२-उसवले धागे कसे?
२-उसवले धागे कसे?

२-उसवले धागे कसे?

राजकारणावर आधारित मराठी कथामालिका
भाग-२-उसवले धागे कसे?
आतापर्यंत आम्ही काय केले याचा पाढा आणि  पुढे काय करणार आहोत याची आश्वासने.
यापलिकडे भाषणे नसतातच.कायम आम्हीच कसे चांगले आणि  दुसरे किती वाईट हे दाखवण्याचा खटाटोप . त्यांच्यानंतर आनंदीचे भाषण सुरु झाले.
आनंदीच्या भाषणाचीही भाषा अनंतरावांसारखीच. शेवटी त्यांचा वारसा चालवणार होती.पण भाषण आनंदीचे होते.कसेही असले तरी केवळ तिचा  आवाज ऐकूनही चैतन्य प्रसन्न  झाला.किती वर्षांनी  तो तिचा आवाज ऐकत होता.
सभा संपली. गर्दी ओसरायला लागली.  चैतन्यने आनंदीकडे बघितले.तिचे लक्ष असण्याचा प्रश्नच नव्हता. तिचे भाषण संपले आणि  लोकं जवळीक  दाखवण्यासाठी स्टेजवर जाऊन त्यांच्यासमवेत फोटो  काढायला लागले. त्याला डोळाभरुन तिला बघायचे होते.पुन्हा ती दिसेल न दिसेल.
पण स्टेजवरच्या गर्दीत आनंदी त्याला दिसणे शक्य नव्हते.तरीही थोडा वेळ तो तिथे घुटमळला. पण गर्दी कमी होत नव्हती.आनंदी त्याला दिसत नव्हती.तो सभामंडपातून बाहेर पडला.सुन्न मनाने गाडीजवळ आला. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. मनात आनंदीचा जप चालला होता.
जावे का एकदा आत? गर्दी जरा वेळात कमी होईलच.
मोबाइलच्या  रिंगने त्याची तंद्री भंगली.
प्राचीचा फोन होता.
अरे किती वेळ चैतन्य,फोन पण उचलला नाही तू?
 प्राची निघालोच आता. त्याने मोबाइल चेक केला. प्राचीचे दोन miss call होते.
उशीर झाला.निघायला हवे असे पुटपुटत गाडीत बसला.थोडा पुढेही गेला.
आनंदीसोबत पुन्हा भेट होईल न होईल.बघू का एकदा जाऊन…असा विचार करत पुन्हा मागे आला.गाडी पार्क केली आणि सभामंडपात गेला.स्टेजवरील गर्दी कमी झाली होती पण आनंदी निघून गेली होती.
चैतन्य विझलेल्या मनाने घरी पोहचला.
प्राची जेवणासाठी थांबली होती.चैतन्य भूक नाही म्हणून बेडरुममध्ये निघून गेला.
प्राची जेवण उरकून  बाजूला येऊन त्याच्या बाहूपाशात शिरली. पण चैतन्यचे आज लक्ष नव्हते तिच्याकडे.तिला बाजूला करुन त्याने दुसऱ्या बाजूने चेहरा वळवला.
आनंदी जात नव्हती डोक्यातून.
त्याचे आयुष्य  असलेली आनंदी आयुष्यातून कशी गेली ? मी कसे जाऊ दिले?
कि मीच तिला माझ्या आयुष्यातून बाजूला केले?
किती वेगात घडले सगळे.
आनंदी सदा माझ्या मागे मागे असणारी.सतत माझ्या वर नजर असायची तिची.आज मी तिच्यासमोर उभा होतो तरी तिला दिसलो नाही.
तिचे वडील अनंतराव राजकारणातील बडे प्रस्थ.
त्यांना आनंद आणि आनंदी  दोन मुले
अनंतराव राजकारणात असले तरी स्वतःची  तत्वे सांभाळणारे होते. 
आनंद आणि आनंदीच्या आईला जाऊन बरीच वर्ष झालेली.मुलांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी लग्न केले नाही.एकट्याने मुलांना सांभाळले.त्यांच्यावर संस्कार केले.
 आनंद चैतन्यचा बालमित्र.लहानपणापासून एकमेकांकडे  जाणे येणे होते. 
आनंदसोबत आनंदीही त्याची मैत्रीण बनली. मग सखी,प्रेयसी.
आनंद,चैतन्यची घरे जवळ जवळ होते.शाळेत सोबत एकाच वर्गात.नंतर काॕलेजमध्येही सोबत.काॕलेज संपल्यावर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या पण मैत्री कायम राहिली.
चैतन्याच्या घरी त्याच्यापेक्षा लहान भाऊ वैभव आणि  आईवडिल असे चौकोनी कुटुंब. पण  सरकारी आॕफिसर असलेल्या वडिलांची नेहमी बदली होत असल्यामुळे इथे आई,वैभव आणि तो असे तिघेच राहायचे.
वडील आठवड्यातून एकदा यायचे. ते प्रामाणिक सरकारी आॕफिसर होते.त्यांना त्यांच्या प्रामाणिकतेमुळे होणारा त्रास चैतन्य लहानपणापासून बघत होता.
आणि  त्रास कुणाकडून तर लोकांनी आशेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून. वडिलांना सतत तणावात बघायचा तो.त्यामुळे राजकारण त्याला कधी आवडले नाही. राजकारणी लोकांबद्दल अढी होती त्याच्या मनात. 
हे लोकं कितीही खाली घसरु शकतात असे त्याचे पक्के मत होते.
त्याच्या घराच्या शेजारी अनंतरावांचा बंगला होता.
अनंतराव राजकारणी आहेत हे त्याला जरा मोठा  झाल्यावर समजले.तोपर्यत त्याची आणि आनंदची  घट्ट मैत्री झाली होती.
बारावीनंतर आनंद आणि चैतन्य दोघांनीही इंजिनियरींग काॕलेजला ॲडमिशन घेतली. काॕलेज संपल्यानंतर  चैतन्यने त्याच शहरात नौकरी शोधली आणि आनंदने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात प्रवेश केला.
 अनंतराव महत्वाकांक्षी होते. एका छोट्या खेड्याचे सरपंच ते इथले आमदार असा त्यांचा खडतर प्रवास होता. इथवर पोहचायला फार संघर्ष करावा लागला त्यांना. आनंदसाठी अजून मोठे स्वप्न बघितले होते त्यांनी.
लहानपणापासून प्रयत्नपूर्वक ते स्वप्न आनंदच्या मनातही रुजवले होते. त्यांच्याच पक्षातील अनंतरावांच्या विरोधकांना आनंदचा राजकारणातील प्रवेश रुचला नव्हता.पण अनंतरावांच्या पक्षातील दबदब्यामुळे ते विरोध दर्शवू शकत नव्हते.
ह्यावर्षी अनंतरावांनी निवडणूकीत स्वतः उभे न राहता आनंदला आमदारकीचे तिकिट मिळवून दिले.त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हे मुळीच आवडले नाही.
अनंतरावांनी आतापर्यंत मतदारसंघात खूप कामे केली होती.आनंदची जीत निश्चितच होती.
प्रचाराच्या तोफा डागल्या गेल्या. आनंदी भावासाठी प्रचारात उतरली.चैतन्यनेही मित्रासाठी पंधरा दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या.
आनंदी आणि चैतन्य आता जास्त वेळ सोबत राहत होते.लहानपणापासून असलेली मैत्री आता प्रेमस्वरुपात  फुलत होते.जवळीक अजून वाढत होती.
निवडणूक संपली कि आपल्या प्रेमाचे घरच्यांना सांगू असे दोघांनीही ठरवले.
निवडणूका जवळ येत होत्या.विरोधी पक्षानेही तुल्यबळ उमेदवार उभा केला होता. प्रचारामुळे सगळ्यांचीच दमछाक होत होती.आनंदचेचे निवडणूकीत जिंकून येणे हा अनंतरावांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला.
निवडणूका संपल्या. निकाल यायला दोन दिवस वेळ होता.आनंद मित्रांसोबत बाहेर गेला होता.चैतन्य पण होता त्याच्यासोबत. वापस येतांना त्याने चैतन्यला सोडले आणि घरी जातो म्हणाला.चैतन्य थकला होता.लगेच झोपला.गाढ झोपेत असतांनाच मोबाइल वाजला. फोन आनंदीचा होता.
क्रमशः
Previous Link
चैतन्यला फोनवर काय सांगितले असेल आनंदीने?
चैतन्य-आनंदीचे प्रेम पुढे कसे फुलत गेले…पुढील भागात नक्की वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!