डायरी शलाकाची
‘डायरी शलाकाची’ शलाकाच्या आठवणीतील क्षणांची गुंफलेली गुंफण.
थोडीशी भरकटलेली,विखुरलेली शलाका सतत आधाराच्या शोधात आहे.
स्वतःच्या मानसिकतेतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचा शोध घेत जाणारी शलाका.
एकांतवास फक्त शारीरिक असतो का?नाही तो मानसिकही असतो.मन एकटे असले तर आजूबाजूला कितीही माणसांची गर्दी असली तरी एकांतवास घडतोच.
शलाका लहानपणापासून मानसिक एकांतवास भोगत आहे.
बोलक्या स्वभावाच्या शलाकाला मनाच्या अनुभूती सांगण्याची कला अवगत नाही.
तिच्या मनात साचत गेलेल्या आणि तिचे आयुष्य बदलवणाऱ्या आठवणींचा संचय म्हणजे ही ‘ डायरी शलाकाची’.
विस्कटलेले घर आणि हरवलेले बालपण यांना दोषी मानणारी शलाका स्वतःचा शोध घेऊ शकली का?
भाग-१
डायरी शलाकाची
शलाकाचा आज पन्नासावा वाढदिवस. नवरा मानस,मुलगा स्वानंद, मुलगी सुखदा,बहीण,भाऊ,नातेवाईक यांनी ठरवल्याप्रमाणे दणक्यात साजरा केला. सकाळपासून घरात चाललेली धमाल रात्री संपली.
सगळे आपापल्या घरी गेल्यावर शलाकाने लहानमुलाच्या उत्सुकतेने सर्व भेटवस्तु उघडून बघायला सुरुवात केली.बहिणीने कांजिवरम साडी,भावाने शलाकाची लहानपणापासून असलेली फोटो काढण्याची आठवण ठेऊन कॕमेरा दिला. मानसने तिची खूप दिवसांची इच्छा म्हणून तिला सोन्याचा नेकलेस सेट दिला.
तिने खूप आधी त्या सेटची इच्छा व्यक्त केली होती. आता त्याचे अप्रुप संपल्यावर तिला ते मिळाले होते.
ती स्वतःही तो सेट घेऊ शकली असती. पण तिला तो मानसकडून हवा होता.
स्वानंदने तिच्या लहानपणापासूनच्या फोटोंचा कोलाज बनवून दिला.त्या कोलाजमध्ये तिच्या असंख्य आठवणी दडलेल्या होत्या. आईबाबा,सई,राजासोबतचे फोटो होते. तो फोटो बघून शलाकाला गलबलून आले.फोटोत सुखी दिसणारे कुटुंब किती विखुरले होते.
सुखदाने शलाकाला एक सुंदर कव्हर असलेली डायरी दिली.
शलाका नेहमी म्हणायची,
माझ्यात खूप काही दडलेले आहे.मला ते सर्व डायरीत उतरवायचे आहे.
आजपासून डायरी लिहिणार,उद्यापासून लिहिणार म्हणत म्हणत तिने वर्ष गेलीत तरी डायरी लिहिली नाही.
आज सुखदाने तिला आवर्जून सांगितले,’बघ हं आई आता तुला रोज डायरी लिहावी लागणार.
‘ तू या डायरीत आधीचे तुझे सगळे आयुष्य लिही.’
शलाका हसली ते ऐकून. आठवेल मला ते सगळे?
मी भोगलेले आनंदाचे सोहळे,दुःखाचे भोग, माझ्या अतृप्त इच्छा. मला जे हवे ते मिळवण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न,माझ्यातील अपूर्णता,अतृप्तता.
बघू या.उद्यापासून नक्की लिहिते.
म्हणजे काय लिहावेच लागेल.सुखदा लिहून घेणारच’.
विचार करत करत शलाका बेडरुममध्ये झोपायला गेली. मानस गाढ झोपला होता. हे रोजचेच होते.
तिला सवय होती या गोष्टींची.पण आज त्याने वाट बघावी,तिच्यासोबत वेळ घालवावा असे शलाकाला वाटत होते. ती मानसच्या बाजूला येऊन झोपली.
पहाटे मानस उठला.स्वयंपाकाला बाई होतीच. तिने डब्बा बनवून दिला. शलाका उठायच्या आधीच मानस काॕलेजमध्ये निघून गेला.
कालच्या कार्यक्रमामूळे थकलेल्या शलाकाने आज सुट्टी घेतली होती.ती घरीच राहणार होती.
सुखदाने तिला आजपासून डायरी लिहायची आहे याची आठवण दिली
.’हो ग,आहे माझ्या लक्षात.
दुपारी जेवण आटोपून शलाका निवांत बसली होती. स्वानंद होस्टेलवर निघून गेला, सुखदा काॕलेजमध्ये गेली. शलाका एकटीच होती.
निवांत वेळ आहे.जरा डायरी लिहायला सुरूवात तरी करावी.
बघू या कितपत जमेल ते.
असे म्हणत शलाका उठली आणि डायरी,पेन घेऊन परत बसली.
कुठून बरे सुरूवात करावी? माझ्या लहानपणापासून? पण माझे लहानपण काही बाकी मुलांच्या लहानपणासारखे आनंदमयी किंवा रमणीय नाही. रसरशीत,मधूर,कोमल आठवणींपेक्षा उग्र आठवणी जास्त आहेत.मग तारुण्य? तिथून लिहू? नको.सगळे संपलेले तारुण्य पुढे येईल.
विचार करत करत शलाकाने डायरीचे पहिले पान उघडले. लिहायला सुरूवात केली. तिच्या लहानपणाला तिने साद घातली.आठवणी एखाद्या लहान बाळासारख्या दुडूदुडू धावत आल्या. आपोआप ती तिच्या लहानपणात शिरली. मनात दडपलेल्या आठवणी सुसाट वेगाने एकामागे धावू लागल्या.
दिनांक ……
खूप लहान असणार मी तेव्हा. बाबांनी घरी रेडिओ आणला होता. बाबांना गाण्याचे खूप वेड.सतत काहीतरी गुणगुणत असायचे. त्यांना वेळ असला कि पेटी काढायचे आणि पेटीच्या संगतीने गाणे म्हणायचे. बाबांना मित्र होते पण ते घरीच जास्त रमायचे. बँकेतून घरी आले कि झाडांना पाणी दे,
आमचा दिवस कसा गेला त्याची विचारपूस कर,आईला बँकेतल्या गोष्टी सांग यातच वेळ घालवायचे. बाबांना फिरण्याचीही आवड होती.सगळे मिळून कुठेतरी फिरायला जावे असे त्यांना सतत वाटायचे.
पण आईची इच्छा नसायची.आईला विशेष अशी कसलीही आवड नव्हती. स्वयंपाक आणि घर टापटीप ठेवणे हीच तिची आवडती कामे. पण बरेचदा तिला न आवडणाऱ्या गोष्टी ती केवळ बाबांना आवडतात म्हणून करायची. बाबा आईला सिनेमाला,नाटक बघायला घेऊन जायचे. घरी आले की आम्हाला समरसून कथानक ऐकवायचे. खूप तद्रुपतेने सांगायचे सगळे. त्यांनी सांगितलेले चित्रवत् डोळ्यासमोर उभे राहायचे.
क्रमशः
Next Part
काय काय घडते शलाकाच्या आयुष्यात?
वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
नविन कथा मालिकेची सुरुवात छान