स्वप्न तहानलेले
रिमझिम झिलमील पाऊस धारा
ज्योती रामटेके
(अरे मग बाबासोबत बोल. ते नक्कीच तुला समजून घेतील.
प्रेमाची किंमत कळते त्यांना. सर्व आक्का सारखे नसतात.
चल रात्र होत आहे. वाड्यात वाट बघत असतील.)
आता पुढे
भाग-१३
कनक.. दीपा घरी जायला निघाले.बाबा वाट बघत होते.
बाबा वाट बघत होते कनकची. आक्का दारात बसून होती.
अरे कनक, आज बराच वेळ केला तू. संध्याकाळी रोज नदीवर तू फिरायला जातो हे मला माहीत आहे पण आज उशिरा घरी आला. काळजी वाटत होती.
बाबा विचारत होते.आराधना झोपाळ्यावर बसून होती.मनातून ती कनकची वाट बघत होती. तिला त्याची काळजी वाटत होती.कनक आला आणि तिचा जीवात जीव आला. हसायला आले तिला.
जे प्रेम माझे नाही हे कळूनही त्यात इतकी का गुंतली मी…
तिचे तिलाच हसू आले. डोळ्यात मात्र अश्रू होते.मनाला किती आवर घालायचा प्रयत्न केला तरी त्याचे दुःख उफाळून येणारच.त्याला किती पण आवर घाला ते आतून जखमेसारखे ओले..ताजे राहणार.शरीराची जखम निदान कुणाला दिसते तरी ..मनाची तर न दिसणारी. आराधनाने अश्रू पुसले.
रात्र झाली.आंनदीची आई स्वयंपाकघरात होती. कनकच्या आवडीचे पदार्थ सुरू होते.वाड्यात त्याचा खंमग वास सुटला होता. पण आज कनकचे कुठेच लक्ष नव्हते.
आज काय झाले कनकला आंनदीची आई मनात विचार करु लागली. आराधनाला आवाज दिला.
आज कनकला काय झाले? त्याच्या आवडीचे जेवण आहे आज. मी आले की माझ्यासोबत गप्पा करायला येतो. आज नाराज दिसत आहे.
आज त्याचे जेवणात लक्ष नव्हते. आक्का शांतपणे सर्व बघत होती.थोड्यावेळाने बाबाने आवाज दिला.कनकने आपल्याला कशाला बोलावले आहे हे ओळखले. तो आतमध्ये गेला. बाबा बसून होते.
ये बस कनक.. तो बसला.
कनक.. आक्का ने मला सर्व सांगितले आहे. गोदावरी गेल्यापासून मी वाड्यात कमी राहतो. मी वाड्यात राहिलो असतो तर गोदावरीच्या आठवणीने वेडा झालो असतो. मी मुद्दाम शेतात बांधलेल्या बंगल्यावर राहू लागलो. तुझ्याकडे दुर्लक्ष झाले माझे. तुला आक्काच्या सुपूर्द करुन मी निवांत झालो.मी माझे दुःख विसरायला पळवाट शोधली खरी.. पण नाही पळता आले मला.
मी आजही तेच दुःख घेऊन जगत आहे. आंनदी छान मुलगी आहे.तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात हे आज मला कळले. मी श्रीमंत,गरीब हा भेदभाव कधी केला नाही.आज रोजी माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे. पण मला त्यात काही रस नाही.त्याचा उपभोग घ्यायला पण आपल्या सोबत आपला जोडीदार हवा. एकट्याने जगणे खूप कठीण असते रे…
कनक, आक्का जेव्हा सासरवरुन वापस आली नं तेव्हा ती खूप दुःखी होती.सासरचे सर्व पाश तोडून माहेरी वापस येणे कठीण असते. कारण कोणतेही असो पण असे पवित्र नात्याचे बंधन तोडून माहेरी कायमचे येणे तिच्या करता वेदनादायी होते. पदरात मुलगी होती.
तिचे, माझे दुःख सारखेच होते. मी वाड्यात न राहता शेतातील बंगल्यात राहायला गेलो.आक्का मात्र तुम्हा दोघात गुंतून गेली. तिचे सारे आयुष्य तुम्हा दोघाभोवती फिरत होते. तुम्ही दोघे सतत सोबत राहायचे, खेळायचे.
एक दिवस तुम्ही दोघे खेळत होते. तेवढ्यात मी आलो.
मी आणि आक्का तुम्हा दोघांकडे बघत होतो.तेवढ्यात आक्का बोलली…
गोपाल.. किती छान जोडी दिसेल यांची.असे झाले तर माझी दोन्ही लेकरे माझ्या डोळयासमोर राहतील.
अग आक्का तू तर माझ्या मनातले बोलली. मी तुला शब्द देतो. वयात आल्यावर या दोघांचे लग्न लावून देऊ.आक्का आश्वस्त झाली होती. तिचा चेहरा समाधानी दिसत होता. किती तरी दिवसांनी तिचा चेहरा आनंदाने फुलला होता.
काळ समोर धावत होता.तुम्ही मोठे झाली. आंनदीचे तिच्या आईसोबत रोज येणे होत होते. ती आली कि तू नेहमी खूष दिसायचा. पण लहानपण होते ते.काही कळलेच नाही मला.आक्का मात्र लक्ष ठेवून असायची.
कनक मला माहीत आहे तू आंनदी सोबतच खूष राहशील. मी तुला माझ्या शब्दातून मोकळा करतो.तुझे सुख महत्वाचे.जिथे प्रेमच नाही तिथे नाते जोडून काय फायदा.
आराधना समंजस आहे.तिला तर आधीच कळले असेल तुझ्या मनातील.आक्काला माफी मागून मोकळा होतो मी.
कनकचा चेहरा फुलला. खोलीतून बाहेर निघतांना त्याला ओझरती एक छाया दिसली. बहुतेक आक्का असेल ती. तिने सर्व ऐकले होते.पुन्हा नवा दिवस उगवला. कनकसाठी हा नवीन दिवस आशा पल्लवित करणारा होता.
कनक संध्याकाळ होण्याची वाट बघत होता. आज आंनदी येणार होती नदीकाठी फिरायला.
संध्याकाळ झाली. कनक आंनदाने नदीवर गेला. आंनदी वाट बघत होती.दीपाने तिला सर्व सांगितले होते.
त्यांच्या आवडत्या दगडावर दोघे बसून होती. आकाशात मेघ दाटले होते. पाऊस येतो कि वादळ असे वाटत होते.
आज प्रथमच कनकने आंनदीचा हात हातात घेतला. नदीवर शांतता होती.
अरे कनक आज काय झाले तुला? रोज माझ्या पासून दूर बसणारा आज अचानक माझा हात पकडला.
आंनदी हसायला लागली.कनक मात्र शांत होता.
आंनदी वाड्यात काय सुरू आहे हे तुला कळलेच असणार.
बाबा तयार आहेत आपल्या लग्नाला. त्यांना माझ्या भावना कळतात ग.
आक्काला माझ्या प्रेमाची आसक्ती दिसत नसेल का आंनदी?माझी तगमग उघड्या डोळ्यांनी बघते ती. स्वतःच्या स्वार्थासाठी ती काही ….
तुला आक्का बाबत नेहमीच शंका वाटायची.खरी ठरली ती.
कनक चल पाऊस येतो आहे जोरात. उद्या बोलू आपण.
तुला आज जी भीती वाटत आहे ती मला आधीपासून वाटत होती. मी आक्काचा स्वभाव केव्हाच ओळखला. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कधीच आपुलकी दिसली नाही. आराधना मात्र नेहमी प्रेमाने वागली. मोठ्या मनाची आहे ती.दोघे घराकडे निघाले.पाऊस जोरात पडत होता.
कनक गुणगुणत होता
ह्या रिमझिम झिलमील पाऊस धारा
तन मन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा
गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा
हा कोवळा शहारा
उजळून रंग आले
स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे…..
क्रमशः
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/१२-स्वप्न-तहानलेले
Next Part
https://marathi.shabdaparna.in/१४-स्वप्न-तहानले
प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




Wah
खूप छान लिहिले