सुंते सोमोर पाय,गाडीवर गन्या येऊन रायला ..,,बराबर चल …पाय कसा कट मारते थो ..,तु नोई दिसली न .,,मग त्याच्या आंगातच येते..लय आगाऊ हाय हे पोरग..पाप्या च पितर ..,,मले निर्मलातै न गोठ सांगतली तवा पासुन त सिसारीच बसेल हाय ह्या पोट्याची ..पोट्ट काय च .व..लगन नाई हुन रायल मुन सांग नाई त आता लोक दोन लेकराई चा बाप झाला असता..नीरा माजेल सांड हाय हे,बापाच्या पैसा वर मज्जा मारते बसते उकिरडे खनत.बापा न हरामा च कमावेल हाय …लोकाईचा जीवघेऊघेऊ ..यकयक धुरा वाढू वाढू गाव भर जमीन केली आन घे मंग ..आता .,,””वायवना ले कावळा बसोला”” असी गत हाय बैना……हे ठुईन काई ..समद चक करते हे ईप्पीतर….
दारके दमादमा न घे न व जरा .किती अकात करु राईली …गेल थे …….
अव माय हे त पुन्यांदि पलटुन आल …अरररररररररर.. आंगवुन नेतक काय…बाई किती जवुन गेल व हे …माय यक्सीडंट ह्वत हुता..
सुंते…पाय मी उगाच नाही माल्या जीवा च पानी करुन रायली .हे बेन असच हाय .गावभरातल्या सर्या पोरी ह्याले ह्याचा बापा च्या सुनाच वाटतेता….मले बी लय मंजे लयच तरास देला हाय यान ..,,आन तु आता गुलबक्षी दिसुन रायली न त्याले मनुन ते अदर अस करीन..
अव सोड मी काय भीतो त्याले दारके..असे कैक आले .. दिसालेच गुलबक्सी हावो आफुन ..लय जहाल आवो..
सुंते हे बाभळीच् काट हाय ..तु होबासक्या मारु नको …. मग मनशीन दारके सांगल नाई तुआ .. संगवारिन हाय जीवाभावाची मुन कातोळा हाय माला …नाई त मंग पाठुन वचकन देशीन मुन ..सांगतो
चाल माल्या घरी गच्ची वर बसु ….तुले नोटबुक पायजे न….चाल चाल …ये ..ये न तुले निर्मल तै न सांगलेली गन्या ची गोठ सांगतो न …वईनी न इल्ली केली न आज, संबार मस्त करते माली वईनी …ये न व ..मंग जाजो तासा भरान ..घरी तुया फोन करु दादा ले घ्याले धाडा मनुन ..ये न ये…….
ह.. दारके तु थे निर्मल न सांगलेली गोठ सांगनार हुती न..
..हव…..ह पा …ताईन कानी फ्स्ट ईयर ले कालेज मधी यडमिशन घेतली ,,तवा चीच गोठ हाय …हे गन्या बी ए फायनल ले होता …तवा.वाणिज्यशाखा नोई निंघाली थ्या वरशी. कालेज मंदी…नवा स्टाप नेमला .सरे नवे प्राध्यापक ..प्राध्यापिका ..ज्वाइन होत होते ..त्या धामधुमीत यक कामाक्शी मैना तथी रुजु झाली .,आहाहा दिशाले यकदम हिरोईन .. केस,कतरेल बाॕपकट …बिन बाह्याईचे ब्लाऊज .नीर्या तलम साड्या , पिकाले आल्या आंब्या बानी तिची कांती …पायता च ये तीले…ताई मने मी त लवुलवु पाहो …चालन त अस का जाता मानुस थांबुन पाईन…बोलन त ऐकावच वाटे, लांबचे लोक कान देऊन ऐकतीन अस …हासन …बयाबयाबया…ईचारुच नका …फूल झरन वाचतो का नाई आपुन ,शेम तसच …शयरातली सरी लकब तिच्या त दिसे ….पुन्या ची होती वाटते .ताई सांगे..मंग गन्या न बी पायल तीले …आसा काई बयकला गन्या..कैंटिनच्या कचोर्या न कट चहा पाजूपाजू त्यान लय चेले चपाटे जमवले हुते ..हो ले हो लावनारे …जत्रेत हिंडल्या वानी तो त्याईच्या संगतीन कालेजात हिंडे…ज्या कलास ले म्याडम पिरेड घे गन्या तटिस उबा राय..वाकुवाकु पाय …म्याडम बिचारी आपल काम करे…एनएसएस ..मधे बी म्याडम च्या भवतीच फिरे थो ,,टिनपटमित्र मंडईत जोऱ्यात मने ..
.”अपना तो दिल आ गया ”
काई पोट्टे हासे त्याले …काई सोबत करे ….यकयक दिस पुढे जात हुता .गैदरिंग आली …गन्या न ड्राम्या त काम केल गान मनल.म्याडम ले ईचारल
. म्याडम जमल का?.
.हसुन म्याडम न मनल.. झाल गन्या ले का वाटल काजाने ….नव वरीस लागल …मंग आल प्रेम पर्व फेब्रुवारी …..झाल गन्या न ठरवल का अपुन म्याडम ले प्रपोज माराचीच ….आला थो दिस ..गन्या न टपोर गुलाबाच फूल घेतल …सुटी च्या वक्ताले बरोबर म्याडम च्या क्लास म्होर उभा रायला .. पिरेड सुटला .म्याडम बाहेर आल्या ग्राउंड च्या मंधात पोचल्या बरोबर गन्या न म्याडम ले अडवल ..
,“एक्सक्युज मी.”.थांबल्या म्याडम …गन्या लगेच समोर येऊन टोंगया वर बसला ..म्याडम ले गुलाबाच फूल देत मनल
“आई लव यु …विल यु मेरी मी “” म्याडम हपचक … कूनी कापल त र्रक्त निंगनार नाई अस त्याईच रुप…
“””गणेष ” ““”ओरडल्या च .
.काय आणी कुणास,म्हणतो आहे ..वेडा झाला का … काहि संस्कार आहे कि नाही..
.म्याडम ची अवस्था पायली जाय न, रागा न लाल झालेले डोये …ओरड्याने कोरडे पडलेले ओठ ….आंगा ले थरथर भरली ….आरडाओरडी न पोरापोरीन घोळका केला ..याईचा तमाशा पायाले …गन्या बदमास होता …त्यान पायल का आपली फजीती होयेल हाय …गन्या यकदम हसाले लागला त्याचे चमचे बी हसाले लागले …गन्या मने ..
..आहो म्याडम ….आज वेलेंटाईन डे हाय का नाई म्हनुन मीन परपोज मारला तुमाले .काई जबरदस्ती थोडी हाय …तुमी नाई म्हना न …चिडता काय ले …
सरा आवार हसाले लागला ..म्याडम मागे वयल्या न तनतन करत आफिसात चाल्या गेल्या ..दुसऱ्या दिशी पासुन म्याडम कालेज च्या आवारात फिरकल्यास नाई ….मंग समजल का राजीनामा देला म्याडम न ….अस हे ड्यांबीस वाना च गन हाय …खायले आटवा न भुई ले भार ….
माय दारके हे त काई झाल …ईठ्ठला …
.@$
परपोज चे सरितामॅडमने केलेले सादरीकरण बघण्यासाठी YOU TUBE ची पुढील लिंक बघा
खूप छान
वाचण्याएवढीच बघायलाही मजेदार वाटणारी कथा
लै भारी
मस्तच v