१-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका-शब्दपर्ण
१-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका-शब्दपर्ण

१-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका-शब्दपर्ण

१-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका-शब्दपर्ण

शरदरावांची  आज पंचाहत्तरी आटोपली.
घरात एरवी  राहणारे दोनच जीव कावेरी आणि शरदराव .आज पंचाहत्तरीच्या निमित्ताने घर भरले होते.
घर आज घरासारखे वाटले.
मुलगा क्षितिज,सून वसुधा, नातू शांतनू आले होते. गावावरुन शरदरावांचा चुलतभाऊ,मित्र प्रभाकर आले होते.खूप  थकलेले मामा-मामीपण आले होते,
पंचाहत्तीराचा कार्यक्रम  संपला.घरगुती गप्पा सुरु झाल्या.
शरदरावांचा तेवीस वर्षांचा लाडका  नातू शांतनू नुकताच एम.बी.ए. झाला होता. आजोबांना
म्हणाला,
आजोबा पंचाहत्तर वर्ष झाली तुम्हाला. किती अनुभव,चढउतार आले असतील आयुष्यात.ते सगळे लिहा नं आजोबा.
नेहमी हसत खेळत दिसणाऱ्या आजोबांच्या आयुष्यात  काय काय गमती जमती घडल्या असतील त्या आम्हाला कळायलाच हव्या.
इति शांतनू.
शांतनूच्या म्हणण्याची मुलगा  क्षितिज आणि  सुन वसुधाने री ओढली.
लिहा हो बाबा.मस्त आत्मचरित्र लिहा.
अरे आत्मचरीत्र मोठी  माणसे लिहितात.मी काय लिहिणार? सरळ साधं जीवन जगलो.माझ्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टी वाचण्यात कुणाला रस वाटेल?
आजोबा आत्मचरीत्रासाठी मोठं माणूसच हवे असे कुठे  आहे.चढउताराने भरलेले जीवन सगळ्यांसाठी सारखेच असते. अनुभव वेगवेगळे असतात बस्स.
तुम्ही लिहा.सापडतील एकेक स्पेशल गोष्टी.
मध्यरात्रीपर्यंत गप्पा करुन सगळे आपापल्या खोलीत झोपायला आले.
कावेरी शरदरावांचा हात पकडून खोलीत घेऊन गेली.
शरदराव–  कावेरी,तुझ्या हाताला प्रेमाची उब  अजूनही तशीच आहे.
 कावेरीतुमचे आपले काहीतरीच.आता वय झाले आपले.
शरदराव– छे ग.मला तर तू अजूनही तरुणच भासते.
 कावेरी-चला.झोपा आता.
कावेरी लगेच झोपली.
शरदराव विचार करत जागे होते.
लिहावे का आत्मचरित्र?
परत सगळे आयुष्य आठवेल आपल्याला? ते आनंदाचे,दुःखाचे अनुभव,गोड,कटू अनुभव
प्रेम,रागाचे अनुभव
सगळे आठवून परत ते सगळे पचवू शकू आपण?
आणि आपण पचवले तरी ज्यांच्यासाठी आपण हे लिहिणार ते तेवढ्याच असोशीने समजून घेणार?
 बघू या म्हणत शरदराव एक मोठ्ठी डायरी आणि पेन घेऊन लिहायला बसले.
शरदरावांना काही आठवावे लागलेच नाही.
पटपट सगळ्या स्मृती  समोर यायला लागल्या.आठवण्यापेक्षा लिहिण्याचा वेगा कमी पडला.डायरी मिटल्या गेली.पेन खाली ठेवला.
शरदराव जवळपास सत्तर वर्ष मागे गेले.
पाच सहा वर्षाचा शरद.

 

रस्ते ,विज नसणाऱ्या खेड्यात राहणारा,पण तेव्हा आपण विजेविना राहतो याची तेव्हा जाणीव नसणारा.
वीज माहीतच नव्हती त्याला.जे माहितच नाही त्याचा अभाव तरी कसा जाणवणार?
शरदचे खेड्यात निसर्गाला बिलगून डोंगरांच्या मध्ये वसलेले झोपडीवजा  कौलारु घर होते.
निसर्गाला बिलगून असल्यामुळे सौंदर्याची वाणवा नव्हतीच खेड्यात.पण खेडे सुंदर आहे हे जाणवायला शहरात जावे लागले.
कमी वस्ती असलेले छोटेसे खेडे.काहीही आणायचे तर बाजूला असणाऱ्या गावी जावे लागायचे.
अगदी तेल,गुळ,दळण आणायचे तरी.
कधी गावाला जायला नाही मिळाले तर आई घरीच जात्यावर  दळायची.
दळण दळतांना गोड आवाजात  ओव्या म्हणायची. सतत कष्ट करणे नशिबात असणाऱ्या आपल्या  आईच्या चेहऱ्यावर  नेहमी  हास्य कसे ?
याचे कोडे नेहमीच शरदला पडायचे.

 

घरात आजी,आई,बहीण सरु आणि शरद.घराला कुडाच्या भिंती.बाबा असतांना बांधलेल्या भिंती होत्या,मध्ये मध्ये त्यावर  लिंपण करावे लागायचे,
दिवाळी आली कि आई त्या भिंतीही  थोड्या लिंपून जमिनीसारख्या सारवायची.
घरात दोन खोल्या.
एक समोरची पडवी आणि  दुसरी स्वयंपाक खोली.
फड्याने झाडून झाले कि आई खोलीचे कोपरे आधी पांढऱ्या मातीने सारवायची. नि मग शेण कालवलेल्या पाण्याने सारवायची.
त्या शेणाचा सुगध  दरवळतोय आजही शरदच्या मनात.
आताचे फिनाईल आणि तेव्हाचे शेणाचे सडा,सारवण यांची तुलना होऊ शकेल?
तो सडा,सारवणाचा सुगंध शांतनू अनुभवू शकेल?
 क्रमशः

शरदरावांचे आत्मचरीत्र….पुढील  भाग कृपया खालील लिंकवर बघा.

प्रिती गजभिये

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!