१०-तिची आजी
श्रीधर भोपाळला निघाला. सीताईला वाटले हा काही दिवसांसाठी जाईल आणि मागे फिरेल.
भोपाळ श्रीधरची कर्मभूमी बनेल असे कुणालाही तेव्हा वाटले नव्हते.
श्रीधरचे पत्र आले.
त्याला तिथेच एका कारखान्यात नौकरी मिळाली.
सीताईला बरे वाटले. नौकरीला लागला आता आपसूकच जबाबदार बनेल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली.
सीताईला येऊन चारपाच महिने झाले.
गावी इंदुमतीचे बाळंतपण जवळ आले होते. सीताईला गावी यावेसे वाटत होते. इंदुमतीचे कोण करेल हा प्रश्न तिच्यापुढे होताच.पण गीता लहान होती.तिला आणि मनोहर दोघांनाच सोडून ती नाही येवू शकली. एका महिन्याने गीताला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या.तेव्हाच जायचे ठरले.
इकडे गावी घरचा सगळा कारभार प्रभाकरच्या हाती आला.
शेतीचे,पैशांचे व्यवहार तो सांभाळू लागला.
जरा पैसे जमा करुन त्याने स्वतःचे वेगळे चार एकर शेत घेतले. इंदुमतीला थोडे दागिने करुन दिले,त्याच्या हातात पैसा खुळखुळू लागला.
इंदुमतीचे बाळंतपण झाले. मुलगा झाला. प्रभाकरने एक माणूस पाठवून मुलगा झाल्याचे सीताईला कळवले.
सीताईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
इंदुमतीने बाळंतपणासाठी तिच्या मावशीला बोलवून घेतले होते.
गीताला सुट्ट्या लागल्या.सीताईला रेल्वेत बसायची भीती वाटायची म्हणून मनोहरने श्रावणला बैलगाडी घेऊन बोलवले. सीताईला नातवाला केव्हा बघते नी केव्हा नाही असे झाले. सीताई ,गीता घरी पोहचल्या.सीताईने नातवाला बघितले प्रभाकरसारखाच दिसत होता.
बाळाचे नाव राम ठेवले. गीताला महिनाभर सुट्ट्याच होत्या. सीताईला घरी येण्याआधी जी ओढ वाटत होती तशी घराला वाटली नाही हे सीताईला पदोपदी जाणवत होते.
तिचे घर तिचे राहले नव्हते. इंदुमतीने पूर्ण घरावर तिची मोहोर उमटवली होती.
प्रभाकरचेही वागणे बदलले होते. तिला दिराकडून प्रभाकरने वेगळी शेती घेतल्याचे सांगितले.सीताईसाठी हे धक्कादायक होते. तिने प्रभाकरला विचारले.
प्रभाकरचे उत्तर तयार होते.
आई आता माझाही प्रपंच वाढत आहे. त्यांची सोय मला करायला हवी.
सीताई काही बोलली नाही.प्रभाकरचा प्रपंच आता वेगळा झाला. हे लक्षात आले तिच्या.
इंदुमतीचा स्वभाव बडबडा होता.कमी वेळातच तिने भरपूर माणसे जमवली होती. हे घर आता सीताईचे कमी आणि इंदुमतीचे जास्त झाले होते.
दिवाळी जवळ आली होती.श्रीधर,मनोहर दोघे भाऊ घरी आले. दयाही बाळाला बघायला आली.
गीताच्या सुट्ट्या संपत आल्या सीताईला आता परतणे गरजेचे होते. दयाही तिच्यासोबत निघाली.आईशिवाय इथे राहणे तिला नको वाटले. श्रीधर भोपाळला गेला.
एकाच कुटुंबातील सगळे पण आता सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या.
दिवस पळत होते. प्रभाकरला दुसरा मुलगा झाला श्याम. मनोहरचे बीए आणि गीताची दहावी झाली.
सीताई आणि गीता आता वापस घरी आल्या होत्या.
घरात शांतता नांदवायची असेल तर इंदुमतीशी जपूनच राहावे लागेल याची जाणीव सीताईला होतीच.तिने गीतालाही वहिनीशी चांगले राहायला सांगितले.
सीताई आता मनोहरसाठी मुलगी शोधायला लागली.
पण मनोहरने आधी गीताचे लग्न करु असे सांगितले.
गीता दिसायला काळीसावळी होती म्हणून लग्न जुळायला वेळ लागत होता. पाहूणे बघायला यायचे पण नापसंत करायचे. एक वर्ष झाले दहावी होऊन पण लग्न जुळत नव्हते.
मनोहरचा बी.एड.ला नंबर लागला.
मनोहरचे गावात सगळ्यांना कौतुक होतो.गावातील पहिला पदवीधारक होता तो. त्याचा आदर्श ठेऊन बरीच मुले आता शिकायला लागली होती. त्याला लहानपणापासून शिक्षक बनून विद्यादानाचे कार्य करायचे होते.त्याचे ते स्वप्न बीएडला नंबर लागल्यामुळे पूर्ण होणार होते.
गीताला पाहूणे बघायला येणे सुरुच होते. एकाने पसंती दाखवली. मुलगा नौकरीवर होता.घरची परिस्थिती साधारण होती. त्याने गीताला पसंत केले पण एका अटीवर.
हूंडा पाहिजे होता त्याला.गीताचे लग्न जुळणे कठीण होते आणि मुलगाही नौकरीवर म्हणून सीताईने हुंडा द्यायचे ठरवले. प्रभाकरला बहिणीला हुंडा द्यायचे जीवावर आले होते. पैशाचे व्यवहार त्याच्या हातात होते.बहिणभावांसाठी त्याच्या हातून पैसे सुटत नव्हते.
पण सीताईने हट्ट करुन प्रभाकरला तयार केले.
गीता आनंदात होती.मुलगा तिला आवडला होता.शिवाय तिचे पुढील शिक्षण करायला तयार होता.गीताला शिक्षणाची आवड होतीच.तो लग्न जमल्यावर एकदा गीताला भेटायलाही आला होता.पण लग्नाआधी मुलामुलीने एकमेकांना भेटणे तेव्हा समाजमान्य नसल्याने सीताईने भेटू दिले नाही.
गीता आणि दयाच्या स्वभावात फरक होता.आणि दोघींच्या वयातील अंतरामुळे परिस्थितीतही अंतर होते.दयाला तिचे मत कधी मांडता आले नाही पण गीता तिच्या विचारांवर ठाम असायची.
गीताच्या लग्नाचा दिवस जवळ आला. मुलगा आणि त्याचे आईवडील शहरात राहत होते.हौशी होते.गीताला सुंदर शालू, दागिने आणले होते.
गीताचे लग्न आटोपले. लग्नाला दया येऊ शकली नाही. तिचे बाळंतपण झाले होते.
श्रीधर भोपाळवरुन आला होता. त्याने त्याच्यासाठी भोपाळची मुलगी बघितल्याचे सांगितले.
मनोहरला नौकरी लागल्याशिवाय लग्न करायचे नव्हते.
श्रीधर थांबायला तयार नव्हता.
कोणे एकेकाळी घरावर एकछत्री साम्राज्य असलेल्या सीताईच्या हातून एकेक गोष्ट निसटत चालली होती.मुले मोठी झाली होती.त्यांच्या निर्णयात सीताईला कमी स्थान होते.
शेवटी मनोहरच्या आधी श्रीधरचे लग्न करायचे ठरवले.
मुलगी भोपाळचीच होती.श्रीधरच्या आॕफिसमधल्या मित्राची बहीण शारदा. श्रीधरला आवडली ती.
शारदाचे कुटुंब मुळ महाराष्ट्रातील पण वडील कामानिमित्त
भोपाळला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.
एवढ्या लांब खूप जणांना लग्नाला जाणे शक्य नव्हते म्हणून प्रभाकर,मनोहर ,गीता,तिच्या सासरची मंडळी आणि जवळचे मोजके नातलगच लग्नाला गेले. श्रीधरने काही दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या.
लग्न करुन नवरीला घेऊन सगळे परतले. शारदा शहरात वाढली होती. इथे तिचे मन लागणे शक्य नव्हते.
संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला कि गाव अंधारात गुडूप व्हायचे. दिवा आणि कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात जास्त काही सुचत नव्हते.
क्रमशः
Previous link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा






छान दिर्घ कथा.
सुंदर रचना