अल्बम-निसटलेल्या-क्षणांचा
आज whats app वर सगळ्यांनी लग्नाचे फोटो टाकायचे ठरवले.
सगळ्या मैत्रिणींच्या लग्नाला जवळपास वीस,पंचवीस वर्ष झालेली.
लग्नाचा अल्बम कुठे आहे हे आठवणे कठीण वाटत होते.
मधुराने फोटोचा अल्बम शोधण्यासाठी सगळे कपाट आवरायला घेतले.
अल्बम शोधता शोधता एका सुटकेसमध्ये सगळ्याच फोटोंचे वेगवेगळे अल्बम मिळाले.
कुबेराचा खजिना मिळाल्यागत् मधुराला आनंद झाला.
तिच्या लहानपणापासून तर आताआतापर्यंतचे फोटो होते त्यात.
अलीकडील फोटो नव्हते.ते तर सगळे मोबाइलमध्येच कैद आहेत.
अल्बम पर्यंत पोहचण्याचे नशिबी नाही त्यांच्या.
मधूरा एकेक अल्बम बघत बसली. सुरुवात लहानपणच्या फोटोंपासून केली.
आईच्या कडेवरचा black and white फोटो .आईला प्रत्येक फोटोमागे काहीतरी लिहिण्याची सवय होती.
ह्या फोटोमागे लिहून होते.
तुझ्या मुळे मला आईपण मिळाले.
मधुराच्या डोळ्यात पाणी तरळले.
दुसरा फोटो आजी,आजोबा आणि बाबांसोबत होतो.ती बाबांच्या मांडीवर निर्धास्त बसून होती.
अल्बमचे एकेक पान उलटत गेले.
एका पानावर ती आणि तिच्याहून लहान असलेला भाऊ. हातात हात पकडून. बहिणभावामधली जवळीक दाखवणारा फोटो.
फोटो बघून आता भावाशी निर्माण झालेला दुरावा जाणवला तिला.
नंतर family फोटो. आईबाबा,भाऊ आणि ती.
काही मावशी,मामा,आत्या,काकांसोबतचे फोटो ,चुलत मावस भावांसोबतचे फोटो ….
फोटोत एकमेकांना बिलगून उभे असणारे ते काळ पुढे गेला तसे दूर दूर झाले.
ती मोठी होत गेली तसे फोटोही बदलत गेले.
दहावीत गेली.पहिला पासपोर्ट साईजचा फोटो.हाही black and white.
किती अप्रुप वाटायचे तेव्हा फोटोंचे.मोजकेच फोटो काढल्या जायचे पण ते धुवून घरी येईस्तोवर उत्सुकता शिगेला पोहचलेली असायची. फोटोसोबत मिळालेल्या negatives पण खूप सांभाळून ठेवण्यात यायच्या. ह्या negatives वरुन पुन्हा फोटो बनवू या विचाराने.जीवापाड फोटो जपले जायचे.आतासारखे नाही आवडला कर डिलीट असे नव्हते.
एक अल्बम बघून झाला.दुसरा ती अकरावीत गेल्यापासूनचा.
दिवस तुझे हे फुलायचे……
या गाण्यासारखे ते दिवस फोटोतही उतरलेले.
मैत्रिणींसोबतचे फोटो ,कुणाकुणाच्या लग्नाला गेले ते फोटो.
आता रंगीन फोटोचा जमाना सुरु झाला.
फोटो बघता बघता मधूरा खुद्कन हसली.
तिला आठवले फोटो काढण्यासाठी पण आईबाबांच्या किती मागे लागावे लागायचे.आता मोबाईलमुळे प्रत्येक क्षणाचे फोटो निघताहेत. पण तेव्हा असे नव्हते. मधुरा एकेक फोटो बघतांना ते दिवसही आठवत होती.
अरे हा साखरपुड्याचा फोटो. मोहितसोबतचा. चेहऱ्यावरची हूरहूर स्पष्ट दिसतेय.दोघेही एकमेकांना अनोळखी.पण जवळजवळ उभे. त्या फोटोमागे काय लिहिले बरे.
माझी न मी राहिले.
लग्नातल्या फोटोत किती लाजरी निघाली.आठवून आताही तिचे गाल लाल झाले. लग्नानंतर फिरायला गेले…तिथले फोटो. हळूहळू दोघांनाही एकमेकांची ओळख होत होती.
त्यातील एका फोटोच्या मागे लिहिले होते
स्वप्नात रंगले मी
चित्रात दंगले मी.
तिने मैत्रिणींना दाखवण्यासाठी लग्नात मोहितला घास भरवतांनाचा फोटो निवडला.
लग्नाच्या एका फोटोत सगळे कुटुंब होते.त्यातील बरेच जण आता फक्त फोटोत दिसत आहेत.
अल्बम बघता बघता मधूराला तो डायरीसारखा वाटायला लागला.तिलाही आईसारखेच फोटोमागे लिहायची सवय होती.
नंतर डोहाळजेवणाचे हिरव्या जर्द साडीतील फोटो.पहिल्या बाळासोबतचे फोटो. तिनेही आईसारखेच फोटो मागे लिहिले….
तुझ्यामुळे मला आईपण मिळाले.
त्याच्या नामकरणाच्या फोटो मागे
स्पंदन…आईच्या ह्दयाची धडकन्....लिहिले होते.
फोटोतून जसेच्यातसे दिवस ती अनुभवू लागली.
तिच्यात होणारे बदल,कपड्यांच्या बदलत जाणाऱ्या फॕशन,राहणीमानात होत गेलेला बदल… कॕमेऱ्यात बरोबर टिपल्या गेले होते.
आधीचे पंजाबी ड्रेस,साडीमधले फोटो नंतरचे जीन्समधील फोटो…खरेच किती बदलत गेलो आपण. आधीचा बालीश मुग्ध भाव असलेला चेहरा आताच्या फोटोत किती परिपक्व वाटायला लागला.
मधुरा एकाग्रतेने फोटो बघत होती. सगळे फोटो बघून झाल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते.
हा फोटो सोडून गेलेल्या आजीचा. त्या फोटोमागे लिहून होते,
आजी माझी सखी
आजीच्या ती खूप जवळ होती.
हा मैत्रिणींचा गृप फोटो. काहीजणी कुठे आहेत माहित नाही.काहीजणींशी काही कारणास्तव अबोला झालेला.
हे वेगवेगळ्या पोजमधले मोहीत सोबतचे फोटो. ते फोटो बघून आजही मोहरल्यागत् झाले मधुराला.
त्यातील एक फोटो उचलून मधुराने लिहिले.
वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांची झेले
एकमेकांवरी उधळले गेले….ते दिन गेले.
हा फोटो स्पंदनचा.
शाळेचा पहिला दिवस..किती रडला होता मला सोडून जातांना. आठवून आताही तिला गलबलून आले, हा पहिल्या वर्गात धावण्याच्या शर्यतीत पहिला आला तेव्हाचा फोटो.स्पंदनसोबतचे आधी तो कडेवर असलेला,मग हात पकडून उभा,मग बाजूला उभा राहून….सुटा होत गेला माझ्यापासून….हा त्याच्या लग्नातला फोटो.मला चिपकून असलेला स्पंदन या फोटोत किती लांब आहे. केवळ फोटोतलेच नाही आता त्याच्या आयुष्यातील माझे स्थानही बदलले. मधूराचे डोळे पाणावले.
सगळ्या नात्यात अंतर येत गेले. फोटोत कैद झालेले क्षण सोडून गेले,हरवले आयुष्यातून.
फोटोत आपण दिसतो,जवळ उभे आहोत कि लांब उभे आहोत हे ही दिसते.पण मनाचे अंतर कॕमेरात कसे टिपणार?
हा फोटो घराच्या वास्तुशांतीचा.तिने उलटून बघितले.
स्वप्नातले घर,
तुझे,माझे,
आपले.
किती हौसेने घर बांधले.मी,मोहीत आणि स्पंदन तिघांचे घर. माझ्या मर्जीशिवाय काहीही व्हायचे नाही घरात तेव्हा.
साधी फुलदाणी कुठे ठेवायची हेही मीच ठरवायची.
आता तसे नाही राहिले.जागा सोडा वस्तुही बदलल्या. सगळ्यांसोबत असेच होत असणार…..
मधुराने सुस्कारा सोडला.
किती फोटो ,त्या फोटोत बांधलेल्या किती आठवणी. पण आता फक्त आठवणीच.ते क्षण फिरून आयुष्यात येणार नाहीत आता.
फोटो बघतांना सुरवातीला झालेला मधुराचा आनंद हळूहळू ओसरु लागला. फोटो बघतांना कधी भरुन आले तर कधी रितेपण आल्यासारखे वाटत होते.
आनंदाचे क्षण हातातून निसटले होते.
जसजसे आयुष्य पुढे जाणार ते मधुर क्षण आणि आपण यातील अंतर वाढत जाणार हे नक्की ……
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.









खूप च सुंदर
अतिसुंदर
Wahh