मराठी दर्जेदार कविता-प्रिया देशपांडे
नववर्ष
मराठी दर्जेदार कविता-प्रिया देशपांडे
गेलेल्या तारखा मागे ठेवून मी
सुखद आठवणी सोबत घेणार आहे .
सरणाऱ्या वर्षा तुझ्यासाठी
दुःख मागे ठेवून जाणार आहे.
सुखाचे शितल चांदणे
नववर्षात सोबत नेणार आहे.
नव्या ऊर्मीने पुन्हा एकदा
जगण्याचा डाव मांडणार आहे
बोलण्यापेक्षा समजून सारं
कर्तृत्वातला महत्व देणार आहे
जुनं काढून नवं कॅलेंडर लावलं तरी
भावनेलाच जास्त भाव असणार आहे.
नकोच कुणाचे उणे- दुणे
माझ्याच चुकांचा हिशोब मांडणार आहे.
येणाऱ्या वर्षा तुझ्यातला
प्रत्येक दिवस आनंदाने जगणार आहे.
जे गेले ते दिवस सरले
येणाऱ्या संधीची वाट पाहणार आहे.
सावट कोरोनाचे दूर होवो
हेच नववर्षा कडे मागणार आहे
तू म्हणशील तसच करू-मराठी प्रेमकविता
तुझ्यामुळेच तर जगण्याचा
अर्थ लागला कळू,
तू फक्त हो म्हण मग
तू म्हणशील तसच करू ….
तुझ्यासाठीच सखे,
मन माझे लागले झुरु,
हातात फक्त हात दे , मग
तू म्हणशील तसंच करू …..
मनातल्या आठवांचा पसारा
सांग कसा बरं आवरु ?
स्वप्नातुन ये सत्यात , मग
तू म्हणशील तसच करू …..
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने
सुख-दुःखाची समीकरणे मांडू,
आयुष्याचं गणित सोडवताना
तू म्हणशील तसच करू……
भांडलो कधी दोघे तरी
मने एकमेकांची सांभाळू,
चूक असेल कोणाचीही ,पण
तू म्हणशील तसंच करू …..
नाहीच मोडणार तुझं मन
विचार सुद्धा नको करू ,
पिलांचे आई-बाबा होताना
तू म्हणशील तसच करू …..
घट्ट विण नात्याची
मनात डोकावून माणसाच्या
माणूसपण शोधावं….
भावना आणि संवेदनाने
नातं घट्ट विणून घ्यावं….
सुख दुःखातली सोबतच
हवीहवीशी वाटावी…..
विण इतकी घट्ट व्हावी की,
ती कधीच ना उसवावी…..
सहवास असो वा नसो
आठवण मात्र रोजच यावी…
मायेच्या ओलाव्याने
पापणी डोळ्यांची भिजावी….
आठवांचे मोर नाचूनि मनी
मन ओलेचिंब व्हावे….
अन् याच मनाला वेड्या
‘प्रीतीचे पाखरू’ म्हणावे
‘प्रीतीचे पाखरू’ म्हणावे….!!
दातृत्व
संसार उघड्यावरचा तुझा
तरी दातृत्व ‘कर्ण’ सारखं,
येतं कुठून तुझ्यात बळ
पिलात अन पाखरात भरण्याचं
असे फाटकीच झोळी जरी
विचाराने गर्भश्रीमंत तूच खरी
देणाऱ्याने देत जावे म्हणत
पुण्याईची घागर तुझीच सारी
भ्रांत तुला आजची जरी
चिंता नसे मुळी स्वतःची
परोपकरा ची दैवी देणगी
दिधली तुला का थोर मनाची
नसे हव्यास सोन्या नाण्यांचा
समाधान शोधतेस वास्तवाशी
कितीही दुःखाचा वारा शिवे तुज
तरीही लढा देशील संकटाशी..
सारथी-प्रेम कविता
चांदण्यात शब्दांच्या मी
उजळून निघावं लख्ख,
अलगद उतराव्या कागदावर
अन प्रकाशून जाव्यात चक्क
शब्दांसाठी जागावं रात्र रात्र
रातराणी होऊन यावेत एकत्र,
श्वास मात्र तूच हो कवितेचा
सुगंध दरवळू दे शब्द मोगऱ्याचा
कल्पनेच्या श्रुंगारांनी मी
असंच शब्दांना सजवावं,
अश्यावेळी तू मात्र मला
डोळे भरून न्याहाळावं
प्रत्येक शब्दातून माझ्या
तू भिजून निघावास,
खुळ्या माझ्या मनाचा
तूच रथ व्हावास
शब्द असले सोबती तरी
कविता माझी तूच हो,
चाके असलो जरी दोघेही
पण सारथी मात्र तूच हो
सारथी मात्र तूच हो
येऊ दे माझ्या लेखणीला बहर
आठवतं…
तू म्हणाला होतास,-
“मुक्तछंदात छान लिहितेस,
खरं सांगू….
आठवणी आहेतच तश्या तुझ्या
कधीही मुक्तपणे माझ्या मनाच्या
अंगणात वावरणाऱ्या…..
मनभर पसरल्या की मग
आवरण कठीण होऊन बसतं
आणि मग आनंदाची सर
नाचून जाते,मनाच्या अंगणात
फुलतो अंगणी प्राजक्त मनात
आयुष्य नव्याने कळून जातं
सहवासात जगायचं ते
मनातच राहून गेलं,
तुझं – माझं मनातच एकमेकांच्या घर बांधून झालं
विरलेल्या जाणिवाना
नकोच दुःखाची झालर
मुक्त छंदात का होईना
येऊ दे माझ्या लेखणीला बहर…
येऊ दे माझ्या लेखणीला बहर…
https://marathi.shabdaparna.in/अद्भुत