मनातील कविता-वीणा विश्वास चव्हाण
मनातील कविता-वीणा विश्वास चव्हाण

मनातील कविता-वीणा विश्वास चव्हाण

मनातील कविता-वीणा विश्वास चव्हाण
तिचा रंग

मनातील कविता-वीणा विश्वास चव्हाण

संसाराच्या वाहत्या
प्रवाहात
विसर्जित करते ती
तिचा स्वतःचा
रंग
तादाम्य पावत
सुखदुःखाशी
होऊन पाण्यासारखी
कोणत्याही रंगाला स्विकारत
परावर्तीत होते
नव्या रंगाच्या अविष्कारात
पण अगदी
सूक्ष्म कणांच्या रूपात
पाण्याच्या तळाशी
असतो अस्तित्वात
तिचा स्वतःचाही रंग
नाही दिसत कधी
पृष्ठभागावरून
जावं लागतं
एकदम खोल
अंतरंगात
तिथं असतं काही
साचलेलं
असतं काही लाव्ह्यासारखं
जपलेलं
असतं काही मनातलं
सहृदयास सांगावं असं
अनेक वेळा
वाहवा होते तिची
कैक वेळा ती
कोतुकास पात्र होते
सहज संसारात विरघळते
म्हणून
पण खरंच नसतं
हे खरं कधी
कधी एखाद्या
निवांत क्षणी
कधी मनाच्या
श्रांत क्षणी
वाटतो जपावा तिला
स्वतःचाही रंग
जो असतो आवडलेला
पण ओळख हरवलेला

 

संवेदना रहाव्यात जिवंत!

मनाच्या संवेदना राहाव्यात जिवंत अगदी आजीवन
टिपुन घ्यायला सृष्टीची
वेगवेगळ्या ऋतुतली
मनोहारी रूपं,
पहाट होतानाची
पक्षांची किलबिल कानांना वाटावी
संगीतातील रागदारी,
उमललेली फुलें पाहुन
उमटावं चेहऱ्यावर
प्रसन्न हसू
दरवळ त्यांचा भरावा
तनमनात
करून रोम रोम
प्रफुल्लित
सुर्योदय सोनेरी यावा
नवीन दिवसाच्या नवीन आशा घेऊन,
शिशिरातील पानगळ,
झोंबणारा वारा आणि
सुर्याच्या तप्त काहिलीत
वसंताची वाट पाहणारी
सृष्टि,
वाटावी नवोढा
वसंत ऋतूचं आगमन,
वर्षा ऋतूचा प्रपात,
आणि श्रावणाचं रिमझिम इंद्रधनुष्यी आगमन
टिपत राहावं मनानं
हिरवं होऊन,
अनुभवावी रात्रीची निरव शांतता
मोकळ्या
आकाशाखाली उभं राहुन
पाहावं ओघळणारं चांदणं आणि
चांदण्यांनी भरलेलं
आभाळ अचंबित
होऊन,
मनाच्या संवेदना अशा राहाव्यात जिवंत सदा
आयुष्यातील अनेक चढ उतार, अनुभवतानाही ,
राहावं थोडंसं ते हळवं
माणसामाणसांतील नातेसंबंध जपण्यासाठी
आणि
एकमेकांच्या सुखदुःखात धावुन जाण्यासाठी,
मनातले समज
गैरसमज दुर करून

जगणं विसरतात

जगण्याचे प्रश्न असतातच प्रत्येकाचे पण
काही जगतात रोज तणावात
नाही जमत
त्यांना जगण्याच्या प्रश्नांना सहज भिडणं,
निसटुन जातात
छोटे छोटे आनंदाचे क्षण
अलगद यांच्या ओंजळीतुन,
शोधत असता
प्रश्नांची उकल
कधी एखादं गाणं यांच्या कानावरून उडत जातं पण नाही घेत हृदयाचा ठाव,
नाही जाणवत कधी
फुलांचा सुगंध
रस्त्याने कधी जाता येता
ऐकू येतं नाही पक्षांचं कुजन
अवचित एखाद्या
झाडावरून
नाही स्पर्शत शिशिराचा
गार वारा, नाही रोमांचत तन मन,
सलत असतात
यांच्या मनात रोजचे
प्रश्न ठाण मांडुन
मुसळधार पावसात भिजत नाहीत ते मनाने
जरी भिजतात शरीराने
नाही जमत त्यांना छत्री
फेकुन पावसात नखशिखांत न्हाऊन जाणं
शिशिर जातो वसंत येतो यांचे दिवस सारखेच असतात
जगण्याची लढाई लढताना
जगणंच जणु विसरून जातात

 

वृद्धत्व-मराठी कविता

झाली आहे संध्याकाळ
आयुष्याची
इतिकर्तव्ये
पार पाडताना
थकलेल्या गात्रागात्रांची
घाबरवते आहे
मनास भीती
येणाऱ्या गडद रात्रीची
रमवण्या जीव जरी
कधी आणला
उत्साहाचा आव
फुटतो तो बुडबुड्यासारखा
जेव्हा शरीर देत नाही साथ
कंप आहे बोलण्यात
कंप आहे वागण्यात
शिथिलता आली आहे
संपुर्ण कंपाने हलत
असलेल्या शरीरास
खोळंबुन
नाही राहु शकत
कोणी इथे
प्रत्येक जण जातच
आहे पुढे
आणि
वृद्धत्व
एकटचं पडत चाललय मागे
भुतकाळात जाऊन
निवांतपणे
जागवल्या जातात मग
आठवणी सुखाच्या दुःखाच्या
मागेच जाऊन अडकतो
आता मनाचाही विरंगुळा
प्रस्थानाची
तयारी करताना
होतं आहे मन चलबिचल
कोणत्याही क्षणी
सोडुन जावं लागेल हे सारं
म्हणुन भीतीने ते थरथरतंय

 

पिकली पानं

पिकली पानं गळुन पडतात
नकळत, हळुहळु, एकेक
कधी झाडाला होते
जाणीव त्याची तर
कधी सहज गळुन जातात अलगदपणे
कधी तरी हिरवी गार असलेली ती
झाडांचा पर्णसंभार
शोभिवंत करत जगलेली
तप्त सुर्यप्रकाशात हरीतद्रव्य निर्माण करत
झाडांचा प्राण झालेली
ऊन, वारा पाऊस
यांच्याशी दोन हात करत
हलत राहिलेली
श्वास उश्वासः घेत घेत
पक्व होतात
आणि पिकली पानं होऊन
गळुन पडतात
निसर्गाचं एक चक्र म्हणुन
कधी मन दखल घेतं
कधी नाही
गळुन पडतात जमिनीत
मातीत माती होऊन मिसळतात
खोल खोल जातात धरणीत
अगदी झाडांच्या मुळापर्यंत
आणि परत कधीतरी
जन्म घेतात
कोंब होऊन, पाती होऊन
पिकली पानं अशी जन्म
घेत राहतात
जगण्याची साखळी होऊन
पुनः पुनः

 

 

कुपी….. सुगंध आठवणींची

आयुष्याच्या प्रवासात
कडु गोड
आठवणीं साठवत
त्यांचे गाठोडे बांधुन
ओझं होऊ द्यायचं
नाही कधी
मोकळ्या हातांनी
सहज चालण्यासाठी
कडु आठवणीं
मागे टाकत
आनंदाचे क्षण
हृदयात साठवत
चालत राहायचं
खुप कठीण असतं
असं हे
माणसाला
देवमाणुस होणं
पण मणामणाचं
ओझं नसतं
डोक्यावर
जेव्हा आपण असतो
शेवटच्या थांब्यावर
सुकर व्हावा
जीवनाचा प्रवास
म्हणून कुपी
सुखद आठवणींचीच
असू द्यावी
हृदयाच्या कप्प्यात
एखाद्या
निवांत क्षणी
हळुच उघडावी
सुगंध घेत
जगण्यासाठी
आणि
मनावर असलेल्या
कोणत्याही
ओझ्याशिवाय
आयुष्याची संध्याकाळ
व्यतीत व्हावी

कविता 

कविता संवेदनशील मनाचं परावर्तित चित्रण
शब्दांनी गुंफलेलं एक अनोखं गुंफण
कविता असते
कमीच शब्दांत केलेलं
भावनांचं वर्णन
कविता करते कधी
निसर्गाचं रेखाटन तर
कधी मानवी स्वभावाचं
यथार्थ दर्शन
कविता लिहिते कधी
नातेसंबंधाचं गुंतणं
तर कधी समाजमनाच्या
खोलात जाणं
कविता असते शब्दांनी
करावी मैत्री म्हणुन
सरस्वतीला केलेलं आवाहन
शब्दांनी चपखल बसावं
म्हणुन केलेलं वैचारीक
मंथन
कविता एक सरताज साहित्यातला
सर्वांना भावणारा
जणु सारांश जीवनाचा

सौ वीणा विश्वास चव्हाण

 

कोकण एक देवभूमी

गाडी रस्त्यातून
भर भर पळत असताना
हिरव्या रंगाचा
विस्तीर्ण पडदा
उलगडत जातो
रीळ उघडल्यासारखा,
मोहवत जातो
हिरव्या रंगाच्या विविध छटात
पिवळी धमक फुले
अंगावर घेऊन,
पसरलेल्या पठारावरच्या
चमकदार पोपटी रंगात
तर कुठे
गच्च वनराई
उभी असते
लक्ष वेधून घेत
गडद हिरव्या रंगात,
अनेक डोंगर नजरेस
पडत राहतात
हातात हात घालुन
रांगेत उभे असलेले,
सजलेले, बहरलेले
असंख्य पानांनी,
उत्तुंग,उभे
आकाशात झेप घेत,
आणि
प्रत्येक झाड असतं
एक दुसऱ्याशी गुजगोष्टी
करत,
भेटत राहतो
हा उत्तुंग पणा
परत परत
डोंगराच्या रूपात
संपूर्ण प्रवासात
मनाला अचंबित करत,
एखादं कौलारू घर
उभं असतं
एकटंच दूरवर
जगाला फाटकारून
तटस्थ, विरक्त निसर्गात
तर काही विखुरलेली
दिसतात खोल दरीत
डोंगराच्या कुशीत
विसावलेली
खात्री पटत राहते
प्रत्येक क्षणाला
कोकण देव भूमी
आहे याची
खळ्खळ्णाऱ्या
नद्यांच्या प्रवाहात
खोल खोल पाण्याच्या डोहात
नारळी पोफळीच्या बागांत
अथांग समुद्राच्या
लांबच लांब लाभलेल्या
शुभ्र वाळूच्या किनाऱ्यात
आणि
नागमोडी रस्त्याच्या
दुतर्फा
मुक्त हस्तांनी
उधळण केलेल्या
निसर्ग सौन्दर्यात

 

 

 

कालिदासाचा मेघदूत

आषाढातल्या
काळ्या ढगांनी
गच्च अंधारलेल्या
आभाळाकडे पाहून
आठवतोच
कालिदासाचा मेघदूत
एकदा तरी
असते ती
वाऱ्याबरोबर पळणाऱ्या
काळ्या ढगांची किमया
ओल्या झालेल्या
ढगांपरी तुडुंब भरलेल्या
मनाची किमया
कालिदासाचा मेघदूत,
जो असतो दबलेला
हृदयाच्या एका कप्प्यात
दडलेला,
मनाच्या खोल खोल
गाभाऱ्यात
जगणं जगताना
अपरिहार्यतेने
मागे टाकलेला
हळूच येतो डोळ्यांत
कोसळणाऱ्या पावसातुन
गार गार वाऱ्यातुन
शहारणाऱ्या तनमनातुन
उमगतो तो
सुखद शिरशिरीतुन
आठवतात मग
मागे पडलेल्या आठवणी
येते एक हुरहुर दाटुन
मन येते ढगांसारखे भरून
वाहणाऱ्या काळ्या ढगांना
सांगितलं जातं
काही आवर्जुन
पुन्हा पुन्हा,
न विसरण्याची
आर्जवं करून

 

 

पालकत्व

पालकत्व
असीम आनंद देणारं,
पालक म्हणून घडताना
निरपेक्ष प्रेम करत
स्वतःचीही परीक्षा देत जाणारं
ते नसतं नुसतं
आनंदाच निधान
ते असतं जबाबदारीचं विधान
मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांना
शिस्तीचे धडे देताना
स्वतःला जोखत,
अनेक परीक्षेत उतरवत
स्वतःलाही शिस्तित बसवणारं
मुलं वाढताना त्यांच्याबरोबर
प्रगल्भ होत जात
स्वतःच्या स्वभावात सुधारणा
करणारं
वर्तणुकीचे अनेक प्रश्न
उपस्थित करत
कोड्यात टाकणाऱ्या पाल्यांना
समजावून घेताना
child pschycology चं पुस्तक वाचणारं
आपापल्या बुद्धीच्या कुवतीनं
बऱ्या वाईटातला फरक
समजावताना
आपलंच तर काही चुकलं नसेल ना
म्हणून कधी खंतावणारं
चाकोरीबद्ध आणि चौकटीत
गेलेलं आपलं आयुष्य
आणि आता चाकोरीतून
बाहेर पडून
चौकटी तोडणारं
पाल्यांचं आयुष्य
सगळंच त्यांना संभ्रमित करणारं
काय चूक आणि काय बरोबर
ह्याचा अंदाज येत नसताना
जगरहाटीशी स्पर्धा करत
शर्यतीत धावणारं
किशोर वयात मनाच्या अडनिड्या अवस्थेत
निसरड्या वाटेवरून चालताना
पाय घसरून ती
पडणार तर नाहीत ना
म्हणून काळजी करणारं
न चिडता, त्रागा न करता
Cool parents
होण्याची कसरत करत
बाहेरून chill दिसण्याचा
आटोकाट
प्रयत्न करणारं पालकत्व
असतं नेहमी
सजग आणि सुजाण

 

मनातली द्वंद

मन कधीआकस धरीत
स्वतःला आक्रसून घेतं
कधी गैरसमजाचं वादळ
जपत
अशांत राहतं
कधी मोठेपणा मिरवत
अहंकाराने फुगतं
कधी कमी वाटून घेऊन
स्वतःला कोसत राहतं
मनातली अनेक द्वंद्
अशी
आपल्याला आयुष्याच्या वाटेत
वारंवार भेटत राहतात
कधी अप्रिय घटनांतून
कधी अप्रिय माणसांच्या
भेटीतून
कधी अप्रिय अनुभवांतून
कधी शांत राहून आपण
सगळं स्विकारतो
कधी मागे फिरून स्वतःच्या
मनास समजावतो
कधी ‘स्व ‘ची ओळख
करून देण्यास सरसावतो
द्वंद् मनातली पुसून टाकून
निर्लेप आणि निर्मळ जगणं
बऱ्याच वेळा
कठीण असतं
अनेक वेळा
आपल्या इच्छेविरुद्ध
ती
कायमच आपल्या
जगण्या बरोबर
जगत राहतात
कधी अनियंत्रित होऊन
कधी गरज म्हणून
कधी आपणच ओढवून घेऊन

 

 

मनस्वी अस्तित्व-स्त्री कविता

सृजनतेची देवदत्त
देणगी मिळालीय तिला
आणि म्हणूनच शरीरही
सक्षम बनवले निसर्गाने
वेदना घ्यायला आणि सोसायलाही
वेदना सहन करत
सोशिक होणं
हा तिचा अभिजात गुण म्हणावा
की दुर्गुण म्हणावा
इतकी अडकत गेली ती
ओठ मिटून घेत जगण्यात
आणि स्वतःच्या मनातील स्पंदनं
जाणवु न देण्यात,
सहन करत गेली स्वतःला
समाज मनाला भान
येईपर्यंत
तिच्या मनस्वी अस्तित्वाचं,
चढवत गेली अंगावर
एकेक गुण अलंकार म्हणून आणि
सजत गेली देवीचं रूप होऊन
मनातली स्थित्यंतरं न दाखवता,
आताही तिची बंडखोर,
पुरोगामी आणि वास्तवतेची
अनेक रूपं दिसत असताना,
जीव लावणं आणि जीव ओतणं
सोडून नाही दिलं तिने
तो तर तिच्या जगण्याचा
स्थायीभाव झालाय कायमचाच
का कोण जाणे
पण कित्येक वेळा
अपमानित होऊनही
मनापासून गुंतत जाते ती
सगळ्यात
अलिप्त न राहता पुनः पुनः
घराचा कोपरा न कोपरा
उजळतो तिच्या चैतन्याने आणि
चार भिंतींचं घर सजीव
होऊन जातं तिच्या असण्याने
रोज लागणाऱ्या
ताट, वाट्या, चमचे
सुद्धा तिचे आप्त होतात
सहवासाने
हे असं सर्वार्थाने
मुलामाणसात,चराचरात
मिसळून जाणे म्हणजेच
स्त्रीत्व असतं का?
सायंकाळी तुळशीजवळ
दिवा लावत
मंगल मांगल्याची आर्जव करत
प्रत्येकासाठी काहीतरी
मागत असते ती
देवाजवळ

 

 

एक घोट पाण्यासाठी

अफाट अशा वाळवंटांत
एक घोट पाण्यासाठी
धावत होता तो
व्याकुळ होऊन,
सगळं बळ एकवटून
रणरणतं ऊन होतं
पायांना चटके लागत होते
अखंड अशा घामाच्या धारात
व्याकुळ होऊन
धावत होता तो
एक घोट पाण्यासाठी,
पाय वाळुत रुतत होते
सावलीसाठी झाड नव्हतं
त्याला वाटलं उन्मळेल
तो
एखाद्या निष्पर्ण झाडागत
निष्प्राण होऊन,
तेव्हढयात नजरेस जाणवतो
त्याच्या
पाण्याचा एक अथांग जलाशय
त्याच्या अगदी समोर येऊन
सारं बळ एकवटून
धावू लागला तो
परत एक घोट पाण्यासाठी,
अंतर जलाशयचं कापत नव्हतं
पाणी हाती लागत नव्हतं
जीव तुटेस्तो धावता धावता
खरंच
तो उन्मळून पडला
तृषार्त तो
एक घोट पाण्यासाठी
अखेर निष्प्राण झाला
नव्हता तिथे जलाशय
नव्हतं तिथे पाणी
ते होतं एक मृगजळ
अफाट अशा वाळवंटी
ओढून नेत होतं त्याला दूरवर
एक घोट पाण्यासाठी
एक घोट पाण्यासाठी

 

कष्टकरी

अगणित असंख्य दिव्यांनी
झगमगणारं शहर
रात्रभर जागं असतं
विजेची रोषणाई
रस्त्यारस्त्यांवर असते
कष्टकऱ्यांच्या झोपडीत
मात्र दिव्यांचीही वानवा असते
कोणी असतं अंधारात
तर कोणी टिमटिमत्या दिव्यात
नशीब अजमावायला आलेले
दहा दिशांनी दहा लोक
आसऱ्यास असतात मिळेल तिथे टेकु लावुन
कुणास मिळते चावी
यशाची तर
कुणी जीवनभर धडपडतो निवाऱ्यासाठी
प्रेम, माया, ममता
सोडून येतात दूर दूर जन्मगावी
प्रत्येक क्षणीे इथे देतात कसोटी जगण्याची
कुणाच्या मनी दाटते हुरहुर
प्रियजनांना सोडून दूर
कुणी जीवनसंघर्षात
अपमानाने होतात चूर
कुणी झोपतो
फुटपाथवर
पाय घेऊन पोटाशी
कुणी झगडत असतो
झोपडीत
पडणाऱ्या पावसाशी
थंडी, वारा, ऊन, पाऊस
शहर घेतं कुशीत त्यांना
धडे देत जगण्याचे
लढत लढत जिंकताना

 

बदलणारे मुखवटे

अनेक प्रकारचे
अनेक मुखवटे
घालुन वावरत असतात माणसे
कधी साळसुदपणाचे
कधी स्वार्थ साधण्यासाठी
हेतूपूरस्सर केलेल्या मैत्रीचे
कधी तारणहार असल्याचे
भासवून चढवले जातात मुखवटे
पण कधी
अपरिहार्यच होऊन जातं माणसाचं
मुखवटे घेऊन जगणं
कुणी असतो विवंचनेत
कुणी
रडतो आतल्या आत
पण यावं लागतं
समोर त्याला हास्याचा
मुखवटा घेऊन समाजात
कधी
एखाद्याच्या मनात
आनंदाचं उधाण असतं
पण व्यक्त व्हावं लागतं
सावधपणे
समोरच्याचा अविर्भाव पाहुन
कुणास वाटते असूया दुसऱ्याची
त्याच्या यशाची, बुद्धीची
पण कौतुकात सामील
होतो तो
चढवून मुखवटा हितचिंतकाचा
काहींना घालावे लागतात
मुखवटे
स्वतःला सिद्ध करत
जगण्यासाठी तर
काहींना समाजाबरोबर
चालण्यासाठी
काहींना जीवन संघर्षात
तगण्यासाठी,
प्रांजळ आणि प्रामाणिक,
माणूस फक्त स्वतःशीच
असतो
म्हणून क्षणाक्षणाला
मुखवटे
बदलणारा सुद्धा
रडतो कधी एकांतात
रागावतो स्वतःवर,
स्वतःच्या कुवतीवर आणि
मोकळा होतो
रडून,रागावून,
मुखवटा सोडून
एका क्षणासाठी
स्वतःशीच असं मोकळं होणं
खरंच खुप खुप
गरजेचं असतं
कधी कधी
स्वतःशीच संवाद साधणं
आणि
दुसऱ्या क्षणाला
मुखवटा

‘ स्व ‘च समर्पण

अनेक अनेक पिढ्या पासून चालत होतं ते
भाजी चिरता चिरता बोट कापायचं बऱ्याच वेळा
आणि त्या संयमाने भाजी चिरायला शिकायच्या
स्वयंपाक करता करता भाजायच्या कित्येकदा
आणि हळु हळु चविष्ट स्वयंपाक करायला शिकायच्या
अल्लड वय असायचं खेळण्याचं,
आणि बरीचशी घरकामे असायची डोक्यावर
जमत नसताना ही जमवायला शिकल्या त्या
सवयीने घर सांभाळायला लागल्या,
मनात असायचं काही कधी हौसेने मागायचं,
पण जीभ रेटायची नाही
कधी मोठ्यां पुढे
हळु हळु मनाला नाही म्हणणे शिकु लागल्या
मनाने नाराज होणे जणु नित्याचा भाग झाला
म्हणुन मग
छोट्या छोट्या क्षणांतच आनंद शोधु लागल्या
जे मिळत होते सहजपणे
जे सापडत होते सहजपणे
तेच म्हणजे जगणे असते
याची सवय करून घेतली त्यांनी
अशा कितीतरी स्त्रिया जगत आल्या
कोणतीही तक्रार न करता
आपली आजी, आई, सासूबाई,
आत्या, काकी कित्येक
जणी
समर्पण त्यांचे, संयम टोकाचा,
कदाचित म्हणूनच
कुटुंबसंस्था घट्ट रुजत राहिली या जमिनीत
कदाचित म्हणुनच
विवाह संस्थाही
अजुन टिकून राहिली इथे
कधी फुलू दिली नाही त्यांनी स्वतःच्या ‘स्व’ ची जाणीव,
कधी फुलू दिल्या नाहीत
स्त्री ही माणुस असल्याच्या जाणीवा
कदाचित कोणताही सल जपायचा नव्हता त्यांना हृदयात आणि नदीसारखं वाहतच
राहायचं होतं,
तेव्हा तसं जगणं अपरिहार्य होतं, काळाला सापेक्ष होतं
आता स्व ची जाणीव
झाली आहे टोकदार
हे ही काळ सापेक्षच,
जे व्हायला हवं होतं
कितीतरी वर्षां आधीच,
पण म्हणून
मनाचं स्वातंत्र्य जे
मिळालंय
कित्येक वर्षांनी,
संयमाचा तोल सांभाळुन उपभोगायला हवं

सलतयं का%

2 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!