तोडत अजित मोरे म्हणाले,
हे बघा, तो अपघात कि घातपात हे अजून निश्चित झाले नाही.आणि श्रीमंत असो कि गरीब पुराव्याशिवाय कुणालाही नाही पकडू शकत.
त्यांच्या आवाजात जरब होती.
पत्रकार निघून गेले.
अजित मोरेंनी कदमकडे मंदार अग्रवालची फाईल मागितली.
अपघात शिताफीने केला गेला होता.अपघात करणाराअतिशय चाणाक्ष होता.एकही पुरावा मागे ठेवला नव्हता.रात्रीच्या अंधाराचा त्याने फायदा घेतला होता.
मोरेसाहेब पुन्हा एकदा अंजलीची चौकशी करायता बंगल्यात आले.
मॕडम तुमचा कोणावर संशय?
नाही.
ड्रायव्हर सदानंदशी मंदारसरांचे भांडण?
एवढ्यात नाही पण सातआठ महिन्यापूर्वी मंदारने दारु पिऊन गाडी चालवली म्हणून सदानंदला कामावरुन काढून टाकले होते.
नंतर त्याची दया येऊन परत ठेवले.
अच्छा.असे आहे तर.
बाकी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.त्यांनी सदानंद खूप रागीट असल्याचे सांगितले.
अजित मोरेंचा सदानंदवरचा संशय वाढत चालला होताच.
अंजलीने माहिती दिल्यानंतर संशय अजून बळावला.
त्यानेच handle break lose केला असणार…
वर्तमानपत्रात बातमी झळकली.
मंदार अग्रवालचा अपघात नसून खून. मंदारचा ड्रायव्हर सदानंद अटकेत.
सगळे अचानक घडत गेले.सदानंद आता घाबरला.त्याचा भाऊ सुनील दोन अडीच वर्षापूर्वी कामासाठी सौदीला होता.अजून दोन महिने तरी तो येऊ शकत नव्हता.
सदानंदसाठी एक चांगला वकील ठेवणे आवश्यक होते.
सुनीलने सदानंदसाठी वकील शोधणे सुरु केले.त्याच्या सोबत काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र विजय राणे राहत होता.भाड्याची रुम घेऊन सोबत राहायचे.कुशाग्र बुद्धीच्या विजयने Law करुन एव्हाना हूशार वकील असा लौकिक मिळवला होता. त्याने विजयला फोन केला.
विजय केस लढायला लगेच तयार झाला.
विजयसारखा वकील मिळाल्यामुळे सुनीलची काळजी बरीच कमी झाली.
सुनीलला आपल्या निर्दोष भावाला विजय सोडवेलच याची खात्री पटली. सदानंदला काहीही होणार नाही असा विजयने विश्वास दिला.विजयने सदानंदला भेटून सर्व माहिती घेतली.
मंदारची केस कोर्टात गेली. विजय राणे आणि मोरेची याआधी एकदोन केसच्या निमित्ताने ओळख झाली होती.
विजय राणे जिंकण्याची शाश्वती असल्याशिवाय केस हातात घेत नाही हे मोरेंना माहिती होते.
आज कोर्टाने तारीख दिली होती.
पत्रकारांनीही कोर्टात गर्दी केली होती.
सगळे कोर्टात पोहचले.
केसचा पहिला दिवस.
जुजबी प्रश्नोत्तरे झाली.
नंतरच्या तारखा मिळत गेल्या.
विजय पूर्ण तयारीनिशी कोर्टात उतरत होता.
सदानंदला कोर्टात काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे,काय खोटे बोलायचे,काय लपवायचे तो आधीच सांगत होता.
केस सुरु झाली.
विजय पूर्ण तयारीनिशी कोर्टात उतरत होता.
सदानंदला कोर्टात काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे,काय खोटे बोलायचे,काय लपवायचे तो आधीच सांगत होता.
सरकारी वकीलाने प्रश्न विचारले कि सदानंदचा खोटेपणा उघड होत होता.
कोर्टात चर्चा होत होती,ही पहिली केस विजय राणे हरणार बहूतेक.
सदानंदची निर्दोष सुटका होणार कि तो अधिकाधिक अडकणार कुणालाही समजत नव्हते.
सुनील सौदीवरुन वापस आला.
विजयला भेटायला गेला.
विजय आपला सदानंद सुटेल ना रे?
हो.तू काळजी नको करु.
माझ्यावर विश्वास आहे ना.
हो यार.
सुनील असा म्हणाला.पण केसचा निकाल सदानंदच्या बाजूने लागेल ही खात्री हळूहळू शंकेत बदलत चालली होती.
सुनील त्याच्या एकदोन वकील मित्रांना भेटला.
त्यांनी विजय मोरे सदानंदच्या बाजूने कमी आणि विरोधात जास्त बोलतो असे सांगितले.कसेही करुन विजय राणेला ही केस हरायचीच आहे असे वाटते असे त्यांनी सुनीलला सांगितले.
सुनीलला आश्चर्य वाटले.
विजय? छे. विजय असे का करेल?
आणि विजयचा काय संबंध मंदारशी?
सुनील विचार करत होता पण काही सुचत नव्हते.
सुनील पुन्हा एकदा विजयला भेटला.
विजय, यार केस आपल्या हातून चालली.
अरे,सगळे पुरावे सदानंदच्या विरोधात आहेत.
काय करणार?
अरे असे काय बोलतोस? तुला माहित आहे सदानंद निर्दोष आहे.
बघतो मी काही करता येते का?
please यार.वाचव माझ्या भावाला.
जवळपास दोन्ही बाजू मांडून झाल्या.सदानंदला अपघात घडवून आणला म्हणून जबर शिक्षा होणार हेही जवळपास निश्चित झाले.
सदानंद प्रत्येकवेळी मी निर्दोष आहे असे सांगत होता.
पण पुरावे?ते सगळे विजय राणेजवळ होते.
आता एकदा पोलीस इन्सपेक्टर अजित मोरे यांची भेट घ्यावी. असा विचार करुन सुनील पोलीसस्टेशनमध्ये गेला.
मोरेसाहेब फाईल बघण्यात व्यस्त होते.
साहेब मंदार अग्रवालचा अपघात खरेच सदानंदने नाही घडवला हो.
वकील विजय राणेला पण माहिती आहे हे.
विजय राणेला प्रसिद्ध वकील आहेत.आतापर्यंत एकही केस हरले नाही. सदानंदच्या विरोधात सगळे पुरावे असल्यामुळे ते काय करणार?
सदानंदला वाचविण्याचे ते पूरेपूर प्रयत्न करत असणारच.
नाही साहेब.सदानंदला…
तेवढ्यात टेबलवरचा फोन खणाणला.
मोरेसर फोनवर बोलण्यात व्यस्त झाले.
सुनीलचे लक्ष समोरच्या टेबलवरील वर्तमानपत्राकडे गेले.पहिल्याच पानावर असलेल्या एका फोटोकडे त्याचे लक्ष वेधल्या गेले. मंदार आणि त्याच्या पत्नीचा अंजलीचा फोटो होता तो.
सुनीलला मंदारच्या पत्नीचा फोटो कुठेतरी बघितल्यासारखा वाटत होता. पण आठवत नव्हते.
मोरेसाहेबांचे बोलून झाले होते.
साहेब हा फोटो मी बघितलाय कुठे तरी.
करोडपती कुटुंब आहे हे.बघितला असेल कुठे तरी.
हो.असू शकते तसेही.
साहेब तुम्ही विश्वास ठेवा.सदानंद खरेच निर्दोष आहे.
माझ्या हातात काहीही नाही.
सुनील हताशपणे बाहेर येतो. विमनस्क अवस्थेत बाहेरच्या बेंचवर येऊन बसतो.
पण तो फोटो त्याच्या डोक्यातून जात नाही.
आठवले,आठवले.
तो जोरात ओरडला.धावतच मोरेसाहेबांच्या केबिनमध्ये आला.
तुम्ही परत?
मोरेसाहेबांनी त्रासिकपणे विचारले.
सुनील टेबलवरचा फोटो उचलून
साहेबांना दाखवत म्हणाला,
साहेब हा फोटो मी विजयच्या सोबत राहायचो तेव्हा त्याच्या जवळ बघितला होता.
काय?
सुनील भावाला वाचवायला काहीही भलतेसलते बोलू नका.
नाही साहेब मी खरे तेच सांगतोय.
विजयला आवडायची ही.
दोघे बहूतेक एकाच गावचे होते.
इन्सपेक्टर मोरेंना आश्चर्य वाटले.
त्याने का लपवून ठेवले असावे?
पुन्हा एकदा चौकशीचे चक्र फिरवावे लागणार होते.
मोरेसाहेबांनी सुनीलला कोर्टाची परवानगी घेऊन पुन्हा चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
अंजली कुठल्या गावची हे शोधायला मोरेंना वेळ लागला नाही.
ते तडक तिथे पोहचले.
अंजलीबद्दल माहिती मिळवली.तिने बीए पर्यंतचे शिक्षण तिथेच घेतले होते.नंतर Law करायला ती नागपूरला आली.
काॕलेजमध्ये विजय दोन वर्ष अंजलीच्या पुढे होता.तोही Law करायला नागपूरला आला होता.
अंजलीचे Law चे एक वर्ष संपल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचे काॕलेज बंद केले.आणि दोनएक वर्षांनी तिचे लग्न झाले.
बस्स मोरेसरांना एवढीच माहिती मिळाली.
सुनीलच्या म्हणण्यातील तथ्य मोरेसाहेबांना जाणवायला लागले.
खरेच गुन्हेगार कोण असेल? काय सत्य असेल?
सदानंद कि……
खरा गुन्हेगार शोधायला प्रयत्न करणे गरजेचे होते.
अजित मोरेसारख्या निःस्पृह अधिकाऱ्याला आता पुन्हा तपास केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नव्हते.
इन्स्पेक्टर मोरे अंजलीच्या बंगल्यात आले.
मॕडम तुम्हाला थोडे विचारायचा होते.
विजय राणेला ओळखता का तुम्ही?
प्रश्न ऐकून अंजली गोंधळली.
मॕडम सगळे खरे सांगाल अशी अपेक्षा आहे.
हो.आम्ही दोघे एकाच गावचे.
फक्त एकाच गावचे कि अजूनही काही दुसरे बंध?
अजित मोरे सगळी माहिती घेऊनच आले हे अंजलीच्या लक्षात आले.
ज्या आठवणी विसरायचा ती लग्न झाल्यापासून प्रयत्न करत होती त्या पुन्हा जिवंत झाल्या.
सांगा मॕडम.
तुमच्या खरे सांगण्यामुळे एखादा निरपराध मनुष्य वाचू शकेन.
साहेब तुमचा विजयवर संशय आहे? किंवा माझ्यावर?
ते मी आताच सांगू नाही शकणार.
सध्या तरी मला फक्त विजयबद्दल माहिती हवी आहे.
जी फक्त तुम्हीच सांगू शकाल.
साहेब, मी आणि विजय लहानपणापासून एकाच शाळेत होतो.तो दोन वर्षाने पुढे होता.
अभ्यासात हुशार असणारा विजय शाळेत सगळ्यांचाच आवडता होता.
तुम्हाला आवडायचा?
जरा वेळ शांत राहून अंजलीने उत्तर दिले
हो.
आणि विजयला तुम्ही आवडायच्या.
असेच ना?
हो.
मग,पुढे ?
आम्ही पुढे एकाच काॕलेजमध्ये गेलो.
विजयचे शिक्षण झाले कि लग्न करायचे ठरवले आम्ही.
गरीब घरचा विजय आणि श्रीमंत घरची मी .
माझ्या घरचे लग्नासाठी कधीही तयार होणार नाहीत ही भीती असल्यामुळे आम्ही कुणालाही आमच्यातील प्रेम समजू दिले नाही. नंतर विजयने इथे Law काॕलेजमध्ये admission घेतली.
विजयला भेटता यावे म्हणून मीही इथेच आले.कसे कुणास ठाऊक माझ्या घरी आमच्याबद्दल समजले.
वडिलांनी नी माझे काॕलेज बंद केले. दोन वर्षांनी माझे मंदारसोबत लग्न झाले.
पण तुमची प्रेमकहाणी सुरुच राहिली.
नाही साहेब तुमचा गैरसमज होतोय.
काॕलेज सुटल्यानंतर एकदाही मी भेटू शकले नाही विजयला.
त्याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही.
तो प्रसिद्ध वकील आहे हेही माहित नाही का तुम्हाला?
वर्तमानपत्रामुळे समजले ते मला.
त्याला भेटावे असे तुम्हाला कधी वाटले नाही?
तो माझा खाजगी प्रश्न आहे.
ठीक आहे.गरज भासली तर भेटू परत आपण.
असे म्हणून इन्सपेक्टर मोरे निघून गेले.
चौकशीत विजय राणे अपघाताच्या दिवशी कोर्टातून कामाचे कारण देत लवकर निघून गेल्याचे समजले. पछमढीमध्ये जाणाऱ्या गाड्यांची Entry तपासली पण विजयच्या गाडीचा नंबर त्यात नव्हता.
काही भाड्याने घेतलेल्या गाड्यांची Entry होती.पण त्यात विजय राणेचे नाव कुठेही नव्हते.
साहेब विजय राणेचे नाव कुठेही दिसत नाही.
कदमने सांगितले.
विजय राणे हुशार आहे.तो खऱ्या नावावर गाडी भाड्याने घेणार नाही.
मोरेंनी विजय राणेचा फोटो अपघात झाला तिथे जवळपास असणाऱ्या दुकानांमध्ये दाखवला.
जो आरोप सदानंदवर होता तो अपराध विजय राणेने केला होता तर …
विजय राणे सकाळी कोर्टात जाण्याची तयारी करत होते.
आज कोर्टात काय मुद्दे मांडायचे? हा विचार डोक्यात चालला होता.
दरवाजाची बेल वाजली. समोर इन्स्पेक्टर अजित मोरे उभे होते.
साहेब सकाळी सकाळी इकडे.
हो तुम्हाला न्यायला आलो.
कुठे ?
चला पोलीसस्टेशनमध्ये.
का?
दुसऱ्या दिवशी अंजलीला वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावर बातमी दिसली.
मंदार अग्रवालच्या केसला कलाटणी.
प्रसिद्ध वकील विजय राणे अटकेत.
प्रेमिकेशी लग्न केले म्हणून विजयने plan करुन मंदार अग्रवालचा अपघात घडवला…….










उत्कंठा वाढवणारे लिखाण सुंदर
धन्यवाद