स्वयंसिद्धा भाग १३
स्वयंसिद्धा भाग १३

स्वयंसिद्धा भाग १३

औरंगाबादहून माधव सुप्रियाच कुटुंब नांदेड मधे स्थायिक झाले.

परिस्थितीशी समायोजन हा एकच पर्याय त्यांच्यापुढे होता.

 

स्वयंसिद्धा भाग १३
बापमाणुस

 

माधव साठी दुकानाचे प्रयोजन केलं होतं. पण तिथे सुद्धा त्याला एकट्याला बसवणं शक्य नव्हतं. एक तर त्याला पैशाचा हिशोब समजत नव्हता आणि दुसरे लिहिलेलं त्याला वाचता येत नव्हतं. म्हणून सुप्रियाचं घरातलं आवरेपर्यंत सासरे माधव सोबत दुकानात थांबायचे. बसल्या बसल्या त्याला पैशाची आणि अक्षरांची ओळख करून द्यायचे. तो पण हळूहळू सगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न करे.

पण साऱ्याच गोष्टी सुरळीत होत गेल्या तर ते जीवन कसले?

त्याच दुकानात सुप्रियाने साड्यांचा जुनाच व्यवसाय सुरू ठेवला. दुपारी सासू सासरे जेवण करून आराम करायचे .

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही.

कष्ट जणू तिच्या पाचवीलाच पुजले होते.

सुप्रिया दुकानात असताना माधवशी खूप गप्पा मारायची.

त्याचं मन इतरत्र गुंतवण्याचा प्रयत्न करायची. जुन्या आठवणी प्रसंग नव्याने सांगायची. माधवचा प्रतिसाद तिला त्याच्या चेहऱ्यावरच कळायचा . गप्पांच्या ओघात ती कधीकधी विसरून जायची की माधवनी कायमचं मौन व्रत घेतलय.आणि आठवलं की जीवाचा थरकाप होत असे तिच्या.

बोलता बोलता त्याला म्हणायची, ” बोला ना सांगा ना आता, हे असं कसं “? माधवचा चेहरा पडला की तिच्या लक्षात यायचं आणि स्वतःशीच हसायची ‘ विसरून कसं चालेल मला ‘ मग माधव पण तिच्या हसण्यात सामील व्हायचा.

 

असेच दिवसांमधून दिवस सरले. दुकान – घर दोन्ही आघाड्या सुप्रिया सांभाळत होती . तसे सासू-सासर्‍यांनी हुश्श म्हणून मोकळा श्वास घेतला.

वर्षभरातले सगळे सणवार सुप्रिया आवडीने करत असे. होता होईतो देवाची पूजा अर्चा सासरेच बघत .

कुलदैवत देवी असल्याने नवरात्री हा सण महत्त्वाचा. नवरात्र आले म्हणजे एक वेगळीच घाई असे. पूजा, घटस्थापना , नऊ दिवस माळ आरती, भजन, गोंधळ सासू-सासरे यथा सांग करत असे. देवीचा खूप सात्विक तेजस्वी तांदळा ( मुखवटा ) देवात होता. त्याची स्थापना घटात करत असे.

याही वेळी नवरात्राची तयारी जोरदार चालू होती. फक्त आता म्हाताऱ्या वयाला होत नाही म्हणून देवीची मूर्ती जुन्या घरातून हलवून नव्या घरात आणली होती. आणि ससऱ्यांना होत नाही म्हणून घटस्थापना सुप्रियाच्या मदतीने माधवने केली होती .

एक बोलणे सोडले तर तो बाकी काम होतील तशी इशाऱ्यानेच करत होता. देवाचे करण्यात त्याला मनोमन आनंद मिळे,

शेवटी तारणहर्ता तोच आहे, या मताचा श्रद्धाळू होता तो.

प्रतिपदेचा दिवस होता तो. फुलांची जमवाजमव, माळा करणे, हार,पेढे,फळ, शमी, धूप, चकाकणारे दिवे, दिमाखदार समया सारं कसं तयार होऊन बसले होतं . देवीच्या घटस्थापनेच्या प्रतीक्षेत. सर्व भाज्या, पंचामृताच्या मिरच्या, वडे,भजे, खीर, कोशिंबिरीची काकडी , कढी चे दही, नैवेद्य, पंचामृत सारं… सारं… तयार करण्यात सुप्रिया मग्न होती. तिचा उत्साह आणि धावपळ न्यारीच होती. एकदाचा नैवेद्य दाखविला आणि गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आरती लावली. चार आरत्या जोरदार झाल्या आणि ……

पाचवी आरती सुरू असताना देवीचा मुखवटा अचानक घटातून सरकुन चौरंगावर पालथा पडला. असं इतक्या वर्षात कधीच झालं नव्हतं. सगळ्यांच्या अंगावर शहारून आलं, चेहरे अगदीच उतरले, उत्साह मावळला.असं कसं झालं असेल?

एकच प्रश्नचिन्ह ?

कदाचित ठेवताना थोडा हलका बसवला गेला असेल . माधवची ही पहिलीच वेळ होती. वडील सगळं सांभाळत, म्हणून तो त्यात कधी लक्ष घालत नसे. पण यावेळी परिस्थितीच बदलली होती.

ही गोष्ट मात्र सासऱ्यांनी फारच मनावर घेतली. आधीच पापभिरू माणूस. झालेला प्रकार त्यांनी अपशकुन म्हणूनच डोक्यात घेतला. ‘असं विपरीत व्हायला नको होतं, आत्ता आत्ता तर आपलं सगळं ठीक चाललंय, माधवही बऱ्यापैकी सुधारतो आहे, असं व्हायला नको ‘, सारखे ते एकट्यात बोलायचे .

त्याच नवरात्रात ललिता पंचमीला सासऱ्यांना पॅरॅलिसिसचा अटॅक आला . कधी नव्हे ते या वर्षी हे सारं अघटित घडतं होतं. दसऱ्यापर्यंत दवाखान्यात ठेवावं लागलं .

कसा बसा सण उरकला, सासऱ्यांच्या प्रकृतीत तीळमात्र सुधारणा नव्हती. त्यांची जगण्याची इच्छाशक्तीच नव्हती. दसरा झाल्यावर दवाखान्यातून घरी आणलं.

‘ घरीच सेवा करा ‘ डॉक्टरांचे म्हणणं . सासऱ्यांच वय वर्ष 84. हळूहळू शरीरातील एक एक अवयव निकामी होत गेला.

पूर्णपणे अंथरुणावर खिळले सासुबाईंचं पण वय जास्त होतं. सासऱ्यांची अवस्था बघून त्याही खचल्या.

सुप्रियाचे घर, दुकान, माधव आणि मुलींकडे लक्ष देणे, सासऱ्यांचे बघणं खूप दमछाक होत होती. कसे बसे दिवस ढकलत होती ती.

रोज येणार दिवस रोज एक समस्या घेऊन येत होता. भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा त्यांना अटॅक आला. दवाखान्यात दाखल केलं. पण जास्त दिवस थांबण्याची गरज पडली नाही, दुसऱ्याच दिवशी दवाखान्यातच सासरा नावाचा बापमाणूस देवाघरी गेला.

क्रमशः

नविन संकट, नविन समस्या. एक संपली की दुसरी तयार .

कशी सामना करणार सुप्रिया ?

वाचा पुढील भागात.

पुढील भागाची लिंक

………. मोहिनी पाटनुरकर राजे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!