९-हरवून गेल्या जाणिवा-बालविधवा
९-हरवून गेल्या जाणिवा-बालविधवा

९-हरवून गेल्या जाणिवा-बालविधवा

९- हरवून गेल्या जाणिवा…

बालविधवा

दर्शना भुरे

 

सगळेजण तालुक्याच्या गावी कपडेखरेदी करण्यासाठी उत्साहात पोहचले. त्याकाळी खरेदी करणे म्हणजे अप्रुपच होते….आता पुढे वाचा.

 

गप्पा करत सगळे तालुक्याच्या गावी पोहचले.नेहमीच्या ओळखीतील कपडादुकानासमोर बैलगाडी उभी राहिली..कापडदुकान काही फार मोठे किंवा प्रशस्त असे नव्हते पण दुकानाचा मालक मधुकररावचा शाळासोबती होता त्यामुळे घरातील कुठल्याही प्रकारची छोटीमोठी कापडखरेदी तिथेच होत असे.

तिथे पाच रूपयांच्या नऊवारीपासून ते पंधरा रुपयापर्यंत किंमती चे नऊवारी, धोती- कुडता,टोपी,पगडी विक्रीस होते..तसेच सुती, लेनिन, खादी, खाटाऊ, जरदोशी, तलम असे कपड्यांचे पोत चलनात होते..

 

दुकानात पोहचल्याबरोबर सगळ्यांच्या अंगात वेगळाच उत्साह शिरला.विशेषतः लहान मुले एकदम खूष झाले.

 

रत्नाआत्याने गडद हिरव्या रंगाची सुमारे नऊ रुपयांची साडी पसंत केली.

वैकुठा स्वतःसाठी परकरपोलकं शोधू लागली. बऱ्याच कपड्यांना नापसंती देवून तिने जांभूळ रंगाची सोनेरी किनार असलेली बारीक चौकडीची परकरपोलकी निवडले त्याची किंमत त्याकाळी पाच रुपये होती.

 

आई, काकी सोबतच विनायक च्या आईची …सर्वांची मनासारखी कपडा खरेदी आटोपली. आबांनी विनायकलाही त्याच्या आवडीचे कपडे घेऊन दिले.

वैकुंठा तिच्या आईजवळ कुजबुजली,याला कशाला?

आई वैकुंठाच्या डोक्यावर हलकेच टपली मारत हसून म्हणाली,अग पाहुण्यांना असे बोलू नाही वैकु..

 

दुकानातून बाहेर पडताच सर्वांना भुकेची जाणीव झाली. खरेदी करुन झाल्यामुळे तो उत्साह आता मावळला होता.

सूर्य अस्ताला जाऊन अंधार पडायला सुरुवात झाली होती.

सकाळच्या धावपळीत व्यवस्थित जेवण झाले नसल्याने एव्हाना सर्वांच्या पोटात भुकेने कावळे ओरडू लागले होते म्हणून जेवणासाठी..

जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत बसून सोबत आणलेल्या दशम्या सोडल्या.. बैलांना चरण्यासाठी मोकळे सोडून दिले..

तालुक्यापासून उमरगावला जाण्यासाठी अजून एक, दीड तास वेळ लागणार होता..

त्याकाळी आतासारखा स्कूटर्स,सायकल ,रिक्षाचा प्रवास नव्हता..प्रवासीबस होत्या पण त्याही फाट्यापर्यतच जात होत्या.. त्यामुळे ज्यांना शक्य असेल ती लोक फाट्यापासून गावामध्ये जाण्यासाठी बैलगाडीचा किंवा डमणीचाच जास्तीत जास्त वापर करीत वा ज्याना वरील वाहने परवडत नसेल ती

मजल दरमजल अंतर पायीच पार पाडत..

दिवसभर शहर माणसांनी गजबजलेले असल्याने रस्त्याने तशी भीती नव्हती.प्रश्न सायंकाळचा होता..

फाट्यापासून उमरगावला आतमध्ये जवळपास तीनचार कोसभर आत जावे लागत होते. बाईमाणसे सोबत असल्याने जास्त रात्र होवू देता येत नव्हती म्हणून आबा गावाकडे परत फिरण्याची घाई करू लागले..

 

पण वैकुंठाने रिबिनीसाठी हट्ट धरला होता, तिच्यासाठी दोन वेणीला लावण्यासाठी दोन रिबीन घ्यायच्या म्हणून घरातून बाहेर पडताना आईला आधीच सांगून ठेवले होते.. त्याची खरेदी अजून झाली नव्हती.रिबिनशिवाय ती परत जायला तयार नव्हती.शेवटी तिला आबाने तिच्या आवडीच्या रिबन गावातील दुकानातून घेऊन देण्याचे कबूल केली. ती खुलली आणि परत यायला तयार झाली.

 

आप्पा वैकुंठाच्या सर्व हालचाली दुरून कौतुकाने टिपत होते.

अवखळ, निरागस वैकुंठा त्यांना त्यांच्या विनायकसाठी आवडली होती. तेव्हा वेळकाळ बघून लवकरच मधुकररावांकडे वैकुंठाचा हात विनायकसाठी मागायचे त्यांनी ठरवले.. मधुकररावसुध्दा विनायकची निवड वैकुंठासाठी करून या दोघांच्या लग्नाला तयार होतील हा मनोमन विश्वास त्यांना होता..

वैकुंठाच भोसले घराण्याची सुन होणार..

आठ भावांचा विस्तार असलेले भोसले घराणे…

सात पिढ्यांपासून चालत आलेली श्रीमंती…

विनायक त्याच्या आईवडीलांचा एकुलता एक मुलगा.. सर्व चुलत भावंडांत लहान.. बाकीच्या भावांना प्रत्येकी दोन दोन मुले..

काही मुलांची लग्न झालेली तर काहींची राहीली होती. प्रमिलाच्या लग्नातच विनायकची सोयरीक पक्की करून वैकुंठाला सून म्हणून घरी आणण्याचे आप्पासाहेबांनी निश्चित केले…तसे त्यांनी विनायकच्या आईलाही सांगितले.

विनायकच्या आईच्या मनात वैकुंठा आधीच भरली होती.

क्रमशः

 

प्रिय वाचक आमची कथामालिका आवडत असल्यास अवश्य सांगा.

तुमच्या comments चे स्वागत आहे.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
Next Part
शब्दपर्णचे  फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!