तृष्णा (प्रेमाची)
भाग-१
अमोलला अमेरिकेत एका चांगल्या युनिव्हर्सिटीत admission मिळाली आणि मि.जाधवांची पैशांची जमवाजमव कशी करायची याची विवंचना वाढली. त्यांनी
तीनएक वर्षापूर्वीच मुंबईत प्रशस्त फ्लॕट घेतला होता.त्यात जमा असलेले सगळे पैसे गेले. जरा कर्जही घ्यावे लागले.
अमोल आणि अमोली त्यांची दोन मुले.अमोल ग्रॕज्यूएट झाला आणि एमबीए बाहेर करायचे अशी इच्छा त्याने बोलून दाखवली.entrance दिली. आणि पासही झाला.
आता जवळपास पन्नास लाख खर्च कसा करायचा हा प्रश्न उभा राहला.
अमोल शिक्षणासाठी कर्ज घ्यायला तयार होता.पण मि.जाधव आणि अमोलची आई मधूराला त्याने कर्ज घेऊन शिकावे हे मान्य नव्हते.पण पैसे जमवायचे कसे हा प्रश्न होताच.
अमोल,अमोलीच्या शिक्षणासाठी पैसे जमवले होते पण ते कमी पडत होते.
विचार करता करता मधूराने गावी असलेले घर विकण्याचा विचार बोलून दाखवला. याआधीही तिने तसे सुचवले होते पण मि.जाधव तयार होत नव्हते.
मागच्या वीस पंचवीस वर्षात ते आणि मधुरा तिथे गेलेही नव्हते.
आताही घर विकायला काढायचे म्हणजे तिथे जावे लागणार होते. ते घर त्यांना कधीही आवडले नव्हते.
आता अमोल मोठा झाला.तोच बघेल विकण्याचे मधूराने सुचवले.
पैशांची तजवीज करण्यासाठी दुसरा पर्याय दिसत नव्हता.
मधुरा अमोलला तशी बोलली.
अमोलची जवळीक बाबांपेक्षा आईशी जास्त होती.त्याला गावी घर आहे हे पहिल्यांदाच समजले.त्याला छोट्या छोट्या गावी फिरणे आवडायचे.तिथल्या संथ आणि शांत वातावरणाबद्दल अमोलला नेहमीच आकर्षण वाटायचे.
तो गावी जायला तयार झाला.तीस लाख तरी घराचे नक्की मिळतील असा मधूराचा अंदाज होता.
नेहमी हसरे असणारे घर अमोल परदेशी जाणार या विचाराने एवढ्यात उदास झाले होते.
अमोलीची चिवचिवही दादा जाणार म्हणून कमी झाली होती. अमोलपेक्षा सात वर्षांनी लहान असलेल्या अमोलीने मीही काही दिवसांनी दादाजवळ जाणार असे जाहीर केले.मधुराचा जीव अमोल वापस येईल कि तिकडेच सेटल होईल या कल्पनेने कासावीस होत होता.
मि.जाधव तिची समजूत काढायचे.अग,दिडएक वर्षाची गोष्ट आहे.पट्कन निघून जातील दिवस. मनातून तेही जरा धास्तावले होते. पण शिक्षण झाले कि तो परत येणार याची त्यांना खात्री होती. त्यांचे चौकोनी कुटूंब सर्वार्थाने परिपूर्ण होते.
अमोलने आईबाबांना नौकरी मी आपल्या देशातच करणार असे सांगून त्यांची काळजी कमी केली होती.
आज दुपारी तो गावी निघणार होता.
गाव खूप छोटे नाही आणि खूप मोठे ही नाही. तालुक्याचे ठिकाण. मुंबईवरुन साधारण आठएक तासाचा प्रवास.
खूप वर्ष बंद असलेल्या घरात अमोल कसा जाईल म्हणून मि.जाधव आणि मधूराने तिथे हाॕटेलमध्ये राहण्याविषयी बजावले होते.
तिथे राहण्यायोग्य हाॕटेल मिळतील का ही चिंताही होतीच.
अमोलने आईला खूपदा तो अगदी व्यवस्थित राहील असे समजवले.
दुपारी बाराची बस होती. रेल्वेपेक्षा त्याला बसचा प्रवास आवडायचा. रस्त्यावरुन बस धावली,धावती झाडे बघितली कि मनाला वेग येतो असे त्याला वाटायचे.
अमोल निघाला.सोबत त्याचा आवडता व्हिडिओ कॕमेरा घेतला. व्हिडीओ कॕमेराशिवाय तो कुठे ही जात नसे.व्हिडीओ शुटींगची आवड त्याला लहानपणापासून होती. म्हणून त्याच्या अठराव्या वर्षी बाबांनी त्याला व्हिडिओ कॕमेरा भेट दिला.
अमोल एकटा असा पहिल्यांदाच निघाला होता. याआधी मित्र किंवा घरचे सोबत असायचे.
मुंबई दूर होत होती आणि गाव जवळ येत होते.
मध्ये एकदोनदा आई-बाबांचा फोन आला. त्याची मैत्रीण,सखी मुक्ता, तिचाही फोन आला.
मुक्ता काॕलेजच्या पहिल्या वर्षात त्याला भेटली. अमोलचे एमबीए झाले कि दोघांनी लग्न करायचे ठरवले होते.दोघांच्याही घरी अजून माहीत नव्हते.अमोलने परदेशी जाण्यापूर्वी आईबाबांना सांगायचे ठरवले.
बस पुढे जात होती.त्याचे मनही स्वप्ने रंगवण्यात मग्न झाले.
मुक्ताला सोडून दीडदोन वर्ष राहायचे म्हणजे…जसजसा तो विचार करु लागला.त्याला सगळेच कठीण वाटू लागले.
बसला ब्रेक लागला.त्याचे हवे ते गाव आले होते. रात्रीचे नऊ वाजले होते.बस थांबली.हा शेवटचाच थांबा होता.सगळे आरामात उतरु शकत होते पण सगळ्यांना उतरायची घाई. अमोल सगळ्यात शेवटी उतरला. बाजूलाच रिक्षा होती.त्याने घराचे कागदपत्र असलेली बॕग सांभाळत रिक्षावाल्याला हाॕटेल विचारले आणि तिथे घेऊन जायला सांगितले.
रिक्षावाल्याने अमोल कसा काय आला विचारले.अमोलने त्याला घरासाठी गिऱ्हाईक बघायला सांगितले.हाॕटेल आले.
रिक्षावाला विजय उद्या येतो सांगून निघून गेला.अमोलने हाॕटेलमध्ये दोनतीन दिवसांसाठी रुम बुक केली.सहा रुम असलेले ते छोटे लाॕज होते. गाव छोटे असले तरी लाॕज चांगले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच विजय आला.घराचा पत्ता घेऊन अमोल विजयसोबत निघाला. पत्ता शोधत एका टूमदार बंगल्याजवळ आले.पंचवीस वर्षापूर्वी अतिशय स्वस्त दरात त्याच्या बाबांनी ते घर घेतले होते.
घराच्या जुन्या मालकाला पैशांची निकड होती.त्यामुळे जेवढे मिळेल तेवढ्या पैशात त्याने घर विकले.
त्याचे आईवडील इथे कधी राहले का हेही त्याला माहीत नव्हते.
विजय त्याला तिथे सोडून परत गेला. अमोलचे काम झाले कि अमोल त्याला फोन करुन बोलवणार होता.
त्या घराच्या जवळपास दुसरीही घरे होती.पण ओळखीचे कोणी नाही. बाजूच्या घरासमोर एक माणूस होता,त्याला अमोलने आवाज दिला.
काका
तो जवळ आला.बाजूच्या घरी तो घरकामाला होता.मध्ये मध्ये या घराचीही देखभाल करायचा.घर कुणाचे त्याला माहित नव्हते पण समोरच्या दरवाजाचे कुलूप जंग लागले कि तो बदलवायचा.
बोल बेटा.कोण हवे? ह्या घरी इथे कोणी राहत नाही.
माझेच घर आहे हे काका.
काय?
काकाला आश्चर्य वाटले.
पंधरा वर्ष झाली होती त्यांना इथे काम करुन.त्या घरात कोणीही फिरकत नव्हते.आणि आज अचानक….
काय घडेल पुढे ,अमोलचे येणे निव्वळ योगायोग की….वाचा पुढील भाग
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




सुरवात खूप छान .. उत्कंठावर्धक
छान कथेची छान सुरुवात
छान कथा,,, छान सुरूवात