संत कबीर
माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।।
मातीच्या वस्तू बनवतांना कुंभार मातीवर उभा राहून तिला तुडवतो.माती त्याला म्हणते, आज तू मला तुडवत आहेस पण एक दिवस असा येईल तू मातीतच विलीन होशील .
वरील दोह्यात संत कबीरांनी कालातीत सत्य सांगितले आहे.
संत कबीर ज्या कालखंडात जन्मले तो कालखंड संतांना अस्वस्थ करणारा,व्याकुळ करणारा होता.सर्वत्र कटूता,वैरभाव प्रवाहित होत असतांना त्यांनी आपल्या सत्यशोधक वृत्तीने निर्भय होऊन समाजाला सन्मार्ग दाखवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या जन्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. उत्तरप्रदेशात काशीजवळ लहरतारा सरोवराजवळ निरु आणि निमा या दांपत्याला हे मुल मिळाले.त्यांनी त्या बालकाचा अपत्यासारखा सांभाळ केला.तेच बालक पुढे कबीर या नावाने प्रसिद्ध झाले असेही एक मत आहे.
संत कबीराचे विचार त्या काळात जेवढे प्रभावी होते तेवढेच आजही आहे. त्यांच्या विचार आणि वाणीने स्थळ,काळाच्या सीमारेषा ओलांडल्या आहेत.
कबीरांचे दोहे जीवनानूभवाचे सत्य विषद करणारे आहे.त्यांनी दिलेले दृष्टांत नित्याच्या अनुभवातून घेतले आहे.त्यांच्या काव्यातून यथार्थ सत्य सांगितले आहे म्हणून त्यांचे काव्य धर्म,पंथ,काल,देश सगळ्या मर्यादेपलिकडे पोहचले आहे.
कबीरांनी त्यांच्या दोह्यामधून ईश्वरभक्ती,प्रेम,सत्य, व्यवहारज्ञान,सन्मार्ग असे विविध विषय मांडले आहेत.
त्यांचा एकेक दोहा म्हणजे जगण्याचे सार आहे.
वाईट गोष्टींकडे आपण लवकर आकर्षित होतो या अर्थाचा त्यांचा हा दोहा.
साचे काई न पतिजई झूटे जग पति पाय
गलीगली गोरस फीरे मदीरा बैठ बिकाय
चांगल्या व पौष्टिक दूधाची विक्री करण्यासाठी रस्तोरस्ती फिरावे लागते.पण अपायकारक मद्याची विक्री करण्यासाठी मात्र काहीही प्रयत्न करावे लागत नाही.लोकच तुम्हाला शोधत मद्य खरेदी करण्यासाठी येतात.
कबीर लहरि समंद की, मोती बिखरे आई.
बगुला भेद न जानई, हंसा चुनी-चुनी खाई.
समुद्राच्या लाटेसोबत मोती येऊन विखुरले.बगळा हे समजू शकत नाही पण हंस वेचून मोती खातो. कुठल्याही गोष्टीचे महत्त्व फक्त जाणकारच समजू शकतो.
हिऱ्याची पारख करायला जोहरीच लागतो.
आपले जीवन क्षणभंगूर आहे हे खालील दोह्तातून त्यांनी मांडले आहे.
यह तन काचा कुंभ है लिया फिरे या साथ
डबका लगाफूटी गया,कछु ना लगा हात
जे सतत तुझ्या सोबत आहे ते तुझे शरीर कच्चे मडके आहे थोडासा धक्का लागला तरी आणि हे मडके फुटते आणि बाकी काही उरत नाही.
मनुष्य स्वभावाचे यथार्थ ,मार्मिक विश्लेषण कबीरांनी केले आहे.
प्रत्येक मनुष्य दुसऱ्याला वाईटदोषी समजतो. संत कबीरांनी आत्मपरिक्षण करुन मनाचा शोध घ्यावा असे सांगितले आहे.
बुरा जो देखन मै चला,बुरा ना मिलिया कोय
जब दिल खोजू अपना मुझसा बुरा ना कोय
मी जेव्हा माझ्या मनाचा शोध घेऊन आत्मपरीक्षण करु लागलो तेव्हा माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी
नाही.मनुष्य स्वभावाचे यथार्थ ,मार्मिक विश्लेषण कबीराने सांगितले आहे.
उद्या उमलणाऱ्या कळ्यांना दुरुनच माळी फुले तोडतांना दिसतो आणि त्या आपापसात बोलतात, आज उमललेल्या फुलाला तोडले.उद्या आपल्यावर हीच वेळ येईल.
आज जे आहे ते उद्या संपेल. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे.
कबीरांचा अतिशय सुंदर दोहा-
नहाये धोये क्या हुआ, जो मन मैल न जाए ।
मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए ।
अंतरंग मलीन असेल तर बाह्यरंग स्वच्छ ठेवण्यात काही अर्थ नाही. मासा नेहमी पाण्यात राहतो तरीही त्याचा दुर्गंध कमी होत नाही.
अधीर मनाचे वर्णन करणारा हा दोहा
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।
अधीर मनाचे वर्णन करणारा हा दोहा
मना जरा धीराने घे. सर्व गोष्टींना वेळ द्यावा लागतो.माळ्याने बागेतील झाडांना कितीही पाणी दिले तरी झाडांची फुले वेळेआधी फुलणार नाही.त्यासाठी वसंतऋतूची वाट बघावीच लागेल.
कबीरा जब हम पैदा हुए, जग हँसे हम रोये,
ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रोये
जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा तो रडतो आणि जग आनंदाने हसते.जर मनुष्य सत्कृत्य करत जगला तर जग सोडून जातांना तो हसेल आणि जग दुःखाने रडेल
संत ना छाडै संतई, जो कोटिक मिले असंत
चन्दन भुवंगा बैठिया, तऊ सीतलता न तजंत।
सज्जन चंदनाच्या झाडासारखे असतात. साप बिलगलेले असले तरी चंदन शीतलता आ सुगंध सोडत नाही.तसेच सज्जनही कितीही दुष्ट प्रवृत्तीची माणसे भेटली तरी सज्जनता सोडत नाहीत.
संत नेहमी काळाच्या पुढे असतात.संत कबीरही त्यातीलच.
कित्येक वर्षापूर्वी त्यांनी गुंफलेले दोहे आजही आपल्या जीवनाशी सुसंगत वाटतात.कैक वर्षानंतरही ते जीवनाशी जुळलेले राहतील.
मधुकर भोवते










कबीरांच्या दोह्यांचे सुंदर रसग्रहण.
अप्रतिम … लिखाण …
संत कबीरांच्या दोहोंचे सुंदर विश्लेषण केले बाबा
👍👍👍👍👍👍
👍👌
अप्रतिम विश्लेषण …kr वंदन
सुंदर लिखाण
Chan
खुप छान रसग्रहण. चांगले लिखाण वाचायला मिळाले काका, thanks.