स्वप्न तहानलेले-एक अपूर्ण प्रेमकथा
आनंदीला धवल सारखा उमदा,प्रेमळ जोडीदार मिळाल्यावर कधीकाळी आनंदीचे आयुष्य व्यापून टाकणाऱ्या कनकला ती विसरु शकली कि मनाचा एक सुगंधी कप्पा आजही त्याच्यासाठी तिने राखून ठेवला….
स्वप्न तहानलेले
भाग-३
Written by
ज्योती रामटेके
पाऊस सुरू होता. वर्षभराचा पाऊस आजच पडतो कि काय असे वाटत होते. हवेतला गारवा वाढत होता. आंनदीने बॅग मधून शाॕल काढली.मुंलाच्या अंगावर ओढली. लग्नानंतर काश्मीरला हनिमुनला गेलो होतो तेव्हा धवलने घेतली होती. किती हौस आहे त्याला प्रत्येक गोष्टीची.माझी प्रत्येक इच्छा त्याने पुर्ण केली.मी तर बरेचदा देवाजवळ आळवणी करते, माझ्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट नं लागो. माहेरी खाणे, पिणे , शिक्षण या व्यतिरिक्त हौसेखातर जास्त काही मिळायचे नाही.
आई-बाबा, आजी,काका-काकु,दोन आत्या -सुधा आत्या आणि कमलआत्या.आणि आम्ही दोन भावंडे.मी आणि आणि माणिकदादा. काकांना दुसरीकडे नौकरी मिळाली.काका-काकु तिथे राहायला गेली.पूर्ण कुटूंबाची जबाबदारी आई-बाबांवर होती. कालांतराने दोन्ही आत्यांचे लग्न झाले. आजी गेली.
लहानपणी सोबत राहलेल्या आत्यांची आता कित्येक वर्ष भेट होत नाही.काका-काकु तर आधीच दुरावले.
आई,बाबा त्यांच्या मिळकती नुसार खर्च करायचे. तिने पुन्हा हळूवार हात फिरवला शाॅलवरुन.तिला धवलचा स्पर्श झाल्यासारखा वाटला. त्याचा स्पर्श किती आश्वासक असतो.तो घरात असला तर घराला चैतन्य येते.
आज धवल सोबत असता तर हा प्रवास किती सुखकर झाला असता.मुलांना मजा आली असती. धवल घरी एकटाच असेल.
आनंदी खिडकीतून बाहेर बघायला लागली.
पावसाचा वेग चांगला वाढला. थंड हवेची झुळूक तिच्या गालाला स्पर्श करुन गेली.पावसाचे एक-दोन थेंबही गालाला स्पर्शून गेले.
कनक….कनक असाच हाताने पावसाचे पाणी गालावर उडवायचा.
आज प्रवासात क्षणोक्षणी कनक आठवतआहे. तेव्हा तो माझ्या नजरेत कैद होता. त्याचे जोखड सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नाही विसरता येत त्याला. उगाच आले मी.जखमेवरच्या खिपल्या आतून ओल्या आहेत.बाहेरुन जरी सुकल्यासारख्या दिसत असल्या तरी आतून रक्तबंबाळ आहेत . घरी धवलच्या प्रेमात सारे विसरते मी.एखाद्या वेली सारखी त्याच्यामध्ये गुरफटून असते.पण मग असे का?
धवल,संसार यात गुंतले तरी कनकची जागा मनात आहेच.
थांबलेली गाडी सुरू झाली.पावसाचा वेग वाढला होता.तिचा प्रवास अंतिम टप्प्यात आला होता. लोकांचे येणे.. जाणे सुरू होते. नवीन जोडपे झोपी गेले होते.
आता धवल असता तर मी अशीच निश्चित झोपली असती.
त्याचा भास सुध्दा मनाला जिवंत ठेवतो.त्याच्याशिवाय तर मी निष्पर्ण झाडासारखी आहे. सही करुन झाली कि लगेच वापस जाते मी.तेवढ्यात धवलचा फोन आला.
काळजीपोटी त्याचे फोन सुरू होते.
दादाला घ्यायला आधीच बोलव. पाऊस सुरु आहे. छत्री आणायला सांग अशा सुचना तो करत होता. धवल झोप आता. काळजी करू नको. दादा येणार आहे घ्यायला. आंनदी सांगत होती.
अग तू पोहचल्यावर झोपेल मी.
लग्नानंतरचा प्रत्येक पहिला पाऊस तुझ्यासोबत अनुभवला आहे मी.
पावसाळ्यातला पहिला पाऊस आहे हा. मातीचा सुगंध अनुभवला का तू. तुला तर तो गंध खूप आवडतो. धवल विचारत होता. हो.कसे विसरेन मी? असे म्हणत आनंदीने फोन ठेवला.
आंनदी पुन्हा त्या गंधात हरवून गेली.
खिडकीतून कनक हातात पाणी घेऊन मला शोधतो आहे. वेड्यासारखा धावत आहे.असा आंनदीला भास होऊ लागला. मला निरोप देताना त्याचा तो दुःखी, व्याकुळ चेहरा सतत मला आठवतो.
मी तर धवलच्या प्रेमात कनकला विसरली पण कनक आजही या आठवणींच्या मोरपीसावर जगत आहे. मी तर सुखात आहे. आठवणींचा कल्लोळ तर अंतरी राहणारच. माझ्यासाठी काही पण करायला तयार असायचा कनक. माझ्यावर प्रेम करुन काय मिळाले कनकला?
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
……………………………..
का तुला सोडवे ना गाव तुझे
मी मला सोडले तुझ्यासाठी….
गाडी पुन्हा थांबली. मघाशी गाडीत चढलेल्या नवीन जोडप्यातील तिच्यावर आनंदीचे लक्ष घगेले. तिने माळलेला पांढराशुभ्र मोगराफुलांचा तिला दिसला.
शेवटी.. शेवटी मोगरा खूप फुलतो.हा शेवटचा बहर. तप्त उन्हात सुद्धा त्या फुलांचे सौंदर्य कायम राहते. सगळीकडे फुलांचा सुगंध पसरला होता.काय जादू असते नं फुलांची तन आणि मन सुगंधित करून टाकते. प्रत्येक फुलांची रंगसंगती वेगळी. आता पाऊस पडला कि जाई.. जुई उमलणार.
निसर्गा एवढा श्रेष्ठ दाता या पृथ्वीतलावर कुणीही नाही. भरभरून दान करतो तो. प्रत्येक ॠतुमधली फुलणारी फुले स्वर्ग सुख देऊन जाते.. वाड्यात मोगरा खूप फुलायचा. संपूर्ण वाडा सुगंधाने बहरुन जात असे.
मी आणि कनक पायरीवर बसून त्या सुगंधात न्हावून निघायचो. तो हळूच माझ्या आवडीचे गीत गायचा.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा…
तेव्हा वाटलेही नव्हते कि आमचेही प्रेम कळ्यांसारखे अपूर्ण राहील.
खिडकीवर सारखा पाऊस आदळत होता. तेवढ्यात कुणीतरी ओरडले, हे बघ गारा पडत आहेत. कनक सोबत किती तरी वेळा गारा वेचायची.त्या ओंजळीतल्या गारांचे पाणी होऊन कधीच विरघळून गेल्या त्या. मनातल्या आठवणीही तशाच विरघळल्या असत्या तर…पण नाही. त्यातर गोठल्या आहेत मनाच्या आत आत…..
क्रमशः
Previous Part




उत्तम कथा.
उत्कृष्ठ लेखन शैली.
सहज सोपी भाषा 🌟🌟🌟🌟🌟
Wah sundr…..
खूप छान… आठवणी वारूळातलया मुंग्यांसारख्या असतात
सुंदर शब्द रचना