आज शाल्वीच्या आजीचा पंचविसावा स्मृतिदिन.
तिच्या आजीला जाऊन पंचवीस वर्ष झाली पण तिला आठवते रोजच अजूनही.तिच्याच शब्दात तिची आजी.तिला भावलेली,तिला आठवणारी तिची आजी
तिची आजी-कथामालिका
भाग-१
माझी आजी निरक्षर,खेडवळ,बाकी आज्यांसारखी लडिवाळ नसलेली.थोडी कोरडी भासणारी,कधीही भावना व्यक्त न करणारी माझी आजी.प्रेमाचा ओलावा तिच्यात कमी आहे असे सगळे म्हणत.
पण काही बंध होते ज्याने ती आठवते नेहमी.
आजीबद्दल खूप माहिती नाहीयं मला.
आजी भूतकाळात जास्त रमायची नाही.
आजीला कधी तरी जुन्या गोष्टी आठवल्या कि तिच्या तोंडून सहजतेने काही गोष्टी बाहेर पडायच्या. तिच्या वाट्याला आलेले भोग सांगतांना त्यात कटूता नसायची,भाग्याला दोष नाही कि डोळ्यातून आसवे गाळणे नाही. सामान्य स्त्रियांपेक्षा म्हणूनच ती नेहमीच वेगळी वाटायची. मी बघितलेल्या कणखर स्त्रियांमध्ये आजीचा नंबर पहिला.
आजीबद्दलच्या काही गोष्टी आजीच्या तोंडून तर काही ज्या गावात ती ऐंशी वर्ष राहली तिथल्या लोकांच्या तोंडून ऐकलेल्या.
आजी— कथेची सुरूवात जवळपास शंभर वर्षापूर्वीची.
एक छोटेसे खेडे.घरात दोन बहिणी आजी-सीताई आणि आजीची लहान बहीण -रमाई
सीताईचे खेडे अतिशय रमणीय. गावात झूळुझूळु वाहणारी नदी,आजूबाजूला डोंगर,चहूबाजूने झाडेच झाडे,माया लावणारी माणसे.संपूर्ण खेडे म्हणजे एक कुटुंबच जणू.
सीता आणि रमाईची माय या दोघी लहान असतांनाच गेली. वडिलांनी सावत्र माय माया लावणार नाही म्हणून दुसरे लग्न केले नाही. वडिलांकडे थोडी शेती होती. शेतीमध्ये कष्ट करायचे आणि आलेले उत्पन्न वर्षभर पुरवायचे हाच प्रघात वर्षानुवर्षे पाळल्या जात होता.कमी उत्पन्नात आनंदाने जगण्याचे कसब त्या पिढीत होतेच.जसे आयुष्य आहे तसे चालत राहायचे.अपेक्षा नाही ,स्वप्न नाही त्यामुळे स्वप्नपूर्तीचा ध्यासही नव्हता.
सीताई घरात मोठी म्हणून सगळी जबाबदारी तिच्यावर.जबाबदारीच्या ओझ्याने तिला आणखी मोठे बनवले.
दळण दळणे,गायीचे दूध काढणे,सडा,सारवण ही सगळी कामे तिच्यावर येऊन पडली. या कामांनी तिची संगत कधीच सोडली नाही. वडील शेतातील कामात व्यस्त असायचे. रमाई लहान होती.
तिच्या आयुष्यात बरीच नवीन माणसे येत गेली,जात गेली. पण जबाबदाऱ्या आणि कष्ट यांनी सीताईची पाठ कधी सोडली नाही. तिच्या स्वभावात ह्या दोन गोष्टी एवढ्या भिनल्या कि ती सुखाचे दिवस येऊनही या गोष्टींना तिलांजली देवू शकली नाही.
दोघींमध्ये सीताई बोलकी आणि कामसू होती.रमाई अबोल होती. सीताईला कामाची आवड होती.झाडे,प्राणी,पक्षी यांच्यात तिचा जीव रमायचा. तिच्या माहेरी कायम एक कुत्रा आणि एक पोपट राहायचा.तिच्या कुत्र्याचे नाव मोती आणि पोपटाचे नाव राघू ठेवले होते तिने. सीताई सगळ्यांना आवडेल अशीच होती.
नदीच्या आसपास गारगोट्या मिळायच्या.त्या घरी आणून कुटून दोघी बहिणी त्याची रांगोळी बनवायच्या. अंगणात तिच्या आईने लावलेले तुळशीचे झाड होते.सीताईने मातीचे थर देऊन देऊन तिला जमेल तसे वृंदावन बनवले होते.
घरातील प्रत्येक खोलीची किनार आधी ती पांढऱ्या मातीने सारवून घ्यायची आणि मग बाकीची खोली शेणाने सारवायची. वडील म्हणायचे रोज नको सारवू पण सीताई नाही ऐकायची.तिच्या अंगणातच एक उंबराचे मोठे झाड होते. झाडाखाली पार बांधला होता.दगड आणि मातीचा.तो पारही ती सारवायची.
सीताईची माय असतांना आजूबाजूच्या बाया कामातून जरा उसंत मिळाली कि येऊन बसायच्या. आता सीताई आणि रमाई दोघीच पारावर काहीतरी खेळत बसायच्या.
सीताईची सखी होती एक जना.
ती दिवसभर सीताईसोबतच असायची.रमाईला माय जास्त आठवायची नाही.सीताई जवळ होत्या मायच्या आठवणी.
कधी पारावर एकटी बसली कि मायला आठवत बसायची.
तेव्हा फोटो काढणे हा प्रकार नव्हता.
जेवढे डोळ्यात साठवलेले तेवढेच आठवायचे.
सीताई आणि रमाईचे पितृछत्रही लवकरच हरवले.
सीताईचे वडील गेले.दोन्ही बहिणी अनाथ झाल्या.
आता काकाकडे दोन्ही बहिणींची जबाबदारी आली.
सीताईला चौदा वर्ष झाले.त्याकाळाच्या मानाने तिचे लग्न करायचे वय झाले होते.थोड्या अंतरावर एका गावात कृष्णापूरला सधन कुटुंब होते. मुलगा एकुलता एक. मुलाला आई नव्हती.
त्याचे नाव राम.लिहिता वाचण्याएवढे शिक्षण झालेला राम स्वभावाने शांत होता.आपल्या सीताईसाठी हाच मुलगा योग्य राहील असा विचार करुन काकाने रामच्या वडिलांशी बोलणे करुन लग्न जुळवले. रमाई आता एकटी पडणार होती.सीताईने आईच्या मायेने तिला सांभाळले होते.
त्याकाळच्या रीतीनुसार सीताई आणि रामने लग्नापूर्वी एकमेकांना बघितले नव्हते.
लग्न झाले. रामने पहिल्यांदा त्याच्या नववधूला बघितले.
त्याला आवडली सीताई. जन्मभराचे जोडीदार बनले होते आता ते.
सीताई लाजून चूर झाल्यामुळे नजर वर करुन रामकडे बघू शकली नाही.
तिचे रमणीय गाव,रमाई,मोती,राघू सगळ्यांना सोडून सीताई नवीन गावात,नवीन घरात,नवीन माणसात आली.
सासरच्या घरात पहिलेच कार्य होते.थाटात पार पडले.सीताई घरातील मोठी सून.सगळ्यांना आवडली. सीताईने कृष्णापूरला आल्यावरच रामला बघितले.
काकाला वाटले तसे रामचे छोटे कुटुंब नव्हते.रामची आई त्याच्या लहानपणीच गेली त्याचा सांभाळ काकुने केला.एकत्र कुटूंब होते.चुलत नणदा,दीर असे माणसांनी भरलेले घर होते. माहेरी सीताईला कमी माणसात राहायची सवय होती. इथे मोठ्या कुटूंबातही ती सामावली गेली. तिचा बोलका स्वभाव अजून खुलला. राम अबोल होता.
क्रमशः
सीताईचे रामबरोबर लग्न झाले.पुढे त्यांचा संसार कसा बहरत गेला….वाचत रहा ‘तिची आजी’ कथामालिकेत.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खूप छान
माझ्या आजीची आठवण करून दिली तू प्रिती….. खूप छान
आजी आवडली.
सुंदर कथानक
पुढील भाग वाचायला खूप उत्सुक आहे.