Mogara fulala मोगरा फुलला अभंग निरुपण
ज्ञानेश्वरांचे अभंग, त्यांच्या विराण्या अतिशय अद्भुत आहेत आणि त्यांना लतादीदींनी स्वरमय करत अधिकच गोड केले आहे. जेव्हा कधी ते रुणझुणलेले शब्द कानी पडतात तेव्हा दिव्यत्वाची प्रचिती येते. ती प्रचिती मी वारंवार घेत असतो. त्या अनुभूतीतून एक नवा अंतर्भाव मनात जागृत होतो. माऊलींचा तो मनोभाव मी शब्दांत मांडावा इतकी माझी पात्रता नाही परंतु मला जे जाणवले ते मी विविध लेखांमधून मांडणार आहे. आज त्याचा पहिला भाग सादर करत आहे.
मोगरा फुलला
अजानवृक्षाची आश्वस्त सळसळ कानी पडली. चौथऱ्यावर मी एकटाच बसलेला कधीचा. रममाण झालेला. डोळे मिटून घेतलेला. स्वतःशीच बोलत होतो. मनातल्यामनात कविता करत होतो. मनातल्या मनात दूरवरचा प्रवास करून आलो. माझ्या सर्व संदर्भांना भेटून आलो. ते सारेच अगदी जिवलग होते. माझे गणगोत होते. माझे अभंग निश्चल राहण्यासाठी ह्यासंदर्भांनी खूप मोठा हातभार लावला होता. त्यांची झालेली भेट ही मुक्तीच्या वेशीपर्यंत घेऊन जाणारी होती. अलगदपणे डोळे उघडले तर आनंद भरून वाहत होता. आणि त्या अनुभुतीने प्रसन्न झालेल्या मनाचा पहिला उद्गार होता ‘मोगरा फुलला..’
होय, मोगराच तो! मन मोगऱ्याच्या दरवळाने बहरावे ह्यासारखा दुसरा सुखसोहळा नाही. शब्दांची फुले झाली होती अक्षरं टपटपून शनेलात न्हाली होती. अभंग तर भोवती फेर धरून नाचायला लागले. तो फुललेला मोगर्याचा बहर हलकेच वेचून घ्यायला लागलो.
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला.
ती फुलं माझ्याच अंगणातील होती. माझ्याच मनातील होती. मी त्यांचीच गीते गायला लागलो. त्यांना परत परत अनुभवायला लागलो. वेचण्यातून काही नवे दरवळ सापडायला लागले. माझेच मन मला नव्याने कळायला लागले. आणि तो आनंद काय वर्णावा! असे अपार तृप्ती देणारे क्षण आयुष्यात आले अजून जगदीशाकडे काय मागावे? ‘माझे मज कळो आले अवघे विश्व आकळले’ अशी निश्चल अवस्था झाली. अशीच अवस्था बुद्धांची देखील झालेली होती. तो प्रसंग आठवला. स्वतःला जाणून घेण्याचा प्रवास हा किती अद्भुत असतो त्याची प्रचिती आली.
सुरुवात कुठून झाली होती या प्रवासाला काही कळत नाही. केवळ त्या पायवाटेवरती पाऊल ठेवले होते. पुढचा शब्दमय, नादमय प्रवास करवून घेणारा कोण होता, ती कोणती शक्ती होती काय जाणे. मी केवळ शब्दांच्या पानांपानांतून अरण्यमय होत गेलो. वेळुवनातील पावा ऐकत राहिलो. पक्ष्यांशी हितगुज करत राहिलो. रानफुलांचा मागोवा घेतला, ती भेटल्यावर त्यांना कुरवाळले. बोलते केले. माझ्या माईशी, माझ्या भुईशी बोललो. संवादरुप झालो आणि मनात पडलेले इवलेसे अक्षराचे बीज अंकुरित झाले व त्याला धुमारे फुटायला लागले तो वेलु हळूहळू वाढायला लागला.
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी.
शब्दांचे आकाशमय होणे कित्ती सुखद असते! तो एक उत्सव असतो. कविता प्रत्यक्षात उतरण्यासारखे सृजनाचे, बहरण्याचे सुख नाही. म्हणूनच मोगरा फुलताच मी इतका हर्षभरित झालो. ती उन्मनी अवस्था मनाला एकाकार करत होती. मनाचे हे गुंतणे भोवऱ्यासारखे होते. मुले भोवऱ्याभोवती दोरी गुंडाळतात आणि दोरी मागे ओढताच त्या भोवऱ्याची फेक एक लयदार अनुभूती देते तशी ही अवस्था! भ्रमर गुंजारव करत कमलिनीच्या गर्भात निजतो, त्याची ती नीज म्हणजे हे गुंतणे! मोगऱ्याच्या दरवळाचा तो गुंता मनात रुंजी घालायला लागला. लेखणीच्या टोकावर त्या दरवळाला ओवत शब्दांचे सर विणले आणि त्या घमघमणाऱ्या सरींचा नाजूकसा शेला तयार केला. अशी लिहिलेली अभंगगाथा सर्वात अगोदर कुणाला दाखवावी,कुणाला अर्पावी तर माझ्या विठोबा रखुमाई शिवाय अन्य पर्याय नजरेपुढे आला नाही.
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला.
हे अर्पण करणे म्हणजे ज्याचे होते ते त्याला सुपूर्द करणे एवढेच! माझे त्यात कर्तृत्व ते काय! मोगर्याचा धनी तो पंढरीचा राणा. त्या दरवळाची स्वामिनी माझी रखुमाई. लेकराचे बोबडे बोल कौतुकाने ऐकावे तसे ह्या शेल्याचे कौतुक होईल ही आस मनोमन ठेवून हा शब्दशेला घेऊन राऊळाच्या पायरीशी आलो आहे.
संतोष जगताप.
https://marathi.shabdaparna.in/पैल-तो-गे-काऊ
https://marathi.shabdaparna.in/रुणुझुणु









सुंदर,तरल….पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे निरुपण लिहिले सर.
तरल भावनांच्या पलीकडे एक निर्लेप अस्तित्व असते. अशा त्या अस्तित्वाची ओळख पटवून देणारे हे विवेचन मनाची तहान वाढवून गेले. अप्रतिम!
अप्रतिम