शोध अस्तित्वाचा-स्त्री लेख
शोध अस्तित्वाचा-स्त्री लेख

शोध अस्तित्वाचा-स्त्री लेख

 

शोध अस्तित्वाचा-स्त्री लेख

सुनिता तागवान

स्त्री विधात्याची सर्वात सुंदर रचना ! सर्वात सुंदर कलाकृती, उत्कृष्ट चित्र, अप्रतिम सौंदर्य, असिम भावनाप्रधान,प्रिती,स्नेही, काळजीवाहू,प्रेमझरा,मायेची उब हे सर्व गुणविशेषांनी ठासून भरलेलं एक अजब व्यक्तिमत्त्व! पण समाजात तिला हीन लेखले जाते. तिच्या सुंदरतेचा फायदा उपभोगासाठी घेण्याकडे पुरूषांचा कल‌ असतो. ती विधात्याची कितीही सुंदर रचना असेल तरी आता असुरक्षित आहे. आजपर्यंत कितीतरी तरूणींवर अँसिड फेकण्यात आले, त्यात त्यांचे चेहरे विद्रूप झाले.सुंदर असण्याचा असा अभिशाप तिला भोगावा लागतो

तिच्या भावनांचा,मनाचा, स्वातंत्र्याचा कुणीही फारसा विचार करत नाही.या वेळी फक्त एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजू शकते. एक बाई घरातील सर्वांची काळजी घेते, नवऱ्याची काळजी आई बनून घेते पण नवरा तिच्या विचारांना महत्व देतो का? तिला मनापासून प्रेम करतो का? कधी कधी तर जन्म दिलेल्या मुलांकडून ही तिला अपमानित व्हावे लागते.

स्त्री-पुरूष यांत भेद तो कोणता? प्रेमाचा ,विश्वासाचा की हिंमत वा शक्तीचा? या दोघांत भेद शोधतांना मानवी मनाची हळूहळू उकल होत जाते. मुद्दा या दोघांत श्रेष्ठ कोण याचा नाही तर स्रीचे मनोधैर्य कसे वेगळे याचा आपण जरा विचार करूया.
पत्नीच्या निधनानंतर पती लगेच दुसरी पत्नी करतो. घर, कुटुंब सांभाळायला आवश्यकता आहे असं जग समजतं. पुरूषाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर एका स्रीची गरज भासते हे उघड उघड सत्य आहे. पुरूष मनाने कितीही खंबीर असो,अमाप पैसा असेल तरीही त्याला पत्नीची गरज पदोपदी जाणवते.

स्त्री लहानपणापासूनच पुरूषांवर अवलंबून आहे, नव्हे तर तिला पुरूषावर अवलंबून राहण्याचेच धडे दिले गेले. लग्नापूर्वी आई-वडील म्हणतात..”कशाला जास्त शिकायचं?लग्न झाल्यावर तुला घरच तर सांभाळायचं आहे”. अशा विचारांमुळे मुली परावलंबी होत आहेत. काही मुली आपण खूप नाजूक असल्याचे भासवतात. हिंमतीने लढणे सोडून गुलामगिरी पत्करतात. समाजाची जडणघडण बघता आताही तेच जूने विचार लोकांच्या मनात आहेत. पुरूषाने काम करावे,बाईने घर सांभाळावे, मुलांचे संगोपन करावे. स्त्री ही पुरुषाची गुलाम असून तिचा उपयोग उपभोग घेण्यासाठी आहे असा समज आताही भारतीय समाजात आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता स्त्री मन बदलायलाच पाहिजे, नाही बदलल्यास तिला पुरूषाची गुलाम बनूनच जगावे लागेल हे त्रिवार सत्य आहे.
अगदी बालपणापासून स्री ला तिचे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण सांगितले पाहिजे, शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तिच्या मनात आणि पायात पालकांनी बळ निर्माण केले पाहिजे. समाजातील बुरसटलेल्या जुनाट परंपरा बाजूला सारून नवीन आधुनिक विचारांची कास मनी धरली पाहिजे. तेव्हा कुठे स्री स्वतः चे अस्तित्व निर्माण करू शकेल आणि तिला इच्छित असलेले ध्येय गाठू शकेल.

जरीही स्री नोकरदार असेल किंवा कोणताही उद्योग धंदा करित असेल तरीही तिला आज वैचारिक, आणि आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य नाही आहे असे चित्र आपल्या समाजात दिसून येते.याचा अर्थ असा की, पुरूषप्रधान संस्कृती चा आताही उदोउदो चालू आहे. भारतासारख्या देशात पुरूषप्रधान संस्कृती येनकेन वर्चस्व ठेवून आहे आणि महिलावर्ग पण कुठेतरी या परिस्थितीला जबाबदार आहे असं सखोल विचाराअंती आपल्या लक्षात येतं.

कुठेतरी स्रीवर्गच याला जबाबदार आहे म्हणून आता स्त्री ही स्वतः गुलामगीरीच्या विचारातून मुक्त झाली पाहिजे, आणि तिने स्विकारलेल्या बंधनरूपी बेड्या ह्या तोडून फेकल्या पाहिजे. त्याशिवाय महिलामुक्ती होईल असं वाटत नाही.

आपण बघतो महिला वर्ग कितीही सुशिक्षित वा सुधारित असेल तरीही एक स्त्री आजही मनाप्रमाणे जगू शकत नाही. बालपणी पित्याच्या धाकात, तरूणपणी नवऱ्याच्या धाकात, आणि म्हातारपणी मुलाच्या धाकात..अशी परिस्थिती आजही जैसे थे आहे….. स्त्रिला स्वतः चे निर्णय घ्यायचे असतिल तर ती कशी घेईल, काही व्यवहार करायचे असतिल तर कशी करणार??? ती कधीच आपल्या मनाप्रमाणे जगू शकणार नाही का? बंधनात जगत आली ..तशी बंधनातच मरणार का???

एखाद्या स्त्री ने बंधने झुगारून जगायचा विचार केला तर तिला समाज जगू देणार का?? इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा की, एक स्री च स्रिला समजून घेत नाही,तिला पाठिंबा देत नाही… खऱ्या अर्थाने जर स्री गुलामीतून मुक्त व्हावी असे वाटत असेल तर आधी तिनेच बदलायला पाहिजे.. विचार बदलायला पाहिजे.

एखादी स्त्री संकटात सापडली असता तिला पाठिंबा देऊन साथ दिली पाहिजे.
एखाद्या महिलेचा जर पुरूष मित्र असेल ते ही लोकांना खपत नाही. तिला अनेक दोषणे लावली जातात.स्री-पुरूष मैत्री वाईटच असते असे नाही. तेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. तिला जर पुनर्विवाह करायचा असेल तर तिला विरोध न करता साथ द्यायला पाहिजे..

काही कारणाने एखादी महिला घटस्फोट घेऊन वेगळी झाली असेल , पतीचा मृत्यू झाला असेल आणि तिला मुलबाळं असतिल तर अशावेळी ती मुलांचा सांभाळ करण्यात स्वतः चे आयुष्य उपेक्षितासारखे घालविते. लग्न केले तर ती वाईट आणि लग्न न करता मुलांचा सांभाळ करून जीवन कंठीत असेल तर तिला चांगली बाई समजले जाते. तिने जर लग्नाचा विचार केला तर समाज हसतो,हिणवतो. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तिला तिच्या आनंदासाठी, अस्तित्वासाठी जगू द्यायला पाहिजे असं मला वाटतं. याउलट जर एखादा पुरुष पत्नी मरताच दुसरा विवाह करतो,

कधी कधी मुले होत नाही म्हणून दुसरी पत्नी करतो. घटस्फोट झाल्यावर दुसरा विवाह करतो तेव्हा पुरूषांला कधी हिणवले जात नाही. मग स्रिलाच का हिणवले जाते?? तिलाच का लोकं चुकीचे ठरवतात?

समाजात स्री-पुरूष समानता खूप आवश्यक आहे.  स्त्री-पुरूष समानता झाली तरच पुरूषी अहंकार मोडून पडेल. स्त्रिला समान हक्क कायद्याने दिलेले आहेत. तेव्हा तिला मुक्तपणे, स्वच्छंदी जगू द्यावे. ती कोणी गुलाम नाही, तिला मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. तिचे मन, भावना, विचार यावर कुणी बंधने घालू नये. कारण अस्तित्वहीन जगणे म्हणजे एखाद्या पशूसारखे जगणे होय. तिला तिचे अस्तित्व निर्माण करू द्यावे. आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकलो तरच मनासारखे जगू शकतो.

आज प्रत्येकीने आपले अस्तित्व शोधायला पाहिजे. त्यासाठी स्वत:ला हे प्रश्न विचारा…..मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला? माझे कर्तव्य आणि अधिकार कोणते? मिळालेल्या आयुष्याचा मी कसा वापर करावा? माझे जीवन जगण्याचे ध्येय कसे व कोणते असावे?माझे या पृथ्वीवर काही तरी अस्तित्व आहे, मी कोणाची गुलाम नाही. मी या जन्मी काही तरी नक्कीच करू शकते ,नव्हे मला काही तरी वेगळे कार्य करायला पाहिजे. मी माझ्या जन्माचा उपयोग उत्कर्षासाठी केला पाहिजे, मी माझ्या पायातील या गुलामीच्या बेड्या काढून फेकल्या पाहिजे. अशा विचारांचे काहूर माजू द्या मनात. उठा मनाने,विचाराने  खंबीर व्हा कारण हा जन्म पुन्हा नाही..

मनासारखे जगणे याचा अर्थ मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करणे असेही नक्कीच नाही तर नीतीमत्ता ठेवून
स्वातंत्र्याचा उपभोग घेणे होय. स्वातंत्र्य मिळाले म्हणून पुरूषांच्या बरोबरीने काम करणे आलेच पण आपल्याला पद, प्रतिष्ठा,पैसा, पाँवर मिळाली म्हणून अहंकाराने विनाकारण कुणालाही दुखवू नये किंवा पुरूषांचा अपमान करू नये.

या आधुनिक युगात आता विचार बदलले पाहिजेत. तेव्हाच नव्या युगात आपण आनंदाने वावरू शकू. जसे राष्ट्रमाता जिजाऊ ने चांगल्या संस्काराने शिवाजी महाराजांना घडवले तसेच चांगले संस्कार प्रत्येक आईने आपल्या मुलांना दिले पाहिजेत व स्रीयांचा आदर करणे शिकवले पाहिजे. तेव्हा पुरूषांची विचार करण्याची दिशा बदलेल,ते स्री कडे सन्मानाने बघतिल आणि तिच्या अस्तित्वावर बोट न ठेवता तिचे अस्तित्व मानतिल. कोणत्याही चांगल्या गोष्टीची आणि परिवर्तनाची सुरुवात आपल्या घरापासून व्हावी लागते तेही विरोधाला न जुमानता..

नारी तू घे भरारी
उंच उंच आकाशाला घाल गवसणी
घे खेचून तुला जे पाहिजे ते
राहू नको दुखी: डोळ्यात आणून पाणी

आपली रजा घेण्यापूर्वी खालील प्रश्न वाचून आपण त्याची उत्तरे स्वतः लाच देण्याचा प्रयत्न करू या.

आम्ही स्रिया एकमेकींसाठी पेटून का उठत नाही?
का आम्ही एकमेकींसाठी लढा देत नाही??
बलात्कार झालेल्या मुलीला सांत्वना देतो का आम्ही? बलात्कारी पुरूषाला रस्त्यावर ओढतो का आम्ही??
हुंड्यासाठी छळ चाललेल्या नवविवाहितांसाठी आम्ही आजवर काय केलं??
तिच्या पालकांच्या बाजूने लढलो का कधी??
का आम्ही सगळे डोळ्यानी बघून गुपचूप घरात बसतो??
असे अनेक प्रश्न स्वतःला विचारायची आता वेळ आलेली आहे.

शोध घेते मी स्वतःचा

रोजही शोध घेते मी स्वतःचा
मी कोण हा जन्म कशासाठी?
काय अस्तित्व आहे माझे
जगते तरी कशासाठी?

काय करायचे होते,
काय घडत आहे?
कुणा हाती असे दोरी
कुठे दूर दूर जात आहे?

जीवन जगत आहे की..
दिवस रेटत आहे मी फक्त?
कुठे दडल्या आशा आकांशा
का वाटे आयुष्य विरक्त?

स्वप्न पाहिलेले बालपणी
मोठी मोठी असंख्य
कसे कुठे हरवले ते
दुमडूनी आपुले पंख?

आहे अस्तित्व शोधणे
जरूरी स्वतःचे, कदाचित..
निजले असेल तरी
गवसेल मनाच्या कुपीत

असतील बदलल्या वाटा
नी चित्र ही भावविश्वाचे
स्मित हास्याने सदा
उलगडू रंग जीवनाचे

या लेखावर वाचकांच्या  प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर  इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

3 Comments

  1. Mohini1408

    खूप यथार्थ लेख आहे
    सुशिक्षित समाजाचं वास्तव सत्य मांडले.
    स्त्री च स्त्री ची वैरी बनते, कधी कधी
    आधारही . खरंच अजब रसायन घडवलं विधात्याने.
    तिच्या मनाचा कोंडमारा कधी कळणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!