८-गुंता-एका स्त्री मनाचा
८-गुंता-एका स्त्री मनाचा

८-गुंता-एका स्त्री मनाचा




आम्ही शहरात पोहोचलो, त्याच्या भाड्याच्या खोलीत स्वयंपाकाचा स्टोव्ह होताच,तुटपुंजी भांडीपण होती . खोली एकच द्हा बाय बाराची असावी. मी झाडपुस करून सर्व सामान नीट लावले. दुसऱ्या दिवशी माझा दीर आला. तो इथेच अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. आता आम्ही तिघेजण येथे रहात होतो. नवऱ्याची कोणतीही नोकरी किंवा काम असे काही निश्चित नव्हते .त्यामुळे घर कसे चालायचे असा प्रश्न पडायचा. सासुबाई महिनाभराची ज्वारी व थोडेफार पैसे काही दिवस पुरवित होते. त्यानंतर त्यांनाही ते जड जायचे. सासूबाईला सासर्‍याची पेन्शन होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मदत केली. पण सतत नवऱ्याला काम धंदा करणे बाबत बोलत असे. पण त्याने कधी कोणते काम केले नव्हते. त्यामुळे त्याला काम करायची लाज वाटे. मग तो मला माझ्या हाती नोकरीचा अर्ज देऊन वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात घेऊन जाई.

मला संबंधित अधिकाऱ्याला भेटायला सांगून तो बाहेर उभा राही. मी त्या अधिकाऱ्याला मला काही काम देण्याविषयी विनंती करीत असे. एकाने नाही म्हंटले की दुसऱ्या कार्यालय जायचे. हा दिनक्रम ठरलेला. जेव्हा सर्व कार्यालयाकडून नकार मिळाला. तेव्हा तो माझ्यावर चिडायचा. मी एखादेवेळी उलट उत्तर दिले की तो मारहाण करायचा. मला माझ्या आई वडिलांची व छोटीची खूप आठवण यायची. त्यांना भेटावे, त्यांना पहावेसे वाटत होते .पण हिंमत होत नव्हती घरी जाण्याची. घरी गेल्यास सर्वांच्या काय प्रतिक्रिया असतील कोण जाणे? बहिणीचा विचार आला की एखादे उनाड वासरु हुंदडता हुंदडता अचानक चुपचाप खाली बसावे तसे व्हायचे.

मी विचार केला की,लग्नानंतर माझ्या जीवनात काही फरक पडलेला नाही उलट आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी माझी गत झाली. दिवसभर घरी राहिले तर नवऱ्याचे टोमणे, बोलणे, मार खाण्यापेक्षा मी माझे शिक्षण पुढे चालू ठेवावे. या निमित्ताने शिष्यवृत्ती पण मिळेल ती घरखर्चासाठी कामी येईल. तो लगेच तयार झाला. त्याला माझा सहवास नकोच होता.

मी बीएससी पूर्ण केले होते .त्याचा रिझल्ट लागला होता .आणि आता कॉलेज प्रवेश सुरू झाले होते. त्यामुळे मीएल एल बी ला प्रवेश घ्यायचे ठरविले. एल एल बी चे क्लासेस सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत असायचे. ते मला सूटेबल होते .तसेच दिवसा एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली.पगार अत्यंत कमी होता पण कामाचा अनुभव येईल असे ठरवून मी रूजू झाले .शाळेत फक्त विज्ञान विषयाचे तास घेण्यापुरतेच जात असे .त्यामुळे दुपारनंतर चे क्लासला सुद्धा मला पुरेसा वेळ मिळायचा. सकाळी घरची कामे उरकुन शाळेत जात असे व त्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ एल एल बी चे क्लासेस असा माझा दिनक्रम ठरलेला.
काही दिवसात माझी बहीण आमच्या खोलीवर यायला लागली. यांची बोलचाल कशी सुरू झाली माहीत नाही. पण ती येत होती. मी तर दिवसातील बराच वेळ घरी राहत नसे. नवऱ्याला भरपुर एकांत मिळे.दिर कॉलेजला किंवा मित्रांकडे असे.तो खोलीवर फार कमीच राहायचा.मला काही हरकत घेण्याचा प्रश्नच नव्हता कारण लग्न झाल्यानंतर कोणी विवाहबाह्य संबंध ठेवू शकत नाही असाच माझा समज होता .ती बरीच नॉर्मल दिसत होती. अधून मधून छोटी पण येत होती. मला जरा हायसे वाटले .

आता आमच्या लग्नाला दोन महिने झाले होते त्याचे माझ्याप्रती रूक्ष वागणे, वडिलांचे अर्धे घर नावावर करून देण्याची मागणी व त्यामुळे मारहाण सुरूच होते .सर्व असह्य होत होते .त्याच्याशी लग्न केले नसते तर बरे झाले असते असे नेहमी वाटे. पण आता उपयोग काय? मला हा संसार पुढे न्यायचा होता .तो केव्हा तरी बदलेल, चांगला वागेल या एका आशेवर जीवनाची वाट चालत राहणे क्रमप्राप्त होते. यातच मला दिवस गेलेत

माझे एल एल बी चे एक वर्ष पूर्ण झाले. शिष्यवृत्तीही मिळाली. शाळेकडून थोडेफार पैसे मिळाले ते सर्व मी त्याच्या स्वाधीन केले. आता माझे ध्येय बी एड करायचे होते. अर्ज केला. अपेक्षेप्रमाणे प्रवेश मिळाला. कॉलेज सुरू झाले. आम्ही कॉलेजच्या जवळपास खोली भाड्याने घेतली. मला आठवा महिना सुरू होता. मी कॉलेजला पायी जाऊ शकत होते. एक महिन्याने मला मुलगा झाला. डिलिव्हरीच्या वेळी माझी आई माझ्या सोबत होती. माझ्या नवऱ्याने मला दवाखान्यात ऍडमिट केल्याचे माझ्या घरी सांगितले होते.म्हणून माझी आई व बहीण दवाखान्यात आल्या होत्या. माझ्या आईने दवाखान्यातून घरी नेले.

मी आईकडे एक महिना राहिले. तेथे माझ्या आईने बाळंतपणाच्या अनुषंगाने माझी योग्य ती काळजी घेतली. बहीण अनिच्छेनेच का होईना स्वयंपाक पाणी करीत होती. परंतु तिने ती नाराज असल्याचे दाखविले नाही. मी ही सर्व विसरून तिच्यासोबत सामान्यपणे वागू लागले .एक महिन्यानंतर मी आमच्या खोलीवर आले .कारण कॉलेजनेही फक्त एक महिन्याची सुट्टी मंजूर केलेली होती. माझी आई माझ्या सोबत बाळाला सांभाळण्यासाठी आली होती. एक महिन्याच्या बाळाला घरी ठेवून मी कॉलेज करीत होते.कालेजमधून दर दोन तासाने सुट्टी च्या वेळी घरी जाऊन बाळाला दूध पाजून परत कॉलेजला यायचे .असे धावपळीत ते दिवस गेले . याचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला.दरम्यान नवरा प्रथमच कामानिमित्य बाहेर गावी गेलेला होता. दोन महिने झाले आई तिच्या घरी गेली .

माझ्या नवऱ्याच्या आग्रहाखातर घराची वाटणी आम्हा दोघी बहिणी मध्ये झाली होती ,तशी आई-वडिलांची ही झाली. आई बहिणीकडे तर वडील माझ्याकडे असे माझ्या बहिणीनेच ठरवून दिले होते .त्यानुसार आईबहिणीकडे गेली व बाबा माझ्याकडे आले. आई च्या ऐवजी बाळाला आता बाबा सांभाळायचे .म्हणजे मी येईस्तोवर त्याचा पाळणा हलवत राहायचे. तो झोपेतून उठू नये म्हणून. मी दर दोन तासाने घरी येत होते. वर्ष संपले. परीक्षा झाली .निकाल लागला. मी व्यवस्थित पास झाले .कष्टाचे चीज झाले, समाधान वाटले .
त्याचवेळी मला एका सरकारी विभागाकडून मुलाखतीकरिता पत्र आले. मुलाखत नाशिकला होती .आम्ही दोघेही बाळाला घेऊन नाशिकला गेलो.मुलाखतीसाठी तयारी म्हणून सदर पदाबाबत संबंधित संस्थेला भेट देऊन आवश्यक ती माहिती घेतली होती आणि पूर्ण तयारीनिशी मुलाखतीसाठी उपस्थित झाली. मुलाखतीच्या दालनात आयुक्त महोदय व त्यांचेसह तीन सदस्य होते. सर्वांच्या प्रश्नांची मी नम्रपणे समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता . सर्व मनासारखे होऊन माझी निवड झाली. मला माझ्या स्वप्नातील नोकरी मिळाली. ज्याचे मला नेहमी आकर्षण वाटे. नोकरीचे आदेश मिळाले तेव्हा आमचे बाळ दीड वर्षाचे होते .जुजबी सामान घेऊन आम्ही नव्या क्षेत्राकडे, नव्या स्वप्नांकडे ,नव्या ठिकाणी निघालो…

क्रमशः




सुमीचे पुढीलआयुष्य जाणून घेण्यासाठी कृपया खालील बघा.

https://marathi.shabdaparna.in/९-गुंता

 

प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..
शब्दपर्ण फुल ना फुलाची पाकळी म्हणून  शब्दपर्णसाठी जे लेखक लिहितील  त्यांना views नूसार मानधन देणार आहे.
१००० views.ला १५ रु…..याप्रमाणे.

लिखाण पाठवण्यासाठी marathi.shabdaparna.in वर Registration करा.
Registration करायला काही अडचण आल्यास
9867408400 वर तुमचा नंबर आणि  नाव पाठवा.आम्ही Registration करुन देवू.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!