ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. तब्यत हलवल्याने, काही दिवसातच अटक होणार आहे व यातून आता आपली काही सुटका नाही या विचाराने आणि लंडन मध्ये कुठेही थारा मिळत नसल्याने सावरकर ब्रायटनला बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव निरंजन पाल यांच्या घरी काही दिवस थांबले. तेथील समुद्रकिनारी फिरत असताना त्यांना ही कविता सुचली. १९०९-१० मध्ये मदनलाल धिंग्रा यांनी केलेली हत्या व त्यामुळे त्यांची अटक, इकडे भारतात भावाला झालेली अटक, कुटुंबाची चालू असलेली परवड, शिवाय मातृभूमीची सेवा अर्धवट सुटण्याची भीती… या सगळ्याचा आवेग व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीचा सार्थ अभिमान आणि प्रेम, पण तिला परत भेटण्याची संधी मिळेल की नाही अशी शंका आणि म्हणून सहन होत नसलेला विरह… यातून बाहेर आलेली तीच ही अप्रतिम, अतुल्य अशी शब्द रचना…
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला
समुद्राला आळवणी घालतांना सावरकर म्हणतात की मला माझ्या आई (मातृभूमी) कडे परत घेऊन चल, कारण मला तिचा विरह सहन होत नाही आहे.
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला …
मातृभूमीला आई संबोधून, भारताच्या पायथ्याशी स्थित कन्याकुमारी, जेथे तींहिबजूने हिंद महासागर जणू काही आईचे चरण आहेत असे संबोधून पुढे ते सागराला म्हणतात की मी तुला नेहमी माझ्या मातृभूमीची सेवा करतांना म्हणजेच पाय धुताना बघितले आहे. तू मला म्हणाला होतास की आपण इतर देशात फिरून येवू, तेथील वेगळी सृष्टी व त्यामुळे बदललेल्या संस्कृती यांचा अनुभव घेऊ. (कविंनी मातृभूमी व तिची विविधतेने नटलेली सृष्टी दर्शवली आहे आणि देशाबाहेरची संस्कृती जाणून घेण्याची तयारी दाखवतात व तेथील अनुभवांचा संग्रह करून परतण्याची इच्छा दाखवतात.)
पुढे ते सागराला म्हणतात माझ्या आईला तेव्हाच माझ्यापासून तिची ताटातूट होण्याची शंका आली, पण तू तिला वचन दिलेस की मला मार्ग माहीत आहेत व मी तुझ्या पोराला स्वतः परत घेऊन येईल.
तुझ्या या वचनांवर मी विश्वास ठेवला आणि मला वाटलं की जगाचा अनुभव घेऊन मी माझ्या आईकडे परतेन. तिच्या कामी येऊन माझे जीवन सार्थकी लागेल. लवकर परत येईल असे सांगून मी तिचा निरोप घेतला.
यातून हे स्पष्ट होते की कवीला पूर्ण खात्री आहे की त्याच्या मातृभूमीला त्याची किती काळजी आहे आणि या गोष्टीचा प्रत्यय भारतमातेने प्रत्येकाचं वेळी दिला आहे; मग ते इराक मधलं जगातलं सगळ्यात मोठ एअरलिफ्ट असो, किंवा अलीकडेच कोविडमुळे अंमलात आणलेलं वंदे भारत मिशन… aआणि अशा या महान मातेसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा.
शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला …
पोपट पिंजऱ्यात किंवा हरीण शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडावा अगदी तशीच फसगत माझी झाली आहे. यापुढे माझ्या मातृभूमीची सतत विरह कसा सहन करू? दाही दिशांकडे मला फक्त अंधार दिसतोय (तुला भेटण्याची इच्छा पूर्ण होईल का अशी शंका वाटू लागली आहे)
मी या परदेशातून फुलरुपी गुण वेचली की त्या फुलांचा माझी आई सुगंध घेऊ शकेल (परदेशात जाऊन ज्ञान प्राप्त केले की मातृभूमीला तिच्या प्रगतीमध्ये माझा, माझ्या ज्ञानाचा उपयोग होईल) पण माझ्या या उद्धार करणारी साठी मी काहीच करू शकत नसेल, माझ्या ज्ञानाने तिची सेवा घडू शकत नसेल, तर असे हे ज्ञान म्हणजे विनाकारणचे ओझे आहे.
जसं एखादं आंब्याच झाड आपल्या अस्तित्वाने भरभरून देत असतं, त्याचप्रमाणे माझी मायभूमी पण तशीच वात्सल्याची एक वृक्षच आहे (माझ्या देशात कुठल्या ही गावी जा, तुम्हाला नात्यातील ओलावा जपणारीच लोकं सापडतील, ओळख नसली तरी अगत्याने विचारपूस करणारी, साधी पण आपलंसं करून टाकणारी माणसं). ती अगदी विशाल झाड आहे की नवीन फुलं, वेली (नवयुवक) एक भक्कम आणि मजबूत आधार म्हणून विसंबु शकतात आणि इथला बाल गुलाब सुद्धा. हे सगळं आठवून वियोगणे कवी म्हणतात की ही सगळी कुटुंब रुपी फुलबाग आणि तेथील प्रेम, माया या सगळ्याला मी पारखा झालो आहे.
नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला …
पुढे व्याकुळतेने कवी म्हणतात की पूर्ण विश्वात, तारका मंडळात मला जर कुठला तारा जिवलग असेल तर तो म्हणजे भरतभूमीच होय. इथे या परदेशात खूप मोठमोठे महल आहेत, इमारती आहेत पण मला मात्र माझ्या भारतातील झोपडीच जवळची वाटते (इथल्या अकर्षणांपेक्षा मला माझ्या देशातील साधेपणा जास्त प्रिय वाटतो). मला कुठलेच राज्य, अधिपत्य नको आहे, माझ्या देशात मला वनवास जरी घडला तरी तो मला चालेल (कवी म्हणतात की मला पीडा जरी द्यायची असेल तर गोऱ्यांनी मायभूमीत द्यावी, तेथील तुरुंगवास सुद्धा मला प्रिय आहे).
आता हे सगळ विसरण मला शक्य नाही. जशी तुला (सरितपतीला) येऊन भेटणाऱ्या नद्यांची (सरितांची) तुला ओढ लागते, तशीच मला माझ्या मातृभूमीची ओढ लागली आहे. जसा पतीला त्याच्या पत्नीचा विरह सहन होणार नाही, तसेच जर एक नदी तुला येऊन भेटू शकली नाही तर तुला जो विरह होईल त्याची शपथ मी तुला घालतो. माझी ही तळमळ समजून घे आणि मला परत घेऊन चल.
या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला …
शेवटच्या कडव्यात कवींचा स्वर अगतिक्तेमूळ विनवणीकडून आक्रमकतेकडे वळतांना दिसतो. त्यांना त्या उसळत्या आणि फेसाळणाऱ्या लाटा उपहासात्मक हस्यासारख्या भासतात आणि ते सागरास म्हणतात की एखाद्या खलनायकसारखा हसतोस कसा, तू तर दिलेला शब्द मोडतोय, वचनाला जागत नाही आहेस. तुझ्यावर जे स्वामित्व गाजवतात त्या गोऱ्यांना घाबरून केलेलं हे एक भेकड कृत्य तर नाही ना, असा प्रश्न ते त्याला करतात. माझ्या मातेला अबला म्हणून फसवू पाहतोस. मला माझ्या मातृभूमीपासून तोडणाऱ्या, बेघर करणाऱ्या गुलामा, तू जरी अंग्लभूमीला भीत असलास तरी माझी माता काही अबला नाही. ती तुझे हे कृत्य अगस्ती ऋषींना सांगणार आहे ज्यांनी तुला एका आचमानात पिऊन तुझं अस्तित्व नाहीस करू शकले होते. (यातून कवी सांगू इच्छितात की अगस्ती ऋषिंसारखे अनेक ऋषीमुनी, विद्वान, सामर्थ्यशाली, कार्यक्षम वीरपुरूष माझ्या मातृभूमीत झाले होते, आता आहेत आणि होत राहतील… आणि ते तिला कधीच अबला होऊ देणार नाहीत)
अशा प्रकारे वेदनेतून तयार झालेल्या या कवितेत कविंनी आपल्या मातृभूमीचे गुण वैशिष्ठ्य तंतोतंत मांडले आहेत. अशा अजरामर काव्याला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले (ज्या साठी त्यांना आपली नोकरी गमवावी लागली) आणि लता व उषा मंगेशकर यांनी गायले. असे महान कलावंत लाभले त्यामुळे या अलंकार रुपी काव्याला चकाकी आली. “तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण” असं म्हणणाऱ्या वीर सावरकर यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घासच… पण अशा कठीण मराठीत (जी आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत नाही) लिहिलेल्या या रचनेचा अर्थ स्पष्ट करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजते. सावरकरांनी जशी मातृभूमीच्या विकास कार्याच्या यज्ञकुंडात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची आहुती दिली, तसेच आजच्या युवापिढीने यातून प्रेरणा घेऊन या पवित्र कार्याचा भाग बनावे व आपापला, येवढा मोठा त्याग नाही, पण खारीचा वाटा जरूर नोंदवावा हीच आशा. जय हिंद.
अदिती ढोले








सुंदर रसग्रहण