कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा हो विठ्ठलु-अभंग
गुळगुळीत पारा मुठीत ठेवला तरी तो स्थिर राहत नाही. वार्याला आपण बांधून ठेऊ शकत नाही. सुमनांचा परिमळ झाकू शकत नाही. सागराचा थांग आपण घेऊ शकत नाही तसेच अवकाशाचा दिगंत मोजू शकत नाही अगदी तसाच तो निराकार ईश्वर असतो जेव्हा कधी वाटते की अरे मला सापडला! मी त्याला जाणले! की लगेच तो निसटू पाहतो.
आता माऊलींच्या ह्या अभंगातच बघा ना, ‘विठ्ठल दिसला दिसला..’ असे म्हणत आनंदाने भावविभोर झालेल्या गोपिकेला तो नटखट कसा भुलवतो ते. एक रूप पाहायला गेले ती त्याची हजार रुपे नजरेपुढे तरळू लागतात. त्याला मूर्तीत पाहायला गेले की तो कधीकधी तिथें नसल्याचा जाणवतो, दर्शनाला जाताच तो त्या दगडातून पसार झाल्याचा जाणवतो. मग तिला वाटते की हा आपल्याला ठकवत आहे, आपली फिरकी घेत आहे. तो अगदी निष्णात अभिनेता आहे तसाच बेरकी आणि नाटकी देखील आहे. मुळात ते तत्त्व आहेच तितके तरल!
राधा देखील ही एक गोपिकाच आहे, एक गवळण आहे सोबतच एक वैष्णव देखील आहे हे सदोदित जाणवते. कृष्णाच्या अनुनयात व्यस्त असल्याची जाणवते. तो तिचा कृष्ण भक्तांना भेट देण्यासाठी पंढरीचा विटेवर येऊन उभा राहिला आहे असे तिला कळताच ती धाव घेत पंढरीत दाखल होते आणि त्याला डोळे भरून पाहायला राऊळात येते परंतु आज त्याने राधेला चकमा द्यायचे ठरवले असते आणि तीच गोड भुलभुलय्याची खेळी तो खेळीया मांडतो हेच सदर अभंगाचे वैशिष्ट्य आहे.
कानडा विठ्ठलु
कोणीतरी वार्ता आणली की तुझा तो हरवलेला कान्हा पंढरीत जाऊन बसला आहे. तिथे त्याचे चंद्रभागेच्या तीरावर भलेमोठे राऊळ आहे. त्या राऊळात तो विटेवर उभा आहे. शक्यच नाही. कान्हा आणि एका जागी स्थिर? तोही इवल्याशा विटेवर? ही गोष्ट काही पचनी पडेना. परंतु त्याला पहिल्याबिगर करमेनाही. तो कधी काय करेल सांगता येत नाही. तो कोणत्या रुपात अवतरीत होईल सांगता येत नाही. इतके दिवस त्याच्या सहवासात घातले तरीदेखील त्याला पूर्णपणे जाणू शकले नाही. तो सावळ्या मनाचा कृष्ण राहिला आणि मी भोळ्या मनाची राधा!
आता कोणी म्हणतच आहे तर हे देखील करून पहावे, त्याला इतक्या ठिकाणी शोधले पंढरीत देखील जाऊन पहावे म्हणून गोकुळ सोडले. आणि मजल-दरमजल करीत माझी एकलीची दोन पायांची दिंडी पंढरीच्या दिशेने निघाली. तो पंढरीचा राऊळात कसा दिसतो ते वर्णन करताना मला कोणीतरी असे सांगितले,
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
म्हणजे ती त्याची निळीसावळी आणि मखमली काया गेली आणि खडबडीत काळा कुळकुळीत देह धारण केला म्हणावा. आणि त्या रूपात देखील तो अतिशय देखणा दिसतो म्हणे! डोळे मिटून घेतलेले आहेत कोणाला तरी स्मरताना जाणवतो आहे म्हणे! कोणाला? मला का? आणि मला आठवायचे आहे तर मग तिथे कशाला कडमडायला गेला! पण काहीही म्हणा, त्याचे ते ध्यानच वेगळे आहे! जगावेगळे आहे. तो कोणत्याही रूपात असला तरी अतीव सुंदरच दिसतो. म्हणूनच तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
त्याच्याभोवती तशीच दिव्य तेजाची प्रभावळ रेंगाळत असेल. अनंत कोटी सूर्याचे तेज त्याच्यात विसावलेले असेल. तो दगडात असला तरी त्याच्या लावण्याचा स्पर्श हा अत्यंत मृदू आणि तलम असेल, देखणा असेल.
असा विचार करत करत पंढरीच्या वेशीवर येऊन पोहोचले आणि धावत धावतच त्याचे राऊळ गाठले. आणि बघते तर तो खरंच माझा कान्हाच कटेवर हात ठेवून विटेवर उभा होता. काय ते पण ध्यान! डोक्यावरचे खोवलेले मोरपीस पसार झाले होते. मी दिलेला तलम केशरी शेलार कुठे दिसेना. नेहमी पायाला भोवरा बांधल्यासारखा पसार होणारे त्याचे ध्यान इथे दोन्ही पाय समान स्थिर ठेवून उभे आहे.
त्याला ओळखायला क्षणभर देखील वेळ लागला नाही. खरे तत्त्व तर त्याच्या आत लपलेले होते. वरवर त्याने कोणतेही रूप धारण केले असले तरी आतमध्ये तोच एक सामावलेला होता. एखाद्या विशाल वृक्षाच्या खोडातून त्याच्या इवल्याशा फांदीची पाने अंकुरित व्हावीत तसे त्याचे तेच कोवळे रूप मला मूर्तीत दिसले.
त्याने माझ्या अंतर्मनाला साद घातली आणि मी पटकन त्याच्या मूर्तीपाशी पोहोचले.
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पाहायला लागले. तरीदेखील तो डोळे मिटूनच उभा! त्याला कळत नाही का मी आले आहे, त्याची राधा आली आहे. आणि लगेच त्याची तीच चिरपरिचित साद, हाक मनात उमटली ‘राधा’. तो जणू मूर्तीतून बोलला. शब्द उमटताना जाणवले नाही परंतु ते शब्द मनात पोहोचले होते. आणि मग आमचा संवाद सुरू झाला. अगदी बेफामपणे बोलायला लागलो. त्याने न सांगताच इकडे येण्यावर त्याच्यावर रागावले देखील. तो कोणत्याही रूपात बोलू शकतो, पण मला तसे नको होते. मला तर माझा कान्हा हवा होता. मी त्याला घ्यायला आले होते. पण आक्रीतच घडले. ‘गोकुळकडे परत चल’ म्हणताच तो आळीमिळी गुपचिळी करत गुमान बसला. बोलेच ना.
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
त्याला परोपरीने विणवायला लागले, समजावून सांगायला लागले ती तुझ्याविना तिकडे गोकुळ सुने पडले आहे. अखेरीस तर त्याच्या पायांवर डोके ठेवले. तर त्याचा तोच मूळचा स्वभाव जागा झाला. लगेच त्याचे पाय अदृश्य झाले आणि तोही पसार ! तो पुढे उभा असलेला दिसेना, आजूबाजूला दिसेना की माझ्या पाठीमागे उभा आहे तेदेखील कळेना. इथे तिथे लपून बसायची आणि अदृश्य होण्याची त्याची ती खोड जुनीच असल्याचे माहित होते. असाच ठकवतो तो!
पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
‘ बरं बाबा! नको येऊस सांगाती. परंतु तू इथे सुखात तर आहेस ना? सर्व काही ठीक आहे ना? तेवढे तरी सांग.’ असे म्हणत उभी राहिली तर त्यावर देखील त्याचे उत्तर नाही. वाटले त्याला एकदा मन भरून भेटावे, कडकडून मिठी मारावी. पण तिथे खुशाली विचारायला दगड देखील शिल्लक राहिला नव्हता. केवळ मीच एकटी बावळटासारखी उभी होती.
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
ह्मणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
इकडे तिकडे पाहात सैरभैर झाल्याचे जाणवताच त्याचे खळाळणारे हसू कानी पडले. ‘ राधे ‘ अशी हाक कानावर पडली तर तोच माझा कान्हा उभा होता तेच डोक्यावर मोरपीस खोवलेले! तोच खांद्यावर मी दिलेला केसरी शेला. का असा लपून बसला असावा इतका वेळ! का त्याने भेटीसाठी इतका त्रास द्यावा? असे नानाविध प्रश्न मनात येतात न येतात तोच डोळे घळघळून वहायला लागले. त्याने लगेच बाहुपाशात घेतले. जिवाशिवाची भेट झाली. गोकुळ ते पंढरीची वारी सार्थक झाली होती.
‘ अगं, माझ्या मित्रांना भेटायचे राहिले होते. त्यांचे हालहवाल विचारायचे राहिले होते. त्यांची सुखदुःखे जाणून घ्यायची होती. त्यांच्याशी गप्पा करायच्या होत्या. मनमुराद बोलायचे होते म्हणून मी ही एक जागा निवडली. मला भेटायला येतात इथे सारेजण. तू देखील येणार हे मला माहीत होते. तू गोकुळातून पंढरीकडे पाऊल टाकले त्या वेळेपासून मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. तू प्रत्यक्ष समोर आल्यावर तुझी फिरकी घेण्याची लहर आली, इतकंच.’
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
‘त्याने केलेली ती मस्करी, त्याने मांडलेला लपंडाव हे त्याच्यासाठी ‘इतकंच’ होतं. पण त्या दरम्यान माझे काय हाल झाले हे त्याला काय माहित? पण आताशा त्याच्या त्या ठकवण्याची सवय पडली आहे. तो माझा कान्हा दृश्य स्वरूपात असो की अदृश्य त्याचा प्रत्येक भाव हा जिवलग आहे.’ असे मनोमन म्हणत नाही तोच त्याचे कृष्ण स्वरूप लोप पावले आणि तो परत विटेवर मूर्त स्वरूपात उभा राहिला. पण आता काही हरकत नाही. त्याची भेट झाली होती आता कोणतीही उणीव राहिली नव्हती.
पुनश्च त्याची ‘राधे’ अशी कोमल हाक आली आणि तो मला हात धरून खाली उतरला. अगदी विटेवरून खाली उतरला. आम्ही राऊळाच्या बाहेर पडलो. दोघेच वाटेवरून चालायला लागलो. चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचलो. ती माऊली संथपणे वाहत होती. तिच्या काठावर आम्ही दोघेच बसलो. त्याला माहित होते मी काय आणले आहे. म्हणाला,’ दे, आण ती माझी वेणु.’ अजबच आहे! एवढ्या साऱ्या पसाऱ्यात त्याला सारे काही ठाऊक असते.
मीदेखील कमरेला ठेवलेली त्याची बासरी काढून त्याच्या हातात ठेवली. त्याने ती त्याच्या बासरी हातात घेतली. तिच्याकडे भारावलेल्या नजरेने पहातच राहिला. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या असल्याचे जाणवले. त्याने अगोदर तर त्या बासरीवर आपले ओठ अलगदपणे टेकवले. तिचे मनापासून चुंबन घेतले.
मग जणू मला काय अपेक्षित आहे हे जाणून त्यांनी माझ्याकडे पाहिले मी केवळ मानेने होकार दिला. ‘ हूं ‘ असा आर्जवाचा अस्पष्ट हुंकार दिला. आणि त्याने देखील वेळ न दवडता त्याची बासरी ओठाला लावली. त्याला प्रिय असलेला राग केदार त्याच्या वेणुवर घेतला. चंद्रभागेची दुथडी कान्हाच्या त्या संतृप्त स्वरांनी वाहायला लागली. त्याचे आणि माझे मिटलेले डोळे, भान मधुबनात पोहोचले होते.
संतोष जगताप.
रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा
https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा