नेमकी चुक कुणाची? marathi satya katha
नेमकी चुक कुणाची? marathi satya katha

नेमकी चुक कुणाची? marathi satya katha

नेमकी चुक कुणाची? marathi satya katha

श्री अरविंद सराफ.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.

रात्रीचे ११.०० वाजले असतील. एका खेडे गावात राहणारे दिपक ( काल्पनिक नाव ) आपले नित्यकर्म आटोपून थकून भागून घरी आलेत. नित्यनेमाने ते घरी आल्यावर आपल्या वृध्द आई-वडीलांची विचारपूस करत असत. त्या दिवशीही त्यांनी आपल्या सौ.ला हाक मारली, “अगं, आई बाबाचं जेवण झालं का?मुलं जेवलीत का?” तसा स्वयंपाक घरातून आवाज आला, “हो हो !” पण तो आवाज नेहमीसारखा नव्हता. त्या आवाजात त्यांना कंप व काळजी जाणवली. तसे ते धावत स्वयंपाक घरात गेले.. बघतात तर काय ! त्यांच्या सौ.चे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ते लगबगीनं आपल्या सौ. ज्योतीजवळ ( काल्पनिक नाव ) गेलेत. त्यांनी घाईघाईने सौ.ला विचारलं, “काय झालं ? तब्येत बरी नाही का ? आराम करायचास ना !कामं काय रोजचीच आहेत. चल पड थोडी. तू जेवलीस का?. जेवून घ्यायचं ना ! बरं मी डाॅक्टरांना घेवून येतो.
आपल्या नवऱ्याची वाढती चिंता बघून त्या माऊलीच्या डोळ्यातून भळाभळा आसवं वाहू लागलीत. त्या हुंदके देऊ लागल्या. आता मात्र दिपकचा धीर खचला. त्यांनी आपल्या सौ.ला रडक्या आवाजात विचारलं, “काय झालं गं ? मी तुला यापूर्वी इतकं गर्भगळीत झालेलं कधीच बघितलं नव्हतं.” त्यावर सौ. ज्योतीने आपला संपूर्ण भार दिपकच्या खांद्यावर टाकून लहान बाळाप्रमाणे रडू लागल्या. आता तर ते पण रडायला लागले. त्याचं रडणं बघून तिने स्वतःला सावरलं.
दबक्या आवाजात म्हणाली, “अजून आपली छकुली रेखा ( काल्पनिक नाव ) घरी आलेली नाही. सगळीकडे बघितलं, विचारलं. तिच्या मैत्रिणीकडेपण नाही. कुठे असेल हो आपली छकुली ? यापूर्वी कधीच अशी न सांगता गेली नाही. काय झालं असेल हो. आपण पोलीसात जायचं का?” ते झटकन म्हणाले, “नाही ! इतक्यात नाही. प्रथम आपण सगळीकडे शोधू या. आपली इज्जत चव्हाट्यावर नाही आणायची. आपली तर बेइज्जत होईलच, त्याबरोबर पोरीची पण बदनामी होईल.” तत्क्षणीच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पोरीनं काही बरं वाईट तर केलं तर नसावं !
दीपक त्यांची सौ लगेच घरून निघाले. आई बाबांनी काळजीपोटी लगेच विचारलं, “इतक्या घाईत दोघंही कुठं निघाले आहात ?” काहीतरी कारणं सांगून त्यांनी सायकल बाहेर काढली. सायकलवर टांग टाकून सौ.ला लवकर बस म्हटलं. तशी ती त्यांचा आधार घेवून ऊडी मारून सायकलच्या मागील सीटवर बसली. ते दोघेही त्यांच्या छकुलीच्या शोधात निघाले. चप्पा चप्पा शोधून काढला. बगीचा असो की मंदिर, बसस्थानक असो की रेल्वे स्थानक, मित्रमंडळी असो की नातेवाईक. काही एक सोडलं नाही. आता मात्र ते पार भांबावून गेले होते, पण क्षणातच त्यांनी स्वतःला सावरलं. दवाखान्यातसुध्दा जावून बघितलं. काळजावर दगड ठेवून शवागृहसुध्दा बघितलीत, पण हाती निराशाच. शेवटी गावातील तळेसुध्दा सोडले नाही. पण कुठे कुठे छकुली सापडली नाही. मन खिन्न झालं. अश्रूसुध्दा सुकले होते.
काही क्षण एका मंदिराच्या ओट्यावर ते दोघेही बसलेत. सौ.चं रडणं सुरूच होतं. त्यांनी सौ.ला काहीसा धीर देत मंदिरातील मूर्तीकडे बघत म्हटलं, “आपण कुणाचं काही वाईट केले नाही, तर आपलं काही वाईट होणार नाही. धीर धर !” असं म्हणून काहिशा आशेने मूर्तीकडे पुन्हा बघितलं. ती रात्र कशीबशी घालवली.
दुसऱ्या दिवशी तडक दिपक सौ.सह पोलीस स्टेशनला पोहचले. तिथे एक पोलीस दादा होते. पोलीसांनी विचारलं, “काय झालं?” त्यांनी त्या पोलीस दादाला सर्व आपबिती कथन केली. तोच त्यांना अपेक्षेनुसार बोचरे प्रश्न ऐकावयास मिळालेत. त्यांनी सौ.कडे बघितलं. तिने हात दाबून शांत राहण्याचा इशारा दिला. त्या पोलीस दादाने स्वतःची लेकरं सांभाळता येत नाही काय? पोलीसांना त्रास द्यायला येतात. असं म्हटले व त्यांचा धीरच सुटला. ते चढ्या आवाजात बोलणारच. तेवढ्यात मोठे साहेब आले. त्यांनीही दिपक व ज्योतीकडे चौकशी केली. त्यांनी मोठ्या साहेबांना पूर्ण हकीकत सांगितली व पोलीस दादांचे वागणंपण सांगितले. तसे साहेबांनी त्या पोलीस दादाला म्हटलं, “आपण पण लेकुरवाळे आहोत ना !” व त्यांच्या केबीनमध्ये घेवून गेले. आस्थेने विचारपूस केली. त्यांचे सर्व ऐकले. व विचारलं, “तुमची छकुली मोबाईल वापरत होती का?घरुन तिने काही पैसे दागिने वगैरे काही नेले का?तसे त्यांनी लगेच ‘नाही नाही’ असं उत्तर दिले. फक्त तिचा मोबाईल घरी दिसत नाही. साहेबांनी तिचा मोबाईल नंबर विचारला. लिहून घेतला. कुणासोबत तरी फोनवर बोलले. दिलेला नंबर कुणाला तरी वाचून दाखविला. पुन्हा साहेबांनी विचारपूस केली. त्यांच्या सौ.सोबत बोलून छकुलीचा फोटो, तिचा पेहराव, मैत्रिणी अशी सर्व माहिती विचारून धीर दिला. ते दोघेही आपलं थकलं शरीर व उदास, दुःखी मन घेवून घरी परतले.
त्यांचे कशातच मन लागतं नव्हते. कसेबसे चार दोन घास गिळले. सौ. देवापुढ्यात जावून बसली. आई बाबांनी धीर दिल्याने थोडं मन हलकं झालं. जसजसा सूर्य डोक्यावर आला, तशी चिंता अधिकच वाढली, तेवढ्यात त्यांचा मोबाईल खणखणला. साहेबांनी त्यांना लवकर ठाण्याला बोलाविले होते. काही अघटीत तर झालं नसेल ना, या काळजीने ते पार गांगरून गेले होते.
सौ. व ते लगबगीनं ठाण्यात पोहचलेत. तसे साहेबांनी विचारलं. अहमदनगरला तुमचे कुणी राहतं का?. त्यांनी नकार दिला. तसे साहेबांनी निरखून बघितलं व म्हटले, “नीट आठवा. कुणी नातेवाईक. कुणी मैत्रिण. बघा आठवा. त्यांनी पुन्हा नकार दिला. नाही साहेब कुणीच नाही आमचे नगरला. “मग एक कागद माझ्यासमोर ठेवला. साहेबांनी म्हटलं. हा तुमच्या मुलीचाच फोन नंबर आहे ना ? बघा. हा नंबर नगरला दाखवितो आहे. मोबाईल मात्र तिचा नाही. दुसराच मोबाईल आहे. सीमकार्ड मात्र तिचेच आहे.” त्यांचेकडे पाहून साहेबांनी विचारलं, “तिचा मोबाईल चोरीला गेला होता का?” त्यांनी म्हटलं, नाही नाही. परवापर्यंत तिच्याकडेच होता.” साहेबांनी पुन्हा विचारलं, “तिचा कुणी मित्र?” माहिती नाही साहेब.” तितक्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला. तिकडून त्यांच्या छकुलीचा आवाज होता. तसे ते सर्व विसरून, “कुठे आहेस बेटा? आई किती रडते आहे.” असे कितीतरी प्रश्नांचा भडीमार त्यांनी तिच्यावर केला, पण ती काहीच बोलत नव्हती. नंतर पुन्हा छकुलीचा आवाज आला, “बाबा मी नगरला आहे, माझ्या मित्रासोबत लग्न केलंय. पण पैसे नाही. मला माझा संसार थाटायचा आहे. हा माझा मित्र काय म्हणतो बघा. हॅलो काका ! सागर बोलतो. माझी रेखासोबत फेसबुकवरून मैत्री झाली. आम्ही कालच लग्न केलं. आता आम्हाला संसार सुरू करायचा आहे. माझेकडे पैसे नाहीत. दोन लाख रुपये पाठवून द्या. नाहीतर…..” तसा रेखाने फोन घेतला, “बाबा माझे सागरवर खूप प्रेम आहे. तुम्ही पैसे पाठवा. हा म्हणतो तसं करा.” हे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू घसरावी तसंच काहीसं झालं.
त्यांनी स्वतःला सावरलं. मनातल्या मनात एक निर्णय घेवून लगेच पैसे द्यायला होकार दिला. सागरने पत्ता पाठविला. मी लगेच करतो व्यवस्था. सागरने ‘ओके’ म्हणताच त्यांनी फोन बंद केला. आईबद्दल ऐवढे सांगूनही आईची पोरीने साधी विचारपूसही केली नाही. हे त्यांच्या फारच जिव्हारी लागले.
साहेबांनी त्यांना विचारलं. आता काय विचार आहे. त्यांनी वेळ न घालवता स्वतःच्या पोटच्या पोरीच्या व त्या पोराच्या विरोधात खंडणी मागणीची तक्रार केली. साहेबांनी लगेच सायबर विभागाची मदत घेवून नाव, पत्ता शोधून काढला. दुसरे दिवशी पोलीसांसह ते नगरला पोहचले. ठरल्याप्रमाणे तो मुलगा पैसे घ्यायला आला. सोबत त्यांची मुलगी पण होती. पोलीसांनी त्या दोघांच्याही मुसक्या बांधल्या. चौकशीअंती त्या मुलाचे खरे रुप समोर आले. फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून गोडी गुलाबीने जाळ्यात ओढायचे. लग्नाचा बहाणा करुन शारीरिक संबध करायचे, नंतर बदनामीचा धाक दाखवून मुलींच्या नातेवाईकांना पैसे मागून ऐश करायची. त्या मुलाचं अगोदरच लग्नसुध्दा झालेलं होतं. मुलीला आपली चूक कळाली होती. बाबा कष्ट करून शिकवितात. कसलीच कमी पडू देत नाहीत आणि आपण क्षणिक सुखासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केले हे तिला कळले, पण खूप उशीर झाला होता. आई-वडील दोघेही शून्यात बघून नेमकं कुणाचे चुकले ? हा प्रश्न नियतीला विचारुन धाय मोकलून रडत होते. मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं.
साहेबांनी तिला ‘स्वतःचे पायांवर उभी राहा व आयुष्य नेटाने जग. पुन्हा अशी चूक करू नकोस,’ असा वडीलकीचा सल्ला दिला. साहेबांनी त्यांना ही धीर देवून म्हटले, “दिपकराव ! तुम्ही खरंच शूर आहात. प्रसंगी मुलीलाही पाठीशी घातले नाही. तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली.
अशा कितीतरी पीडित मुली आहेत, ज्यांना मदतीची खरंच गरज आहे. काही स्त्रीलंपटानी त्यांचा उपभोग घेवून त्या मुलीना भिकेला लावलेत. त्या मुली कुटुंबापासूनही दूर झाल्या आहेत. तारुण्यातील चुकांमुळे कितीतरी मुली आज न्यायाकरिता लढा देत आहेत. मदतीची याचना करीत आहेत. माणुसकीच्या दृष्टीने आपले सर्वांचे कर्तव्य आहे, की आपण त्यांना सहकार्य करायला हवे, कारण ‘टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.’ सर्व पीडित स्त्रियांनी न घाबरता, न लाजता, कोण काय म्हणेल? याची पर्वा न करता, एकमेकांशी संवाद साधून आपले दुःख दूर करण्यास पुढे या. संविधान व न्यायप्रणालीवर विश्वास ठेवा. नक्कीच न्याय मिळेल असा दृढविश्वास ठेवा.
सरतेशेवटी चूक नक्की कुणाची हा प्रश्न निरुत्तरच राहतो.

श्री अरविंद सराफ.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!