दुरावलेली मैत्रीण
आबाने शांतीला माहेराला नेण्यासाठी बैलगाडी पाठवत असल्याचा निरोप धाडल्यापासून माहेरी जाण्यासाठी शांती खूप अधीर झाली. तिच्या भावाचे लग्न होते. बैलगाडी चा प्रवास म्हणून पहाटेला लवकर उठून ती कामाला लागली. सडासारवण आटोपून दोन तांबे अंगावर घेतले. भाजी भाकरी करून घेतली. लहानगा विजू उठला तर काहीच सूचू देणार नाही म्हणून तो उठायच्या आत होईल तसा भराभर हात चालवित होती शांती जमिनदाराची मुलगी माहेरी गडगंज श्रीमंती . पाच.. सहा भावंडांमध्ये एकुलती त्यामुळे सर्वांची खुप लाडकी.. तिचं माहेर उमरगाव चे फार पूर्वी खेडोपाडी प्रवासासाठी बैलगाडी चा वापर जास्त प्रमाणात होत असे. नर्मदा, सगुणा,कौशल्या तिच्या बालमैत्रिणी सारख्या डोळ्यासमोर येत होत्या. कशा असतील ? कुठे असतील?विजूच्या जन्माच्या वेळी नर्मदा,कौशल्याची भेट झाली .सगुणाचे वर्षभरा पूर्वी लग्न झालेले तिच्या लग्नात सर्व मैत्रिणी एकत्र जमल्या होत्या त्या दिवसानंतर आज त्यांना ती भेटणार होती दहा वाजत आले होते आतापर्यंत दिवस बराच वर आला होता.शांती सारखी आतबाहेर बैलगाडी ची वाट पाहत येरझारा घालीत होती.लांबचा प्रवास आणि लहान बाळ सोबत जरा दिवस मावळायच्या आत पोहचलेल बरं ..,. तसं ध्रुपदा काकीला सोबतीला पाठवतो निवांत रहा असा आबांनी निरोप धाडलेला.. पण..शांती ची आतल्या आत चलबिचल सुरू झाली होती.”शांते ए शांते चल आटपल का?”धृपदा काकीन शांतीला बाहेरून च आवाज दिला.गणप्याने तोपर्यंत बैलजोडी सोडून सावलीला बांधली आणि त्यांच्यासमोर चारा टाकला. बैलगाडी तयार झाली होती, आता निघायची वेळ आली .
शांती तयारच होती पण विजूचे आबा शेतातून घरी आल्याशिवाय तिला घराबाहेर पडता येत नव्हते त्यामुळे ती त्यांची वाट बघू लागली जरा वेळाने विजूचे आबा आले तिने त्यांना जेवायला वाढून देत उरलेसुरले काम आटोपून घेऊन घरातील देवाच्या पाया पडून बैलगाडीत बसली बैलगाडी रस्त्याला लागली विजू धृपदा काकीच्या मांडीवर बसून रस्त्याच्या कडेची झाडेझुडपे बघून खुश होत होता. वर्षभरानंतर मैत्रीणीना पाहणार
त्यांना भेटणार .. म्हणून आतुरलेल्या शांतीला माहेरा पर्यंत जाणारी वाट कधी एकदा संपते असे झाले होते.
बैलगाडी मधून जाताना तिला प्रत्येक छोट्या छोट्या वळणार तिची मैत्रीण सगुणा आठवत होती नर्मदा , कौशल्या, सगुणा ,शांती अशा चौघींची चौकोडी होती पैकी सगुणा वर शांती चा फार जीव होता त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या बालपणापासून एकत्र खेळल्या बागडल्या सगुणाही तिला खूप जिव .लावायची रस्त्याने जाताना शांती तिच्या आठवणीने व्याकुळ झाली होती.तिला लवकरात लवकर मैत्रिणीला भेटण्याची ओढ अनावर होऊ लागली. गावामध्ये बैलगाडीने प्रवेश केल्यानंतर तिच्यासमोर बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, मैत्रीणींचे हसरे चेहरे आणि त्यांच्यासोबत काय घालवलेले खोडकर क्षण पुन्हा एकदा समोर उभे राहिले.” तिचे मन परत जुन्या आठवणींत धावू लागले होते .या नादात..
तिला बैलगाडी कधी घराजवळ येवून थांबली हे सुद्धा कळले नाही. शांतीच्या भावाच्या लग्नाला सर्व नातेवाईक जमली होती लग्न विधी सुरू झाली होती शांतीचे नर्मदा कौशल्या सोबत भेटून झाले होते.फक्त सगुणाच तेवढी भेटायची राहिली होती पण सगुणा तिच्या भावाच्या कार्यक्रमाला आली नव्हती होता.तिने सगुणाच्या आईला तिच्या येण्याबाबत विचारले तर येईल ती आता म्हणत सगुणा चा विषय बदलवून दुसऱ्याच विषयावर बोलायला लागली…
तिच्या आईसोबत बोलत असतानाच शांतीची नजर दरवाजा कडे गेली तर तिकडून सगुणा येत असलेली तिला दिसली दोघीही एकमेकींना बघून आनंदाने हसल्या शांती तिला हाताने खुणावत आपल्या जवळ बोलावू लागली .पण तेवढ्यात विजू घसरुन पडलेला तिला दिसला म्हणून ती त्याच्या कडे धावत गेली तोवर सगुणा निघून गेलेली होती.
सगुणा माझ्या सोबत अशी का वागली मला न भेटताच गेली.
आधी तर ती अशी नव्हती मग आज काय झाले असावे ..हिला
शांतीला सगुणा चे असे तिच्यासोबतच कोरडे कोरडे वागणे अजिबात पटलं नव्हतं. पण तरीही आपली जीवाभावाची मैत्रीण म्हणून गावाकडे जायच्या आधी तिच्या घरी जाईल असा विचार शांतीने केला..
लग्न समारंभ आटोपल्यानंतर
दोन दिवसांनी शांती सगुणाच्या भेटीला घराकडे जात असताना
वाटेत तिला धृपदा काकी भेटली.
शांती काकीला सगुणाला भेटायला जात आहे तिच्या घरी चला आपण सोबत जाऊ असे म्हणाली.
काकी शांती कडे आश्चर्यने बघून म्हणाली
शांती तुला माहित नाही सगुणा नाही आता. चल आपण परत जाऊ.
शांतीचा काकूवर विश्वास बसला नाही.
तिने स्वतः दादा च्या लग्नात सगुणाला बघितले होते. सगुणा आनंदात होती.
ती हसत होतो,आपण तिला हातही दाखवला होता.
सगुणा नसणे कसे शक्य आहे? ती नाही आहे तर तर मला कशी दिसली?
विचारा विचारात ती सगुणाच्या घराजवळ पोहचली. घरात पाऊल टाकणार तोच तिला समोर सगुणाचा हार लावलेला फोटो दिसला.
सगुणाच्या आईने शांतीला मिठी मारली. सगुणा तुझी खुप आठवण करायची. बाळंतपणात गेली ती. पोटात मूल आडवं आलं इथल्या डॉक्टरने तिला शहरात न्यायला सांगितले. शहरात नेई पर्यंत उशीर झाला होता
सगुणाची आई रडत रडत सांगत होती शांती तिच्या फोटोकडे बघून रडत होती. तिला फोटो तून ती तिच्या कडे बघून हसत आहे असे भासत होते.
जणू काही आपल्याला तू रडू नको मी तुझ्या सोबत च आहे असंच ती म्हणत आहे असे तिला वाटले
ती तिच्या फोटोकडे पाहूत घराबाहेर पडली .
आणि सगुणा सोबत लहानपणी खेळत असलेल्या जागेवर जाऊन बसली व सगुणा सोबत घातलेले क्षण आठवू लागले सगुणा च्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. कितीतरी वेळ ती तशीच बसून राहली. सगुणाच्या कितीतरी आठवणी तिच्यजवळ होत्या. त्या दोघींच्या मैत्रीचा इतर मुलींना हेवा वाटायचा.
आपल्या मैत्रीला दृष्ट लागली सगुणा…. असे म्हणत जड मनाने ती उठली
दुरावलेली सगुणा कायम शांतीच्या मनात राहणार होती.
लेखिका..
सौ.दर्शना ओमकुमर भुरे हिंगोली…






खूप छान मैत्रीची कथा. हृदयस्पर्शी
खूप छान लिहिले ग .. मैत्री वर .. बालपणाच्या मैत्रीणी आठवल्या