मराठी स्त्री कविता
चक्र
आई तू दळण दळताना तुझ्या
मांडीवर मी पेंगुळलेली
तू दळत राहते आयुष्याचे दळण
चार चार दाणे टाकून
फिरते ते तुझ्या आयुष्याचे चक्र
कधी वरची पाळू भिंगरीसारखी हलकी
तर कधी जड झालेल्या मनासारखी
रुतून बसलेल्या शिळेप्रमाणे जड जड……
तू दळत राहते मुलांना पोसते
तुझ्या ओविने मंग जात्याला ही
देवत्व येते दोन पाळू वाजवू
लागतात टाळ
तू विसरून जाते तुझे देह भान
तू दळलेल्या पिठात
भाकरीतला चंद्र पहाते
मी मात्र दळलेल्या पीठात
टिपूर चांदणे पाहते
मी मात्र दळलेल्या पीठात
टिपूर चांदणं पाहते
सिंधू व्हटकर-सोनवणे
अस्तित्व-मराठी स्त्री कविता
हा खचवितोच तुजला नेहमी जमाव वेडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
या धावत्या जगासह, धावू बरोबरीने
अन् जिद्द ही पणाला, लावू परोपरीने
सद्भावना सदा ही संकल्प हाच सोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
जरी हे समानतेचे, युग स्त्री मनास भावे
अजुनी न समजणारी, असती कित्येक गावे
जनजागृती करावी, की बंधनेही तोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
सोबत तुझीच तुजला, मदतीस ना पुकारी
हो ढाल तू स्वतःची, लढ घेऊनी तलवारी
कर सामना जगाचा, अबला हे नाम खोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
जागा कुणी न देती, कर मानसी तयारी
कोणी दयाही करती, कुणी मारती कट्यारी
हिंमतीस दाद मिळते, सारे रिवाज तोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
बेधुंद होऊनी गा, वार्यासहित गाणी
मनी भाव हेलकावे, घेतील ग फुलराणी
हा गंध अंतरंगी, नाते तयासी जोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा.
सुवर्णा पाटुकले
सातारा.
वांझोटी- मराठी स्त्री कविता
वांझोटी म्हणुन कायम हिणवल जातं होतं
पोर नाही म्हणुन छळलं जात होतं
दोष तिचा जणू मान्य केला सगळ्यांनी
तीच गुन्हेगार साबीत केलं समाजाने
सासरी-माहेरी बिचारी दोषी तीच ठरतं होती
मुलगा-जावई या नात्याने तो निर्दोष गणला जात होता
दुसरे लग्न करं म्हणुन त्याला सल्ला देवून झाला
तिच्या हळव्या मनाचा विचारच नाही केला
देव देवस्की उपाय केले, दवाखान्यावर विश्वास नव्हता
अनाथालयात जायचा प्रश्नच उद्भवत नव्हता
अनाथालयातुन पोर कसं दत्तक घ्यावं
जातीच बिरुद तेथेही मिरवलं जातं होतं
कोणा जातीच म्हणुन बाळास हिणवलं जात होतं
समाजात सुधारणा आता तरी व्हायला हवी
अनाथलयाच्या लेकरांना घरकूल मिळायला हवी
आपलं म्हणुन त्यांचाही स्विकार करावा
एका लेकराचे भाग्य फुलविण्याचा प्रयत्न व्हावां
शीला रंगारी
यंत्र बनलेय मी-मराठी स्त्री कविता
मी आज अनोळखी-मराठी स्त्री कविता
जन्मले ज्या मातीत,
खेळले ज्या मातीत,
आणि वाढले ज्या मातीत
जाणवलं मला त्या मातीसाठी
मी आज परकी आहे
जमिनीवरच उभं आडवं
वाळलेलं गवत, झाडं, पान, फुलं
होता ज्यांच्या बद्दल
आत्यंतिक जिव्हाळा
आज जाणवलं मला
या
सगळ्यासाठी आज
मी अनोळखी आहे
शेंदल होतं विहिरीचं पाणी
हाताला रट्टे येईपर्यंत,
जगवली होती कितीतरी
झाडं,
पाजून विहिरीच्या पाण्याचं जीवन
जाणवलं आज ते
माझ्यासाठी फक्त
एक पेय आहे
होत्या असंख्य आठवणी
विरघळलेल्या जिच्या
पाण्यात आणि
कित्येकदा आलं होतं
डोळ्यात पाणी,
बसून तिच्या काठावर
जाणवलं आज
की हे सगळंच आता
आठवणीतुन ही गाळायला हवं
खळ्यात पसरलेलं
दुधाळ चांदणं
आणि जमिनीवर पडलेल्या
झाडांच्या सावल्या,
अनुभवली होती
एक गुढ, निरव शांतता
जाणवतं आता कदाचित
नाहीच मिळणार ही
अनुभूती परत एकदा
असंच जगायचं असतं
स्त्रीने समजून उमजत,
झाली आहे रीत वर्षानुवर्षांची,
जीव लावायचा,
जीव गुंतवायचा
आणि
एका अपरिहार्य क्षणी
अलगदपणे जीव
काढूनही घ्यायचा
कशाचीही खंत वाटुन
न घेता.
सौ वीणा विश्वास चव्हाण
मीरारोड मुंबई
तरीही तू सखीच आहेस-मराठी स्त्री कविता-
प्रत्येक महिन्यात येतेस तू
अगदी न चुकता
कधी नियमितपणे
तर कधी अनियमित होऊन
पण तुझं येणं कोणत्याही स्त्रीला
कधी आवडत नाही फारसं
तू येताच, येतात बंधने,
बंधने चालण्यावर, बंधने बोलण्यावर
बंधने सगळ्या वावरण्यावर
कसं अडकल्यासारखं वाटतं अगदी
स्वतःच्याच पायात पाय अडकतो जसा
तुझ्या शिवाय होत नाही
गर्भ धारणा
तुझ्या शिवाय येत नाही
सृजनता
ज्या मुळे स्त्रीला देवत्व दिलं गेलं त्या निर्मितीचं
कारण तर तुच असतेस
प्रत्येक आईसाठी मात्र
तू असतेस
सौख्याचा क्षण
जेव्हा तु तिच्या मुलीला
कुमारवयात अगदी वेळेत भेटतेस
आणि
पदर आला म्हणुन,
सुरु होतात मग तिच्या वरची
अनेक बंधने
तुझ्यामुळे स्त्री कधी
पूजनीय होते,
तर कधी
तुझ्यामुळे ती
कलंकित ही होते
तिचा दोष नसताना,
तिची इच्छा नसताना ,
जेव्हा ती कुमारी गर्भार
राहते,
तुच जबाबदार असतेस
स्त्रीच्या आयुष्यात
उलथापालथ करण्यास आणि
न आवडलीस तरी
कितीतरी वर्षें
आयुष्याचा एक
अविभाज्य भाग बनुन
राहतेस,
तिच्या
प्रत्येक महिन्यात येतेस तू
अगदी न चुकता
कधी नियमितपणे
तर कधी अनियमित होऊन
पण तुझं येणं कोणत्याही स्त्रीला
कधी आवडत नाही फारसं
तू येताच, येतात बंधने,
बंधने चालण्यावर, बंधने बोलण्यावर
बंधने सगळ्या वावरण्यावर
कसं अडकल्यासारखं वाटतं अगदी
स्त्रीपणाचे
एक द्योतक म्हणुन
प्रत्येक महिन्यात तिचा
नको असलेला जीवनरस बाहेर टाकत
तिच्या शरीराचं यंत्र
कार्यक्षम ठेवत असतेस
सौ वीणा विश्वास चव्हाण
चारित्र्याचे ठिगळ-मराठी स्त्री कविता
मी सुखी आहे माझ्या विश्वात,परिस्थितीशी जुळवताना
तू परत का यावंसं जीवनात,आयुष्याची सांज होताना…
नकळत केलेल्या चुकीची का द्यावीस जाणीव पुन्हा पुन्हा
सर्वस्वी जबाबदार असण्याचा माझ्यावर नोंदवायला गुन्हा….
माझी मी सोसतेय आपली, संसारातील उष्ण झळा
आज अचानक तुझ्या मनात कसा काय दाटला उमाळा…
कशाला आणतोस सहानुभूतीचा चेहऱ्यावर आव
मी पुरती ओळखून आहे तूझ्या मनातील धूर्त डाव…
मी तुला माझ्या जीवनातून कधीच केलंय वजा
संसारासाठी करते आहे रोज कर्तव्याच्या बेरजा…
शिकते आहे डावपेच जगाकडे पाहून मी ही जरा
मोडलेल्या संसाराचा मानेवर आहे भार सारा…
एक एक पाई जमवते आहे,उपसून कष्टाचा डोंगर
कुणाची दबेली नाही,ओढतेय बैलासंग वावरात नांगर…
नकोच तुझा आधार, नुसताच वासनेन बरबटलेला
लावते आहे ठिगळ माझ्या चारित्र्याचे, संसार माझा फाटलेला..
सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)
नारी नारी नाही तू-मराठी स्त्री कविता
तू आहेस सबला
तूच दुर्गा तूच काली
नको समजु तू अबला
उठ जागी हो माय माऊली
पुरे झाली मनमानी
नराधमांचा कर संहार तू
रहा आनंदी स्वाभिमानी..
आता नकोच सोसूस
अत्याचार नि बलात्कार
कर रणचण्डिका बनून
दुष्ट दुर्जनांचा संहार…
जिथे कुठे करती रोज
बेटी बचाओ आंदोलने
कँडल मार्च काढून सारे
ठोकती भाषणे….4
नारी तूच झेप घे नवे
स्वप्न बाळगूनी उराशी
ओळखून अस्तित्वाला
घे भरारी उंच आकाशी….5
नारी तू ममतेचा सागर
ओळख तुझी किती महान
घराघरात तू आई बनूनी
राखती कुटुंबाचा अभिमान…
तूच असशी वात्सल्याची
शांत सोशिक मूर्ती
अशीच पसरू दे तुझी
आसमंती अलौकिक कीर्ती..
सबला होऊनी देऊनी लढा
कर अन्यायावर मात
नकोस डगमगू यापुढे तू
उचल बिनदिक्कत हात..
पुरे झाली थट्टा आता
जाग जाग ग रणचंडिके
घेऊनी शस्त्र हाती तूच
आता नराधमा संहारिते..
बदलून टाक तू नारी व्याख्या
आजच या स्त्री जन्माची
गाथा ठेव अंतरंगात ठसवुनी
आनंदी,जिजाऊ,सावित्रिंच्या लेकींची…..
*********************
✍️सौ.पद्मजा जोशी
पुसद
घेऊ दे तिला मोकळा श्वास-
नको तिच्यावर स्त्री
असल्याचे ओझे
नको तिच्यावर
सुंदर दिसण्याचे ओझे
नको तिच्यावर मातृत्वाचे
सक्तीचे ओझे
जगू द्यावे तिला
एक व्यक्ती म्हणून
घेऊ द्यावा तिला
मोकळा श्वास भरभरून
नको तिच्या
स्वातंत्र्यावरची बंधने
नको तिच्या
शिक्षणावरची बंधने
घेऊ दे तिला अवकाश कवेत
उडू दे तिला मोकळा श्वास घेत
असावं तिनं मर्यादेत
जपावी तिने नातीगोती
जपावे कुळाचार सणवार
एक स्त्री म्हणून
राहावे नेहमी तिने
चार भिंतीआड
बदलू द्यावे हे गृहीतक आता
घेऊ दे तिला मोकळा श्वास
दाखवा थोडासा विश्वास
पडू दे तिला उंबऱ्याबाहेर
जगू दे तिला थोडं
चाकोरीबाहेर
घार आहे ती
उडली जरी आकाशी
लक्ष असणार आहे तिचं
घरट्यापाशी
सौ वीणा विश्वास चव्हाण
अजुनही काही भावतं तिला
.हजारो वर्षांची पुरुष प्रधान संस्कृती आपली
जणु रुजत गेली पुरुषांच्या गुणसुत्रांतही,
होत गेला तो आक्रमक,
निर्भीड आणि अहंकारी
आपल्या मजबुत बाहूंवर विश्वास ठेवत
आणि घेत राहिला
कुटुंब कबिल्याची
जबाबदारी
अगदी आंनदाने,
मानत आला
आद्य कर्तव्य आपले
बाहेर जाऊन कुटुंबाचे भरणपोषण करण्याचे,
आणि संतती हीच संपत्ती मानण्याचे
मुक्त स्त्री पुरुष संबंध असणाऱ्या
त्या काळात
तो बनला रखवालदार आणि पहारेकरी, आपापल्या गढयांचं
रक्षण करीत,
कोणाही परपुरुषाला
आपल्या आखलेल्या
हद्दीत न येण्यासाठी ,
आणि
स्त्रियांवर घातली गेली
जाचक बंधनें घरातून
बाहेर न पडण्यासाठी
मग चुल, मुल आणि घराची
काळजी घेणं जसं
स्त्रियांच्या गुणसुत्रांतही
उतरत गेलं,
बनत गेल्या नाजुक, सुकुमार,
वृक्षाच्या आधाराने
चढत जाणाऱ्या वेलीसारख्या,
सातत्याने होणाऱ्या
बदलात
विवाह संस्था स्थिर
होताना,
पुरुष प्रधान संस्कृती जीर्ण होत गेली
स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने
अर्थार्जन करत
महत्वाकांक्षी बनल्या,
परिस्थितीवश काळानुरूप पडलेल्या बंधनातुन
मोकळ्या झाल्या त्या
पण ऊबदार तिच्या
घरकुलात
अजुनही तिला वाटत राहिलं
ती आहे एक कोमल वेल
भावत राहिलं तिला
जोडीदाराच्या खांद्यावर
डोकं ठेवुन
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
झोके घेणं
अजुनही तिच्या गुणसुत्रांतून वजा नाही झालं,
तिने मनापासुन
घराची काळजी घेणं
अजुनही तिच्या गुणसुत्रांतून वजा नाही झालं तिचं,
संततीत रमुन जाणं
आणि अजुनही पुरुषांच्या
गुणसुत्रांतून वजा नाही झालं,
तिच्या डोक्यावर थोपटुन म्हणणं,
मी आहे ना,तु नको काळजी करुस
स्त्रीला हे सगळं
हे मनापासुन भावणं
अजुनही
वजा नाही झालं
दोघांच्याही गुणसुत्रांत
काही गुण कायमच राहिले
- सौ वीणा विश्वास चव्हाण
हौस
ती राहिली तशीच,,,,,
फेरा
सात फेरे वडाला मारुन
कोणाला काय मिळालं
एकच जन्म पुरे झाला
पुढचं कोणी ठरवलं ….
जन्मोजन्मी चे नाते
फक्त पोथी पुराणात दिसतात
वास्तविक जगण्यात तर
काही क्षणाचे असतात …
तिचं संसारासाठी धडपडणं
त्याचं क्षणा क्षणाला चिडणं
मीच ओढतो सर्व गाडा
दोघांनी सारखंच भासवणं ….
गाठ ऋणानुबंधनाची म्हणतात
स्वर्गात बांधली जाते
काळ्या मण्यांच्या धाग्यांमध्ये
तिचेच आयुष्य का गुंतले जाते ….
केवळ औपचारिकता झाली
उगाच नटुन थटुन निघायचे
करपलेल्या वाती सारखे
सगळे आयुष्य जगायचे ….
तोडले बंधन तिनेही हल्ली
तोही आता निर्धास्त झाला
जन्मोजन्मी चा फेरा कुठला
दोघांनी आता आयुष्य झाला …
सुभाष उमरकर
नारी अष्टभुजा
नारी विना जग सुने
नसे जीवनात मजा
नाही नुसती गृहिणी
नारी एक अष्टभुजा ।।1।।
पेलतसे ती आव्हाने
कुटुंबातील लिलया
दावी कर्तव्यदक्षता
नारीचीच हि किमया ।।2।।
असे ही आत्मनिर्भर
सदोदित स्वाभिमानी
राहुनिया ही स्वछंदी
सजग नि अभिमानी।।3।।
मुले नी घरसंसार
विश्व जणू हे नारीचे
घरी असो वा नोकरी
मोल तिजला कामाचे।।4।।
घार हिंडते आकाशी
लक्ष तिचे पिल्ला पाशी
हीच तुलना जुळते
जणू आजच्या आईशी।।5।।
हाती घेऊनि लाटणे
कधी अन्नपूर्णा भासे
कधी लॅपटॉप संगे
जग भ्रमंती ही असे।।6।।
नारी तू नारी नाहीस
आहे तू तर सबला
नको समजूस नारी
कधीच स्वतःला अबला।।7।।
सौ.पद्मजा जोशी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









