विश्वासघात-सत्यकथा-शब्दपर्ण
विश्वासघात-सत्यकथा-शब्दपर्ण

विश्वासघात-सत्यकथा-शब्दपर्ण

विश्वासघात-By-सौ. दर्शना भुरे

आरती दवाखान्यातील बेडवर निपचित पडून सकाळपासूनचा घटनाक्रम आठवण्याचा प्रयत्न करीत होती. डोक्यावर टाके पडल्याने तिचे डोके भयंकर ठणकत होते. हातापायांमध्ये पण वेदना जाणवत होत्या. तरीही ती तशीच धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होती. तिची ही धडपड पाहून आशिष तिच्या जवळ येत तिला म्हणाला,
आरती काही पाहिजे का तुला मी इथेच आहे मला सांग…

आशिषला समोर बघून तिने विचारले,
आशिष मी इथे कशी? आणि तू कधी आला.. यश, आदी मुले.. मुले कुठे आहेत? आरती घाबरून मुलांना इकडे तिकडे बघत होती.

तिला काळजीत पडलेले पाहून आशिष म्हणाला ,
आरती तू शांत हो आधी…अजून तुझ्या जखमा ओल्या आहेत… डाॅक्टरांनी तुला आराम करायला सांगितला आहे. मुले सुखरूप आहेत मंगला आहे.. जवळ मुलांच्या..
मंगला ती परत कधी आली..

मंगलानेच मला फोन लावून घरी बोलावून घेतले खूप घाबरलेली होती ती.. मी घरी आलो तेव्हा तू जखमी अवस्थेत होती.. मुले पण रडत होती. काय झाले? कोणी आले होते का? आशिषने विचारले.. तशी आरती म्हणाली,
नाही..दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडले पण दारात कोणीच नाही हे पाहून दार परत बंद करायला गेले तर अचानक तेव्हाच माझ्या डोक्यावर पाठीमागून कशाचा तरी आघात झाला…मी तसेच पडले..मग नंतर काय घडले मला काहीच आठवत नाही…
एवढ्यात आशिषचा फोन खणखणला म्हणून त्याने इशाऱ्याने आरतीला सांगून फोनवर बोलायला सुरुवात केली.
तब्बल दोन तीन तास घरातील तपासानंतर …

इन्स्पेक्टर अजय सिंह आशिषला फोनवर बोलत होते…
मिस्टर जाधव .. तुमच्या घरात आम्हाला संशयास्पद असे काहीही आढळले नाही.. मॅडमची तब्येत कशी आहे.सध्या बोलण्याच्या मनस्थितीत असतील तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत..

इन्स्पेक्टर अजयने आरतीला तपासामध्ये काही प्रश्न विचारले पण आरती पाहिजे तशी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. म्हणून त्यांनी सरळ मंगलाला चौकशीसाठी बोलावून घेतले . मंगलाने सांगितले
ती आरतीकडे घर कामाला आहे. परंतु गेल्या आठ दिवसापासून तिची आई आजारी असल्याने तिच्या बदलीत काही दिवस शीलाला पाठवून आईच्या भेटीला गावाकडे गेली होती.
आणि आज तिला गावावरून आल्यावर शीलाने तिच्या घरी पाहूणे येणार आहेत. असे फोन वर सांगून बोलावून घेतले..व ती हेही म्हणाली होती घरी जाताना आदिच्या स्कूलबसला आज सुट्टी आहे तेव्हा आदीलाही आजच्या दिवशी शाळेतून तू घरी घेऊन जा..म्हणूनच ती आज तिच्या म्हणण्यानुसार दुपारी आदीला शाळेतून घेऊन घरी आली. घराजवळ आली तेव्हा मंगलाला घराचे दार उघडलेले असून आरती रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेली दिसली. ते पाहून ती घाबरून
शेजारच्या फ्लॅटमधील सरोजताईला बोलवण्यासाठी धावली पण सरोजताईच्या घराला कुलूप दिसले. म्हणून तसेच ताबडतोब तिने आशिषलाच बोलावून घेतले.

शीला अजून नवीन व्यक्ती ..
आता ही शीला कोणॽ तिची आणि मंगलाची ओळख कशी?
यासाठी त्यांनी आरतीला मंगला जे बोलत आहे ते खरे आहे का म्हणून विचारले तर…शीला ने तिच्या समोरच मंगलाला फोन लावला होता असे आरती म्हणाली. म्हणजे मंगलाने जे सांगितले तेच आरतीनेही सांगितले
दोघीही खऱ्या बोलत होत्या तर.
या दोघींवरही संशय घेण्यासारखे काही नाही दोघीही निर्दोष तर..

मग तिसरा आरोपी कोण? तो इथपर्यंत कसा पोहोचला.. आरोपी फार चलाख दिसत होता. त्याने अत्यंत सफाईदारपणे आपले काम केले होते. संशयाला कुठेही जागा शिल्लक ठेवली नव्हती. एवढ्या मोठ्या तीन मजली इमारती मध्ये साधा सी सी टिव्ही कॅमेरा असू नये. याचे इन्स्पेक्टर अजयला नवल वाटत होते.

या केसमध्ये पुढे जाण्यासाठी आता आरतीचीच मदत होईल..तिच यावर प्रकाश टाकू शकेल तिच्या कडूनच काही पुरावा मिळाला तर ठीक… पण यासाठी आरतीला दवाखान्यातून सुट्टी मिळण्याची अजून वाट बघावी लागेल.. इन्स्पेक्टर अजय विचारात पडले. पुढील दोन दिवसांत दवाखान्यातून घरी परतल्यावर आरतीने इन्स्पेक्टर अजयला घरातील रोख रक्कम, दागिन्यांसोबत तिचा किंमती मोबाईल गहाळ झाल्याचे सांगितले. आता आरतीचा गहाळ झालेला मोबाईलच गुन्हेगाराला पकडून देईल.. म्हणून अजयने मोबाईल वर बेल मारली

.बेल जात होती इथेच गुन्हेगाराची चूक झाली ते मोबाईल स्विच ऑफ करायला विसरले आणि..
मोबाईलच्या आधारे लोकेशन ट्रॅक करून त्या मार्गावर इन्स्पेक्टर अजय आपल्या टिमसह तपासणी करण्यासाठी निघाले..तेथील ठिकाणावर पाहणी करताना इन्स्पेक्टर अजयला सी सी टिव्ही कॅमेरा लावलेला आढळल्याने तपासासाठी एक नवीन दिशा मिळाली..

यातून थोडाफार तरी पुरावा मिळाला तर पुढील हालचालींना वेग येईल असे त्यांना वाटले. चोरी होवून आधीच चार दिवस उलटले अजून वेळ वाया न घालता ताबडतोब सी सी टिव्ही कॅमेऱ्याच्या मालकाकडून फुटेज मागवून घेतले. फुटेज तपासत असताना अजयला त्या कॅमेऱ्यात तोंडावर कापड बांधलेले दोन तरुण आणि सोबत एक तरुणी बोलचाल करताना दिसत होते. तरूणी पाठमोरी उभी असल्याने चेहरा दिसत नव्हता.

 सर्व जण आपसात काहीतरी कुजबुज करत होते. त्यांची वागणूक जरा संशयास्पदच वाटत होती. त्यांनी लगेच त्या तिघांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेऊन आशिषला ओळख पटवण्यासाठी पाठवून दिले.
फोटोतील पाठमोऱ्या तरुणीला तिच्या पोशाख आणि दुप्पट्यावरून आरतीने लगेच ओळखले..

ती शीलाच आहे. असे तिने खात्रीने सांगितले.

पण शीलासोबतची ते दोघेजण कोण आहेत त्यांना आरतीने ओळखले नाही. शीलाची ओळख आरतीला पटली म्हणजे शीलाचा या दरोड्यात नक्की च हात आहे. म्हणजे अजयचा तपास योग्य दिशेने चालू होता तर..

आरतीच्या म्हणण्यानुसार ही शीला असेल तर.. हिची आणि मंगलाची ओळख कशी? मंगलाने हिलाच का आरतीकडे पाठवले? का या दरोड्यात मंगलाचाच हात आहे? आता संशयाची सुई मंगलाकडे पण वळत होती म्हणून त्यांनी त्या दोघींवरही पाळत ठेवणे सुरू केले.शीलाची चौकशी केली असता ती वर्षभरापूर्वी मंगलाच्या घराशेजारी राहायला आली होती.

दोघीही समवयस्क असल्याने दोघींची लवकरच गट्टी जमली होती. मंगलाच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने ती आईसोबत घर कामाला जाई..आणि शीला महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने जरा खर्चिक आणि चैनीचे जीवन जगणारी होती. यामुळे पैशाच्या लोभाने ती अधूनमधून मंगलाच्या सुट्टीत घर कामाला जाई.. त्यातून तिचे कोण्यातरी विजू नावाच्या मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होते व ती दोघेही लवकरच लग्न करणार असे शेजारच्या लोकांकडून कळले.

हा विजू कोण? कुठे राहतो? काय करतो याचा छडा लावला तर आपण लवकरच खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहचू… या विचाराने इन्स्पेक्टर अजयने ताबडतोब त्यांच्या साथीदारांना फोन लावून शीलाच्या चौकशीसाठी तिच्या घरी पाठवले.. अचानक पोलीस घरी आल्याने शीलाच्या तोंडचे पाणी पळाले ती उसने अवसान आणत घाबरून पोलीसांना बोलू लागली विजूला आपण ओळखत असल्याचे तिने साफ नाकारले.

तिच्या हावभावावरुनच ती चक्क खोटे बोलत आहे हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिची दमदाटी सुरू केल्यावर ती बोलायला लागली आरतीताई कडे दरोडा टाकण्यासाठीचा विजूचाच प्लॅन मी विजूला मदत केली. मंगलाला आमच्या प्लॅनविषयी काही माहिती नव्हते..तिने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा मी गैरफायदा घेतला.

आरतीताई शौकीन, पैसेवाली असल्याने नेहमी काही ना काही ऑनलाईन सामान मागवत..व विजू कुरीयर पोहचवण्यासाठी आरतीताई कडे बरेचदा जात असे तेव्हा त्याने त्यांच्या विषयी माहिती गोळा करणे चालू केले.. आणि त्याच्याच सांगण्यावरून मी इकडे मंगलाचा विश्वास संपादन करून तिच्याशी मैत्री केली.. व तिच्या बदलीत ती सांगेल त्या घरी कामाला जाऊ लागले.. व एक दिवस तिने मला आरती कडे पाठवले.. विजूने पहिलेच आरतीवर पाळत चालू केले होते.

मग मी पण

आरतीताई च्या घरी काम करीत करीत कोण कधी येते कधी जाते त्या घरी एकट्या कधी असतात त्याची प्रत्येक बातमी विजूपर्यंत पोहचवू लागले.. आणि अशातच एक दिवस मंगला आई आजारी असल्यामुळे सुट्टी घेऊन गावाला गेली त्यावेळी घरात किंवा शेजारी कोणी नाही हे पाहून आम्ही चोरीची वेळ निश्चित केली. व ठरल्याप्रमाणे आधीच आरतीसमोर माझ्यावर संशय नको म्हणून मी मंगलाला फोन लावला व जास्त वेळ न घेता विजूला लागलीच बोलावून घेतले.

विजू आला तेव्हा त्याचा साथीदार राजेश हा त्याच्या सोबतच होता. दरवाजावरील बेल वाजवून आरतीला बाहेर दारापाशी बोलावले व आरतीने दार उघडताच दारामागे लपून तिच्या डोक्यावर वार करून निपचित करून
नंतर त्यांना घरात घेतले… लहान यश झोपला होता. तर आदी शाळेत होता. त्यामुळे घरात शांतता होती..वरुन मी आधीच आरतीच्या घरात सगळीकडे सहज वावरत असल्याने मला त्या घरातील कोपरा न कोपरा माहिती होता त्यामुळे आरतीच्या खोलीत जाऊन तिच्या पर्समधून चावी काढून कपाट उघडून किंमती दागिने व रोख रक्कम काढून घेण्यात कसलाही अडथळा जाणवला नाही..
अशा रीतीने शीलाने तिचा संपूर्ण गुन्हा स्वतःहून कबूल केल्यानंतर इन्स्पेक्टर अजयने पुढील कारवाईसाठी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून तिच्या दोन्ही साथीदारांचा पत्ता घेतला व त्यांना अटक करण्यासाठी ताबडतोब त्याच्या मागावर निघाले…

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!