मराठी साहित्यविश्वातील विख्यात कवी,गीतकार,पटकथा व संवादलेखक ,आधुनिक युगाचे वाल्मिकी गजानन दिगंबर
माडगूळकर यांच्या “चैत्रबन”
या काव्यसंग्रहातील ही कविता असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी वीर पुत्रांनी हौतात्म्य पत्करलेले, त्या मायभूमीच्या सुपुत्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे गीत आहे.’वन्दे मातरम्’ हा मंत्रच जणू स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना प्रचंड ताकद मिळवून देण्यास कारणीभूत ठरला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.भारतीयांच्या दृष्टीने या मंत्राचे मोल अनमोल आहेत.
वेद मंत्राहून आम्हां
‘ वंद्य वन्दे मातरम्’ !
ज्याप्रमाणे वेदांमधील मंत्र पावित्र्य ,जगण्याचा मार्ग,प्रेरणा देतात त्याप्रमाणे ‘वंदे मातरम्’
हा मंत्र देखील भारतीयांसाठी खूप मोठे महत्त्वाचे कार्य करतो.वेद जसे भारतीयांना वंदनीय तसाच हा ‘वन्दे मातरम्’
हा मंत्र सुद्धा भारतीयांना वंदनीयच आहे.
माऊलीच्या मुक्ततेचा
यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती
जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला
मंत्र ‘ वन्दे मातरम्’ !
ज्याप्रमाणे आपली दु:ख ,संकटं,अडचणी दूर होण्यासाठी यज्ञामध्ये विविध प्रकारच्या आहुती देतात त्याप्रमाणे भारतमातेच्या स्वातंत्र्याकरीता (इथे भारतमातेला ‘माऊली’ असे संबोधले आहे.) आमच्या माऊलींच्या स्वातंत्र्याकरीता युद्धामध्ये अनेक लाखो वीर आपल्या प्राणांची आहुती देत आहेत.’वंदे मातरम्’ या मंत्राला या आहुती मुळेच पावित्र्यता प्राप्त झाली आहे.
याच मंत्राने मृतांचे
राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी
शांति वादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभो
शस्त्र ‘वन्दे मातरम्’
गुलामगिरीच्या जोखडामध्ये अडकलेले ,पारतंत्र्यात मृतावस्थेत असलेले हे आपले
सारे राष्ट्र जणू काही या मंत्रामुळे खडबडून जागे झाले आहे.युध्दामध्ये आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणा-या क्रूर शत्रूशी मोठ्या धैर्याने ,मोठ्या सामर्थ्याने लढले.त्यासाठी शस्त्रहीन भारतीयांना ‘वन्दे मातरम्’ नावाचे शस्त्र हाती लाभले.या शस्त्राच्याच बळावर त्यांनी परकीय सत्तेविरूद्ध लढा दिला.
निर्मिला हा मंत्र ज्यांनी,
आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले
स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे
गीत ‘वन्दे मातरम्’ !










सुरेख रसग्रहण