६-तिची आजी-मराठी कथामालिका
६-तिची आजी-मराठी कथामालिका

६-तिची आजी-मराठी कथामालिका

भाग-६
६-तिची आजी-मराठी कथामालिका
प्रभाकर बहिणीला भेटायला निघाला.त्याचा रेल्वेतील पहिला प्रवास उत्सुकतेत पार पडला.आता  पुढे … 
तिची आजी
 एवढ्या मोठ्या शहरात  आता दयाबाईचे घर कसे शोधायचे याच विचारात दोघेही पडले. तेवढ्यात प्रभाकर,प्रभाकर असा लांबूनच दाजीचा आवाज आला. प्रभाकरने मान वळवली.त्याला  दाजी येतांना दिसले.
दाजींना पत्र पाठवून आधीच कळवले होते म्हणून बरे झाले.
दाजींनी एक रिक्षा केली आणि तिघेही घरी आले. 
प्रभाकर शहर बघून अचंबित होत होता.आपली बहिण एवढ्या मोठ्या शहरात राहते हा विचार मनात येऊन बरे वाटले त्याला. मी शिकलो असतो तर मलाही एखाद्या शहरात नौकरी मिळाली असती.हाही विचार मनाला चाटून गेला.
घरी दया त्यांची वाटच बघत होती. आपला भाऊ पहिल्यांदाच आपल्या घरी आला म्हणून खूप आनंद झाला होता तिला. दयाची मोठी लेक तारा दोन वर्षाची होती.तिला प्रभाकर पहिल्यांदाच बघत होता. दयाचे पहिले बाळंतपण इथेच झाले होते. दयाच्या घरी एका खटक्यात सुरु होणारे वीजेवर चालणारे दिवे बघून त्याला रोज साफ करावे लागणारे कंदील आणि दिवे आठवले. 
दोन तीन दिवस जबलपूरला थांबून दयाला आणि  ताराला घेऊन दोघेही परत फिरले. ताराला अनोळखी असलेला मामा लगेच ओळखीचा झाला. 
दया तीन वर्षानंतर माहेरी आली होती. तिला घरात पाऊल टाकल्याबरोबर वडिलांची आठवण आली.सीताईला भरुन आले लेकीला बघून. ताराला तिने कडेवर उचलून घेतले.तिचे मुके घेतले.दयाच्या लग्नाच्या वेळी गीता खूप छोटी होती.त्यामुळे बहिणींमध्ये जास्त जवळीक नव्हती.
पण ताराची गीतामावशीसोबत चांगली गट्टी जमली.
दयाला माहेरी ,आपल्या माणसात येऊन खूप बरे वाटत होते. दिवसभर आत्या,आतेभावंड,नाना,नानी,चुलतभावंड यांच्यासोबत गप्पा करण्यात तिचा वेळ जात होता.
जबलपूरला वाटणारा एकटेपणा इथे नावालाही नव्हता. पण आईचा बदललेला स्वभाव जाणवत राहायचा.
तिच्या आईचे हसू बा ने सोबत नेले होते.
दिवस जात होते. दयाचे बाळंतपण आटोपले.दुसरी मुलगी झाली. प्रभाकरने तार करुन दाजीला बातमी दिली.
दाजीने पत्र पाठवून लेकीचे नाव कमल ठेवायला सांगितले.
मनोहरला शाळेला सुट्ट्या लागल्या. सुट्ट्या लागल्याबरोबर तो गावी पळत आला.. मनोहरचे जुने सवंगडी त्याची वाटच बघत होते दयाला,ताराला आणि छोट्या कमलला बघून आनंदला तो. सीताईला खूप वर्षांनी घर भरल्यासारखे वाटले. 
तिचे सगळे मुले तिच्याजवळ होते.
फक्त कधीही भरुन न येणारी रामची कमतरता होती.
मनोहरच्या एक महिन्याच्या  सुट्ट्या पटकनच संपल्या. पुन्हा वसतिगृहात जायची वेळ आली.
प्रभाकर त्याला सोडायला गेला.
दयाला येऊन सातआठ महिने झाली. दाजी एकटे कंटाळले होते.शिवाय छोट्या कमललाही बघितले नव्हते.
ते सुट्ट्या घेऊन दयाला घ्यायला आले.
एक आठवडाभर थांबले.घरातले मोठे  जावई म्हणून त्यांना खूप  मान होता. त्यांच्या शब्दाला किंमत होती.
त्यांनी सीताईकडे प्रभाकरच्या लग्नाचा विषय काढला.
मामीजी, प्रभाकर अठरा वर्षाचा झाला.लग्नाचे वय झाले त्याचे.तुम्हालाही मदत होईल.कामाचा भार हलका होईल.सीताईला जावयाचे म्हणणे पटले.
त्यांनी प्रभाकरसाठी मुली बघायचे ठरवले.
दया वापस गेली.घर परत रिकामे झाले.घरी सून आल्याशिवाय आता घरपण नाही असा विचार करुन नातलगांना सीताईने प्रभाकरसाठी मुली बघायला सांगितल्या.
अब्रुदार घराणे  असल्यामुळे प्रभाकरला खूप  मुली सांगून आल्या. रामसीताईचा जमाना आता जरा बदलला होता. लग्नाआधी मुलगा मुलीला बघायला जाऊ शकत होता.
प्रभाकर एखाद्या चुलत्याला, चुलत भावंडाला घेऊन मुली बघायला जात होता.
सीताई जरी नातलगांसोबत अंतर राखून होती तरी मुलांना तिने कधी अडवले नाही.आणि रामची मुले म्हणून नातलगांनीही त्यांना कायम जवळ ठेवले.
पण याचा परिणाम असा झाला कि प्रभाकरचाआपली आईच नातलगांसोबत  चांगली राहत नाही असा गैरसमज झाला आणि तो वाढतच गेला.पुढे मनोहर,श्रीधरलाही तेच वाटायला लागले. सीताईची काटकसर कोणी समजून घेतली नाही. 
यात सीताईच्या रामच्या जाण्याने बनलेल्या थोड्या कठोर आणि अलिप्त स्वभावाने भरच पडली. तिला तिची बाजू कुणाला पटवून देता यायची नाही.त्यामुळे तिला नेमके काय वाटते हेही कुणाच्या लक्षात यायचे नाही.
प्रभाकरला जरा लांब असलेल्या खेड्यातील एक मुलगी पसंत आली. ती होतीच कुणालाही पसंत येईल अशी. 
गोरापान वर्ण, चाफेकळीसारखे नाक,टपोरे काळे डोळे,लांबसडक केस,उंची,बांधा….देवाने काहीही उणीव 
ठेवली नाही तिच्यात.तिला बघताक्षणी प्रभाकरला ती आवडली.
 क्रमशः
प्रभाकरने मुलगी पसंत केली….पुढे वाचत रहा तिची आजी कथामालिका
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!