माझं लग्न….
सुमीने दीर्घ उसासा टाकला. भूतकाळातील अंधारलेली अजून एक वाट तिला येऊन धडकली.
माझी फायनल इयर ची परीक्षा संपली होती. त्यादिवशी मी घरच्या कामात असताना माझ्या बहिणीची नजर चुकवून त्याने एक बोटभर चिठ्ठी माझ्या हातात कोंबली.आणि निर्विकार चेहऱ्याने आधी होता तिथे जाऊन बसला .मी प्रथमच त्याच्या हाताच्या स्पर्शाने गोंधळून गेले. बघते तर
“तू माझ्याशी लग्न करशील का”
एवढे एकच वाक्य त्यात लिहिले होते. थोड्यावेळात माझी बहीण आंघोळ करून आली. तिचे माझ्या वर बारीक लक्ष असायचे आणि त्याच्यावर सुद्धा .कदाचित् माझ्या चेहऱ्यावरचे भाव तिने वाचले असावे .तिने मला दरडावूनच विचारले ,
काय झाले ?काय म्हणाला तो?
मी मानेनेच काही नाही म्हणाले. तिने माझा हात ओढला आणि काय आहे मुठीत? असे म्हणाली. मी काही नाही असे म्हणताच तिने एक रट्टा लगावला आणि माझी मुठ उघडून त्यातील चिठ्ठी वाचावयास लावली. कारण तिला वाचता येत नव्हते. मी घाबरले आणि प्रचंड अपराधी भावनेने ती चिठ्ठी वाचून दाखवली. तिने मला शिवीगाळ करून जोर जोरात मार मारहाण करावयास सुरुवात केली.मध्ये तो आला आणि म्हणाला कशाला मारतेस?
मग तिचा मोर्चा त्याच्याकडे वळला. आणि त्याला माझ्यासमोरच तिने शिवीगाळ करून लाथेने मारण्यास सुरुवात केली .मला बाहेर जा म्हणून तिने दरवाजा बंद केला. आणि त्या दोघात बहुधा भांडण झाले असावे .बराच वेळ ते सुरू होते .सायंकाळी तो आमच्या घरातून जाण्यास निघाला व निघूनही गेला .त्याने बाहेर खोली भाड्याने घेतली.
परंतु माझ्या घरी वातावरण खूपच तापले होते. माझ्यामुळे माझ्या बहिणीच्या व त्याच्या संबंधात अडसर निर्माण झाला होता.तो माझ्यामुळे घरातून निघून गेला होता. मला तर फार आनंद झाला. चला पूर्वीसारखे घर होईल असे वाटून हायसे वाटले. परंतु माझी बहीण मला सतत मारहाण करीत होती. एकही दिवस ती चांगली वागली नाही. तो गेल्यापासून माझा सतत छळ करीत होती.
मी तिला म्हणाले, तो जर पुन्हा घरी येणार नसेल तर मी त्याच्याशीच काय कोणाशीही लग्न करणार नाही. आपण सर्वजण आनंदाने राहू
.पण तिला ते मान्य नव्हते. तिला तो हवा होता. ती म्हणाली तू कोणासोबतही जा ,लग्न कर. पण तो माझा आहे . तुला मी वापरलेला माणूसच कसा काय पसंत पडला? मी म्हणाले, मला तो पसंत नाही. आणि त्याच्याशी मला लग्नही करायचे नाही. परंतु तिचा विश्वास बसत नव्हता.
मी रोजच्या घरच्या अशा वातावरणाने त्रासून गेले होते.
त्यात कोणाला काही सांगायची हिंमत नव्हती. बऱ्याच मैत्रिणींचे लग्न झाले होते.
माझा चुलत भाऊ आणि त्याची बायको माझी समवयस्क होती. ती मैत्रिणी सारखी होती. मी दुपारी त्याच्या घरी गेले. दादा वहिनी घरी होते. त्यांचे नवीनच लग्न झालेले होते .किमान हे एक वर्ष झाले असावे त्यांच्या लग्नाला. माझी परिस्थिती पाहून दादा म्हणाला,
कशी आहेस सुमे ? बरी दिसत नाहीस.
मी मान हलवून त्याला प्रतिसाद दिला. थोड्यावेळाने दादा बाहेर गेला. वहिनीने जेवण वाढले. जबरदस्तीने खावयास लावले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मी थोडक्यात जे घडले ते तिला सांगितले. दादा काही खायच्या वस्तू घेऊन परतला .तेव्हा त्या दोघांनी यावर चर्चा केली. दादा म्हणाला,
मला त्या दोघांच्या संबंधाबद्दल माहित आहे पण आपली गरिबीची परिस्थिती लक्षात घेता आणि तुझ्या बहिणीचे घरातील वर्चस्व लक्षात घेता ती तुझे लग्न करून देईल याची काही शाश्वती नाही. ती तुला घरकाम करण्यासाठी कायम घरी ठेवेल. त्यात तिचे असे वागणे. यापुढे तुला खूप त्रास होईल. मुलगा काही वाईट नाही. आणि त्याचे वयही वाहवत जाण्याचं आहे. तुझ्या बहिणीने त्याला फसविले आहे. जर तू त्याच्याशी लग्न करशील तर काही वाईट नाही असे मला वाटते. वहिनी म्हणाली, किमान या वातावरणातून तरी सुटका होईल असे मला वाटते.मग मुलं बाळ झाल्यानंतर कोणत्याही पुरुषाला घराची ओढ लागते. कित्येक वाईट पुरूष लग्नानंतर सुधारतात ते यामुळेच.पण तूच विचार कर, तुझा विचार पक्का पाहिजे .
त्यांनी सावध पवित्रा घेतला.
थोड्या वेळाने वहिनीने केलेला चहा प्यायला व घरी आले. मनात सारखे विचार घोळत होते. काय करू? माझे स्वप्न चारचौघी सारखे नवरी बनून लग्न करून सासरी जाण्याचे होते.माझ्या नशिबात ते नाहीच का? जिथे चरित्रहीन बहीण असेल त्या घरची मुलगी कोण मागेल? म्हणूनच कदाचित इतर मुलींच्या घरी बघायला पाहुणे येतात तसे माझ्या घरी येत नसत. खूप खूप विचार करून माझे डोके जड झाले.
क्रमशः
सुमीच्या आयुष्यात पुढे काय होते? परवड सुरु राहिल कि सुखाचा शिडकावा येईल कि गुंता वाढत जाईल…..वाचत रहा
पुढील भाग- https://marathi.shabdaparna.in/५-गुंता
आणि कथा तुमच्या मनापर्यंत पोहचत असल्यास नक्की like करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल




सुखासाठी दुःखाचा गुंता
छान लिहिले