१२-तिची आजी
कांताला सोबत द्यायला आलेली सीताई दहा वर्ष इकडेच थांबली.
गावी तिची गरज आता संपली होती. आता पुढे वाचा.
कधीतरी सगळे भेटायचे तेव्हा नातवंडांच्या जल्लोषात सीताई हरखून जायची. हे दिवस असेच राहावेत,जाऊच नयेत असे वाटत राहायचे तिला.
सीताईला मनोहर जेव्हा नेईल तेव्हा गावी जायला मिळायचे. दोनतीन दिवस गावी राहले कि परत इथे यायचे.
मनोहरला इथे येऊन दहा वर्षे होऊन गेली होती.त्याचा जीव इथे रमला होता. दोघांनीही जीवाभावाची माणसे जोडली होती.आयुष्यभर इथेच राहावे असेच सगळ्यांना वाटत होते.पण हे अशक्य होते.मनोहरची बदली झाली आणि जड अंतःकरणाने त्यांना या गावाचा निरोप घ्यावा लागला.
निरोप द्यायला पूर्ण गाव जमा झाले होते.
ज्या गावी मनोहरची बदली झाली शहर होते. तालुक्याचे ठिकाण होते. तिथे घरभाडे महाग होते. मनोहरने दोन खोल्यांचे घर घेतले. प्रभाकर शेतीतील उत्पन्नापैकी एक दमडीही भावांना देत नव्हता.
दोन खोल्यांमध्ये सीताईची अडचण होणार होती.
माणूस आपल्या मुलांसाठी कितीही तडजोड करायला तयार असतो पण आईवडिलांसाठी नाही करु शकत.
सीताईची रवानगी पुन्हा तिच्या गावी झाली.
सीताईचे आयुष्य एखाद्या वस्तुसारखे झाले होते.
भावभावना असलेल तो जीव आहे हे सगळे विसरत होते.
दयाच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले. तिला कृष्णापूरच्या जवळ एका गावी दिले. तिची घरची परिस्थिती गरीब होती. मुलाला नौकरी आहे असे सांगून फसवणूक करण्यात आली होती. माहेरी चांगल्या परिस्थितीत वाढलेल्या ताराला शेतीत मजूरी करावी लागायची. सीताई तिच्यापरीने ताराला मदत करायची.
सीताई गावी परत आली पण इंदुमतीशी तिचे नाते
बदलले नाही. इंदुमतीला सीताईने तिथे राहलेले आवडत नव्हतेच.गावी असली कि सीताईला पीकपाणी किती झाले,कापसाला,तुरीला भाव काय मिळाला सगळे माहित व्हायचे आणि तेच प्रभाकर, इंदुमतीला नको असायचे.
घरी एवढे अमाप पीक होऊनही मनोहर आणि श्रीधरला धान्य विकत घ्यावे लागत होते याचे सीताईला फार वाईट वाटायचे.
प्रभाकरला तिने काही म्हंटले कि त्याचे उत्तर ठरलेले असायचे,
मला भावांमुळे शिक्षण घेता आले नाही.लहान वयात शाळा सोडावी लागली त्यामुळे शेतीवर त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार माझा आहे.
त्याचे हे बोलणे ऐकले कि सीताई आतल्याआत तुटत राहायची.
प्रभाकर आणि सीताईमध्ये असलेल्या मायलेकाच्या नात्यातील दरी दिवसेंदिवस वाढत होती.इंदुमतीने सीताईशी बोलणे सोडले होते. तिने नातवंडांनाही आजीबद्दल फारसे प्रेम निर्माण होऊ दिले नाही.
सीताईने दोनदा जेवावे आणि गपचूप बसावे असे तिला वाटायचे पण सीताईलाही स्वस्थ बसवत नव्हते.
स्वस्थ बसणे तिच्या स्वभावात नव्हते.तिचे मन आता इथे रमत नव्हते. आपली माणसे,घर सगळे परके झाल्यासारखे तिला भासत होते. तिने प्रभाकरजवळ काही दिवस ताराकडे जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रभाकर लगेच तयार झाला. त्यालाही सीताईने कृष्णापूरला राहू नये असे वाटायचे याचे सीताईला फार दुःख व्हायचे.
प्रभाकर कधी अंतर देणार नाही हा भ्रम तुटला होता तिचा.
ताराचे गाव बाजूलाच होते. बैलगाडीने श्रावणने सीताईला ताराकडे नेऊन दिले. सीताईला ताराकडे येऊन आठ दिवस झाले,पंधरा दिवस झाले,महिना झाला पण प्रभाकरने तिला बोलवणे पाठवले नाही.
ताराच्या घरी खूप गरीबी होती. घरी फक्त चार एकर शेती होती.नवऱ्याची नौकरी गेलेली. शेतकामाला मजूर ठेवण्याची ऐपत नव्हती. ती आणि सासु स्वतःच कामे करायची शेतातील. त्यात सीताईची भर पडली. सीताईला कष्ट करायची सवय होतीच. ती आता तारासोबत तिच्या शेतात मजुरी करायला जात होती.
शेतीची मालकिण असणारी सधन सीताई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन कामे करत होती.
आपल्या नकळत आयुष्य किती सहजतेने बदलत जाते.
गावी सर्व मजेत चालले होते.प्रभाकर दोन्ही भावाची शेती एकटाच बघत होता.भावांना काहीही देत नव्हता आणि भाऊही प्रभाकरला मोठा भाऊ म्हणून आदर करायचे. त्यामुळे काही मागत नव्हते. संपूर्ण पीक एकट्या प्रभाकरच्याच वाट्याला यायचे त्यामुळे घरात मुबलक पैसा खेळत होता.
त्यात प्रभाकर गावचा सरपंच बनला त्यामुळे त्याचा रुबाब,तोरा अजूनच वाढला.
इंदुमतीला व्यवहार कळत नव्हता. तिला भविष्याची तरतुद करावी असे कधी वाटले नाही.आला दिवस घालवावा एवढेच तिला यायचे. पैसे साठवून ठेवावे असे कधी ध्यानात यायचे नाही.मुलांकडे,त्यांच्या अभ्यासाकडे ती मुळीच लक्ष देत नव्हती. उलट आपल्याजवळ खूप पैसे आहेत त्यामुळे शिक्षणाची आपल्याला गरज नाही असे मुलांवर बिंबवत गेली. प्रभाकरची मुले शाळेत जाईनासे झाले.
क्रमशः
Previous part link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







Chan!