२-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका
(आत्मचरीत्र लिहिण्यासाठी शरदरावांनी आठवणी आठवायला सुरुवात केली आणि त्या पावसासारख्या सरसर यायला लागल्या.
शरदरावांच्या आयुष्यात काय काय घडले…..वाचत राहा…आत्मचरित्र-न लिहिलेले)
त्या शेणाचा सुगध दरवळतोय आजही शरदच्या मनात.
आताचे फिनाईल आणि तेव्हाचे शेणाचे सडा,सारवण यांची तुलना होऊ शकेल?
तो सडा,सारवणाचा सुगंध शांतनू अनुभवू शकेल?
पडवीत कुडाच्या भिंतीवर बाबांचा फोटो लावला होता.
प्रत्येक दिवाळीत भिंत सारवून झाली कि आई फोटो तिच्या पदराने पुसून पुन्हा लावायची.फोटोवरचा हार बदलायची.
फोटो पुसतांना तिच्या डोळ्यातले पाणी फोटोवर ओघळायचे.
बाबा गेले तेव्हा मी पाच वर्षाचा आणि सरु-माझी बहिण दोन वर्षाची होती. मला बाबा पुसटसे आठवतात.दर मंगळवारी बाजूच्या गावी भरणाऱ्या बाजारातून आठवडाभराचे सामान आणि आमच्यासाठी खाऊ घेऊन यायचे.माझा आणि सरुचा खूप लाड करायचे.
चार एकर शेत होते.दरवर्षी पाऊस दडी मारुन बसायचा किंवा अवकाळी कोसळायचा.कसेतरी काही महिने पुरेल एवढे उत्पन्न व्हायचे.
शेतात काम करतांना बाबांना साप चावला.काही कळायच्या आतच बाबा गेले.
आमचे बाबा गेले.आजीचा मुलगा आणि आईचे सर्वस्व गेले.
नंतर आई सावरली केवळ मुलांसाठी.
बाबा जाऊन दोन वर्ष झाले.सात वर्षाचा झाल्यावर मला शाळेत टाकायचा आईने विचार केला.
बाजूच्या गावात मॕट्रीकपर्यत शाळा होती.
मी तिथेच जायला लागलो.शाळा नदीच्या काठी होती.
शाळेसमोरच वडाचे मोठे झाड,त्या झाडाच्या आजूबाजूने बांधलेला पार होता.
शाळेच्या मधल्या सुट्टीत वडाच्या पारंब्यांना लोंबकळणारी शाळेतली मुले.चवथीपर्यतची शाळा म्हणजे एक मोठी खोली आणि चार कोपऱ्यात चार वर्ग,चार फळे,गुरुजींना बसायला चार खुर्च्या असायच्या.
दुसऱ्या वर्गात काय सुरु आहे हे आपसुक दिसायचे,ऐकू यायचे.
शाळेला सुट्टी झाल्यावर मुले थोडावेळ पारावर खेळायची.
विटीदांडू,लगोऱ्या…..
घरी जायची घाई नाही अन् मुले कुठे आहेत याची घरच्यांना भीती नाही.
लगोऱ्या खेळायला कापडाचा बनवलेला चेंडू होता.क्रिकेट आजच्यासारखे लोकप्रिय नव्हते.फुटबाॕल तर माहितीही नव्हता.
सगळे कसे चित्रपटापेक्षाही झरझर सरकत आहे नजरेसमोरुन.
आताच्या computer, projector ने सुसज्ज असलेल्या शाळेसोबत त्या शाळेची तुलना नाही होऊ शकणार.
जगण्याचे,माणूसकीचे शिक्षण मिळायचे त्या शाळेत.
Technology चा गंधही नव्हता शाळेला म्हणून यांत्रिकपणाही नव्हता.आतासारख्या जीवघेण्या स्पर्धाही नव्हत्या.आणि शाळा खाजगी झाल्या नव्हत्या म्हणून व्यावसायिकपणाही नव्हता.सगळीकडे फक्त आपूलकीची भावना होती.शाळेत नदी ओलांडून जावे लागायचे.
आई पण शरद सोबतच निघायची नदीवर घरचे कपडे धुवायला. माझ्या जवळ झोळीसदृश दफ्तर होते.खूप वर्ष मी ते वापरले. आई नदीवर थांबायची.मी पुढे नदीच्या काठाने शाळेत जायचो,
सुट्टीच्या दिवशी मी आईला कपडे धुण्यासाठी मदत करायचो.ती नदीवर कपडे धुण्याची मजा आजही आठवते.
तो कपडा नदीत लांब सोडला कि हवेमूळे फुगायचा,मग तिथेच बाजूला असलेल्या झाडावर,रेतीवर कपडे सुकवायचे.तोपर्यंत स्त्रियांच्या गप्पा चालायच्या.
कुणाच्या दारात पाळणा हलणार?कुणाची सोयरिक झाली,कोण आजारी आहे?
एखादी नवीनच लग्न झालेली सासुरवाशीण तिचे दुःख हलके करायची.
कितीतरी गोष्टींची साक्षीदार होती नदी.
तिचे नितळ,निर्मळ पाणी वाऱ्याच्या दिशेने वाहायचे.
आमच्या नदीचे नावही सुंदर होते.चंद्रकला.
चंद्रकलेच्या आसपास असणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब ती स्वतःमध्ये सामावून घ्यायची.
मी,माझे सवंगडी खूप वेळ नदीत पाय सोडून नदीतील हलणारे चित्र बघत राहायचो.
शाळेतून घरी येतांना संध्याकाळच्या कमी उजेडामुळे तिच्यात धुसर दिसणारी चित्र ओळखण्याचा खेळ खेळायचो.
नदीच्या काठावर पांढरे दगड मिळायचे.आई ते दगड घरी आणून ते कुटून त्याची रांगोळी बनवायची.अंगणात सडा घालून रांगोळी टाकायची.रांगोळीवर सूर्याची किरणे पडली कि ती चमकायची.पांढऱ्या रांगोळीत हळद मिसळवून पिवळा रंग,कोळसा बारिक करुन तो रांगोळीत मिसळवला कि काळा रंग…असे विविध रंग तयार करायची.
तेव्हा आमच्या खेड्याजवळच्या गावात आठवड्यात एकच दिवस बाजार भरायचा.
बैलगाडीत शेतकरी माल आणायचे.
क्रमशः
आत्मचरीत्र- न लिहिलेले पुढील भाग कृपया खालील लिंकवर वाचा.
प्रिती गजभिये.
(प्रिय वाचक,तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्हीही लेख,कथा,कथामालिका शब्दपर्णव पाठवू शकता.)






उत्तम
छान लिहिले