सुमी झोपेचा प्रयत्न करीत असताना तिचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे सरकू लागला. तिला आठवले जेंव्हा मारहाण करून, यातना देऊनही मी माझ्या वडिलांचे अर्धे घर मागण्यास तयार नाही असे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने माझ्या वडिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना माझी मोठी बहीण लग्नापूर्वी माझा कसा छळ करायची, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला व आम्ही कोणत्या परिस्थितीत लग्नाचा निर्णय घेतला. हे ही त्याने माझ्या वडिलांना पटवून देण्याचा प्रयत्न केला .यासाठी तो मला घेऊन वडिलांच्या कामावर वेळोवेळी भेटायला जात असे.
यात एक सुखकारक गोष्ट घडली की, माझे वडील जे माझ्या लग्नापासून माझ्याशी बोलत नव्हते ते हे सर्व ऐकून माझ्याशी बोलू लागले. मनातून मी सुखावले होते. कारण हे लग्न मी माझ्या मर्जीने केले वडिलांना काही न सांगता. सांगायची हिम्मत नव्हती व तेवढी वैचारिक परिपक्वताही नव्हती. त्यामुळे मनामधील अपराधीपणाच्या भावनेने मी खचून गेले होते. बाबा बोलायला लागल्याने त्या भावनेची तीव्रता जरा कमी झाली. मनावरचे ओझे हलके झाले. मला त्यांना दुःख होईल असे वागायचे नव्हते किंवा माझ्या कोणत्याही कृतीमुळे ते दुखावतील असे काहीही करायचे नव्हते. पण परिस्थितीच तशी होती.
माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाला यश आले आणि माझ्या वडिलांनी अर्धे घर माझ्या नावावर करून दिले .यथावकाश आम्ही तेथे म्हणजे वडिलांच्या घरी राहायला गेलो. माझ्या नवऱ्याच्या मनासारखे झाले .आता तो चांगला वागेल अशी अपेक्षा होती. पण त्याच्यातला दुराचारी माणूस अधुनमधुन डोके वर काढून शिवीगाळ मारहाण करीतच होता. आता मी घर सोडून कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता .कारण तोच माझ्या घरी आला होता. मला लग्न झाल्यानंतर सासरी राहायचे होते. पण परिस्थितीमुळे माहेरी राहावे लागत होते. शेजारी काय म्हणत असतील असा विचार आला की ओशाळल्यासारखे व्हायचे.
नवऱ्याला मात्र अजिबात संकोच वाटत नव्हता . माझ्या आई वडिलांसमोर तो मला मारहाण करायचा .तेव्हा माझ्या आई-वडिलांची आगतीक अवस्था बघून माझे हृदय पिळवटून निघायचे. त्यांना माझ्या या अवस्थेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात मी अयशस्वी झाले .आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी माझ्या लग्नाने माझी अवस्था केली.
मी त्याच्याशी लग्न करून स्वतःवरच सुड उगवला की काय असे वाटते. नकळतच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या गालावरून उशीवर ओघळून उशीचा भाग ओला झाला होता. ती स्वतःलाच विचारू लागली.
मी लग्न का केले ?
लग्नापूर्वीचे दिवस आठवले. माझी मोठी बहीण कामाला जायची त्या ठिकाणी तिची त्याच्याशी (माझ्या नवऱ्याशी) ओळख झाली आणि त्याचे आमच्या घरी येणे जाणे सुरू झाले. त्याचे रात्रीचे जेवण तर बहुतेकदा आमच्या घरीच व्हायचे. त्याचे असे येणे जाणे आणि माझ्या बहिणीशी लगट करणे मला त्यावेळी आवडत नसे. मी त्याच्याशी कधीही बोलत नसे. तो पण माझ्याशी बोलत नसे.
आमच्या घरी आई बाबा मोठी सावत्र बहिण असा परिवार होता. आता तिचा उच्चार सावत्र बहीण जरी करत असले तरी मी तिला लहानपणापासून सख्खी बहिणच मानत आले. ती माझी सावत्र बहीण आहे हे मला माहीत नव्हते.ही मोठी सावत्र बहिण नवऱ्याचे घर सोडून काही वर्षापासून आमच्याकडेच राहत होती.
आई-वडील आपापली कमाई तिच्या स्वाधीन करायचे. ती सर्व व्यवहार सांभाळायची.ती माझ्यापेक्षा वयाने दहा-बारा वर्षाने मोठी असेल. तिचा घरात दरारा होता. तिच्या मनाप्रमाणे घर चालायचे .तिला एक लहान मुलगी होती दोन वर्षाची. तिची देखभाल मीच करत असे. घरची सर्व कामे करून मला कॉलेजला जावे लागे.कॉलेजमधून आल्यानंतर ही घरची कामे करावी लागत. व तिच्या मुलीला सांभाळून अभ्यास करावा लागे.
दोन वर्षानंतर तो ज्या होस्टेलमध्ये राहत होता तिथे त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे माझ्या बहिणीने त्याला घरी राहायला आणले. त्यांचे वागणे, बोलणे एकत्र झोपणे, सर्व अश्लील वाटे. आई बाबा त्यांच्या कामात व्यस्त होते.पण मी त्यांना काही सांगू शकत नव्हते. या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होत होता. असे दोन वर्ष निघून गेले त्यांचा रोमान्स दिवसाढवळ्या बिनदिक्कत सुरू असे. कॉलेजमधून घरी जाण्याची इच्छा होत नसे. आणि एक दिवस सर्व असह्य झाल्याने माझ्या बहिणीला मी त्याला माझ्या घरातून जाण्याविषयी सांगितले.ती भयंकर भडकली. खूप भांडण केले माझ्याशी .मला घर सोडून जाण्यास सांगितले .मला खूप वाईट वाटले.
त्या दिवसापासून तिचे वागणे बदलले. कोणाचीही पर्वा न करता ती आणखी निर्लज्जपणे वागू लागली.माझा नाईलाज झाला. माझी फायनल ईयर ची परीक्षा सुरू होती. मला अभ्यास करायचा होता. इतरत्र कुठेही लक्ष देणे मला परवडणारे नव्हते. तो ही कॉलेजमध्ये होता .तो तिच्या नादी लागला म्हणून असावे कदाचित तो कॉलेजात जात नव्हता किंवा परीक्षा देत नव्हता माहिती नाही. पण त्याची दरवर्षी मी नापास ची गुणपत्रिका बघायचे . त्याला माझ्या यशाचे अप्रूप वाटे. तो माझा अभ्यास , गुणपत्रिका बघून म्हणायचा, हुशार आहेस.
पण त्याच्या तोंडून हे ऐकतानांही ओंगळवाणे वाटे. तो गरीब घरचा, खेड्यातून येथे शहरात शिक्षणासाठी आलेला आणि त्याने एका बाईच्या नादी लागून आपले भविष्य असे उध्वस्त करीत असल्याचे दिसत होते .मला माझ्या बहिणीचा व त्याचाही खूप राग यायचा. सुमीच्या तोंडून त्यांच्यासाठी एक शिवी निघाली नीच कुठले…
क्रमशः
सुमीच्या आयुष्यात पुढे काय होते? परवड सुरु राहिल कि सुखाचा शिडकावा येईल कि गुंता वाढत जाईल…..वाचत रहा पुढील भाग
आणि कथा तुमच्या मनापर्यंत पोहचत असल्यास नक्की like करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.
भाग-4 https://marathi.shabdaparna.in/चार
अबब किती हा गुंता ?
उत्तम लिखाण , पुढची उत्सुकता