१-उसवले धागे कसे?
१-उसवले धागे कसे?

१-उसवले धागे कसे?

उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
राजकारणात मुरलेल्या अनंतरावांची आनंदी आणि आनंद  ही दोन अपत्ये.आईविना वाढलेल्या आनंदी आणि आनंदला आईची उणीव भासू नये म्हणून  अनंतराव प्रयत्न करतात.
आनंद अनंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवून  राजकारणात प्रवेश करतो.आयुष्य सुरळीत सुरु असते.
पण मध्ये  काही अकल्पीत घटना घडतात आणि आनंदीला राजकारणात प्रवेश करावा लागतो.
त्यानंतर तिच्या  बदलत गेलेल्या प्राथमिकता,बदलत गेलेले आयुष्य आणि तिच्या आयुष्यातील तिला हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणींचा असलेला साक्षीदार पारसपिंपळ यांची ही कथामालिका उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
प्रिय वाचक,याआधीच्या शब्दपर्णवरील लिखाणाला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळीही तो लाभावा हे अपेक्षित आहे.
काही त्रुटी आढळल्यास अवश्य सांगाव्या.तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.
१-उसवले धागे कसे?
चैतन्यला आज कंपनीत बरीच कामे होती. नवीन नौकरी होती. सगळी कामे संपवून निघायला उशीरच झाला.
आधीच उशीर, त्यात ट्रॕफिक आणि मध्येमध्ये लागणारे सिग्नल. वैतागला होता तो.हे तसे रोजचेच होते पण अजून सवय होत नव्हती. 
प्राचीने आज सुट्टी घेतली.आजतरी घरी लवकर जायला हवे होते.कंपनीजवळच घर बघायला हवे असा विचार करत गाडी  सिग्नलजवळ थांबली. 
त्रासिक नजरेने तो इकडेतिकडे  बघायला लागला.बघता बघता  एका भिंतीवर एक मोठे बॕनर दिसले.त्याची नजर तिथेच थबकली. बॕनरवर  मोठ्या आकाराचा अनंतरावांचा आणि  बाजूलाच त्यांच्यापेक्षा जरा लहान आकारात आनंदीचा फोटो  होता.
चैतन्यला अक्षरे व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून सिग्नल सुरु झाल्याबरोबर त्याने गाडी जरा पुढे घेऊन थांबवली आणि घाईघाईने  बॕनर  वाचू लागला. 
अनंतरावांची उद्या सभा होती इथे आणि सोबत आनंदीही येणार होती. बॕनरवर आनंदीच्या जागी आनंदीदेवी लिहिले होते.
राजकारणात गेल्यानंतर आनंदीची आनंदीदेवी झाली होती. आज हाती सत्ता असलेल्या आनंदीदेवीचे मनोराज्य फार वेगळे होते.
जावे का सभेला ? चैतन्यच्या मनात आले.
कित्येक वर्षात आनंदी दिसली नाही मला.
कशी दिसत असेल ती आता?
बॕनरवर डोक्यावर पदर घेतलेली,मोठा चष्मा लावलेली आनंदी तिच्या वयापेक्षा कितीतरी वयस्कर दिसतेयं. त्या जुन्या,हसऱ्या आनंदीचा लवलेशही नाही दिसत ह्या आनंदीदेवीत.
तरीही जावे का सभेला? संधी मिळाली तर भेटही घेता येईल ह्या विचाराने लगेच उभारी आली त्याला.आतापर्यत मनावर,शरीरावर असलेला ताण सैल झाला.
आनंदीच्या विचारा विचारातच चैतन्य घरी पोहचला.
प्राचीने आज सुट्टी घेतली होती. घरीच होती ती. चैतन्य घरी आल्यावर  तिने त्याला आवडणारा आल्याचा चहा बनवला.
प्राची आणि  चैतन्य एकच वर्ष झाले त्यांच्या  लग्नाला.  मनाने कोसळलेल्या  चैतन्यला सावरायला वेळ लागला. आईवडिलांनी मागे लागून त्याला लग्नाला तयार केले. प्राची आयुष्यात आली आणि आयुष्यच बदलले त्याचे.
प्राचीच्या चैतन्यदायी सहवासामुळे भूतकाळाचाचा विसर पडायचा त्याला. पण तेवढ्यापुरताच. खूप
प्रयत्न करुनही तो विसरु शकला नाही. 
दिवस उजाडला.आज अनंतरावांची सभा होती.सकाळपासून चैतन्यची चलबिचल चाललेली . आॕफिसमधून लवकर निघून सभेला जावे का?
एवढ्या गर्दीत आनंदी मला ओळखेल?
पण जायला काय हरकत आहे?
प्राची आणि  तो दोघेही सोबतच निघायचे. प्राचीचे आॕफिस आधी यायचे आणि  नंतर चैतन्यचे.
तिचे आॕफिस आल्यावर चैतन्य म्हणाला
प्राची आज मी उशिरा येईल घरी.
का रे?
अग, आॕफिस सुटल्यावर अनंतरावांच्या सभेला जायचा विचार करतोय.
काय रे तू कधीपासून राजकारणी लोकांच्या सभेला जायला लागला? तुला तर आवडत नाही ना.
प्राचीने विचारले.
चैतन्यने थाप मारली.
अग,माझ्या मित्राच्या ओळखीचे आहेत  ते.
तो मागे लागला माझ्या म्हणून चाललो.
बरे जा.पण उशीर नको करु जास्त.
हो ग.येतो लवकर.
असे म्हणून चैतन्य पुढे  निघाला.
चैतन्य  संध्याकाळी जरा लवकरच आॕफिसमधून निघाला. आणि जिकडे सभा होती तिकडे जायला निघाला,आधी आनंदीला भेटायला जातांना ह्दयाचे ठोके  जसे वाढायचे तसेच आताही वाढले होते.
आधीसारखीच तिला भेटायची घाई झाली होती.
तो पोहचला सभेच्या ठिकाणी.तो जरा लवकरच पोहचला. अजून गर्दी वाढली नव्हती. लवकर आल्यामुळे त्याला पुढची जागा मिळाली.
हळूहळू गर्दी वाढत गेली.आनंदीदेवीची लोकं उत्सुकतेने वाट बघू लागले. एक तास दोन तास.तब्बल दोन तास उशीर झाला आनंदीदेवीला यायला.
जावे का घरी निघून? प्राची वाट बघत असेल
पण आलोच आहे तर थांबतो थोडावेळ.
अनंतरावांच्या,आनंदीदेवीच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती.सगळे अनंतरावांची  वाट बघत होते.अनंतरावांचे आगमन झाले. लोकांनी जल्लोषात
स्वागत केले.
सोबत आनंदीही होती. आनंदीला किती वर्षांनी बघत होता चैतन्य.जरा बदलली होती पण बरीचशी त्या तेव्हाच्या आनंदीसारखी दिसत होती. चेहरा जरा करारी आणि  रुक्ष वाटत होता. अनंतरावांचे भाषण  भाषण सुरु झाले.
तरबेज राजकारणी लोकांचे असते तसेच भाषण
आतापर्यंत आम्ही काय केले याचा पाढा आणि  पुढे काय करणार आहोत याची आश्वासने.
क्रमशः
पारसपिंपळ कशाकशाचा साक्षीदार असतो….वाचत रहा पुढील भागात.
पुढील भाग वाचा खालील लिंकवर

https://marathi.shabdaparna.in/२-उसवले-धागे-कसे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!