मराठी निसर्ग कविता
डोंगराच्या आड
डोंगराच्या आड
क्षितिजाच्या पल्याड
काय असेल बरे
वेगळे जग कि
दूसरे आभाळ
तिथे नसेल का चंद्राला
लागणारे ग्रहण
महिन्यातून येणारी अमावस्या
अन् सूर्याचा कोप
कि असेल फक्त
आभाळभर पसरलेल्या चांदण्या
आणि त्यांना कवेत धरणारा शशी
तिथेही असेल का तुटणाऱ्या ताऱ्याला
अतृप्त स्वप्ने मागण्याची सोय
आणि ती स्वप्ने लगेच पूर्ण
करणारे तारे
काय असेल नक्की
डोंगराच्या आड
क्षितिजाच्या पल्याड
काय असेल बरे?????
पाऊस असेल का तिथे
इथल्यासारखाच हट्टी?
कि थांब म्हणता थांबणारा
अन् ये म्हणता येणारा?
तिथे असेल का दवात भिजलेली वाट
आणि वाटेवर स्वप्नातल्या कळ्या.
काय असेल तिथे
इथल्या सारख्या तुडूंब वाहणाऱ्या
नद्या कि सुखाचा पूर
सागरासारखी भरती ओहोटी
कि फक्त सुखाच्या लाटाच लाटा
त्या लाटा अंगभर पांघरता येतील?
बघूया का शिडी लावून
डोंगराच्या आड,क्षितिजाच्या पल्याड
नक्षत्रांच्या वेली अन् तारकांची फुले
असतील का तिथे?
डोंगराच्या आड
क्षितिजाच्या पल्याड
काय असेल बरे?????प्रिती
मी निसर्गाची जवळची आप्त
कधी वाटतं मी
गर्द वनराईतील
एक झाड बहरलेलं
कधी माळरानावरचं
एकटंच उभं असलेलं
कधी वाटतं मी
एक वाहणारी नदी
कधी वाटतं मी
अथांग पाण्याचा एक डोह
कधी भरून आलेलं आभाळ
कधी निळं निरभ्र आकाश
कधी ओघळणारं
दुधाळ चांदणं
कधी आकाशात लुकलुकणारी
एक चांदणी
सतत संमोहित करतो हा निसर्ग मला परत परत
डोळे भरून डोळ्यांत साठवत ठेवला तरीही
नजर त्याला पाहत राहते
स्तिमित होऊन परत परत
ही गर्द वनराई
आकाशाला टेकणारे
उत्तुंग डोंगर
तळाशी विसावलेली
विखुरलेली घरें
भातशेतीची हिरवीगार खाचरे
जशी शाश्वत शांतता
इथेच आहे घर करून
जणु परमेश्वराने वास
इथेच केला आहे
प्रसन्न होऊन
कधी वाटतं
मी निसर्गाची एक जवळची आप्त
माणसांच्या जगात राहुनही
मनाने तटस्थ अलिप्तसौ वीणा विश्वास चव्हाण
हिरवं कोकण- निसर्ग कविता
पावसाळ्यातलं कोकण
एकदम डोळ्यांत भरणारं
गडद हिरवं, प्रसन्न
झाडं, वेली, पाना फुलांनी
बहरलेलं
हिरवाईच्या कित्येक छटा
कुठे माळरानावरच्या पोपटी
कुठे हिरव्या तपकिरी
कुठे आताच जन्मलेल्या
कोवळ्या हिरव्या पाती
काळ्या पांढऱ्या ढगात
गुडुप झालेले
हिरवे डोंगर
दरीतुन वर वर येणारा
धुक्याचा दाट पडदा
खडकाखडकांतुन जन्मलेले निर्झर
आणि फेसाळ शुभ्र धबधबे
नागमोडी वळ्णावळणाचा रस्ता आणि
नितळ शुभ्र पाण्याने
भरलेल्या नद्या
वयाने जडत्व आलेलं
मन देखील अल्लड होऊन जातं
मनाचा मोर
धबधब्याखाली भिजतो आणि पावसाच्या सरींबरोबर
ओठांवर गाणी येतातसौ वीणा विश्वास चव्हाण
मोगरा फुलला
हा मोगरा सुगंधी
मनास मोहवून जाई
दरवळे सुवास हळुवार
अंतर्मन प्रसन्न होई।।1।।
येता झुळूक वाऱ्याची
डोले मोगरा लतिकांसवे
शुभ्र चांदण्या चमचमती
जणू भासे नभिचे दृश्य नवे।।2।।
माळूनी गजरा केसांमध्ये
धुंद होऊनि रातीला
वाट पहाते सख्या साजणा
येऊनि घेना मिठीत मजला।।3।।
आपसूक गीत येई ओठी
मोगरा फुलला मोगरा फुलला,
दरवळे सुगंध सांजवेळी
हर्ष सुवासिक मनोमनी जाहला।।4।।
सौ. पद्मजा जोशी
कळी कळी बहरली
आज माझिया अंगणी
कशी सृष्टी हि नटली
झाडे नि लतीकांवरी
कळी कळी बहरलीमंद सुगंध सर्वत्र
जाईजुई चमेलीचा
नाद घुमतो मंजुळ
गोड ध्वनि कोकिळेचाआज हिरवाई जणू
नवी नवरीच वाटे
मना मनात सुगंध
हर्षुनी अंकुर फुटेलागे चाहूल मनात
गोड श्रावण गीतांची
वाट पाहती आशेनं
लेकी या सणावारांचीचला या झाडाफुलात
रमू जाऊन बागेत
कळी फुलांच्या संगत
नाचू गाऊ आनंदातनाचू गाऊ आनंदात,,,,
✍️ सौ. पद्मजा जोशी
पुसद
निसर्गात होतो विसर्ग मी पणाचा
वाहणाऱ्या पाण्याचा
खळखळाट
अगदी कान भरून ऐकते मी
समोर उन्नत डोंगर हिरवाईने सजलेले
डोळे भरून पाहते मी
घनगर्द जंगलं भोवताली
पक्षांचे सरमिसळ
आवाज ऐकते मी
हिरव्या शेतांची
मखमल चहूकडे
डोळ्यात साठवत
राहते मी
ऐकते मी घंटानाद
देवळातला
आणि हात जोडते
मनोमन देवाला
जाणवतं राहतं त्याचं
अस्तित्व
या चराचरात
प्रत्येक क्षणाला
मातीत, झाडाफुलांत
पानापानांत
निसर्गाच्या इतक्या
निकट सानिध्यात,
प्रगाढ शांततेत
नकळत होऊन जातो
विसर्ग
मी पणाचा आणि
जाणवत राहतो
आपला खुजेपणा
निसर्गा समोरचासौ वीणा विश्वास चव्हाण
एक अनुपम सोहळा
गावाकडची सकाळ
म्हणजे
एक अनुपम सोहळा
पक्षांच्या मधुर किलबिलाटाने
लवकरच आटोपलेली साखरझॊप
बाहेर पाहताना झुंजूमुंजू
शब्दाची पुरेपूर प्रचिती
यावी अशी
हलक्या हलक्या पावलांनी
येणारी पहाट
थोडासा काळोख
धुक्याचा गडद पडदा
अनेक पक्षांचा किलबिलणारा
मधुर संमिश्र आवाज
खूप खूप प्रसन्न वाटायला
लावणारी ही अनुभूती
परत परत अनुभवून घ्यावी
ताटव्या ताटव्यात उमलणाऱ्या
अर्धोन्मीलित कळ्यावरचे दवबिंदू
हलकेच स्पर्शून घ्यावेत हाताने
आणि फुलू द्यावे त्यांना
त्यांचा सुगंध पसरवीत
आसमंतात
वाहणाऱ्या वाऱ्याने
पूर्व दिशेची लाली परत परत
पाहत राहावी
अनिमिष नेत्रानीं
चैतन्य पसरवत
वर येणारा सूर्यादेवाचा
लाल बुंद गोळा
भरून घ्यावा मनात
करून त्याला अभिवादन
दाही दिशांत पसरणारी
त्याची कोंवळी सोनकिरणे
उमललेल्या फुलांचा सुगंध
पक्षांचा किलबिलाट
समोरून खळखळ करून
वाहणाऱ्या पाण्याचं संगीत
देवळातला घंटानाद
हिरवीगार वनश्री
आणि
हवेतला सुखद गारवा
अनुभवावा आणि अनुभूती घ्यावी
असाच असतो हा सोहळा
अनुपम आणि प्रसन्नसौ वीणा विश्वास चव्हाण
झरा-निसर्ग कविता
डोंगराच्या कुशीत
खडकाळ भूमीत
पाझरतो झरा…वळणाची वाट
तुडवीत सुसाट
खळाळतो झरा…उंच कड्यावरून
डोंगर दरीतून
नाचतो झरा…शमवित तहान
भिजवीत रान
वाहतो झरा…नितळ निळाई
हिरवी वनराई
जपतो झरा…सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते )
नको अवहेलना वसुंधरेची
एक व्यक्ती एक झाड
करु सारे वृक्षारोपण,
तरच मिळेल भावी पिढ्याना
जगण्यापुरता ऑक्सिजनझाली उजाड रानोमाळे
बोडखी सारी डोंगरे,
करुनि कत्तल वृक्षांची
मानव ऑक्सिजन सवे फिरे,,,,अवनी ही भुकेली
वृक्ष, पाण्याविना,
लाव रोपटे मानवा
नको बनु अति शहाणा✍️ सौ.पद्मजा जोशी
पुसद
गावाकडची नदी
कोणे एके काळी वळखंण व्हती
वाहणारी नदी गावाची शान
आता मातर गावोगावी
नद्या झाल्या समध्या कचरा घाण,,,,,सांगताना बी यायची
मजा तवा गावाचं नाव
नदीतीरावर वसलाय
माझा साजिरा गाव,,,,माझ्या गावाची नदी
देते वळख शहराची
खळा खळा वाहे जशी
ग्वाहीच देई समृद्धी ची,,,,आता समद्या नद्यांचा
दमच घुटून ऱ्हायला
प्लास्टिक च्या कचऱ्यात
रस्ताच नाही वाहायला,,,,या नद्यांच्या नाड्या बी
तुडुंब झाल्या केरान
हे काय कमी म्हून
रुसवा बी केला या पावसानं,,,,,,जागोजागी झालीआता
झाडा जंगलाची वाणवा
कसा बरं पाऊस पडल
इचार कर रे शहाण्या मानवा,,,,,,जागा होऊन आतातरी
धर पर्यावरनाची कास
झाडं लावून जागोजागी
घेऊ दे माणसाले मोकळा श्वास,,,,,,तवा पुन्हा एकदा वाहतील
नद्या दुधड्या भरभरून
गाव बी वळखुयील माझा
खळाळत्या नदिच्या तीरावरून,,,,वाहत्या खळाळत्या नद्या
हिच श्रीमंती आपली
पाण्या इना सारी रानंशेत जागजागी सुकली,,,
नका टाकू कोणी प्लॅस्टिक
अन कचरा आता नदिमंदी
वळखून घ्या समध्ये राजे हो
ही तर हाये धोक्याची नांदी,,,,,,,ही तर हाये धोक्याची नांदी,,,
✍️सौ.पद्मजा जोशी
निसर्ग काव्य
मन जाई हरखुनी
झाडा नि फुलांच्या सवे,
नव्या जोशात पसरती
पहाटचे सूर्य किरण नवे,,,,दिसती हिरवेगार डोंगर
माळराने वधुसम नटलेली,
भासे जणू यौवनाच उभी
कंचहिरवा शालू ल्यालेली,2त्या खळाळणार्या नद्या
वाढवी रंगत निसर्गाची,
ती मंजुळ साद ऐकू येई
गोड किलबिल पक्षांची,,हा निसर्ग देई शिकवण
जणू मानवास क्षणोक्षणी,
जगा स्वछंद पाखरांसम
बेधुंद हुंदडूनी मनोमनी,,,हा लपुनी डोंगरा पल्याड
भास्कर उधळी लाल तांबडे रंग,
डुंबताना भासे जणू खेळतसे
रंगपंचमीच जणू निसर्गाच्या
संग,,,सौ.पद्मजा जोशी
जतन पर्यावरणाचे
जप रे मानवा पर्यावरणाला
मूकशिल नाही तर प्राणाला,
नकोस प्रदूषण वाढवू असा
असह्य होशिल घेण्या श्वासा ।।1।।करू नको तू वृक्षतोड अशी
उजाडू नको धरणी मातेची कुशी,
तुझिया कारणे रख रखली धरणी
अंत नको पाहु करशील पाणी पाणी ।।2।।पाण्याविणा कैसे हे जीवन
संकल्प करू या मिळूनि आपण,
वृक्ष तोड ती बंद करूनिया
प्रत्येकाने झाड लावूनी पर्यावरणाचा समतोल राखू या ।।3।।असेल वसुंधरा हिरवी गार
मानव राहिल विना आजार,
सुजलाम सुफलाम असेल वसुंधरा
एक व्यक्ति एक झाड.. मनी पक्का निर्धार करा।।4।।चला मिळुनी करू वृक्षारोपण
करू रोपांचे बालसंगोपन
सुजाण नागरिक हो बदल घडवा
संकल्प करुनी झाडेसौ.पद्मजा जोशी**
पुसदनिसर्ग सौंदर्य
हिरवे तृण लवलवीत
त्यावरी शोभे पुष्प श्वेत ,
वाऱ्यावरी डुलतात धूंद
चहूबाजू सुगंधीत होत….!
वाहे सरिता खळखळून
तरूवेली घे गगन चुंबन,
गिरीराजा चे रूप रांगडे
दृश्य घेई मन मोहून…..!
स्वच्छंद विहरती पक्षी
बनवती नभांगणी नक्षी,
वसु जणू हसते खुदकन
कुंभ पाहूनी नभीच्या कुक्षी…!
असा असो निसर्ग देखणा
सहाय्य करू पर्यावरणा,
झाडे लावू,झाडे जगवू
पाणी वाचवू नित मंत्र म्हणा…!
मनु अतुल
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








