दिवाळी माझ्या मनातली
दिवाळी माझ्या मनातली

दिवाळी माझ्या मनातली

 

दिवाळी सिझन (हो सिझनच)चे पडघम दसर्‍याच्या आधी पासुनच वाजायला लागतात.
त्यात वेगवेगळ्या कंपन्यांकडून देण्यात येण्याऱ्या ऑफर, आणलेले नविन प्रकार, ईत्यादींचा भडीमार केलेला असतो. रोजच्या पेपर मधे तर पानेच्या पाने विविध प्रकारच्या ज्वेलर्स च्या, दुचाकी, चारचाकींच्या शोरूम च्या जाहिरातींनी भरलेली असतात. दसऱ्या नंतर ह्याला अगदी ऊत येत असतो.
सोशलमिडीया वर तर अशा जाहिरातीं बरोबरच अनेक राजकीय पक्ष, संघटना वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून आपली पोळी भाजून घेत असतात.

ह्या सगळ्यात माझ्या मनातली दिवाळी कुठेच नसते.
एकीकडे नाविन्या कडे जाणारी नवीन पिढी आणि दुसरीकडे आमच्या वेळी असे नव्हते चा पाढा वाचणारी जुनी पिढी मी दोन्हीकडून odd man out झालेली.

ऊगाच काहीतरी खरेदी करून, कोणत्यातरी हाॅटेलात जाउन स्टेटस टाकणारी, रील बनवणारी जशी मी नाही, तशीच जाहिरातीच्या कोणीतरी खरेदी केली, अशा प्रभावाखाली येणारी हि मी नाही.

पण मला ही दिवाळी साजरी करायची असते अगदी माझ्या मनाप्रमाणे.
आपल्या फराळाचे, नातेसंबंधांचे (नेने बाईंनी) कितीही गोडवे गायले तरी खरे तर आता त्यात काही अप्रूप राहिलेले नाही. लाडू चकली खायला, आणि नातेवाईकांकडे जायला आता ना दिवाळी लागते ना बोनस लागतो.
आपापल्या कामावर जाण्याच्या घाईत घरातील सगळेच जण पावणेसात च्या आत आंघोळी उरकत असतात, मग अभ्यंगस्नानात कोणाला आनंद वाटणार आहे?

म्हणून मला दिवाळी म्हणजे…एक वेगळीच साजरी करायची मनात असते. अनायसे 7,8 दिवसाची सुट्टी असते, त्याला जोडून येणाऱ्या शनिवार अथवा सोमवारी सुट्टी टाकली की 10 दिवस मिळतातच. मग जरा स्वतःकडे लक्ष देणे, घराची साफसफाई रोजच असते हो…थोडी स्वतःच्या शरीराची, मनाची साफसफाई केली तर काय बिघडले? म्हणून माझी दिवाळी थोडी वेगळी.
सगळ्यांना सुट्या आहेत तर अगदी कोणतीही धास्ती न बाळगता आरामात जाग येईल तेव्हा उठणे,कडक चहा घेऊन योगासने, त्यातही जे अवघड आहे ,जमत नाही त्याकडे जास्त वेळ देणे. मग थोडासा नाष्टा. मग अगदी स्पा किंवा पार्लर च्या महागड्या सर्व्हीस नाही, पण निट साग्रसंगीत आंघोळ, मेडीटेशन (कोणत्याही forwarded message च्या नादी न लागता) म्हणजे रामरक्षा, अथर्वशीर्ष असे म्हणणे.
साधा स्वयंपाक करून हलके जेवण करणे.
नंतर दुपारी उशीरा पेटीवरची धुळ झटकून एखादे आवडते गाणे म्हणणे, असतीलच कोणी
मैत्रीणी तयार तर घरातच एखादी छोटी मैफल जमवणे, नाटक, पुस्तक प्रदर्शन बघणे. एखादे राहून गेलेले कौशल्य आत्मसात करणे, जसे या वेळेस मी ठरवले की शाळेत मला हस्तकलेच्या बर्‍याच गोष्टीं कराव्या लागतात मग तेच कौशल्य मी आत्मसात करेन, म्हणजे माझे रोजचे काम सुकर होईल. रात्री जमले तर लंघनच करणे, पण त्याची ही सक्ती नाही.
अशा प्रकारे जर ते 8,10 दिवस घालवले, तर पुन्हा आपापल्या कामाच्या व्यापात जाताना एक वेगळी ऊर्जा, वेगळे व्यक्तिमत्व घेऊन मी जाईन. जी मी एक महीना आधी होते त्याच्या एक स्टेप नक्कीच वर चढलेली असेल. नरकासूराचा अंत म्हणजे तरी काय, आपल्याला कोठे तो राक्षस भेटणार आहे.

अशी दिवाळी जर दरवर्षीच घरातील प्रत्येकाने साजरी केली तर 3,4 वर्षातच आपले रहाणीमान, आपले कौशल्य, आपले व्यक्तीमत्व खुप सुधारले आहे हे नक्कीच जाणवेल.

असो तुम्ही ही अशी साजरी करा असा माझा सल्ला आहे, आग्रह आजिबात नाही.
शेवटी दिवाळी ज्याची त्याची वेगळीच, अगदी साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे तुकाराम महाराज म्हणतातच.

वैशाली जोशी

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!