तमाशा-मुरळी
जितीजागती माणसे देवाला सोडणे, ही कुप्रथा म्हणावी. ती राजरोसपणे समाजात चालू होती. ती संपली असे नाही आहे.. जोगतीण, मुरळी, देवदासी, देवकरीण, पोतराज, आराधी आणि वाघ्या- मुरळी असे बरेच काही. मानवतेच्या देहाचे विडंबन होय. हे बरे नाही?
यामागील हेतू अनेकांना पोटभर मिळावे असा असेल कदाचित…… देवापेक्षा पोटही महत्त्वाचे होते. अन्न मिळणे मुश्कील होते. त्या समाजातील स्त्रिया, पुरूष हे भक्त मंडळी होती, हे नाकारता येणार नाही. या मागची अनेक प्रश्न मनात रुंजी घालतात. ती उत्तरेही अलीकडे कळायला लागली आहेत. व्यवस्थेनं चारही बाजूनी कोंडी केली होती.
शिक्षणाचा अभाव, गरिबी, अंधश्रद्धा आणि दैवभोळेपणा या वरंवठ्याखाली भरडून निघालेली, ही माणसे बरं का?
तीसचाळीस वर्षांपूर्वीची घटना मला अस्वस्थ करत होती. ती थोड्या वेगळ्या अंगाने मांडतो आहे. जेमतेम पंधराशे लोकांची वस्ती, दोनशे उंबरे असतील. कोरडवाहू गाव, तसं नेक आणि फेक माणसांचं गाव त्यागावात चार लेकी मुरळ्या अन् पोतराजही एकाच गावात. कलेत अगदी निपूण, हलगी ते संवादीनी, तबला, ढोलकी, सनई म्हणजे सर्व वाद्य लिलया स्वरूपात वाजवून देहभान विसरायला लावणारा मधुर आवाज. सांज जागी करायचा….
दसरा दिवाळीपासून जत्रा चालू होताच, पोट हातावर घेऊन, फडाची जमवाजमव करून लोकरंजनासाठी हजर. कुणब्याच्या हातात पैसा आलेला असतो. ह्या गावातून त्या गावात काफिला प्रस्थान करायचा. छंदीफंदी, हौसेगौसे, अंबटशौकीन आनंदासाठी बाहेर पडायचे.
गावात घुंगरू वाजलं, की चांगलं पिकते.
हा समजही होता. गावच्या शाळेत थांबून, रातीला. लालटेन, बत्तीच्या अंधूक प्रकाशात..
आज काल पाटलाचा
लई रुबाब, बाई लई रुबाब
पायपेटीवर हे गाणं वाजायचं. नाचगाणी, बैठकीची लावणी, वाड्याच्या अंगणात रंगून जायची…. कधी कधी नव्हे नेहमीच देह व्यवहारही होत असे. कैकांनी पैसा, जमीन जुमला, संसारही या नादापायी देशोधडीला लावला आहे.
सत्तांध, मुजोर लोकांच्या या दास्या होत्या.
देवाची दासी, अन् पिसाटांच्या फसी..
हे नशिबांचे भोग म्हणून भोगायच्या (राजीव, सजीव, जिवलगा, निलांबरी) ह्या प्रचंड ताकदीच्या कलावंत… पंचक्रोशीत त्यांच्या फडाचा बोलबाला होता. हे ऐकलय, अनुभवलय…
याची देही। याची डोळा।। गाण्याची समज, आवाज, तालसूर पदन्यास, बतावणी आणि सवाल जबाव सारं काही लाजवाब, नेत्रदीपक असं काही…. नंतर बऱ्याच वाटा फडाला फुटल्या, कोणी त्या वाटेने, तर कोणी ह्या वाटने….. जीवनाची वाट लावून घेतली. तीसेक वर्षे लोकमनावर अमीट असा ठसा उमटवला होता. पन्नाशीपुढील लोक आदराने, कौतुक करतील. ही मंडळी आता आपल्यात नाहीत. पण लोकरंजनाचा, त्या कलाकारांच्या कलेचा अतुलनीय पिसारा आजही फुलतो मनात….
*केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा*
या गीतातील भक्तीभावाचा नाचाच्या फडाला भक्तीगीताची नशा चढते,हे विशेष…. अतुलनीय…!!
हा सात्विक हेतू, बाजूला ठेवला, तर भयाण वास्तव वेगळे आहे. जत्रा, गावदरबारी, करमणूक करण्यासाठी पोट हातावर घेऊन फिरणारी,ही माणसे….. सद्या कोलमडून पडली आहेत. झगमगाटात कुठल्या कुठे पळून दूर गेलीत. मुरळीची जागा घरंदाज लोकांनी हिसकावून घेऊन, नाचणं, गाणंही पळवलं आणि जगणं हराम केलं, हे वास्तव आहे. चित्रनगरीच्या मायाजालात संगीतबाऱ्या, लावणीचे फड मोडून पडले.. तमासगीर, तमाशानांही गिळंकृत केलं. हे बटबटीत सत्य आपण जाणतोच…. कलेचं हस्तांतरण झालं, पण अर्थाचं आणि अर्थार्जनासाठी काय? शिक्षणाचे संक्रमण झाले, स्वाभिमानाचे काय? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. ते पंचेहत्तरीतही सुटले नाहीत. आजही या चालीरीती, प्रथा, परंपरा यांचे वहन आपण करतो. एकीकडे राजाश्रय प्राप्त झाला आणि ती दासीच राहिली. म्हणून कुटुंब त्यांचे कधी झालेच नाही. मुलाबाळांना बापाची नावे मिळू शकली नाहीत. त्या बायकांनी स्वतःचीच नावे देऊन, परिवर्तनाचे पाऊल टाकले आहे. म्हणून त्या लावणीतल्या लावण्यवतीसारख्या नखशिखांत श्रेष्ठ कुलाचारी, मातृसत्ताक कुटुंबांच्या उद्वाहक, सुधारणावादाची जागृत…
. तू मुरळी आहेस…!
चंद्रकांत गायकवाड
मुखेड.
सुंदर … छान आणि प्रखर लिखाण ,..
अप्रतिम 👌
सत्यता मांडली., छान