मराठी लघुकथा-दर्शना भुरे
मराठी लघुकथा-दर्शना भुरे

मराठी लघुकथा-दर्शना भुरे

मराठी लघुकथा-दर्शना भुरे
स्वस्वप्न

आपल्या लेकीच्या सावीच्या हाती नौकरीची ऑर्डर पडताच दीपिका आनंदून गेली…आज लेकीच्या नौकरीचा पहिला दिवस..म्हणून दीपिकाची सकाळी सकाळीच तिच्यासाठी डबा बनविण्याची गडबड चाललेली..भाजी, पोळी लेकीच्या आवडीची कोशिंबीर वगैरे करून डबा भरून तिच्या हाती दिला. डबा हाती घेऊन…
येते हं आई ..असे म्हणून सावीने जेव्हा स्कुटी स्टार्ट करीत आईला आवाज दिला. तेव्हा लेकीचा आवाज कानावर पडताच दीपिका तिला निरोप देण्यासाठी गॅलरीत धावत जात…. नौकरीच्या पहिल्या दिवशी घरातून बाहेर पडणारी आपली लेकीच्या रूपात स्वतःची अपूर्ण राहिलेले स्वप्न , आत्मविश्वास, मान सन्मान परत मिळवल्याच्या आनंदात तिच्याकडे कौतुकाने बघत कितीतरी वेळ उभी होती….

 

अनपेक्षित मदत 

सामानाने भरलेल्या जड पिशव्या हातात घेऊन आलेल्या सुमतीकाकूंचे एव्हाना हात दुखायला लागले म्हणून मदतीसाठी आसपास कोणी मिळते का पाहू लागल्या तेव्हा त्यांचे लक्ष घराच्या आवारातच खेळणाऱ्या मुलांकडे गेले.. त्यांंना हाक द्यावी अशा विचारात असताना..
मुलेच खेळता-खेळता त्यांच्या मदतीला धावली..व त्यांच्या हातून पिशव्या घेऊन त्यांच्यासोबत घराकडे निघाली.. तेव्हा सुमती काकूचे डोळे भरून आले… आपण मुलांसोबत नेहमी किती कठोर वागतो म्हणून त्यांना आता स्वताःचीच लाज वाटू लागली …ज्या मुलांना ..
.. घरासमोर गोंधळ घालाणारी उनाड मुले समजुन त्यांचा रागराग करून घरासमोरून आपण हाकलून लावतो..तीच मुले आपल्या बोलाविण्याची वाट न पाहता.. स्वतः हून मदतीला धावून आली… हातातील पिशव्या घरात ठेवून ..मुलं जावयास निघाली..तेव्हा सुमतीकाकू प्रेमाने हसत मुलांना म्हणाल्या,
बर..का मुलांनो आजपासून तुम्ही रोज माझ्या घरासमोरील आवारात खेळायला आलात ..तर मला नक्की आवडेल ….काकूमध्ये असा अचानक झालेला बदल पाहून सर्व मुले एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागली…

 

पार्सल ..अलक

गीताने काऊंटरवर दोन पावभाजीची तसेच भाचे मंडळींकरीता नूडल्स ची ऑर्डर दिली.. बऱ्याच महिन्याने भाचेमंडळी मावशीकडे आलेली असल्याने खाणे पिणे, गप्पागोष्टी धमाल चालू होती.. आवडीचे नूडल्स समोर येताच.. मुलांनी त्यावर ताव मारायला सुरुवात केली.गीता पण पावाचा तुकडा भाजीत बुडवून तोंडात टाकणार तोच…तिची नजर बाजूला बसलेल्या एका छोट्या मुलीवर गेली.. ती आशाळभूत नजरेने त्यांच्याकडेच बघत होती. लगेच तिला हाताने खुणावत जवळ बोलावून घेत गीताने विचारले, पावभाजी खाणार?

तिने पटकन हो.. पण.. म्हणत आपल्या हाताच्या मुठीत धरलेली चिल्लर गीतासमोर धरली.. हसून तिची मुठ बंद करत गीताने तिला जवळ बसवून तिच्या समोर पावभाजी ठेवली.. पावभाजी समोर येताच चिमूकलीने आनंदाने खाण्यासाठी हात समोर केला.. पण नंतर एकदम उठून कसलासा विचार करत उभी राहून म्हणाली, घरी लहान भाऊ आहे.. घरी नेवू का? त्याच्यासोबत खाईल..

हो का नाही? म्हणत गीताने पावभाजीचे  पार्सल बांधून तिच्या हाती दिले..

 

पान्हा.

माहेरी दीपिका बऱ्याच..दिवसांनी मनसोक्त खरेदी करण्याचा बेत ठरवून आपल्या मैत्रिणीसोबत घराबाहेर पडली.. बाळाची कपडे, बाळाची खेळणी आईसाठी साडी, लहान भाऊ बहीण वगैरेंची कितीतरी खरेदी करण्यासाठी ती फिरत असताना तिला काळ वेळेचे काही भान राहिले नाही. आणि अचानक ..

बाई ..मला भूक लागली काही खायला द्या ना…बाळासाठी पान्हा येत नाही आहे.

असे समोरून कानावर शब्द पडल्याने तिने चमकून समोर पाहिले तर एक गरीब असहाय्य महिला आपले तान्हुले कुशीत घेऊन उभी होती. तेव्हा तिला आपले पाळण्यातले बाळ नजरेसमोर दिसू लागले व तिची पावले आपसूकच घराकडे वळली.

 

पालवी… अलक

लेकीचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. आणि लेक माहेरचा निरोप घेऊन सासरी नांदायला गेली..घरातील पाहुणे हळूहळू पांगू लागले..आणि दीपिकाने सामानाची आवरा आवरी हाती घेतली..तर अंगण साफ करीत असताना लग्नाच्या गडबडीत बरेच दिवस झाडाला पाणी दिले नाही म्हणून बगिच्यात एक इवलेसे रोपटे सुकलेले तिला दिसले. तिने झाडांना पाणी देऊन ते इवलेसे रोपटे अलगत उपटून घरातील कुंडीत लावले. आणि त्याची देखभाल करू लागली. इवलेसे रोपटे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रुजायला वेळ लागत होता. हे पाहून तिला आपली लेक आठवली तीसुद्धा माहेरच्या मुळापासून उपटून सासरी आपली मुळे घट्ट रोवायला गेली होती. आणि एक दिवस त्या इवल्याशा रोपट्याला पालवी फुटून ते भरलेले बघितले.. व इतक्यात घरातील फोन वाजला तर पलीकडून लेकही आपल्या संसारात त्या इवल्याशा रोपटे प्रमाणे तिच्या आवाजावरून बहरलेली जाणवलेली..तेव्हा दीपिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!