२- तिची आजी-marathi story
बोलकी,कामसू सीताई तिचे गाव, तिची माणसे सोडून अबोल रामबरोबर सासरी आली.आता पुढे ……
भाग-२ -तिची आजी
सीताईचा नवीन संसार सुरु झाला. घरात माणसे जास्त म्हणून कामेही खूप. सीताईला आईवडील नाही म्हणून काकू खूप जपायच्या तिला.
सीताईच्या नशिबाने इथेही तिच्या माहेरसारखीच नदी होती.ती नणदांसोबत रमतगमत नदीवर कपडे धुवायला जायची.
विशेष म्हणजे त्यांच्या शेतात नदी ओलांडूनच जावे लागायचे.
सीताईला असलेली प्राणीपक्ष्यांची आवड रामला समजल्यावर त्याने तिच्यासाठी एक पोपटाची जोडी आणली. सीताईने त्यांची नावे राघू आणि मैना अशी ठेवली.
आपल्यासारखीच आहे यांची जोडी असे रामने म्हणताच सीताईने लाजेने चेहरा दुसरीकडे वळवला.पण त्याचे हे वाक्य तिच्या कायम स्मरणात राहिले.
राम दिवसभर शेतीच्या कामात मग्न तर सीताई घरच्या.एकमेकांसाठी दोघांना फार कमी वेळ मिळायचा.
जो काही वेळ मिळायचा तो फक्त रात्रीच. रात्री मग कधी कधी राम आधीच्या गप्पा सांगायचा तिला.तिला लिहावाचायला शिक म्हणून आग्रह धरायचा. पण सीताईला लिहिण्यावाचण्यात रस वाटायचा नाही.
खेड्यात रात्र लवकरच व्हायची.सात वाजले कि सगळेजण आपापले जेवणे आटोपून निजायला जायची.वीज नसल्यामुळे सूर्याच्या प्रकाशात सगळी कामे करावी लागायची.
सीताईला कामे खूप राहायची पण ती ते आवडीने करायची. कपडे धुवायला नदीवर जायची. अगणातच असलेल्या व विहिरीचे पाणी झपझप ओढायची.
हरिदास नेहमी म्हणायचा,
भाभी इथे पाणी भरायचा जिम्मा माझ्याकडे आहे.
पण सीताई तो यायच्या आधीच पाणी भरुन ठेवायची.अंगणात अंगधूनी होती.त्यामुळे बायांची आंघोळ पहाटेच व्हायची. पाच वाजता उठून चूल पेटवायची.पाणी गरम करायचे.लगेच बाजूला(उल्हा म्हणायचे त्याला) चहा ठेवायचा. चहा झाला कि तुरीची डाळ मांडायची. मग तव्यावर लाल मिरची भाजून त्यात लसूण,जिरं टाकून त्याचे वाटण बनवायचे.मग भाकरी,भाजी असे सर्व चालायचे. हातावर एकेक भाकर करुन ती निखाऱ्यावर भाजावी लागायची. भाकरी भाजता भाजताच पुरुष मंडळीची जेवणे आटपायची. चूल एकदा पेटवली कि सगळे आटोपल्याशिवाय विझायची नाही.
घरात आठदहा माणसांचा स्वयंपाक, घरी दोन गडी होते त्यांचेही जेवण सीताईच बनवायची.काकुने मोठी सून
म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर टाकली. सीताई रमली तिच्या नवीन माणसांमध्ये.
तिला इथे जीवाभावाची मैत्रीण भेटली पूर्णा. बाजूलाच राहायची.बालविधवा होती ती. मुलबाळ नसलेल्या,
एकटी असलेल्या पूर्णाला सीताईचा आधार वाटायला लागला.
राम सीताईचा संसार सुखाचा चालला होता.
वर्षभरात सीताईने मुलीला जन्म दिला.
रामने तिचे नाव दया ठेवले. खूप दिवसांनी लहान मुल घरात आले. दयाचे सगळ्यांनी खूप लाड केले.रामचे चुलत बहिणभावांच्या दया खूप लाडकी होती. तिच्या पाठीवर तीन वर्षांनी प्रभाकर जन्मला. नातवंडांचे मुख बघितले आणि रामचे वडील गेले. रामचे वडील रामसारखेच स्वभावाने शांत होते. सीताईला त्यांनी मुलीसारखे जपले होते.
इकडे सिताईच्या बहिणीचे रमाई चे लग्न झाले.दोन्ही बहिणी शेजारी राहाव्या म्हणून तिला बाजूच्याच गावी दिले.
तेव्हा बसेस् नव्हत्या. कुठे जायचे तर पायी किंवा बैलगाडीने जावे लागायचे. बहिणी जवळजवळ असल्या तरी त्यांच्या भेटी कमी व्हायच्या.रमाईच्या लग्नाला राम,सीताई गेले होते.रमाईला सीताईशिवाय कोणीच नव्हते म्हणून ती आठदहा दिवस आधीच गेली. माहेरी रमाईरुपी एकच बंध होता तोही आता तुटला होता. सीताईची मैत्रीण जनाचेही लग्न झाले होते.रमाईला जनाईच्याच गावी दिले होते. सीताई लग्न आटोपून सासरी परतली. रमाईचे सासर कसे असेल ही काळजी वाटत होती.
प्रभाकर नंतर तीन वर्षाने मनोहरचा जन्म झाला.
रामच्या चुलत बहिणी आणि भावांचे लग्न रामने करुन दिले . बहिणी लाडक्या होत्या त्यामूळे त्यांना गावातलेच साजेसे मुले शोधून लग्न लावून दिले.रामचे काका,काकु आता थकले होते.
मनोहरनंतर श्रीधर आणि सगळ्यात छोट्या गीताचा जन्म झाला.दिवस भराभर पुढे जात होते. मुले मोठी होत होती. रामने दया,प्रभाकर आणि मनोहरचे नाव बाजूला असलेल्या गावातील शाळेत टाकले. रामला शिक्षण फार महत्वाचे वाटत होते. तिन्ही बहीणभाऊ दहा वाजता शाळेत जायची ती संध्याकाळीच परतायची.अभ्यासात तिघेही हुशार होती.वर्गात पहिला,दुसरा नंबर पटकवायची.
क्रमशः
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान कथा
गावाकडील जीवन छान रंगवले
अप्रतिम
छान!
पुढील भाग वाचायला खूप उत्सुक