-By-प्रसाद कुळकर्णी
मराठी लेख-आनंद तरंग
आनंद म्हणजे काय ? तो कशात असतो ? कशामधून मिळतो ? आनंदाची व्याख्या काय ?
तर आनंद म्हणजे मनमोकळं होणं , आनंद हा काही काळापुरता किंवा काही क्षणांपुरता असतो , परंतु आपल्या जगण्याला उभारी देऊन जातो , सकारात्मकता वाढवतो.
आता तो कशात असतो ? कशातून मिळतो ? अर्थात, आनंदाची व्याख्या काय ? तो आपण घेतानाच समोरच्यालाही कसा देऊ शकतो याचाच आपण या लेखातून धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अगदी मातृत्वाच्या आनंदापासून सुरवात करुया . नऊ महिने त्रास , वेदना ,ताण सोसत एक स्त्री पोटातला गर्भ जन्माला येण्याची आतुरतेने वाट पहात असते. प्रचंड वेणा सोसून जेव्हा तो गर्भ या जगात येतो त्यावेळी त्या मातेच्या चेहऱ्यावर दिसतो, तो आनंद. त्या स्त्रीचा तो पुनर्जन्मच असतो. आपण आई झालो या मातृत्वाच्या आनंदाला कशाचीच सर येणं शक्य नाही. जन्माला आलेलं बाळ काळाकुट्ट असो , अशक्त असो , रूपाने विचित्र असो , आईला मात्र त्याच्याकडे पाहिल्यावर मिळतो, फक्त आनंद.
आपल्याला आनंद कधी होतो ? तर प्रचंड मेहनत , बुद्धी किंवा श्रम ओतून अगदी मनापासून , हृदयापासून प्रयत्न केल्यावर जे फळ मिळतं , ज्यासाठी एव्हढा अट्टाहास केलेला असतो ते समोर दिसल्यावर सगळे श्रम विस्मरणात जातात आणि उरतो तो निव्वळ आनंद.
अगदी लहानगं बाळ जेव्हा आधारविना उभं रहात, पाहिलं पाऊल टाकतं , दुसरं टाकतं आणि मग तिसरं, तसतसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. पहिल्या पाऊलानंतर ते आजूबाजूला पाहून खुदखुदून हसतं. हे मला जमलं , हा भाव त्याच्या नजरेत असतो. आणि आता मला कुणाच्या आधाराची गरज नाही हा निरागस आनंद त्या हास्यात सामावलेला असतो. त्यावेळी तुम्ही चटकन त्याचा हात धरून त्याला सावरायला जा , ते मुल आपला हात नकारार्थी मान हलवत झिडकारून टाकतं. कारण त्यावेळी तो आनंद त्याला भरभरून घ्यायचा असतो. इतके दिवस घरातल्या सगळ्यांनाच त्याने आधाराशिवाय चालताना पाहिलेलं असतं. जे आज आपल्यालाही जमलं हा तो आनंद असतो
पुढे शाळेत जायला लागल्यावर मोठं कुणीतरी सोडायला आणायला सोबत असतच. ज्या दिवशी पहिल्यांदा ते मूल शाळेतून एकटं घरी येतं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक आनंद पसरलेला असतो. मी एकट्याने हा रस्ता पार केला हा आनंद सोबत घेऊन तो प्रत्येकाला सांगत असतो ,
“माहितीय आज मी एकटा शाळेतून घरी आलो” किंवा
“तुला माहितीये का मी एकटा जातो शाळेत” आणि त्यावर आपण जर चेहऱ्यावर आश्चर्य दाखवून म्हटलं
“हो ? काय सांगतोस!” हे ऐकल्यावर तर त्याच्या आनंदातला रुबाब अजुनच वाढतो.
जसजसं वय वाढतं तसतशी समजही वाढत जाते. आपल्या मोठ्या भावंडांसारखं आपल्यालाही आई वडिलांनी काही जबाबदारीचं काम सांगावं असं मनापासून वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी
“मी करतो ! मी आणतो ! मी करू ?” हे चाललेलं असतं. आणि
“तू नको ! तुला नाही जमणार . तू अजून लहान आहेस”. असं उत्तर समोरून आलं की हिरमुसायला होतं. आणि एके दिवशी आई अचानक किचनमधून सांगते
“अरे हा चहा जरा बाहेर नेऊन देतोस का ?”
हे ऐकून तो तिरासारखा आत पळतो आणि आईच्या,
“सावकाश ,पाडशील” या शब्दांना कानाआड करून आपली सगळी एकाग्रता कपबशीवर केंद्रित करून तो बाहेर आणून ठेवतो आणि जराही न सांडता आपण हे काम केलं याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतो.
शाळा कॉलेजच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये असे अनेक क्षण येतात जे खूप आनंद आणि अभिमानाने भरलेले असतात. परंतु ते निखळ आनंदाचे नसतात तर त्यासोबत अपेक्षा आणि जबाबदारी सुद्धा येत असते.
शाळा कॉलेजमध्ये असताना आपल्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधले पैसे वाचवून आई वडिलांच्या वाढदिवशी त्यांना दिलेली छोटीशी भेट एकट्याने जाऊन विकत घेताना जो आनंद मिळतो आणि त्याहीपेक्षा त्या वस्तूला स्वतः गिफ्ट पॅक करून त्यांना देताना त्याहूनही आनंद मिळतो त्याला खरंच तोड नसते. कारण ‘ देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे ‘ यामधून ‘ देणाऱ्याचे हात घ्यावे ‘ हे आपण अगदी सहजपणे शिकून जातो. आणि याहीपेक्षा ती भेट आई – वडिलांना देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखणं यासारखा खरंच दुसरा आनंद नसतो. आपलं अपत्य नुसतं वयाने मोठं नाही तर समजुतीनेही मोठं होतंय याचा असतो तो. ती भेट किंमतीने नगण्य असते , पण आई बाप मुलाकडून मिळालेली पहिली भेट सांभाळून ठेवतात.
शिक्षण संपून नोकरी लागते आणि व्यस्त जीवन सुरू होतं. घरातल्या ज्येष्ठांसाठी वेळ देणं कठीण जाऊ लागतं. ते आपल्या सहवासासाठी आतुरलेले असतात. त्यांना बोलायचं असतं , सांगायचं असतं. व्यस्त दिवसातला वेळ काढून
कशी आहेस आई ? किंवा काय म्हणताय बाबा ?”
म्हणत मुलगा त्यांच्याकडे आला की त्यांचे डोळे लकाकतात. आनंद असतो तो लेक वेळ काढून आपल्याशी बोलायला आला याचा. कारण त्याची व्यस्तता ते रोज पहात असतात. आणि मग काय बोलू आणि किती बोलू असं त्यांना होऊन जातं. त्याला निरखत आधी त्याची चौकशी करतात. आपली दुखणी ते सांगत नाहीत , पण मुलाने समजून त्याबद्दल विचारलं , उपाय सांगितला की मनातून तर खूप आनंद झालेला असतो पण उघड म्हणतात ,
“काही होत नाही मला ! तू माझं कौतुक नको करुस , आधी तुझ्या तब्येतीकडे बघ.” बरं , घरातच असल्यामुळे नवीन वस्तू , कपडे यांची फारशी गरजही उरलेली नसते. तरीही नवी साडी , शाल , स्वेटर , शर्ट आणून दिल्यावर खूप प्रेम आणि आनंदाने आधी त्यावर ते हात फिरवतात.
आपल्याला लहानपणी कसं नवीन कपड्यांचं अप्रूप असायचं , तसं त्यांना आता असतं. आपण विकत घेऊ शकतो , पण आपलं कुणी प्रेमाने भेट देतं तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त कसा करणार ?
आपले काही आप्त विकलांग अवस्थेत असतात , काही परस्वाधिन झाल्यामुळे घरीच बसून असतात. वेळ जात नाही आणि मरणही येत नाही. कित्येकदा एकटेपण खायला उठतं. अशा वेळी आठवणीने आठवड्यातून , पंधरवड्यातून त्यांना एक फोन केला आणि त्यांची चौकशी केली की नक्कीच तिकडे डोळ्यात आनंदाश्रू भरून येतात. हा आनंद दुहेरी असतो .
सुंदर लिखाण
वाह
सुंदर .आनंद घेता आणि देता आला तरच आनंद मिळेल.
छान