अक्षम्य-भाग-१४
अक्षम्य-भाग-१४

अक्षम्य-भाग-१४

काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य-भाग-१४
नक्षत्राचे फायनलचे वर्ष संपले. नेहमीप्रमाणे ती पहिली आली.आनंदसर आणि शलाकाचे आशीर्वाद घ्यायला घरी आली.ताई तुम्ही आणि सर नसते तर मी विचारही  करु शकत नाही मी कुठे असते त्याचा.
समाजाने माझे जगणे कठीण केले असते.
नक्षत्रा काही प्रसंग आयुष्यात extra म्हणून येतात.त्याला बाजूला सारुन आपल्याला पुढे  जाता यायला हवे.
हो पण कुणाच्यातरी आधाराशिवाय  शक्य नाही होत.
मी तुझ्या सोबत आहे असे म्हणणारी माणसे खूप कमी आहेत जगात.
आता पुढे काय करायचा विचार आहे नक्षत्रा?
ताई,मी तुमच्यासारखेच Law चे शिक्षण घेणार.
वकिली करणार.माझ्यासारख्या अन्यायपिडीत मुलींच्या केसेस लढणार.
मग Entrance असेल ना आता?
हो ताई.सध्या त्याचाच अभ्यास करतेय.चांगले काॕलेज मिळायला हवे.
ताई,मला स्काॕलरशिप मिळेल ना शिक्षणासाठी?
हो ग.मिळेल ना.
पण तू तो विचार का करतेस?
आनंदसरांनी तुझ्या बाबांना वचन दिले आहे ते तुझा खर्च पूर्ण करणार आहेत.
ताई,म्हणून तर मी नेहमी तुमचे दोघांचे आभार मानत असते.
मुक्ता ताई ताई करत नक्षत्राजवळ आली.जरा वेळ नक्षत्रा मुक्ताबरोबर खेळली आणि निघून गेली.
नक्षत्राचा दुसऱ्या शहरात Law साठी नंबर लागला.
आनंदसरांनी तिथे तिला राहण्यासाठी घर शोधले.
तिच्या खाण्याची सोय केली.लागणारी पुस्तके खरेदी करुन दिली.
तीन वर्ष नक्षत्रा लिलावतीताईंसोबत राहली.दोघींनाही एकमेकींचा लळा लागलाहोता. नक्षत्रा आकाशात उडायला पंखात अजून बळ भरुन घ्यायला सज्ज झाली.पण लिलावतीताई आता पुन्हा एकट्या  पडल्या.
शलाका-आनंद नेहमी त्यांना भेटायला जात होते.
आनंदबद्दल लिलावतीताईंना  वाटणारे  कौतुक नेहमीच ओसंडून वाहत राहायचे.
त्यांच्यावर,त्यांच्या लेकीवर आनंदचे फार मोठे उपकार आहेत असेच त्या सुचित करत राहायच्या.
आनंदला ते कौतुक बघून फार लाजल्यासारखे व्हायचे.
मी लायक आहो का या कौतुकाच्या?
त्याला प्रश्न पडायचा.
मी गुदमरुन जातोय ह्या दोघींच्या चांगुलपणापायी. कसे सांगू यांना तुम्ही विचार करताय तसा मी नाही आहो.
माझे मन आतल्या आत आक्रंदतयं. 
शलाकाने मन मोकळे केले तिचे.
पण मी? मी कसे आणि कुणाजवळ मन मोकळे करु?
शलाकाजवळ तिची आई होती जी शलाकाचे दुःख समजू शकली. वाटून घेऊ शकली. 
मी तर एकटाच भोगतोय सगळे.
शलाकाला सांगू का?
नाही.
कसे शक्य आहे हे?
ती काय म्हणेल मला? 
आनंद विचारात गुंतला होता.
ही विचारांची श्रृंखला पार त्याच्या आयुष्याला वेढा मारुन बसली होती.
 ती गळून पडावी आणि मी मोकळा श्वास घ्यावा.
 आनंदला असेच वाटत राहाचे.
 पण नाही.काही प्रसंग घडले कि हमखास तो ह्या विचारांच्या गर्तेत गुंतत जायचा.
 ते विचार डोक्यातून कायमचे निघून जावे असेच त्याला वाटायचे.  ते विचार,ती घृणास्पद आठवण विळखा मारुन बसली होती त्याला. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला कि विळखा अधिक  घट्ट होणार हे ठरलेले.
काय करु? कसे जगू? वरुन सगळ्यांना चांगले दिसणारे आनंदसर आतल्या आत ज्वालामुखीसोबत राहत आहेत हे कुणाला कधीतरी कळू शकेल का? आणि कळले तरी कोणी समजू शकेल का?
शलाका समजून घेईल?
नाही.नाही.शक्यच नाही.
अरे आनंद अंधारात का बसला? 
बाबांनी लाईट लावत विचारले.
शलाका मुक्ताला घेऊन बागेत गेली होती.
आनंद मध्येमध्ये जरा अस्वस्थ वाटत असतोस तू मला.
सगळे ठीक आहे ना बेटा.
म्हणजे मला भासही होऊ शकतो कदाचित्.पण नेहमी आनंदी  दिसणारा तू मध्येच कधीतरी उदास दिसतो.
नाही हो बाबा.तसे काही नाही.ठीक आहे मी.
सगळे व्यवस्थित सुरु असले तरी माणूस होतो बाबा कधी कधी अस्वस्थ.
असे म्हणत उठला तो.
कसली बेचैनी येते याला मध्ये मध्ये?
शलाकाला पुन्हा एकदा विचारावे का?
नको.
मीच जास्त काळजी करत असणार.
दिवस जात होते.
शलाका वकिलीत अधिक बिझी झाली.
बहूतेक केसेस अन्यायग्रस्त लोकांच्याच घ्यायची.शलाका मॕडम आपल्याला न्याय मिळवून देईल अशी  त्यांना खात्री वाटत होती.
शलाकाचा मी आनंदला फसवत आहे ही वेदना कमी झाल्यामुळे आनंदचीही बोच कमी झाली.
सगळे सुरळीत सुरु आहे. आणि जे घडले होते तो एक अपघातच होता असे समजून मी सुद्धा बाहेर पडायलाच हवे.असा विचार त्याचे मन करत होते.
आणि जे माझ्या हातून झाले त्याने शलाकाचे काही नुकसान तर नाही झाले. तिला घर,संसार सगळेच तर मिळाले.
आनंदची विचार करण्याची दिशा बदलत चालली होती.स्वतःला निरपराध सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता तो.
शलाकाने नेहमीप्रमाणे सकाळी आईला फोन केला.पण लिलावतीताईंनी फोन उचलला नाही.असेल कामात असे समजून शलाका तिच्या कामात व्यस्त झाली.
थोड्या वेळाने आईच्या घरी काम करणाऱ्या बाईचा फोन आला,बराच वेळ ती दारात उभी होती.पण लिलावतीताई दार उघडत नव्हत्या.
घाबरलेली शलाका आनंदला घेऊन घाईघाईने आईकडे गेली.तिच्याजवळ असलेल्या चावीने दार उघडले.
तिची आई पलंगावर निपचिप पडून होती.शलाकाची आई झोपेतच निघून गेली.
आनंदने नक्षत्राला बोलवून घेतले.
सगळे सोपस्कार आटोपले.एवढे सुंदर आवडीने बांधलेले घर,हौसेने बनवलेली बाग उजाड झाले.
कधीकाळी नांदते असलेले घर आज मुके झाले.
शलाका आठवत राहली त्या तिघांचेच असलेले जग. ती,बाबा,आई. आज मुके असलेल्या घरात शलाकाचे कित्येक वाढदिवस साजरे झाले होते.तिचे बोबडे बोल, पहिले अडखळत टाकलेले पाऊल,  तिच्या शाळेचा पहिला दिवस,बाबांनी सायकल चालवायला शिकवल्यानंतर मारलेली रपेट, तिचे लग्न ह्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार असलेले घर आज आईसोबत संपले जणू.
सगळ्या गोड आणि  आनंददायी आठवणी जुळलेल्या आहेत ह्या घरासोबत फक्त ती आठवण सोडली तर. त्या आठवणीचा डाग लागला आहे घराला.
शेवटी घर म्हणजे तरी काय असते?
सुखद आणि दुःखद आठवणींचा मेळ.
त्या प्रत्येक आठवणींचे साक्षीदार घर असते.
माणसांमुळे बनलेले घर माणसे  असेपर्यंतच घरपण टिकवू शकते.
आज शलाकाचे माहेर संपले होते.
सगळे आटपून आनंद घरी परत आला.
शलाका,नक्षत्रा तिथेच थांबल्या.
शलाकाला आईच्या आठवणी सोडवत नव्हत्या.
क्रमशः

पुढील भागाची लिंक

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!