खूनी सापडला-२१-उलटे पडले फासे
खूनी सापडला-२१-उलटे पडले फासे

खूनी सापडला-२१-उलटे पडले फासे

खूनी सापडला-marathi suspense story
शेखरने मयंकचा खून का केला….वाचा अंतिम भाग
भाग-२१-उलटे पडले फासे
शेखरने सांगितले
हो.मीच मारले मयंक भाऊजींना. एवढे श्रीमंत असूनही दहा लाख मला दिले नाही त्यांनी. 
म्हणून तू खून केला?
हो गळा दाबून.
मला खूप गरज होती पैशांची.
बाबा पुन्हा एकदा मला पैसे द्यायला तयार नव्हते.
मी लहानपणापासून लाडात  वाढलो.घरी कधी पैशांची चणचण बघितली नाही. बाबा शिस्तप्रिय पण सतत कामात बिझी असायचे.
आईचा मी खूप लाडका.ती माझे सगळे हट्ट पुरवायची.
मला अभ्यास करायला आवडायचा नाही.मित्रांबरोबर भटकणे,चैन करणे यातच वेळ घालवू लागलो.
शिखाताई आधीपासून हुशार आणि  मेहनती.
तिचे लग्न श्रीमंत मयंकशी झाल्यावर  तिची मला  मदत
होईल याच भ्रमात होतो मी.सुरूवातीला ती द्यायची पैसे पण नंतर मयंक भाऊजींच्या सांगण्यावरुन तिने मला पैसे देणे बंद केले. एकाच घरात सारख्या परिस्थितीत वाढलेलो आम्ही पण शिखाताईच्या लग्नानंतर खूप अंतर पडत गेले सर्व गोष्टीत. 
बांधकाम व्यवसायात टाकायला पैसे दिले होते पण नाही जमला मला तो व्यवसाय.मयंक खूप ओरडला तेव्हा माझ्यावर. माझी अक्कल काढली तेव्हा त्याने.
धंद्याची आधी ए बी सीडी शिक आणि  मग धंद्यात उतर असा आगाऊ सल्लाही दिला.तेव्हापासून माझ्या डोक्यात राग होताच.
आता आम्ही मित्रांनी मिळून बार आणि रेस्टाॕरंट काढायचे ठरवले होते.त्यासाठी  मित्रांनी पंधरा पंधरा लाख जमवायचे असे ठरले.
आमच्या बाबांनी उभी हयात प्रामाणिकपणात घालवली.
त्यामुळे मला पुन्हा एकदा गुंतवणूक करायला पैसे देणे त्यांना अशक्य होते. पण भाऊजींजवळ अमाप पैसे होते.त्यांच्या पंधरा लाखाने माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली असती.मी खूप  विनंत्या केल्या त्यांना,हातापाया पडलो.पण नाही तयार झाले ते.माझ्या मित्रांना मी शब्द दिला होता पैसे देणार असा.पण भाऊजींच्या नकाराने आमचे व्यवसाय सुरु करण्याची योजना बारगळली.
मी शेवटचा प्रयत्न म्हणून कंपनीत गेलो. भाऊजी कसेतरी
पाच लाख द्यायला तयार झाले पण एका अटीवर. त्यांना बार काढणे योग्य वाटत नव्हते.दुसरा कोणता धंदा कर असा त्यांनी सल्ला दिला.
आमची योजना तयार होती.ऐनवेळी त्यात बदल करायला मित्र तयार नव्हते. पण भाऊजी मानायला तयार नव्हते.
पैसा आणि मी याच्यात मयंक भाऊजी अडसर आहेत असे मला वाटायला लागले.
भाऊजी नसतील तर सगळे पैसे शिखाताईचे होतील आणि  ती मला कधीही नकार देणार नाही खात्री होती मला. 
तिचे पैसे पर्यायाने माझे पैसे असे वाटले मला.हळूहळू भाऊजी नसतील तर….या कल्पनेने डोक्याचा ताबा घेतला. आणि योजना तयार केली.पण त्यासाठी भाऊजींचे घरी एकटे असणे गरजेचे होते.
नेमकी त्यादिवशी शिखाताई घरी आली.भाऊजींची बाहेर पार्टी होती.त्यांची पार्टी असली कि शिखाताई आमच्या घरी  येऊन राहत असे.   निघता निघता तिला उशीर झाला. मग मीच तिला म्हंटले एवढ्या रात्री जाण्यापेक्षा उद्या जा. ती थांबली. मला एवढ्या लवकर संधी मिळेल असे वाटले नव्हते. तिचे थांबणे माझ्यासाठी सुवर्णसंधीपेक्षा कमी नव्हते.
उशिरापर्यंत गप्पा झाल्यावर सगळे झोपले.मी मात्र जागा होतो. मागच्या दारातून बाहेर पडलो.थोडा दूर पायी गेलो. नंतर रिक्षा पकडली आणि  कुणाला संशय येऊ नये म्हणून बंगल्याच्या अलिकडेच उतरलो.तिथून चालत  शिखाताईच्या बंगल्यात पोहचलो. बंगल्यात माझे खूप जाणे येणे असल्यामुळे मला त्याची सगळी माहिती होती.मी खिडकीतून  भाऊजींच्या बेडरुममध्ये गेलो.ते गाढ झोपून होते.त्यांच्या बाजूला उशी होती ती घेतली आणि त्यांच्या  चेहऱ्यावर ठेवून दाबली. भाऊजींनी प्रतिकार करण्याआधीच खेळ खल्लास झाला. त्याच खिडकीतून उडी मारुन बाहेर पडलो.बाहेरच्या भिंतीच्या आडोशाला थोडा वेळ लपून राहलो. नंतर जसा बंगल्यात आलो तसाच पायी आणि  रिक्षाने घरी गेलो. घरी पोहचलो तेव्हा घरी कोणी नव्हते.माझ्या लक्षात आले काय झाले असेल ते.मी परत शिखाताईच्या बंगल्यावर गेलो.
मानकरसरांनी शेखरला लाॕकअपमध्ये टाकले.  आणि तसे शिखाला कळवले.
मयंकच्या दुःखातून पुरते बाहेर न आलेल्या शिखा आणि तिच्या आईबाबांसाठी हा धक्का होता.
शेखर ज्याच्यावर शिखाने मुलासारखे प्रेम केले त्यानेच तिचे जन्माचे नुकसान केले.
शिखा आईबाबांना घेऊन आली.शेखर कुणाच्याही डोळ्याला डोळा भिडवू शकला नाही.
शिखाला राग,दुःख  सगळ्याच भावना रडवत होत्या.
केस कोर्टात गेली. 
चोरीच्या गुन्ह्यासाठी विनयला एक वर्षाची सजा झाली.
एक वर्षांनी विनय बाहेर आला तेव्हा मनिष जज बनला होता.आई ठीक झाली होती.रमाने अर्पिता,शिल्पाच्या मदतीने नवीन उद्योग सुरु केला होता.
विनयच्या आयुष्यात उलटे पडलेले फासे सरळ होत होते.आनंदाने विनयच्या घराची वाट पकडली होती……

प्रिती

समाप्त
Previous Link

प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.

तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!