Marathi poem on life

Marathi poem on life

काय उरते शेवटी?

 

काय उरते शेवटी??
लूळा-पांगळा झालेला,
उपकाराखाली दबलेला देह..
विट-विट रचलेल्या घरात
भेटतो एक कोपरा,
उदास, अंधारलेला, ढगाळलेला…
हौसेने घेतलेल्या पैठणी,शालू
असतात कपाटभर,
अंगावर असते फक्त
एक लक्तर वारभर….
कुठे?उरतो यौवनाचा भार,
आणि श्रीमंतीचा माज
उरते फक्त एक वेदना,
एक कळ निरंतर मरेपर्यंत….
काय उरते शेवटी?
काहीचं नाही…..

शारदा

Marathi poem on life

आयुष्याचा कागद-

आयुष्य वही आहे पानाची
आयुष्य उधळण आहे रंगाची

लिहीत गेलो रंग भरत गेलो
आयुष्य जगताना तंग होत गेलो

दुःखाचा रंग भडक लाल
रडून रडून सुकायचे गाल

सुखाचा रंग गडद हिरवा
जीवनात मिळायचा गारवा

एक दिवस जीवनात वावटळ आली
होते नव्हते सारे रंग उधळून गेली

शेवट माझ्या जीवनाचा ठरला
आयुष्याचा कागद कोराच उरला

✒️सौ.राजश्री म. हिमगिरे (विभुते)
नांदेड

आयुष्याचे दळण

 

आयुष्याचे दळते दळण
चार चार टाकीत दाणे
जात्यांच्या दोन्ही पाळूत
गात असते जीवन गाणे

सांगते, गऱ्हाणे भल्या पहाटे
मामा भाच्याचे गात गाणे
ऐकताना, मला वाटे छान
सुख चांदणे पिठात पाहणे

माझे सखे ,जाते ,रूचणा, खुठा
होते जिवाचे झाडतणे
नंदा जावांचे वागणे
सासू सासऱ्याचे टोमणे

दळण कांडण हेच नशिबात
तरी हो, उजडावी सकाळ
लेकरांच्या आयुष्यात
कधी नकोच दुष्काळ

भेगाळून जाते धरती
तसे भेगाळते मन
अंधारल्या ऊन्हाचे नको चटके
जीवनाचे व्हावे, चंदनी चंदन

चंद्रकांत गायकवाड,
मुखेड.

 

आयुष्याचा लेखाजोखा

 

ऐन उमेदीच्या काळात

तारुण्य भरास असताना
बेदरकार असतो आपण
हातातुन जाणते अजाणते पणी
झालेल्या चुकांना
नाती जपताना
मनं सांभाळताना
दुसऱ्यांना जबाबदार धरत जातो
कधी नाती तुटतात
कधी संबंध बिघडतात
कधी माणसं सुटतात
पण मनाचा अभिमान
मनाचा अहंकार
एवढा टोकाचा असतो की
दाखवत नाही आपण
जरी चुटपुट लागलेली असते मनातुन
आणि
हातातुन काही निसटुन गेल्याची जाणीव
निभावत असतो
आयुष्यातले चढउतार
समर्थपणे, स्वतंत्रपणे
आत्मनिर्भर असल्याचं दाखवत
पण
आयुष्याच्या सायंकाळी
जणु आयुष्याचा लेखाजोखाच मनात तयार होऊ लागतो
काय गमावलं
काय कमावलं
काय दुरावलं
काय तोडलं
ह्याचा सगळा हिशोब
प्रामाणिकपणे मांडला जातो आतल्या आत
आस लागते मनाला
तुटलेली नाती सांधण्याची
राहुन राहुन आठवतात
दुर गेलेल्या आठवणी
बोलावणं धाडलं जातं
येऊन भेटण्यासाठी
समोरचाही जणु त्याच
अवस्थेत असतो मनाच्या एकमेकांना
माफ करून भेटणं होतं
आसवांच्या धारात
मान अपमान
वाहुन जातात
मन नितळ होतं
प्रस्थान ठेवताना आता
डोक्यावर कोणतंही ओझं नसतं

सौ वीणा विश्वास चव्हाण

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
error: Content is protected !!