७-तृष्णा

भाग-७
तृष्णा (प्रेमाची)
तृष्णा-सखा नदीवर गेल्यानंतर पुढे काय….वाचा खालील भागात
तृष्णा
भाग-७
अमोलने आईला फोन केला.
कसा आहेस बाळा? 
मी बरा आहो ग.तुम्ही सगळे? 
आम्ही पण ठीक  आहोत.
बाबा सांगत होते घरासाठी गिऱ्हाईक मिळाले असे.
फायनल बोलणे व्हायचे आहे आई.
तेवढ्यात बाबांनी फोन घेतला.
अमोल उद्या कोर्टात जाऊन इसारचिठ्ठी करुन घे बेटा.
तीन महिन्याची मुदत दे.
सकाळी ते काम झाले कि दुपारी निघून ये.
तुला पुढची पण तयारी करायची आहे.
बाबा उद्या नाही येत मी.
का रे? ज्या कामासाठी गेला ते होत आहे उद्या.
हो पण बाबा मला एक दिवस त्या घरात राहायचे आहे.
अरे पंचवीस वर्षापासून ते घर बंद आहे.तू कसा राहणार?
लाईट,पाणी काही नसेल.
शेजारच्यांकडून मी ती सोय केली बाबा.
बरं उद्या थांबून परवा ये.
बघतो बाबा.
एकदा घर विकल्यावर मी पुन्हा राहू नाही शकणार.
बाबा तुम्ही पण आठएक दिवसांसाठी  या अमोली आणि आईला घेऊन. इथली शांतता आवडेल तुम्हाला.
 नाही जमणार बाळा. अमोलीची परीक्षा ,माझे आॕफिस.कसे जमणार? बघू पुढे  कधीतरी,
 तू ये पण लवकर.तुझी आई तुझ्याच काळजीत असते.
अमोलने हाॕटेल सोडले आणि  घरी आला.सोबत विजयलाही घेऊन आला. विजय केवळ अमोलच्या आग्रहाखातर आला.अमोल बेडरुममध्ये झोपला आणि विजय हाॕलमध्ये.
विजय लगेच झोपला.पण अमोलची झोप उडाली होती. त्याला तिथे प्रत्येक गोष्टीत तृष्णाचे अस्तित्व जाणवू लागले.
त्याने बॕग काढली.व्हिडिओ कॕसेट काढली. आणि  बघत बसला.
तृष्णा समोर आली.आनंदी दिसत होती.
काल गेलीच मी नदीवर हट्टाने.
सखा तयार नव्हता.पण माझ्यामुळे यावेच लागले.
निर्मला नदी,तिचे निर्मळ,नितळ पाणी,तिच्या  दोन्ही बाजूंनी असलेल्या हिरव्यागार झाडांच्या प्रतिबिंबामुळे तिचे हिरवे भासणारे पाणी,तिचा झुळूझुळू आवाज ,तिच्या काठावर असलेली विविधआकाराचे दगड, रेती ,काठावरच्या झाडांवर बसलेले पक्षी त्यांची किलबिल.नदीच्या काठी जिवंतपणा काठोकाठ भरला. मी आणि  सखा आणि  ते रम्य वातावरण.अहाहा! सांजवेळ टळूच नये असे वाटत होते.
आमच्या सारखीच आणखीही काही जोडपी होती,हात हाती घेऊन गप्पा करत एकमेकांच्या अगदी जवळ बसली होती.
सखा अंतर राखून होता. मग मीच सखाचा हात पकडला.आणि  म्हंटले,
अहो,ती जोडपी बघा.प्रणयात रंगलेली आणि  आपण ह्या नदीच्या दोन काठासारखी ,अंतरलेली.
माझे बोलणे ऐकून सखा हसला.
हसत जा,छान दिसता हसतांना.
मी म्हंटले.
त्यांनी विचारले,तू आधीपासूनच एवढी बोलकी आहे का?
 मी हो म्हंटले.
दिवसभर कुणाशी बोलतेस?आहे माझी एक गंमत.
सख्याला ही शुटींगची गंमत माहीत नाही अजून. 
आम्ही दोघे नदीमुळे जरा मोकळे झालो होतो.
निर्मलेने आमच्यातील अंतर  कमी केले होते.आम्ही नदीवरुन परतलो तेव्हा सांज टळली होती.दिवसभर तळपणारा सूर्य  आभाळात गायब होऊन चंद्र आणि  त्याची चांदणी विराजमान झाले होते.सख्याचा हात  सोडूच नये असे मला वाटत होते. येतांना  एका दुकानासमोर मोगऱ्याचा सुगंध आला.किती दिवसांनी मी माझी आवडती फुले बघत होते.
तो सुगंध मला माहेरच्या अंगणात घेऊन गेला.
अंगणात आईने फुलवलेल्या बागेत मोगऱ्याची फुले चांदण्यासारखी चमकायची आणि  सुगंधाची लयलुट करायची.
 मी त्या दुकानासमोरच उभी होते.सख्याने माझ्यासाठी  माझ्या आवडत्या मोगऱ्याचा गजरा घेतला.
मी तिथेच माळला. मला येणारा सुगंध माझ्या  केसापंर्यत पोहचला.
मग घर येईपर्यंत मी सख्याला आमच्या बागेचे वर्णन ऐकवले.सखा हूं हा करत ऐकत राहला.
झोपण्याआधी आईला फोन केला.माझ्या एका शब्दातून आईने मी आनंदी असल्याचे ताडले.
कमालच आहे आईची.एवढ्या दुरुन तिला कसे काय कळले असणार?
मी आई बनल्यावर मलाही असेच माझ्या  बाळाने न सांगता सगळे समजेल?
क्रमशः
निर्मलेने सखा-तृष्णेतील कमी अंतर अजून कमी होईल कि वाढत जाईल….वाचा पुढील भागात.
Previous Part

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!