Marathi Poem-सुरेखा मोगरे
सोन्याचा दिन
संकटे येती आणिक जाती
चक्र निरंतर चालणार
उद्या कुणी पाहिला मानवा
उत्तम जीवन जगणार….. !!1!!
खडतर वाटा आल्या जरी
नाही आम्ही डगमगणार
संघर्ष करुनी प्रसंगाशी
जणू नव्या दिशा काढणार…!!
सूर्य, चंद्र, तारा सम बनू
प्रयत्नवादी हो ठरणार
आशा न ठेवती ही फळाची
आम्ही नित्यकर्म करणार….
माणुसकीचे नाते जपून
प्रेमानी सर्वांशी वागणार
प्रत्येकाशी सौजन्याने आम्ही
संस्कार बाग फुलवणार…..
हे ही दिवस जातील आता
सोन्याचा दिन उगवणार
सकारात्मक राहुनी आम्ही
वर्तमान पुढे चालणार….
थोरवी संतांची शिकवण
आचरणात हो आणणार
सकळाचे करू भले हाच
संदेश हाची वदवणार…..
फुलपाखरा सवे स्वच्छंदी
आता नभी भरारी घेणार
दुःख सारे विसरून जाता
सुख क्षण सरसावणार……
महाराष्ट्राची शान बाण तू
निराधार बालकाची आई
कर्तबगार महिलांसाठी
लाडक्या प्रेरणादायी माई…
महाराष्ट्रातल्या खाणीतून
जन्म घेतलास तुम्ही माई
मी मराठी असल्याचा तुम्ही
बाळगला अभिमान आई….
ऊन, वारा, पाऊस तरीही
नाही थकलीस तू मनाने
जीवाची पर्वा न करता तू
झेप नभी नव्याच ऊर्जेने….
सकारात्मकतेचा हा झेंडा
सुगंधा परी दरवळला
हसतमुख राहून माई
भुकेल्यांना घास भरविला…
सिंधुताई सपकाळ नाव
तरुणाईची हो झाली आई
गौरविले महाराष्ट्राला तू
समाज कर्तव्यातून माई….
ऐतिहासिक कथेवर आधारित एक कविता
ऐका हिरकणीची ही गाथा
सांगतो सख्यांनो तुम्हा आता
पश्चिम गडाचा इतिहास
संध्यास सूर्य अस्त्याला जाता…
हृदय हेलावून हो जाईल
पराक्रमी ही शूर, धाडसी
स्त्रीत्वाला तिचा ग अभिमान
निर्धार पक्का करी मानसी…
कोजागिरी पौर्णिमेचा सण
गडावर उत्सव हा भारी
गावकऱ्यांना आमंत्रीत
नाचती गाती आनंदी सारी…
महाराजांचा दरबारी ग
नियम काटेकोर पालन
सैनिक प्रामाणिक राबती
डोळ्यात तेल घालून….
काळजाचा तुकडा घरीच
धरीला ध्यास ग लेकराचा
अडवणूक करणाऱ्यांना
दिला लढा तिने संघर्षाचा…
सैरावैरा पळत सुटली
नाही भान ही तिला कशाची
वाटेतले काटे कितीतरी
नाही केली परवा जीवाची..
आश्चर्यचकित सारेजण
हाहाकार हा दरबारात
कशी उतरली गवळण
सारे पडले हे विचारात….
शिवाजी महाराजांनी बाई
केला तिचा आदर सन्मान
बांधून बुरुज हिरकणी
नावान लागले ओळखून..
सावळा मुरारी-कृष्णकविता
शिरी शोभे मोरपंख
कानी कुंडल सोन्याचा
वस्त्र पिवळे धारण
गळा हार हा मोत्याचा……!!1!!
रंग भाळवी सावळा
भावना नयनात दिसे
रूप तुझे न्याहाळून
अंतर्मनी स्वप्न वसे….
केस चमकती काळे
बासुरीच शोभे हाती
नेत्र हे कमळापरी
जपे प्रेमाची ही नाती….
दही दूध लोणी खाई
घागर भरून बाई
सावळा मुरारी आता
खोड्या काढी कान्हा बाई..
.
दृष्ट कुणाची न लागो
कान्हा तुला आता अशी
जीव ओवाळून टाकू
भावना आवरू कशी……
माय माझी
माय माझी उन्हाची सावली
आभाळा एवढी तिची माया
जिव्हाळा प्रेमळ आपुलकी
जणू वटवृक्षाची ही छाया..
संस्कार रुपी वेल ही गगणी
मायेच्याचं आधाराने घेई
उंच उंच झोका अंतर्मनी
मायेचा स्पर्श प्रेमच देई..
माय माझी ग विचारधारा
त्याचं प्रवाहात वाढलेली
शांत सागर वाहतो झरा
भावनाच मनी साठलेली…
वाहत्या पानावर ही काठी
मारली तरी पाणी एकच
मायलेकीचा अतूट नातं
जन्मोजन्मी नवं नवीनच…
भुकेल्याची भूक भागवून
तहानलेल्याची तहान ती
गरजूंना मदतीचा हात
नकळत संस्कार देई ती….
मानव हो जागा
पर्यावरण हा दिवस
साजरा करूया मानवा
जन्मोजन्मी येईल दिन
आशेचा किरण जागवा…..
पर्यावरणाचा हा ऱ्हास
थांबवा आताच मानव
तुझाच जीव संकटात
नकोस बनू तू दानव…..
ओझोनची कमतरता
जाणवत आहे फारच
सावध हो आता मानव
जगणं कठीण सारच….
आयुर्वेदिक औषधांचा
मात्रा या उपचारांसाठी
लाभती हीच संजीवनी
उत्तम हे आरोग्यासाठी…
वसुंधरेचे सौंदर्य पण…
जपूया आपण सारेच
वृक्ष लागवड करू या
देई थंडगार वारेच….
एकतरी लावा हो झाड
मनी नवा संकल्प धरु
कर्तव्यदक्ष राहूनिया
सर्व मिळूनी काम करू….
बरसला मेघ
सरी बरसता येई
जणू आनंदाच्या लाटा
मन आकर्षित होई
झाल्या मोकळ्या वाटा.
रानी वनी डोंगरात
काढी वळणाची वाट
काना कोपऱ्यात जाई
पार नागमोडा घाट…
फुले पाने बहरती
स्वर मधुर गावूनी
पक्ष्यांचीही कुजबुज
बरसत्या सरी पाहुनी…!!3!!
मेघ बरसला पहा
ही किमया निसर्गाची
किती अद्रुतच सारे
फुले सृष्टीच सौंदर्याची….
माया आभाळाची झाली
वसुंधरा सुखावली
सारे संकट मानवा
दूर ही सरसावली…
अंगणात बरसल्या
पावसांच्या आता सरी
लतावेली फुलण्याचा
आनंदच घरोघरी..
आम्हा तुझा सहवास
वाटे जीवना आधार
तुझे कौतुक करण्या
आम्ही मानितो आभार.
प्रीतवेडी
प्रेमाचा सुगंध मोगर्याचा
दरवळे क्षण आनंदाचा
प्रीत फुले झुलती गगना
किती भोळा ग माझा साजना..
मन आभाळा एवढे तुझे
नित्य जिद्द व चिकाटी रूझे
कार्यरत विचार धारणा
किती भोळा ग माझा साजना…
मदतीचा हात पुढे असे
दुःखातच साथ तुझी वसे
सर्व सुखी ठेव ही भावना
किती भोळा ग माझा साजना…
जिवलगा प्रीत तुझी वेडी
जमली सात जन्माची जोडी
प्रेमाचा घास हा भरवणा
किती भोळा ग माझा साजना…
आयुष्याच्या या वळणावर
किती प्रेम तुझे माझ्यावर
अबोल प्रित तुझी आज ना
किती भोळा ग माझा साजना…
साजना साथ तुझी अशीच
नित्य राहो जीवनी तशीच
करी ईश्वराची आराधना
किती भोळा ग माझा साजना….
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
फारच सुरेख शब्द मांडणी
आपले मनःपूर्वक धन्यवाद
सुरेख कविता
छान कविता
Thankyou 👍👏🌹
Thankyou 👍👏🌹
खूपच छान मांडणी केली आहे. Congratulations Madam ji.