ती आपल्या काॅलनीतील अतिशय, लाघवी, हुशार, मोहक, सुंदर आणि गोड अशी मुलगी, म्हणून सर्वांची लाडकी होती. शेजारी तिचे कौतुक करतांना थकत नसत. तिचे आई-वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. त्यांनी काबाड कष्ट केले, पण मुलीला कशाचीच कमी पडू दिली नाही. स्वतः थिगळ लागलेली कपडे घालायचेत, पण मुलीकरता नेहमी तिच्या आवडीचे कपडे घेण्यात त्यांनी कधीच काटकसर केली नाही. आई-वडीलांच्या कष्टाचे चीज करून लवकरात लवकर त्यांना या कष्टातून दूर करून सुखी करायचे हाच तिचा ध्यास. तसे तिने प्रयत्नही सुरू केलेले होते. मुलीचे शिक्षण पूर्ण झाले, की चांगला मुलगा बघून तिचे लग्नात कन्यादान करुन पुत्री ऋणातून मुक्त होण्याचे स्वप्न आई-वडील बघत होते.
परंतु या सुखी कुटुंबाला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक ?तिच्याच काॅलनीत राहणाऱ्या एका मुलाचे तिचे घरी काही दिवसांपासून येणे जाणे वाढले. सुरवातीला काॅलनीतील लोकांनी कानाडोळा केला, पण त्या मुलीचे आई-वडील घरी नसताना त्यांचे गैरहजेरीतसुध्दा त्या मुलाचे येणे जाणे वाढल्याने ही बाब काॅलनीतील काही सुज्ञ शेजाऱ्यांनी त्या मुलीच्या वडीलांना सांगितली. त्यांनी लगेच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला याबाबत विचारणा केली. बाबांनी अचानक विचारलेल्या प्रश्नांने ती मुलगी पुरती गोंधळली, हे तिच्या वडीलांनी आपल्या अनुभवाचे नजरेतून लगेचच हेरले.तत्क्षणीच ती मुलगी आईच्या पदराआड लपली. तिने आईचा सहारा घेतला.आईने लगेच मध्यस्थी करून, ”आपली मुलगी तशी नाही हो !’ शेजारी नाहक शंका घेत आहेत. विनाकारण माझ्या मुलीला रागावू नका. मी तिला समजावते.” असे म्हणून मुलीला पाठीशी घातले.
पण कालांतराने आईलासुध्दा आपल्या मुलीमधील बदल जाणवू लागला. तिचा खोडकरपणा कमी झाला. दचकूनच सावधतेने उत्तर देणे, अभ्यासाकडील दुर्लक्ष, जेवताना लक्ष नसणे, मोबार्ईलवरील व्यस्तता ही व इतरही लक्षणे मुलीमध्ये दिसू लागल्याने आईची चिंता अधिकच वाढली. आईने मुलीच्या बाबांना लगेच ही सर्व लक्षणे सांगितली. तसे सुरुवातीला ते आईवरच चिडलेत. नंतर शांत होऊन ठीक आहे, कुठे वाच्यता करू नकोस. आपण मुलीला प्रेमाने समजावून यावर उपाय काढू? असे म्हणून दोघांनीही स्वतःला सावरलं. शेवटी आई-बाबाच ते ! आईबाबा मुलीचे चिंतेत संपूर्ण रात्र त्यांनी जागून काढली.
दुसरऱ्या दिवशी मुलीला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळीत वडीलांनी मुलीला विचारले, “बेटा ! काही त्रास आहे का? कुणी काही बोलले का ? पैसे हवेत का ? काय झालं बाळा? आमचं काही चुकलं का?” असे म्हणताच त्या मुलीने आईच्या कुशीत शिरुन हंबरडा फोडला व रडायला लागली. मुलीचे रडणे बघून दोघांनीही मुलीला कवटाळले. “बेटा ! चिंता करु नकोस, आम्ही आहोत अजून जिवंत ! बिनधास्त पूर्वीसारखीच वाग.” असे म्हणून मुलीला धीर दिला खरा, पण मुलीबद्दलची चिंता त्यांना लपविता आली नाही हे मात्र तितकेच सत्य.
त्या मुलाचे मुलीचे घरी वारंवार येणे, त्यांच्यातील मोबाईलवरील वाढता संवाद, याचे रुपांतर कधी दोघांचे प्रेमात झाले, हे तिला कळलेच नाही. या आंधळ्या प्रेमात त्या मुलीने आपले सर्वस्व कधी त्या मुलाला अर्पण केले हेदेखील तिला कळले नाही. आईबाबांना शंका आली. आता आपले पितळ कधीही उघडे पडेल याच चिंतेत ती मुलगी दिवसरात्र होरपळून निघत होती.
अशातच तिला दिवस गेल्याचे समजले. तिने ही गोष्ट मुलाला सांगून म्हणाली, “आपण लवकर लग्न करूया. मी तुझ्या बाळाची आई बनणार आहे. मला दिवस गेले असल्याने आता तू लवकर काहीतरी निर्णय घे.” असा आग्रह तिने मुलांकडे धरला. मुलाने विविध कारणे सांगून मुलीला टाळण्याचा प्रयत्न सुरू केला. शेवटी मुलीचा रुद्रावतार बघून मुलाने लग्नास होकार दिला, पण एकीकडे त्याचे मुखवट्यावरील कुटील हास्य त्याला लपविता आले नाही. त्याला पूर्ण कल्पना होती, की तो परधर्मीय असलेने मुलीचे आई वडीलच या लग्नाला मान्यता देणारच नाहीत व सुंठेवाचून खोकला जाईल.
पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आज आई बांबाचा मूड चांगला आहे, हे बघून मुलीने आईला बिलगून लाडीकपणे आपला लग्नाचा निर्णय सांगितला तसे आईच्या हातातील ताट खाली पडले. आवाज ऐकून मुलीचे वडील धावतच स्वयंपाकघरात शिरलेत. “काय झालं गं ? ताट कसे पडले ?” असे विचारताच त्यांचे लक्ष बायकोच्या चेहऱ्यावर गेले. बायकोचा पडलेला चेहरा बघून त्यांनी मुलीला विचारले, “काय झाले आईला? ” मुलीला काय उत्तर दयावे हे कळलेच नाही. आईची अवस्था बघून मुलीने आईला पाणी पाजले. तशी तिची आई तर रडायलाच लागली. हुंदके देत पुटपुटली, “मुलं शेवटच्या क्षणाला आई वडीलांना पाणी पाजतात, पण तू तर जिवंतपणीच आम्हाला मारलंस. काय करून बसली पोरी तू हे !”
काहीतरी भयंकर घडले असावे, तेव्हा तर आपली बायको अशी भाषा वापरत आहे, याची कल्पना मुलीच्या वडीलांना लगेच आली. त्यांनी मुलीला दरडावूनच विचारले, “काय झालं खरे सांग?” मुलगी काही बोलण्या आधीच आई म्हणाली, “अहो, ही लग्न करणार म्हणते. हिने मुलगा पण बघितला आहे. मुलगा परधर्मीय आहे. हिला त्याचेपासून दिवस पण गेल्याचे म्हणते.” ही वाक्ये ती एकाच सुरात बडबडली. हे ऐकताच मुलीचे वडील जमिनीवर धाडकन कोसळले. आई धावली. तिने आपल्या नवऱ्याला सांभाळून धीर दिला. मुलगी एका भिंतीचा आधार धेवून नि:स्तब्धपणे खाली मान घालून ऊभी होती.
मुलीच्या वडीलांनी स्वतःला सावरलं. मुलीकडे एक कटाक्ष टाकून म्हटले. “पोरी आम्ही खूप स्वप्न बघितली होती गं !” तू आमच्या स्वप्नांचा पार चुराडा केलास. तू आमची चिमणी होतीस, पण आता तुला पंख फुटलेले दिसतात. तू स्वबळावर कधीही उडून जावू शकतेस, हे आम्ही तुझ्या प्रेमापोटी विसरलोच होतो. धन्यवाद ! बेटा वेळीच तू आठवण करून दिली आम्हाला.” असे म्हणून घरातून निघून गेले. आईने मुलीला समजावण्याचा खूप निष्फळ प्रयत्न केला, परंतु हाती काही आले नाही. मुलीसमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ती आपल्या निर्णयावर ठाम होती.
मुलीने लगेच घर सोडले. मुलाला भेटली. आई वडीलांचा विरोध असला, तरी मी तुझ्यासोबतच लग्न करणार हा निर्णय मुलाला ऐकविला. मुलाची योजना फार विस्कटून गेली. लग्न नाही केले, तर ही पोलीसात जाईल या भितीने मुलाने तिला सांगितले, “उद्या सर्व कागदपत्रे, फोटो घेवून आपण कोर्ट मॅरेज करू !” मुलीचा घरचा रस्ता बंद झाला होता. तिने ती रात्र मैत्रिणीकडे काढली.
दुसरे दिवशी दोघांनीही कोर्टात जावून लग्न केले. काही दिवस मित्राकडे तर काही दिवस लाॅजमध्ये काढून भाड्याने घर घेतले. संसार सुरू केला. मुलगा दिवसा घरी असतो. रात्री ड्युटी आहे सांगून रोजच घरून निघून जातो, म्हणून त्या मुलीला शंका आली. तिने शोध धेतला असता तिला धक्काच बसला. मुलगा अगोदरच स्वधर्मीय मुली सोबत विवाहीत होता. त्याने आपल्याला फसवले हे पूर्णपणे मुलीच्या लक्षात आले होते. तिने मुलाला जाब विचारल्यावर म्हणाला, “आई बाबा, तुला कबूल करणार नाहीत. तु मला आवडतेस. तुला काही कमी पडू देणार नाही. तुला पण सांभाळेल व तिचाही सांभाळ करेल. अशी भूलथापा देवून तिची समजूत घातली. आता काय करावे, तिला समजेना. पोटात मूल वाढतंय. आपल्या बाळाकरता ती त्याच्या म्हणण्याला तयार झाली.
योग्य वेळी तिला एक गोंडस मुलगा झाला. काही दिवस आनंदात गेले, मग मुलाच्या नावावरून पुन्हा वाद सुरू झाला. आता याचेसोबत आपण लग्नच केलंय तर फक्त नावासाठी कशाला वाद करायचा म्हणून मुलीने पुन्हा समझौता केला.
हळूहळू मुलाचे येणे कमी झाले. पैसेसुध्दा देणे कमी होत गेले. मुलाचे हे वागणे बघून मुलीने मुलाला जाब विचारला, पण फारसा काही बदल झाला नाही.
एके दिवशी अचानक आपल्या बाळाला सोबत घेवून ती त्या मुलाच्या घरी धडकली. मुलाच्या पहिल्या बायकोने तिला विरोध करून तिलाच खरी खोटी सुनावली. सासू-सासऱ्यांनीसुध्दा हकलून लावले. तिने आपल्या घरी जावून तमाशा केला म्हणून मुलाने तिलाच मारहाण केली.
सर्व असह्य झाल्याने शेवटी त्या मुलीने पोलीसांकडे तक्रार केली. बदनामी होऊ नये, म्हणून मुलाने त्या मुलीला बायको म्हणून सन्मान देतो अशी कबुली दिली व तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. त्या मुलीने तक्रार मागे घेतली, पण त्या मुलाचे आईवडील मुलीला घरात घेण्यास तयारच नव्हते. तिकडे पहिल्या बायकोच्या आई- वडिलांनीसुध्दा मुलाला तू आमच्या मुलीला फसवले. परधर्मीय मुलीसोबत दुसरे लग्न का केलेस ? अशी विचारणा केली. “औलाद के लिए करना पडा। एक बार औलाद का कब्जा मिला तो ऊसे छोड दुंगा।” असे म्हणून समजूत घातली.
पुनः काही दिवस आनंदात गेलेत. आता मुलाने चक्क बाळाची मागणी केली. याला मुलबाळ नाहीत, म्हणून याने फक्त माझा वापर केला, हे तिला समजून चुकले. तिने कुटुंब न्यायालयात तक्रार दाखल केली व सरळ आपल्या वडीलांचे घरी बाळासह परत आली. सुरुवातीला तिच्या वडीलांनी विरोध केला, पण बायकोची प्रकृती बघून ते नरमले. आकाशाकडे बघून म्हणाले, “जरा सी आहट पर जाग जाता है। वो रातो को वो बाप ही है। ए खुदा गरीब को बेटी दे तो साहस भी दे, ये जमाना बहुत ही जालीम है।” आणि मुलीला कवटाळून रडू लागला.
आजही ती मुलगी स्वतःचे पायावर उभी राहून स्वकष्टाने आपल्या मुलाचे पालन पोषन करून न्यायासाठी लढा देतच आहे. तिचा ‘प्रेम’ या शब्दावरुन विश्वास उडाला असून लढा देताना ती मुलींना अशा प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आवाहन करतांना म्हणत असते, की ‘आई वडीलांच्या कृपेने आपणाला सर्व मिळते, पण आपण आपल्या कर्माने ते सर्व गमावून बसतो. आंधळ्या प्रेमात मी जी चूक केली, ती तुम्ही करू नका.’ असा सल्ला नवतरुणींना देते. ‘झाडासारखे जगा खूप मोठे व्हा, पण या मातीला व आई वडीलांना कधीही विसरू नका असा सल्लावजा आवाहनही ती करते.
अशा केलेल्या चुकांना कुणी ‘लव्ह जिहाद’, कुणी ‘प्रेमभंग’ तर कुणी ‘व्यभिचार’ असे विविध रंग देतात, पण त्या पीडित मुलींचे हास्य हिरवणाऱ्या या नराधामांना कोण वठणीवर आणणार हा प्रश्न अद्याप ही निरूत्तरीत आहे.
श्री अरविंद सराफ
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.






