उन्हाळ्याचे दिवस म्हणजे मुलांचा वार्षिक परीक्षेचा काळ. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी घड्याळाचा अलार्म लावून लवकर उठणे. आर्या ,काव्या नी पण चार चा अलार्म लावला . त्यांची आतेबहीण त्यांच्यासोबत शिकायला होती .
तिघीही सकाळी लवकर उठणार होत्या.
उन्हाळा असल्याने आई -बाबा,काका-काकू अंगणात झोपले होते . नेहमी सकाळी सहा वाजल्यापासून एक एक जण झोपेतून जागे होतात, आज आठ वाजले तरी सगळे झोपलेले.
आतेबहीण खडबडून जागी झाली, घड्याळात पाहिले
“बापरे ! इतका उशीर? असे कसे झाले? इतक्या उशिरा पर्यंत सगळेच कसे काय झोपले”.
मनाशीच बडबडत होती परीक्षेला उशीर होईल म्हणून आर्या काव्याला हलवून आंघोळीला पळाली. खोल्यांमध्ये आजूबाजूला काय घडले? याकडे तिचे लक्षच नव्हते.
पण सगळे झोपलेले असताना परस आंगण कडचे मागचे दार उघडेच कसे? पण ……
तिच्याकडे एवढा वेळ नव्हता पटकन परीक्षेसाठी निघायचे होते . तो पर्यंत सगळेच उठले आणि आपापले आवरायला लागले. एडवोकेट विनायकराव देशमुख यांचे घर मोठे कुटुंब . घर एकदम जुन्या बांधकामाचे. सहा खोल्यांचे घर. दोन्ही बाजूला तीन-तीन खोल्या. चारही बाजूला भरपूर मोकळी जागा अंगण, घराच्या एका बाजूच्या जागेत गाईचा गोठा,.
मुला-मुलींचे शिक्षण लग्न यामुळे त्यांनी नवीन वास्तू बांधण्याचा विचारच केला नव्हता. बांधकाम जुने असल्याने थोडे मोडकळीस आलेले घर.
विनायकरावांची पत्नी, सुनीती पण उशीर झाल्याने घाईघाईत मागच्या खोलीत गेली आणि किंचाळली…. घरावर दरोडा पडला होता.
त्या काळात त्या छोट्या तालुका गावात बहुतेक वकिलांच्या घरात चोरीचे सत्र सुरू झाले होते.
सुनितीबाई म्हणायच्या सुद्धा ,
“आपण उन्हाळ्यात सगळे आंगणात झोपतो, घरात काही झाले तरी कळायचे नाही”
विनायकराव थट्टेने हसून म्हणायचे
,” घर बघ आपलं? दारे उघडे ठेवले तरी कोणी चोर घुसणार नाही”.
देशमुखांच्या वाड वडिलांकडे वतनदारी होती. जुन्या काळातील चांदीची काही भांडी सोडली तर त्यांच्याकडे विशेष अशी संपत्ती नव्हती. वतनदारीच्या काळातील आठवण म्हणून त्यांनी एक जुनी भरभक्कम वजनदार तिजोरी घरी ठेवली होती, तीही नावापुरती होती.
देशमुखांच्या छोट्या घरात बाहेरून येणाऱ्यांच्या ती तिजोरी सहज हृष्टीस पडायची.
दरोडेखोरांनी देशमुखांकडे घराच्या मागच्या खिडकीचे गज वाकवलेले होते, दाराच्या कडी कोंड्याच्या बाजूने भिंतीला भगदाड पडले होते.
घरातले लहान-थोर सगळेच घाबरले. आपल्याही घरी चोरी होऊ शकते याची जरासुद्धा कल्पना कोणाच्या डोक्यात आली नव्हती. काही नव्हते तर चोरी करायला, कशाची करणार होते.
पण एका दृष्टीने मुली अभ्यासासाठी उठल्या नाहीत , ह्यामुळे देशमुख पती-पत्नींना हायसे वाटले, घरात तिघीच मुली , काही विपरीत च्या कल्पनेने सुनितीबाईंचा थरकाप झाला. त्यात दुसर्याची पोर शिकायला आलेली.
पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली गेली त्यावेळेसचे पीएसआय गोटे साहेब तपासणीसाठी आले.
चोरांनी घरची जुनी मोठी ट्रंक जवळच्याच बगिच्यात नेऊन त्यातलं सामान अस्ताव्यस्त फेकले होते.
गोटे साहेबांनी आधी घराची पाहणी केली . वाकलेले गज, भिंतीच भलंमोठं छिद्र, पाहणी , फोटो काढले गेले.
दारावर , कपाटाच्या आरशांवर पडलेल्या ठशांचे फोटो नमुने घेतले,
पोलिसांची कारवाई सुरू होती .
घरचे , बाहेरचे, नोकर, सगळ्यांचे हाताचे ठसे घेतले. सुनितीबाईंनी घरचे जे काही सोन्या-चांदीचे जिन्नस, रोख रक्कम तपासले .काय चोरीला गेले ? ते हवालदार शिंदेनी नोंद करून घेतली.
चोरीला खूप काही गेले नसले तरी सगळे सुखरूप आहे यातच देशमुख पती-पत्नीला समाधान होते.
परंतु लागोपाठ होणाऱ्या चोरी दरोड्याचा छडा लावणे गोटे साहेबांना महत्त्वाचे झाले होते . वरून आलेला दबाव, नागरिकांमध्ये नाराजी भीती यामुळे त्यांची झोप उडाली होती. अजून कुठले धागे-दोरे त्यांच्या हातात येत नव्हते. वरचेवर चोरीचे प्रमाण वाढले होते.
” हा कोण “?
“भिकाजी “
देशमुखांच्या घरचे छोटे-मोठे काम करतो. रिक्षा पण चालवतो
भिकाजीची केस एडवोकेट देशमुख कडे होती. त्याने खून केला नव्हता पण अडकला मात्र होता . देशमुखांनीच त्याला त्यातुन सोडवलं होते. तेव्हापासून भिकाजी देशमुखांच्या पायाशी येऊन पडला .
‘मला तुमच्याकडे ठेवून घ्या’ म्हणून विनवणी केली. देशमुखांना नोकर ठेवायची काही गरज नव्हती पण त्याचे वर्तन सुधारेल , वळण लागेल म्हणून त्याला रिक्षा घेऊन दिली होती . तेव्हापासून तिकडेच काम करायचा.त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड ऐकुन गोटे साहेबांची त्याच्याकडे नजर वळली. त्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेले. पण देशमुख कुटुंब तळमळीने भिकाजी असे करणार नाही सांगत होते .पण पोलिसच ते कोणावरही संशय घेऊ शकतात .ही सगळी चौकशी सुरू असताना एक तरुण बराच वेळचा लांबून बघत होता, ऐकत होता . गोटे साहेबांच्या बेरक्या नजरेतून त्याची हालचाल टिपल्या गेली . तो भिकाजी चा मुलगा होता .एडवोकेट देशमुखांकडे मागच्या आठ-दहा दिवसात येणारी इतर लोक, पक्षकार कोण कोण येऊन गेले? याची चौकशी त्यांनी केली .देशमुखांचा मुनीम राजाराम दोन दिवसापासून सुट्टीवर होता . ही विशेष माहिती पोलिसांना मिळाली .तो शेतीच्या कामासाठी गावाकडे गेला होता.” कोणी पाहुणे येऊन गेले होते का इतक्यात ?गोटे साहेबांनी करड्या आवाजात विचारले.सुनितीबाई डोक्याला ताण देत..” अरे हो! आठ दिवसापूर्वी यांच्या चुलत आत्याचा मुलगा लग्न पत्रिका देण्यासाठी येऊन गेला, एक दिवस मुक्काम होता त्याचा.विनायकरावांनी थोड्या रागातच सुनितीबाई कडे पाहिले.देशमुखांकडे मित्र , शेजारी येऊन चोरी कशी झाली? ते बघून जात होते .त्यात कानडे वकील मित्र :” काय देशमुख ! इतके कसे गाढ झोपले तुम्ही ? चोर घरात शिरले तरी आवाज नाही आला तुम्हाला ?”चोरीचा तपास सुरू असताना दरोडेखोरांचे चोरी सत्र सुरूच होते.घटनेच्या दोन दिवसानंतर कानडे वकिलांच्या जानव्याची किल्ली काढून घरात चोरी केली होती. तेव्हा कानडे फार खजील झाले होते .देशमुखांच्या चोरी प्रकरणात सगळयांना कुठलेतरी गुंगीचे औषध हुंगवले होते, म्हणून सगळे उशिरापर्यंत झोपलेले राहिले.गोटे यांनी निदर्शनास आणून दिले.अंगणात झोपलेल्या इतरांच्या पलंगाजवळ मोठमोठे दगड ठेवलेले होते जाग आली असती तर, हेच दगड आपल्या डोक्यात बसले असते या विचाराने देशमुख पती पत्नी हादरले .भिकाजी, त्याचा मुलगा चंदु , मुनीम राजाराम यांना गोटे साहेबांनी चांगलाच पोलिसी हिसका दाखवला होता. तरी हवी तशी माहिती त्यांना मिळत नव्हती.देशमुखच्या ‘ त्या ‘ नातेवाईकांची चौकशी अजुन बाकी होती.गोटे साहेबांना साखळी दरोडाचा छडा लावणे खूप महत्त्वाचे होते नाहीतर त्यांना बदलीची ‘प्रेमळ ‘नोटीस मिळाली होती .सगळी फाईल, सगळ्यांच्या जबान्या त्यांनी वारंवार वाचून काढल्या .चार-पाच वकिलांच्या घरावर दरोडा पडल्याने त्यांनी तिथल्या कोर्टात जाऊन काही धागेदोरे लागतात का? तपासायचे ठरवले.न्यायाच्या पायरीवर असं काही सापडणार नाही, त्यांना वाटत होतं,पण‘माणसांवर येणारी वेळ आणि परिस्थिती त्याला कुठल्याही थराला नेऊ शकते ‘हे त्यांना पोलीस खात्याच्या अनुभवावरून माहित होते.मधल्या काळात तपासणीदरम्यान गोटे साहेबांनी आपला खबऱ्या, भिकाजी चा मुलगा चंदु च्या मागे लावला होता. चौकशीदरम्यान साहेबांना चंदुच्या जबानीत थोडी गडबड वाटली. पण त्याला संशय न येऊ देता त्याच्या मागे माणसे लावली . आणि गोटे साहेबांची शंका हळूहळू आकारत गेली .आपल्या बापाला मिळालेल्या देशमुखांच्या पाठिंब्याचा त्याने फायदा उचलला होता आणि जबानीत थांगपत्ता लागु दिला नाही त्याने .चंदु वर पाळत ठेवून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवली. भिकाजी जरी आधी गुन्हेगारीतुन निघून देशमुख यांच्या कृपेने चांगल्या वळणाला लागला असला तरीबापाच्या नकळत तो वाईट वळणाला लागला होता, त्यात दारूचे व्यसन. रोजंदारीवरचे काम.ज्या दिवशी हाती पैसे त्याच दिवशी मटक्यात उडवून टाकू लागला. पैसे कमी पडू लागले. इकडून तिकडून उधारी घेऊन झाले , व्याजावर पैसे घेणे झाले. हे इतकं वाढलं की उधारी देणे होईना. पैसे देणाऱ्यांनी मारण्याची धमकी दिली.चंदु बरेचदा देशमुखांकडे यायचा. त्यांच्याकडे येणारी इतर वकिल लोक पण त्यांनी माहिती करून घेतले होते आणि मित्रांना हाताशी धरून त्याने त्यांच्या घरावर पाळत ठेवली. चोरीच्या मालात वाटणी मिळणार म्हणून त्याचे साथीदारही या दरोड्यात सामील झाले होते.गोटे साहेबांनी चंदू आणि त्याच्या साथीदारांची वेगवेगळी चौकशी केली.त्यांनी एक शक्कल लढवली.चंदुच्या साथीदाराला म्हणाले,” चंदू ने सगळं खरं खरं सांगितलं, तो म्हणतो मास्टर माईंड तूच आहे”.त्याचा साथीदार भडकला, तो चंदुबद्दल सगळी गरळ ओकून मोकळा झाला.साहेबांचे काम फत्ते झालं .चोरलेला सगळा ऐवज विकायच्या आत चंदुला साथीदारासोबत अटक झाली. चंदुची चोरीची केस कोर्टात हजर करण्यास तयार झाली.गोटे साहेब हुश्श करून खुर्चीत बसले.आता त्यांना बदलीच्या नोटिशीची चिंता नव्हती.
मोहिनी राजे पाटनुरकर