भाग -२५ हरवून गेल्या जाणिवा..
भाग -२५ हरवून गेल्या जाणिवा..

भाग -२५ हरवून गेल्या जाणिवा..

भाग -२५ हरवून गेल्या जाणिवा..
सौ.दर्शना भुरे…

 

संध्याकाळी सुधा आजीसाठी चहा घेऊन आली असता आजी सकाळपासून ऊठल्याच नाहीयेत हे तिच्या लक्षात आले..

पुढे..
सुधाने त्यांच्या अंगाला स्पर्श केला असता त्यांच्या अंगाचे चटके सुधाला जाणवत होते.त्या तापाने चांगल्याच फणफणल्या होत्या.. सुधाची चाहूल लागताच त्या अंथरुणावर उठून बसू लागल्या पण सुधाने त्यांना तसेच झोपवून ठेवून त्यांच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली आणि त्याने त्यांना जरा आराम पडल्यावर सुधाने सोबत आणलेला गरम चहा बशीत ओतून घेऊन आजीला टेक्याला बसवत पाजू लागली.

सुधाच्या हातून गरमागरम चहाचा घोट घेत आजी सुधाला म्हणाली,
कोणी सख्खे करत नाही एवढे करते तू
माझे अजून किती करशील ग सुधा..
बोलताना आजीला ठसका लागत होता म्हणून सुधा आजीच्या पाठीवरून हात फिरवू लागली तशी आजी पुन्हा म्हणाली सुधा मला वाटते मी या आजारातून वाचत नाही.माझे आता काही खरं नाही तेव्हा मी माझ्या जवळच्या काही वस्तू तूला देवू इच्छिते आजीची आठवण म्हणून त्या तू तुझ्या जवळ ठेव आजीचे लग्न श्रीमंत घरात लागले असले तरी आजीच्या वाट्याला आलेला हिस्सा घरदार, पैसाअडका सर्व काही भाऊबंदकीने आधीच हिसकावून घेतले होते.

येवूनजावून आजीच्या गळ्यात तेवढी एक सोन्याची चैन आणि कानात कर्णफुले एवढे च शिल्लक होते. तेच आजी तिला देऊ इच्छित होती. ते सुधाने घेण्यास नकार दिला होता.
तरी आजीने तिच्या हातावर त्या वस्तू बळजबरीने ठेवल्या आणि तिला म्हणाली सुधा तू माझ्या साठी खूप केले हे राहू दे तुलाच…
पण आजी तुम्ही काही द्याव म्हणून तुमचे दुखणे करत नाही.
मला हे काहीही नको..
उद्या तुमच्या घरातील लोक मला नाव ठेवतील, माझ्या वर आळ घेतील.. हे दागिने तुम्हीच मला दिले यावर तुमच्या माघारी कोणी विश्वास ठेवणार नाही..

कोणी काही म्हणणार नाही तुला.. अग मी म्हातारी मेली का जीवंत आहे याची विचारपूस करायला ही कोणी आले नाही.मग मी कशाला कोणाचा विचार करू सांग.

पण सुधा तिच्या विचारावर ठाम होती.
ती म्हणाली
आजी हे तुमचेच आहे.तुम्ही लवकर बऱ्या व्हा फक्त…
सुधा चे आपुलकी चे बोल ऐकून आजीचे डोळे पाणावले..सुधाकडून आजीला आपुलकी प्रेम जिव्हाळा मिळाला होता होती. कृश चेहऱ्यावर
तृप्ती पसरली होती.
आजी आणि सुधा मधील हा शेवटचा संवाद ठरला होता..

अचानक एखादे वळण येते.खरं तर ते आपल्याला अचानक असे वाटते पण आयुष्यातील वळणे आधीच ठरलेले असतात. वैकुंठाचेही अगदी तसेच झाले होते. स्त्री तरुण झाली की आई बापाचा हात सोडून नवऱ्याचा हात धरते तिच्या उर्वरित आयुष्यात तिचा नवराच तिचा सर्व काही असतो पण वैकुंठा आजीला तर नवऱ्याची साथ कधीच मिळाली नाही त्याचा हात तर तिच्या हातातून कधीच निसटला होता.वैकुंठा आजीचा संसार कधीच फुलला नव्हता .बालवयात झालेले लग्न, नंतर लगेच नकळत्या वयात आलेले वैधव्य,आई वडील आणि हळूहळू एकेकाची साथ सुटणे या सर्व प्रसंगानंतर
तिच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागले होते.
तिची हौस,मौज इच्छा आकांक्षा या सर्वांचा तिने बळी दिला होता.नकळत्या वयात तिचे आयुष्य बेरंग झाले होते.
एका चाकोरीबद्ध आयुष्यात तिने स्वतःला कोंडून घेतले होते.

ती जीवंत होती पण जीवंतपणीच तिच्या सर्व जाणिवा हरवून गेल्या होत्या..एका जीवनाचा अंत झाला होता.
वैकुंठाआजी वारली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याच अंगावर असलेले दागिने विकून तिचे अंत्यसंस्कार आटोपले होते.

आजीने तिच्या जिवंतपणी तिची राहती जागा तिच्या सारख्या निराधार गरजू तसेच पतीच्या निधनानंतर एकाकीपणाचे जीवन जगणाऱ्या स्री यांसाठी राहण्यासाठी दान
करण्याची इच्छा गावातील पंचासमोर बोलून दाखवली होती.तिची ही अंतिम इच्छा पंचांनी पूर्ण करून त्या जागेवर तिच्या नावाने आश्रम उभे केले.

नवरा मेल्यानंतरचे आजी चे साधे पण सोज्वळ रूप …
आजीचा तो निर्विकार चेहरा वनिताला चांगलाच आठवत होता..
बऱ्याच वर्षांनी ती आजीच्या आठवणीने आज मोकळेपणाने बोलत होती.

एकंदरीत वैकुंठाआजीने सासरच्या बाबतीत नशीबच काढले होते पण…
नियतीला बहुतेक ते मान्य नसावे..

बहिणीच्या आग्रहास्तव आपले राहते गाव सोडून कायमस्वरूपी अकोल्यात स्थिरावलेली वैकुंठा आजी,आईची हसरी, खोडकर वैकु आता परत
आईच्या कुशीत‌ विसावण्यासाठी
काळाच्या पडद्याआड निघून गेली होती.

समाप्त

हरवून गेल्या जाणिवा…कथामालिकेचा हा शेवटचा भाग.कथा सत्य घटनेवर आधारित आहे.एक अवखळ अजाण बालिका रुढी,परंपरेनूसार बोहल्यावर चढते.लग्नाचा अर्थ कळण्यापूर्वीच बालविधवेचे आयुष्य तिच्या पदरी पडते.अवखळ वैकू ते जगण्याच्या जाणिवा हरवलेली वैकुंठेचा आयुष्यपट मांडण्याचा हा प्रयत्न वाचकांना आवडेल ही अपेक्षा.

तुमचा प्रतिसाद,प्रतिक्रिया आमच्यासाठी प्ररणादायी असतात.
ही कथामालिका सुरुवातीपासून वाचण्यासाठी खालील लिंक बघा

3 Comments

  1. Mohini1408

    जुन्या चालीरीती परंपरानी एका हसऱ्या खेळत्या निरागस मुलीचं आयुष्यच होरपळून टाकलं.
    खूप हृदयस्पर्शी दिर्घ कथामालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!